अरुणोदय झाला---१४
विकी-लीक्स फिकी ?
सत्याचे मोठे गमतीचे असते. जोपर्यंत ते माहीत नसते तोपर्यंत त्याचे वेडच असते. पण एकदा उघड झाले की तीच माणसे त्याला तोंडीही लावीत नाहीत. विकी-लीक्स चे असेच होत आहे, होणार आहे.
खरे तर ह्यांची खूप लीक्स अगोदरच लोकांना माहीत होती. आता राहूल गांधी हिंदू दहशतवादाचा बाऊ करणार नाहीत तर कोण करणार ? त्यांनी तो केला तर असे काय मोठे होते ? अमेरिका अफगाणिस्तानाच्या लढाईत नको तिथे निरपराध माणसे मारते हे काय नवीन आहे ?
ह्या खळबळजनक लीक्स नी काहीच कसे जनमानस हलत नाही ? जनमानसात चाललेय तरी काय ? जनमानस तयार तरी कसे होते ?
महात्मा गांधी आयुष्यभर सत्याच्या त्वेषाने जीव टाकत राहिले. अगदी सत्याचे प्रयोग करीत राहिले. ज्या जनमानसाने ह्या नंग्या फकीराला परमोच्च स्थान दिले त्याच्या लेखी तरी त्यांची प्रतिमा आता सच्ची आहे का ? भारतातल्या हिंदूंना वाटते की त्यांनी मुसलमानांची उगाच जरा ज्यास्त बडदास्त ठेवली तर पाकिस्तानातल्या मुसलमानांना वाटते की हे तर कटटर हिंदूच होते. सत्याच्या सत्याग्रहीचे असे चित्र जनमानसात असावे ? बरे जे कधीच खरे नव्हते ते मात्र जनमानसात कोरलेच जाते. जसे गोळी लागल्यावर त्यांचे "हे राम !" म्हणणे. त्यांच्या स्वीय सहायकाने लिहून ठेवलेय की असे ते काही म्हणालेच नव्हते, तरी लोक ते मानायला तयार नाहीत.
शिवाजी महाराजांचेही असेच आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणल्यावर तिला मानाने सोडून देताना तिचा मातेसमान मान केला ( आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही इतके सुंदर झालो असतो ) असे आपण तमाम मानतो. पण इतिहासकार म्हणतात असे काही घडलेच नव्हते. त्याला काही पुरावा नाही. म्हणजे जे झालेच नाही ते जनमानसात लीलया कोरले जाते.
सोनिया गांधी पंतप्रधान नसल्या तरी त्यांच्याशिवाय पान किंवा पगडी हलत नाही हे लोकांना माहीत आहेच. तरीही त्या बिचारीच वाटतात. आता तुम्ही कितीही आकडेवारीने सिद्ध केले की इतके इतके पैसे त्यांनी स्विस बॅंकेत नेले, तरी त्याचा काही उपयोग नाही. जवाहरलाल नेहरू जरा छानछोकीचे होते हे लोकांना माहीतच होते, त्यासाठी माउंटबेटनच्या मुलीने आत्मचरित्रात त्यांचे माझ्या आईवर प्रेम होते असे लिहिले तरी काय झाले ? लाडक्या नेहरूंची प्रतिमा जराही डागाळली नाही. म्हणूनच तर ते लाडके !
शिकार एकट्या दुकट्याने साधत नाही. त्याला सगळ्या कोलाहलाने रान पेटवावे लागते, डंके वाजवत सावजाची कोंडी करावी लागते, तेव्हा सावज आटोक्यात येते. बिचार्या विकीलीक्सला दिवस कठीण आहेत, बलाढ्य अमेरिका त्याच्या हात धुवून मागे लागली आहे, बॅंकांनी त्याची कोंडी केली आहे, आणि थोड्याच दिवसात शिकार्याचीच शिकार होणार आहे ! विकी पडतेय फिकी !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com