Sunday, October 24, 2010

संस्कृतीची ऐशी तैशी !
जर्मनी हा एकमेव असा देश आहे की ज्याने पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी दरम्यानची भिंत संगनमताने तोडून जगाला साहचर्याचा एक आदर्श घालून दिला. आता त्याच जर्मनीच्या चॅंन्सेलर बाई, एंजेला मर्केल, म्हणताहेत की आम्ही बहुविध संस्कृती जोपासण्यात अपयशी ठरलो आहोत. बाई हे खास करून टर्किश स्थलांतरित लोकांबद्दल( हे अवघे ४ टक्के) म्हणताहेत. त्यांचा रोख आहे की बाहेरून आलेले लोक एका संस्कृतीत मिसळत नाहीत, देशाची एकजीव अशी संस्कृती बनतच नाहीय. आणि हे आमचे अपयश आहे.
ऐकायला धक्कादायक असले तरी हे हरघडी व हरठिकाणी दिसणारे वास्तव आहे. आता हेच पहा मराठी लोकांचे पदार्थ खायचे असतील किंवा मराठी पद्धतीचे आकाशदिवे घ्यायचे असले तर आपण घाटकोपरहून दादरलाच जातो. कारण अजून तिथेच हे थोडेफार टिकून आहे. मुसलमान तसे लोकसंख्येने म्हणतात १५ टक्के आहेत पण सकाळी कुठेही बागेत जे लोक मॉर्निंग वाक घेताना दिसतात त्यात हे अजिबात कुठेच दिसत का नाहीत ? मॉर्निंग वॉक घेऊ नये, असे तर काही इस्लाम सांगत नसावा. तसेच तुम्हाला समजा बुरखा विकत घ्यायचाय तर मोहमद अली रोडवरच जायला हवे. घाटकोपरला आताशा सगळीकडे ९० टक्के गुजराथी लोकच आहेत. गरबा दांडीयात इथे जे मराठी लोक राहतात ते का सामील होत नाहीत ? उलट ते दादरला जाऊन मराठी दांडीया खेळतात. दिवाळीला कोणी मुसलमान शेजार्‍याने कोणा हिंदूला मिठाईचा बॉक्स दिलाय असे का होत नाही. उलट एकेकाळी आम्ही तुमच्याबरोबर राहूच शकत नाही ह्या धार्मिक निकषावरच तर आपल्याला वेगळा पाकीस्तान करून द्यावा लागला. म्हणजे एक सामायिक, निदान रोजच्या व्यवहाराची, अगदी जुजबी का होईना, अशी समान संस्कृती का तयार होत नाही ? जर्मन बाई म्हणतात तसे हे आपल्या सगळ्यांचेच अपयश म्हणायचे !
बरे आपण समजा एकवेळ मागासलेले, म्हणून हे आपल्याला जमत नसावे, असे म्हटले तर अमेरिकेतही काही वेगळी परिस्थिती नाहीय. माझी मुलगी तिथली नागरिक होऊन आता २० वर्षे झालीत. पण अजूनही तिथले आजूबाजूचे लोक त्यांना "इंडियन" म्हणूनच ओळखतात. त्यांची मुलेही "इंडियन" ! त्यांना एक धड इंडियन भाषा येत नाही, इंडियन संस्कृती कशाशी खातात हे त्यांना माहीत नाही, तरी ते इंडियनच ! कसले आलेय संस्कृतीचे मिसळणे !
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com