Friday, January 19, 2018

स्त्री-पुरुष सिम्बायोसिस
--------------------------------
सिम्बायोसिस हा शब्द आपण क्वचितच वापरतो. अर्थात जे पुण्याचे आहेत त्यांना हे एका टेकडीवरचे कॉलेज आहे हे माहीत असते. पण ह्याचा अर्थ काय असावा ? तर हे जीवशास्त्रात सांगतात की “दोन जीवांचे एकमेकांना मदत करीत एकत्र राहणे”. उत्क्रांतीकार डार्विन भले 
म्हणू देत की बळी तो कान पिळी, पण जीवशास्त्र सांगते की सिम्बायोसिस हीच उत्क्रांतीची प्रेरणा आहे.
स्त्री-पुरुष संबंधात आदर्श वागणूक ही सिम्बायोसिस पद्धतीची आहे. सिम्बायोसिसचे उदाहरण म्हणून एका माशाचे उदाहरण देतात. ह्याचे नाव आहे क्लाउन फिश. वर विदुषकी थाटाचे पट्टे असलेला जो मासा आहे तोच क्लाउन फिश. हा एका काटेरी जिवाबरोबर राहतो. काटेरी जीव (anemone) त्याच्या काट्याने हल्लेखोरावर विष टाकतो व माशाला वाचवतो व एका स्निग्ध पदार्थाच्या स्त्रवण्याने माशाला त्याच्या विषापासून वाचवतो. क्लाउन फिश त्याच्या विष्ठेने अनिमोनला खाद्य पुरवतो व जे invertebrates अनिमोनवर हल्ला करतात त्यांच्यापासून संरक्षण देतो. ही जोडी जणू “अवघे धरू सुपंथ” असेच म्हणते आहे.

(अर्थात हे झाले साह्यकारी सिम्बायोसिस. कित्येकवेळा एका जीवावर स्वतः वाढणारे बांडगूळ जीवही असतात. हे  म्हणजे ऐजीच्या जीवावर बायजी उदार सारखे व अर्थातच नकोसे उदाहरण झाले.).