Sunday, June 5, 2011

-------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----२२
अलिप्त नग्नता
नग्नता ह्या विषयाला नागडे उघडे करण्याबद्दल श्री. संजीव खांडेकर ह्यांचे अभिनंदन करायला हवे ( संदर्भ: लोकसत्ता : दि.५ जून२०११ "अलिप्त नग्नता" हे जाणीवा सदरात आलेले स्फुट )
लेखाचे नाव जरी "अलिप्त नग्नता" असले तरी समाजात जागोजागी भेटणारा ( समाज-लिप्त ) हा विषय आहे, हे दाखविण्यासाठी श्री.खांडेकर क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान एका मॉडेलने भारत जिंकला तर मी नागडी होईन असे म्हटले होते ह्या बातमीची आपल्याला आठवण करून देतात. योगायोगाने त्याच दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियातली अजून एक बातमीही ह्या विषयाची व्याप्ती अधोरेखित करणारी आहे. बातमी अशी :लंडनच्या वुरसेस्टर कॉलेजच्या लायब्ररीत म्हणे ४० मुलामुलींचा एक ब्रेकफास्ट क्लब आहे, जो दुपारी ३ ते ४ दरम्यान नग्नतेचा ( स्ट्रिपिंग ) प्रयोग करतात. त्यावर लायब्रेरीयनने बंदी घातली. कारण ह्याने इतरांचे लक्ष विचलित होते व हे विनापरवाना कृत्य आहे. त्यावर ह्या विद्यार्थ्यांचे म्हणणे की ही इथली परंपरा आहे व ह्याने कंटाळा टळतो व गर्मीपासून सुटका होते. वाद कसलाही असला तरी नग्नता हा विषय केवळ कल्पनेतला नसून सर्वव्याप्त आहे एवढे तरी ह्या बातमीने ठसते.
नग्नतेचे तात्विक चिंतन वा समर्थन करण्यासाठी श्री.खाडेकर ज्या फ्रेंच तत्ववेत्त्याचा ( जॅकस्‌ लाकान्‌ Jacques Lacan ) उल्लेख करतात ते संभ्रम निर्माण करणारे आहे. हे ह्या लाकान्‌ महाशयांच्या एकूण चरित्राला साजेसेच म्हणावे लागेल . ( कारण फ्रॉईडचे शिष्यत्व पत्करूनही त्यांना फ्रॉईडवाद्यांनी बहिष्कृतच केलेले होते.). खांडेकर म्हणतात तशा "गेझ"चे नव्हे तर "मिरर स्टेज"चा निर्देश लाकान्‌ करतो. तो नेणीव हेच वास्तव असे मत मांडणार्‍या फ्रॉईडचा शिष्य असला, तरी त्याला, ईगो हा एक भ्रम आहे, नेणीवेतून तयार झालेला आहे, असे "मिरर स्टेज"च्या उदाहरणाने दाखवायचे होते. मुलाच्या विकासातला महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा मूल स्वत:ला ओळखायला लागते तो. त्याच "मिरर स्टेज" बद्दल तो म्हणतो, की सहा महिन्याचे मूल, जेव्हा त्याचा त्याच्या शारिरिक अवयवांवर अधिकारही चालत नसतो, आणि ते जेव्हा आरशात पाहते व स्वत:ला त्या प्रतिबिंबात ओळखते तेव्हाच त्याची स्वत्वाची जाणीव ( ईगो ) निर्माण होते. प्रतिबिंब म्हणजे ते मूल नसते . तो त्याचा भ्रमच असतो असे लाकान्‌ आपल्याला सांगतो. त्याला तो "मिस-रेकॉग्निशन" असेही म्हणतो. हे असे का होते ह्याचे समर्थन तो नेणीव ही भाषाशास्त्राच्या अंगाने स्वची जाणीव करून घेते असे दाखवतो. ( पहा: आधुनिक समीक्षा-सिद्धान्त ले: मिलिंद मालशे, अशोक जोशी पृ.२२६ ते २२९ ) आणि इगो हा भ्रम आहे असे मानतो.
ह्याचा नग्नतेशी काय संबंध पोचतो असे कोणालाही वाटू शकते. कदाचित आपले शरीर म्हणजेच आपण, असे ईगोला वाटणे हेच ह्या नग्नतेच्या जाणीवेच्या मुळाशी असावे. एका गोष्टीने हे स्पष्ट करता येईल. गोष्ट अशी : एका नर्तिकेला गौतम बुद्धाची सेवा करावी असे मनात येते. तिचा पेशाच असल्याने कामुक नर्तन करणे एवढेच तिला अवगत होते. गौतम बुद्ध तयार होतात. ती त्यांच्या पुढ्यात नाच करू लागते. करता करता ती एकेक कपडा अनावृत्त करीत जाते ( म्हणजे स्ट्रिपिंग हो, ). संपूर्ण नग्नावस्थेत जाऊन नर्तन झाल्यावर ती थांबते. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की का थांबलीस ? ही जी तुझ्या शरीरावरची चामडी आहे तीही, कपडयासारखी उतरवून टाक ना ! आपल्या गीतेत नाही का सांगत की शरीर जीर्ण झाले की जुन्या कपडयासारखे आपला आत्मा ते बदलतो व नवीन शरीर धारण करतो. आपले शरीर म्हणजेच आपण, असे वाटणे हेच ह्या नग्नतेच्या जाणिवेच्या मुळाशी आहे, ते असे.
बाजारपेठेतला नग्नतेचा भाव व कदाचित त्या भावाचे घसरणे ह्या बद्दलचे विवेचन मात्र खांडेकरांचे अचूकच आहे. ह्या बद्दल माझा स्वत:चा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. आज २० वर्षांपूर्वी मी नोकरीनिमित्त वेस्ट ईंडीज येथे चार वर्षे होतो. तिथे मुक्त अमेरिकन संस्कृती नांदत होती, व ५० टक्के लोक भारतीय वंशाचे होते. पण ते वेशभूषेत अगदी पाश्चात्यच असत. भारतातून नुकत्याच तिथे गेलेल्या आमच्या साडीतल्या बायका पाहून त्यांना खूपच गंमत वाटे. शरीराचा जो भाग भारतीय साडी झाकते तो त्यांच्या पोशाखात उघडा असे, तर ते जो भाग झाकीत ( साडीतला ओटीपोटाचा भाग, बेंबी वगैरे ) तो भारतीय साडी बिनदिक्कत उघडा ठेवी. हे त्यांना फारच सेक्सी वाटे. ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करू लागलो तेव्हा आमच्या बायकांनीही साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली. आता तो त्यांना नॉर्मल वाटू लागला. अगदी क्लीव्हेज दिसले तरी ! शेवटी सौंदर्य काय आणि नग्नता काय, ही पाहणार्‍याच्याच दृष्टीत वसते नाही का ? ( मी एकदा माझ्या दोन वर्षाच्या नातवाबरोबर गाण्याच्या सीडीज घेत होतो. चित्रात ऐश्वर्या राय हिची एक मादक पोज होती . माझी नजर, "जशी पाप्याची नजर वळावी, अनोळखीच्या वक्षावरूनी " फिरत होती, तेव्हाच माझा नातू मला दाखवत होता व त्याला तेव्हा अवगत असलेल्या शब्दात म्हणत होता, "अजोबा, नाईस दुदू नो ?").
असेच आपण कोणत्या वेळी कोणता दृष्टिकोण ठेवतो, त्यावरही नग्नतेची श्रेणी अवलंबून असते. ह्याचे उदाहरण असे : माझी मुलगी अमेरिकेत हायस्कूल ( आपल्याकडचे ज्युनिअर कॉलेज, १२ वी पर्यंत ) मध्ये सायन्स शिकवते. तिथल्या मुली अगदी तोकड्या अशा शॉर्टस्‌ घालून वर्गात येतात. वर्गात चाललेले असते शिक्षण व त्यात असा मादक पोशाख, हे माझ्या मुलीला योग्य वाटेना. तिने एक युक्ती केली. ती दुसर्‍या एका मुलीच्या हाती टेप देई व तिला उशीरा व तोकडी शॉर्ट घालून आलेल्या मुलीच्या शॉर्टची उंची मोजायला सांगे. समजा ५ इंच ( सगळ्या जगात जरी सेंटीमिटर्स मध्ये मोजमाप असले तरी अजून अमेरिकेत इंचच वापरतात ). आता ती त्या शॉर्टवाल्या मुलीला त्याचे सेंटिमिटर मध्ये रूपांतर करायला सांगे. अगदी कॅलक्युलेटर घेऊन. जर बरोबर आले, तर वर्गात बसू देई. नसता नाही. ह्याने परस्पर जरा लांब शॉर्ट घालावी हा संदेश जाई व वर्गात शॉर्ट पेक्षा गणिताचे, शिक्षणाचे, महत्वही ठसवल्या जाई.

--------------------------------------------------------------------------------

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com