मु.पो.कुसुमाग्रज व भाषांतराचे पक्षी:
फारा वर्षानंतर एका अभिजात कार्यक्रमाला जायला मिळाले. दि.१५ आक्टोबरला ( २०११) यशवंतराव चव्हाण सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे कुसुमाग्रजांच्या कवितांवर कवी सौमित्र ( नट, किशोर कदम) व गुलजार ह्यांच्या कवितावाचनाचा हा कार्यक्रम होता. खालचे प्रेक्षागृह भरल्याने वरच्या बाल्कनीत बसावे लागले. अर्थात बाल्कनीही भरली हे या कार्यक्रमाचे दिसणारे यशच.म्हणतात की हा चौथाच कार्यक्रम होता आणि असे बरेच व्हावेत असे वाटावे इतका ह्रद्य !
स्टेजवर गुलजार व कुसुमाग्रजांचे भव्य चित्र, आणि दोन पोडियम्स इतकाच नेटका रंगमंच होता व तो फारच प्रभावी जाणवत होता. प्रेक्षकात डॉक्टर जब्बार पटेल, गुरू ठाकूर व मुंबईच्या धकाधकीतून निवांतपणा काढणारे रसिक होते. कवी सौमित्र कुसुमाग्रजांची कविता अतिशय भावोत्कटतेने वाचीत व नंतर गुलजार त्याचे हिंदी-उर्दूतले भाषांतर पेश करीत, काही स्पष्टिकरणेही देत. असे एका भाषेतले कवितेचे पक्षी मु.पो, कुसुमाग्रज ह्या कवीच्या गावाहून भरारी घेत गुलजार ह्यांच्या कवितेच्या गावी सुखेनैव पोंचत व दोन्हीही कवी किती प्रचंड ताकदीचे होते त्याचा प्रत्यय येई. मध्ये मध्ये सौमित्र त्यांना काही कविताविषयक, सृजनविषयक, तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारीत व त्यांची चपखल उत्तरे तितक्याच लीलया गुलजार देत. असा मन खिळवून टाकणारा हा कार्यक्रम फारच वेधक झाला. अखेर गुलजार म्हणाले तसे, अनेक कवींचे मुशायरे टाळून एकाच कवीची कवने व तिची भाषांतरे ह्यांचा मरातब करणारी ही मराठी अभिरुची त्यांना तसेच प्रेक्षकांना अपार भावली.
कवितांच्या निवडीबद्दल सौमित्रांचे, अमृता सुभाष ह्यांचे अवश्य अभिनंदन करायला हवे. कारण कुसुमाग्रजांची आपल्या मनात असलेली प्रतिमा गर्जा जयजयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, आगगाडी व जमीन, जालीयनवाला बाग, जा जरा पूर्वेकडे, वेडात मराठे वीर दौडले सात, टिळकांच्या पुतळ्याजवळ वगैरे शालेय जीवनात भेटलेल्या शिरवाडकरांना ( कुसुमाग्रज) दाट ओळखीची होती. त्यात समकालीन कवी जी जीवनावरची, नात्यांवरची, मृत्यूवरची तत्वज्ञानात्मक भाव-कवने रचतात तशाच कविता निवडून त्यांची भाषांतरे पेश करण्याने एका ज्ञानपीठ विजेत्या कवीची भारदस्त बाजू पहायला मिळाली. शिवाय मूळ कवितेचे लगेच भाषांतर पेश करण्याने ती कविता मनावर चांगली पक्की कोरल्या जायची हेही वाखाणण्यासारखे झाले. कविता वाचनाच्या निमित्ताने सृजनाचे व आयुष्याच्या तत्वज्ञानाचे जरा रंगतदार दर्शन झाले. मृत्यूबद्दल सौमित्रांनी विचारलेल्या प्रश्नावर गुलजारांनी एक काव्यमय कल्पना सांगितली. त्यांना मृत्यू आजाराने शय्येवर यायला नको आहे, क्षणात चिंध्या करणार्या अपघाताने यायला नको आहे, तर कविता लिहिता लिहिता पेनमधली शाई संपून जावी तसा यायला हवा आहे. कवी गुलजारांची भाषांतरे चपखल तर होतीच, शिवाय एका थोर कवीने दुसर्यासमोर किती प्रांजळपणे नतमस्तक व्हावे ह्याचा आदर्श दाखविणारी होती. त्यांच्या एका कवितेवर प्रेक्षकांची दाद आल्यावर ते म्हणाले की ही दाद मूळच्या कुसुमाग्रजांना आहे ! केव्हढी ही विनम्रता व किती देखणी !
आजकाल आपल्याच नात्यांबद्दल विमनस्क करणारी भावना दाखवणारी एक कविता मोठी बोलकी होती. कवीने मोठ्या मशागतीने रोप लावले आहे व त्याची निगराणी केली आहे. पण आता ते झाड उन्हपावसात बहरत असताना कवीला आता त्याच्याशी संबंध तुटल्यासारखा वाटतो आहे. आणि तरीही तो म्हणतो की हे बहरणे, निसर्गाचे कवतिक वगैरे त्या झाडाच्या मुळांतून जमीनीच्या कुशीत जाणारे आहे. आजकालच्या पोटच्या मुलांना अंतरणार्या पालकांना ह्या कवित्तेचे तत्वज्ञान क्षणभर हेलावून सोडते. तसेच म्हातारपणी एकटेपणाचे दु:ख सोसणार्या पुरुषांची व्यथा कवीने सात चमच्याच्या स्टॅंड ह्या हलक्या-फुलक्या वाटणार्या कवितेने छान रेखाटली आहे. घरची मालकीण असती तर तिच्या देखरेखीत सातवा चमचा हरवला नसता ह्या अगदी सोप्या, घरगुती निरिक्षणाला पुष्टी देत जेव्हा कवी म्हणतो की तर मग मीही हरवलो नसतो, तेव्हा एकटेपणाची हळहळ साक्षात समोर उभी राहते. ह्या कवितेच्या भाषांतरादरम्यान गुलजारांनी एक छान उत्तर दिले. सौमित्रांनी विचारले होते की तुम्हाला निसर्गाच्या रूपांचे सुचते कसे ? त्यावर गुलजार म्हणाले की निसर्गाचे सोडा, इथे कुसुमाग्रज तर निर्जीव अशा चमच्याच्या स्टॅंडला जिवंत करीत आहेत ! सृजनाला अजून वेगळी दाद ती काय असावी ? सृजनाबाबत एक कवी म्हणून सौमित्रांना कुतुहूल असणे स्वाभाविक. मग ते विचारतात की तुम्ही चालीवर गीते कशी लिहिता. ह्यावर ते सांगतात की दोनशे वर्षांपासून अशीच रीत चालत आली आहे. प्रक्रीया समजली नाही पण रीत अशीच हे उमगले.
कुसुमाग्रजांच्या ज्वलंत राजकीय उपरोधाची खूण पटविणारी एक कविता, महात्मा गांधींच्या सरकारी भिंतींवर टांगले असण्याची, नेहमीप्रमाणे भरघोस दाद मिळवती झाली. शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दु:खाची किंवा कंगालपणाची खिल्ली न उडवता त्याचा मानमरातब ( डिग्निटी ) कुसुमाग्रज "कलोजस" ह्या कवितेत कसा सांभाळतात ते गुलजारांनी कवितेच्या भाषांतरात अप्रतीमपणे बोलून दाखविले. कुर्ल्याच्या चाळीत एका बंदिस्त खोलीत त्या गरीबाला, कंदिलात, एका सूर्यनारायणाचे कसे दर्शन होते व तो कलोजस कसा घनगंभीर होतो हा अनोखा रसास्वाद गुलजार इथे आपल्याला शिकवून जातात. पुराने घर खचले तरीही उभारीने, ताठ कण्याने, लढणार्या शिष्यावरची कविता "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" ह्यात गुलजार कुसुमाग्रजांचे नेमक्या व मोजक्या शब्दात चित्र उभारण्याचे कसब आवर्जून दाखवतात. "बायको मात्र वाचली" एवढे म्हणण्याने बाकीची हलाखी आपल्यापुढे साक्षात उभी राहते असे जेव्हा गुलजार निदर्शनास आणून देतात तेव्हा एका कवीचे रसग्रहण कसे असते त्याचा नमूनाच पहायला मिळतो.
कवी सौमित्र म्हणजेच कसलेले नट किशोर कदम व गुलजार हेही थेटर सिनेमातले, व कुसुमाग्रजही थोर नाटककार, तेव्हा नाटकावरची कविता नसती तर चुकचुकल्यासारखे झाले असते. "नट" नावाची एका नटाच्या अखेराची अप्रतीम कविता अशीच रंगते. रिकाम्या प्रेक्षागृहात रिकाम्या खुर्च्यांकडे प्रयोगाअंती पहात हा नट आशा करतो की जे प्रेक्षक माझी स्मृती घेऊन गेले आहेत त्यांच्यात अंशा अंशाने तरी मी वाटला गेलो आहे ह्याचे मला समाधान आहे. अशा कार्यक्रमानिमित्त धावपळीतल्या रसिकांना थोर कवींचे अंश अशाच रितीने आपल्यात झिरपले असावेत अशी सुखद जाणीव होते, जी "मु.पो.कुसुमाग्रज, भाषांतराचे पक्षी" ह्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मिळणारी पोचपावतीच आहे जणु.
------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव