---------------------------------------------------------------------------------------------
अरुणोदय झाला----२४
हीना रब्बानी खार !
भारतीय माणूस, मग तो मुस्लिम असो वा हिंदू, पाकीस्तानवर जरा खार खाऊनच असतो. पाकीस्तानशी बोलणी करताना त्याला नेहमीचे सर्व हातखंडे पाठ झालेले असतात. आम्ही मुंबई हल्ला काढला की त्यांनी समझौता एक्स्प्रेस काढायची, आम्ही घुसखोर काढले की त्यांनी बलुचिस्थान मध्ये होणारे हल्ले काढायचे. काश्मीर तर नेहमीचाच प्रश्न असतो. तशात पाकीस्तानने हीना रब्बानी खार ह्या ३० वर्षीय सुंदरीला परराष्ट्रमंत्री म्हणून भारतात पाठवावे हा खरेच एक मास्टरस्ट्रोक म्हणता येईल अशी चाल आहे. आणि त्यात एक प्रकारचे अप्रतीम काव्यही आहे. कसे ? अहो, ज्या पाकीस्तानावर आपण कायम खार खाऊन असतो त्यांनी त्यांचा परराष्ट्रमंत्रीच "खार" नावाचा पाठवावा ? म्हणजे हे अगदीच जशास तसे झाले !
शिवाय नेमेचि येतो मग पावसाळा सारख्या नेमाने होणार्या शांततेच्या बैठकी किती कंटाळवाण्या व्हायच्या. आणि आता पहा बरे ! बाईंवरून नजर हटत नाही इतके सौंदर्य ! किती माफक आणि भारी साजश्रृंगार ! १७ लाख रुपायांची म्हणे नुसती पर्स आहे. बिर्किन्स नावाच्या ब्रॅंडची आणि गॉगलही काय सुरेख, डोळ्यांना म्हटले तर लपवणारा, म्हटले तर खुलवणारा ! उंचनीच बाई, बोलतेही किती आर्जवी ! पाकीस्तानचे आता ऐकायला हरकत नाही !
आता भारतानेही ह्यापासून धडा घ्यायला हवा व आपला परराष्ट्रमंत्री असाच देखणा ठेवायला हवा. जर शशी थारूर ह्यांना परत आणू शकत नसतील तर त्यांची नववधू सुनंदा पुष्कर ही ह्या हीनाला तोडीस तोड होईल ! राहूलने स्वत: जरी अजून लग्न अथवा नारीवलय जवळ केलेले नसले तरी जरा देखणे लोक राजकारणात ठेवावेत म्हणजे आपल्या देशाचा टीआरपी जरा तरी वाढेल. हिलरी क्लिंटन बाईंचे नित्यनूतन बदलणारी केशभूषा पाहून सोनियांनीही जरा स्फूर्ती घ्यायला हरकत नाही.
माणसांचा तसाच देशांचा मूळ स्वभाव काही जाता जात नाही म्हणतात. पाकीस्तानाचा स्वभाव पहिल्यापासूनच उलटे बोलण्याचा, उलटे करण्याचा आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग ह्या "हीना रब्बानि खार" बाईला नेमताना त्यांच्या मनात नेमके उलटे नसेल ह्याचा काय भरवसा ? काय असेल ह्या बाईच्या उलटे ?--- हीना रब्बानि खार--ह्याच्या उलटे काय होते बरे ? अरेच्चा ! ते होते : रखा निब्बार नाही ! निब्बर नाही म्हणजे मऊ आहे, हेहि चांगलेच आहे म्हणायचे ! उलटे अथवा सुलटे बाईच जिंकते की !
-------------------------------------------------------------------------------------------
Wednesday, July 27, 2011
Wednesday, July 13, 2011
कवितांच्या प्रतिमा--प्रतिमांच्या कविता
कै.पु.शि.रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या अंकात ( कविता-रती मार्च-जून २०११ ) प्रा.गंगाधर पाटील ह्यांचा एक "गाणारं झाड" नावाचा रेगे यांच्या आठवणींवरचा लेख आहे. त्या लेखात त्यांनी रेगे ह्यांना कशा काही कविता "दिसत" असत व ते लगेच त्या टिपून घेण्यासाठी रात्री उशाशी कागद-लेखणी ठेवीत असत असे सांगितले आहे. चक्क दिसलेली कविता व जोडून मोडून केलेली कविता ह्या संबंधी आपल्याला नेहमीच कुतुहूल असते. काही प्रमाण असो वा नसो, एक असे वाटत असते की जी कविता अशी "दिसते" ती दैवीच म्हणावी लागेल. ( मराठीतल्या विदुषी दुर्गा भागवत ह्या ग्रेस ह्यांच्या कवितांना असेच विशेषण लावीत. ). अशा दैवी कवितात कोलेरिज ह्यांच्या "कुबला-खान" ह्या शंभर ओळींच्या कवितेला सर्वात उच्च स्थान असावे, कारण ती म्हणे त्यांना शीर्षकासह दिसली होती. ह्यावर लगेच इस्लामवादी म्हणतील की मोहमंद पैगंबराला अपरिचित अशा भाषेत ज्या कविता दिसल्या ( म्हणजे आजचे कुराण ) त्यांनाच हे स्थान द्यावे, कारण त्या नुस्त्याच टिकल्या नाहीत तर त्यामागे आज एव्हडी प्रचंड संस्कृती उभारलेली आहे .
महाराष्ट्र काव्यभूषण श्री.मंगेश पाडगावकर सांगतात की त्यांना अकस्मात कवितेची एक ओळ सुचते व ती बरेच दिवस त्यांचा पिच्छा पुरवते व मग ते त्या ओळीतल्या भावनेनुसार त्याची चारोळी, वात्रटिका, गजल, सुनीत, भावगीत, गीत किंवा कविता अशी कलाकृती करतात. त्यांना प्रसंग, चित्र, देखावा दिसतो असे ते म्हणत नाहीत. कवी ग्रेस ह्यांना मात्र रात्री अपरात्री देखावे, दृश्ये दिसतात व त्यांच्या ते कविता करतात. असेच पु.शि.रेगे ह्यांना प्रसंग, देखावे दिसले व त्यावर त्यांनी कविता रेखल्या असे प्रा.गंगाधर पाटील ह्यांनी मांडले आहे. शास्त्रीय ( मेंदू बाबत ) दृष्टीने माग काढला तर असे आढळते की आपल्या मेंदूत विचार करण्याची काही कळच नाही.आपण एक तर साठवलेल्या आठवणी माघारी काढू शकतो किंवा येत असलेले अनुभव अगोदर असलेल्या अनुभवांशी पडताळून त्यांना योग्य कप्प्यात साठवू शकतो. पण आपल्याला स्वप्ने पडतात, चित्रे दिसतात हे तर नाकारता येतच नाही. स्वप्ने वा चित्रे दिसणे हे आपल्या मेंदूला खूपच सोयीचे आहे. कारण चित्रांऐवजी येणारे विचार जर शब्दात आले असते तर एखादे स्वप्न वाचायला आपल्याला कैक दिवस लागले असते. ( आपला लिहिण्याचा वेग असतो ४०/५० शब्द दर मिनिटाला, तर वाचण्याचा वेग असतो ८०/९० शब्द दर मिनिटाला. मनात वाचण्याचा वेग असतो १५०/१६० शब्द दर मिनिटाला. ) त्या मानाने अनेक शब्द लागणार्या वर्णनाचे एक चित्र ( फ्रेम ) धरले तर आपल्या पाहण्याचा वेगच असतो २४ फ्रेम्स दर सेकंदाला. म्हणजे क्षणात आपण कित्येक शब्दांचे चित्र ( फ्रेम ) वाचू शकतो, पण चित्राच्या भाषेत. आता ही चित्रेच म्हणजे प्रतिमा, असे धरले तर, ज्या कवींना कविता दिसतात असे मानले तर कवितेतल्या प्रतिमा ह्याच त्यांना दिसलेल्या प्रतिमा असे होईल. त्या प्रतिमा आपणही त्यांच्या कवितेतून पाहू शकतो.
नेमकेपणासाठी आपण पु.शि.रेगे ह्यांचीच अशी कविता-रतीने ह्या अंकात छापलेली ( मुखपृष्ठामागे ) एक कविता घेऊ :
पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो.
सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते बजावून सांगतो.
हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो.
मी कविता करीत नाही
माझ्या मनाची आणि तुझ्या धांव घेतो.
ह्या कवितेतल्या प्रतिमांची ( कवीला दिसलेल्या चित्रांची ) जंत्री केली तर तीत अशी चित्रे दिसतात : १) गाणारा पक्षी २) डरकाळ्या फोडणारा सिंह ३) झाडांना अंग घासणारा हत्ती ४) कविता करणारा कवी ( मी ) ५) पक्षी सीमा घोषित करतो आहे ६) सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय ७) हत्ती आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवतोय ८) कवी आपल्या मनाची व प्रेयसीची धांव घेतोय. ह्यातील १) ते ४) ही चित्रे अगदी सरळ-साधी चित्रणे आहेत तर ५) ते ८) चित्रे ही पहिल्या गटातील (१ ते ४) चित्रांचा अर्थ लावणारी चित्रे आहेत. सकृदर्शनी कवीने नुसती चित्रे सादर केली आहेत असे दिसते. पण जरा काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक चित्रावर त्याने आपला तर्क चालवलेला आहे व त्याचा अर्थ दिला आहे असे दिसेल. जसे: गाणारा पक्षी नुसते गात नाहीये तर तो आपल्या सीमा घोषित करतो आहे. डरकाळ्या फोडणारा सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय. झाडांना अंग घासणारा हत्ती आपल्या वावर-प्रदेशाच्या खुणा ठरवतोय. कवी कविता करीत नाहीय तर त्याच्या मनाची व प्रेयसीची धांव घेतो आहे.
कोणाही जाणकार प्राणी-मित्राला विचारले तर सिंहाचे, हत्तीचे ( एव्हढेच काय कुत्र्यांचेही ) हे आपली सत्ता-प्रदेश इतरांना दाखवून देण्याचे प्रघात आहेत, असे कळेल. म्हणजे हे नैसर्गिक आहे हे ठाम झाले. इथे कवी क्रमा क्रमाने आपल्याला ह्या तर्काला बांधून शेवटाला घेऊन जातो व म्हणतो की असेच माझी कविता ही कविता नसून तुझे व माझे प्रदेश दाखवणे आहे. शिवाय हे किती नैसर्गिकही आहे, सुंदर आहे. हे रेगे ह्यांचे प्रामाणिकपणे आपल्याला दिसलेल्या चित्रांचे दाखवणे आहे की नेटाने तर्क लढवून कविता ही त्यांच्या व प्रेयसीचे प्रदेश दाखवणे आहे हे पटवणे आहे ? आता ही काही लबाडी म्हणता येणार नाही. प्रख्यात विदुषी मार्जोरी बोल्टन ह्यांच्या "ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या पुस्तकातल्या "इंटेलेक्च्युयल फॉर्म:द टू मेन पॅटर्न्स ऑफ इमेजरी" ह्या प्रकरणातले हे वाक्य पहा (पृ.११२ ) : "तर्कसंगती हे जागृत मनाचे लक्षण आहे व भावनेच्या विरोधी आहे. श्रेष्ठ कवितेत भावनेचा भडिमार असून त्याचबरोबर सुसंबंद्ध आंतरिक तर्कही असेल. तर्काची सुसंगती ही चांगल्या कवितेच्या रचनेचा महत्वाचा भाग असतो, व तो प्रतिमांच्या अनाकलनीय परिणामांपेक्षा जोरदार असतो. " ह्या अंगाने, प्रत्येक प्राणीमात्र आपल्या वावर-सत्तेच्या प्रदेशाच्या खुणा दाखवीत असतो, हे ह्या कवितेतल्या तर्कामागचे मूलसूत्र होते.
प्रत्येक संबंधात (रिलेशन) त्यातल्या घटकांना आपला स्वतंत्र प्रदेश ( स्पेस ) लागतो हे आता जवळ जवळ मान्यच झाले आहे. ह्या स्वतंत्र वावराला वाव मिळाला नाही तर संबंध विकोपाला जातात हे कोणत्याही कौटुंबिक कोर्टात न जाताही आपण मान्य करू इतके ते पटण्याजोगे आहे. असे असताना कवीने असे जर म्हटले असते की माझ्या कवितेत तुझे प्रदेश व माझे प्रदेश असे मी दाखवतोय तर ते ह्या तर्क-संगतीची पुढची कडी झाले असते. रेगे ह्यांच्या वैयक्तिक चरित्रातही ते रास्त ठरते. जसे : बायको सरिताबाईंचा एक प्रदेश, जर्मन प्रेयसी केठ ह्यांचा एक प्रदेश, मुलाबाळांचा एक प्रदेश, मित्रांचा एक वगैरे. पण ते जेव्हा शेवटच्या ओळीत म्हणतात की माझ्या कवितेत मी माझ्या मनाची व तुझ्या ( मनाची ) धांव ( ओढ ) घेतोय तर ते ह्या प्रादेशिक रचना करण्याच्या तर्काविरुद्ध जाते. प्रियकर प्रेयसी ह्यांचे मनोमीलन हे रोमॅंटिक व आदर्श खासच असते पण मग त्यासाठी सिंह, हत्ती हे आपले वेगळे प्रदेश करतात ( इतरांपासून ) ही तर्काची दोरी रास्त ठरत नाही.
कवी भले म्हणो की मी माझ्या मनाची व तुझ्या मनाची धांव घेतोय पण वाचकरूपी तिसर्या अंपायरला विचारलेत तर तो धांव-चित ( रन-आऊट) झालाय असाच निर्णय द्यावा लागेल. कारण ह्या कवितेत केवळ प्रतिमांचा खेळ असता, नुसती पक्षी, सिंह, हत्ती ह्यांची चित्रे असती, तर कसल्याही निर्णयाचे कवीचे म्हणणे चालले असते. त्याला समीक्षकांप्रमाणे वाचकही अप्रतीम म्हणते झाले असते. पण ह्या कवितेत तर्क हीच मोठी प्रतिमा आहे व शेवटचे चित्र हे तर्क-विसंगत ठरते !
----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
-----------------------------------------------------

Subscribe to:
Posts (Atom)