Friday, April 3, 2015


भय इथले संपत नाही !
      माझ्या आयुष्यातली दहा बारा वर्षे ज्या भीतीने पोखरली होती, त्यासंबंधी आता हसू येईल, पण असे अनेकांना निरनिराळ्या भीतींपोटी वर्षे वाया घालवावी लागतात. ही भीती होती काळेपणाची, गोरे नसण्याची !
      मॅट्रिकच्या वर्षापासून मला हा एक नवीनच चाळा लागला होता. मी समोरची व्यक्ती, न्याहाळी व ती किती गोरी आहे, त्याचा अंदाज घेई व मग आपण त्याच्यापेक्षा काळे आहोत की गोरे असा अंदाज बांधी. आणि बहुतेक वेळा मला खिन्नच व्हायला होई. कारण मी होतोच काळा. आता त्याकाळात गरीबी असल्यामुळे ह्या वाटण्यामुळे मी काही क्रीम्स, लोशन्स वगैरे वापरू शकलो नाही पण उगाचच सारखे उदास वाटत राही. मग ह्यातून सुटका म्हणून मी अभ्यासात मन रमवे. त्यामुळे फायदा झाला तो अभ्यासाचा व करीयरचा. पण व्यक्तिमत्वात एक भित्रेपणा आलाच. ह्या भित्रेपणावर मात करण्यासाठी मग परत ज्यास्त वाचन, अभ्यास असे चक्रच पाठीमागे लागले. आता समजा समोरच्या मुलापेक्षा मी ज्यास्त काळा आहे असे मला वाटले तर त्यावर काही उपाय होता का ? पण तरीही माझा बराच मनातला वेळ ह्या तुलनेत जाई. त्यामुळे सुन्न व्हायला होई. अभ्यासात मन लागत नसे. सदा सर्व काळ आपण किती काळे आहोत, त्याचा अंदाज घेण्यातच जाई.
      खरे तर अशा वैगुण्यावर कुठल्याही घरात डॉक्टरी उपचार किंवा निदान समुपदेशनाचा तरी मार्ग शोधल्या गेला असता. पण त्या काळात ही सोय इतकी प्रचलित नव्हती. पण समुपदेशनाचा एक सामाजिक मार्ग होता. लता मंगेशकरांचे "एका तळ्यात होती" हे गीत इतके लोकप्रिय होते की ते सतत कानावर पडायचे व त्याने एक सामाजिक समुपदेशन परस्पर व्हायचे. गीतात एका राजहंसाची गोष्ट असे. राजहंस म्हणतात काळा असतो. तर अशी तीन बदकाची पिले आहेत. त्यापैकी एक काळे पिल्लु आहे. त्याला कोणी खेळायला घेत नाहीय. त्यामुळे ते पिल्लु उदास आहे आणि एके दिवशी त्याला तो राजहंस आहे असे कळते व तो सुखावतो. ह्या समुपदेशनामुळे आपण जरी काळे असलो तरी खास आहोत, हुशार आहोत ह्या स्वत:लाच देऊ केलेल्या धीराने मग मी खूप अभ्यास करायचो. त्याने शैक्षणिक यश मिळायचे. मान मिळायचा.
      तरीही आपण किती काळे आहोत ही पाहण्याची खोडी मधनं मधनं उचल खाई व पुन्हा उदासी येत असे. मग त्यावर पुन्हा काहीतरी वाचण्यात मन रमवावे लागे. एकदा मग काळ्या रंगावरच वाचणे झाले. एका जपानी माणसाचे संशोधन वाचले. काळा रंग मोजण्यासाठी स्पेक्ट्रोमेट्रिक कलरोमीटर वापरले होते. कपाळावरच्या एका जागेवरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्याच्या मोजमापावरुन आपल्या रंगाचे मोजमाप करतात. जगातल्या एकूण जमातींचे कॉकेशीयन, मोंगोल व निग्रॉइड असे वर्गीकरण केले तर त्यांच्या रंगांचे आकडे म्हणे असे निघतात : ( कॉकेशियन ) 3.1YR6.4/3.7 ; ( मोंगोलाइड) 4.9YR6.2/3.8 ; (निग्रॉइड ) 4.8YR4.1/3.4.
रक्तातल्या हेमोग्लोबिन व मेलॅनिन पिगमेंटमुळे हे वेगवेगळे रंग बनतात. ह्या आकड्यातले काळ्या रंगाचे फिकेपण मोजणारे आकडे होते : कॉकेशियन: 6.4; तर निग्रॉइडसाठी 4.1. हीच आहेत गोरेपणाची वैज्ञानिक मापं. केवळ दोनाच्या फरकाने एक गोरापान होतो तर दुसरा काळा. ह्यातले गोरेपण म्हणजे काळ्या रंगाचे फिकेपण, असे म्हणणे हे मोठे गंमतीदार आहे. आणि ह्याची उदाहरणे आपण हरघडी बघत असतो. वयात आलेल्या मुली व मुलेही त्या काळात काळी असली तरी जरा उजळ दिसू लागतात. कदाचित असेच फिकेपण म्हणजेच पर्यायाने गोरेपण, बाजारातल्या गोरेपणाच्या क्रीम्समुळे होत असावे. ( काळ्या रंगाच्या छटाही किती मजेदार असतात. ह्यात निग्रो लोकांचे ढिम्म काळेपण किंवा ठार-काळेपण आहे, तर भारतीयातले काळा-सावळा, उजळ, निमगोरे, गहू वर्णी, असे उतरत्या श्रेणीतले काळेपण आहे. ).
      सगळीच माणसे गोरी का नसतात ? काळसर माणसे मुळात काळी होतातच का ? जीवशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर माणसांचेसुद्धा अनेक वंश आहेत असे सांगतात व त्याप्रमाणे त्यांचे रंग होतात. अजूनही विज्ञान सांगते की भौगोलिक हवामानाप्रमाणे माणसे काळी-गोरी होतात. पण त्याच थंड हवेत काळी माणसेही असतात व त्यांचे वंशज हे काळेच होत राहतात. मी वेस्ट इंडीज मध्ये नोकरी निमित्त असताना तिथे मला ठार काळी असणारी निग्रो माणसे, व भारतीय वंशाची माणसे, समप्रमाणात राहताहेत असे पाहायला मिळाले. निग्रो लोकात असेही काही ( क्रिओल) लोक होते की जे रंगाने अगदी गोरे होते पण त्यांचे केस व शरीराचा इतर बांधा निग्रोंसारखाच होता. ही माणसे गोरी असली तरी ते स्वत:ला व इतर लोक त्यांना, काळेच समजत. जेव्हा केव्हा काळे-गोरे असे वाद होत तेव्हा हे गोरे-निग्रो, काळ्यांचीच बाजू घेत.
      १९५० च्या सुमारास जगातल्या लोकसंख्येत २६ टक्के माणसे गोरी होती व केवळ ८ टक्के माणसे काळी होती. आणि आता २०६० साली म्हणतात की जगातल्या लोकसंख्येत केवळ ९ टक्के माणसे गोरी असणार आहेत व काळी माणसे २६ टक्के होणार आहेत. म्हणजे काळ्यांचेच राज्य येणार आहे असे आपण म्हणू शकतो. तरी बरे ह्या २६ टक्क्यात भारतीय लोक धरलेले नाहीत. अमेरिकेतसुद्धा काळा अध्यक्ष व्हायला कैक शतकं त्यांना थांबाव लागलं.
      हे काळेपणाचे भूत आपल्या समाजात चांगलेच रुतलेले आहे. मुलींसाठी तर "गोरी गोरी पान" ही तर सर्वात महत्वाची प्रार्थना झाली आहे. कितीही चुकीचे मानले तरी गोरी मुलगी दिसायला चांगली दिसतेच. प्रत्येक आईला आपले मूल गोरे असावे असे वाटतेच, मग भले ती प्रत्यक्षात "कसेही असले तरी स्वस्थ असले म्हणजे झाले" असे म्हणत असो. माझ्या मुलासाठी मुलगी पाहताना एक मुलगी चांगली इंजिनिअर, हुशार होती. पण त्यामानाने दिसायला काळीच होती. बुद्धीने किती जरी सांगितले की दिसणे काही महत्वाचे नसते, तरी बरेच निर्णय आपण नेहमी दिसण्यावरूनच घेत असतो. आई जरी काळी असली तरी तिला आपला मुलगा गोरा असावा असेच वाटत असते. ह्या गोरेपणाच्या वैश्विक आकर्षणापायी अजूनही फॉरेनर माणसाच्या गोरेपणाने आपण दिपूनच जातो. एक गोरा माणूस वेस्ट इंडीजमध्ये मी नोकरीला असताना माझा चांगला मित्र झाला होता. एकदा मी धीर करून त्याला विचारले होते की तुम्हाला भारतीय माणसे ( ती परदेशी लोकांपेक्षा काळे असल्याने ) आवडतात का ? तर त्याने प्रांजळपणे सांगितले होते की आम्ही त्यांना सहन करतो जरूर, पण आम्हाला इतर गोरे लोक जसे आवडतात तसे ते आवडत नाहीत.
      कदाचित ह्याच गोरेपणामुळे आपल्याकडे ब्राह्मणांनी एकेकाळी पुढारलेपण मिळविले असेल. एक प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आहेत श्री.एस.एल.भैरप्पा नावाचे. त्यांची "दाटू" ही कादंबरी खूपच गाजली होती. त्याचे भाषांतर उमा कुलकर्णी ह्यांनी मराठीत "जा ओलांडुनी" ह्या नावाने केले आहे. ह्यात जाती जातीमधले तेढ कसे असतात ते रंगवलेले आहे. लिंगायत व तत्सम ब्राह्मणेतर लोक आपल्याला ब्राह्मणाइतकेच वा त्यांच्यापेक्षा ज्यास्त श्रेष्ठ समजतात असे दाखवले आहे. त्यात एक दलित पात्र आहे. ते म्हणते की तुम्हा ब्राह्मणांच्या बायका घरातच वावरल्याने उन्हाने रापल्या नाही व गोर्‍या राहिल्या तर आम्हा दलितांच्या बायका शेतात राबल्यामुळे रापल्या व काळवंडल्या. ह्यावरचे मतभेद कितीहि चर्चिले तरी रंगाच्या वैषम्याचे महत्व फारच उठून दिसते. हे रंगाचे दिसणे व त्याचे वैषम्य वाटणे, इतके सर्वव्यापी असते की त्याने कित्येक पिढ्या ह्या भावनेत पेटून निघतात. तरी बरे की कित्येक खालच्या म्हणवल्या जाणार्‍या जमातीतही गोर्‍या बायका आढळतात ( जसे: लमाणी, गवळी वगैरे ).
      माझ्या मेहुण्यांचा मुलगा काही काळा म्हणता येणार नाही पण गोर्‍यांतही मोडणार नाही असाच आहे. त्याला बायकोही तशीच मिळाली. यथावकाश तिला एक मुलगी झाली. ती मात्र अगदी पिट्ट गोरी म्हणता येईल इतकी गोरी झाली. आम्ही त्याला सहज चिडवत होतो की काही औषधे वगैरे घेतली होतीस की काय ? आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या गोरेपणाचे रहस्यच सांगितले. ते असे की मुलीच्या आईने गर्भारपणात बालाजी तांब्यांची काही औषधे घेतली होती. ती औषधे चांगलीच महागडी होती. त्यात सोन्याचे भस्मही असते म्हणतात. आणि औषधांचा गुण ह्या गोर्‍या पिटट मुलीमध्ये आमच्यासमोरच होता. असे अनेक मार्ग लोक काळेपणापासून सुटका व्हावी म्हणून आचरतात. त्यापैकी एक मार्ग परंपरेने चालत आला आहे तो असा की गर्व्हारशीने प्रसूत व्हायच्या आधी चांगले दूध प्यावे, नेमाने म्हणजे मूल गोरे होते. काळे-गोरे ह्या वादात आजकाल कसा बारीक फरक पडतो आहे ते आम्हाला आमच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस कळून आले. आमची मुलगी तशी काळी-सावळीच. तिची मोठी मुलगी सुद्धा झाली तेव्हा काळी सावळीच होती. मुलाच्यावेळेस तिला आम्ही सुचवले की दूध घेत जा किंवा काही औषधे घे. त्यावर ती जे म्हणाली त्यावरून काळे-गोरे वादाकडे नवी पिढी कशी पाहते ह्याचा आम्हाला अंदाज आला. ती म्हणाली होती, की औषधे वा दूध पिऊन होणारे दुसरे मूल होईलही गोरे, पण माझ्या मोठ्या मुलीला नाही का वाईट वाटणार ? मुलाचे गोरे असणे तिला आवडणारे होते, पण मुलीला आपण का नाही गोरे झालो, असे वैषम्य वाटणे तिला नको होते. आईने आदर्श असा विचार कसा करावा ह्याचेच हे उदाहरण झाले.
      गोरे व्हावे असे वाटणे ही केवळ मनाचे एक वाटणे आहे असे समजून सोडू देता येत नाही. कारण ह्या वाटण्यामागे जगातले मोठमोठे उद्योग कार्यरत आहेत. प्रचंड पैशांच्या उलाढाली होत आहेत. लॉरीयल, पॉंडस्‌, फेअर ऍंड लव्हली, अशा अनेक मातब्बर कंपनीच्या कोट्यावधी किंमतीची प्रसाधने ही काही केवळ मानण्याने आपण बाजूला सारू शकत नाहीत. ती दिवसेंदिवस अधिकच बाळसे धरत आहेत, त्यावरून गोरेपणाची क्रेझ कमी न होता वाढतेच आहे हे सहजी कोणाच्याही ध्यानात येईल.
      काळ्या माणसाला तो जेव्हा आपण काळे आहोत, असे समजणे सोडतो, तेव्हाच त्याचे काळे-पण सुटते. ह्याचे मी पाहिलेले साक्षात उदाहरण आहे, स्मिता पाटील ह्या नटीचे. ती जेव्हा दूरदर्शनवर वृत्त-निवेदिका होती तेव्हा हिला कसे काय घेतले असेल, असे वाटावे इतकी ती दिसायला साधारण होती. बर्‍याच नाटकांमध्येही जेव्हा तिला प्रत्यक्ष आजूबाजूला पाहिले तेव्हाही तिचे व्यक्तिमत्व काही खासे वा नजरेत भरण्यासारखे नव्हते. पण काय झाले कोण जाणे, ती सिनेमात आली आणि तिचे काळेपण व व्यक्तिमत्व एकदम उभारूनच आले. इतके की "भूमिका" ह्या सिनेमातल्या तिच्या भूमिका अगदी मातब्बर नटांनाही डोईजड व्हाव्यात. त्या काळातला जो सुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन त्याच्यासोबतही ती अनेक सिनेमात अगदी उठूनच दिसली. तिने प्रत्यक्षात लग्न केले तो नट राज बब्बरही त्याकाळचा एक देखणा नटच होता. ती स्वत: जेव्हा स्वत;चे दिसणे विसरली, तेव्हाच तिचे व्यक्तिमत्व निखरून आले व ती दिसायलाही चांगली दिसायला  लागली. गुण निखरले की रूपही निखरते असे म्हणतात ते तिच्याबाबतीत असे निदर्शनाला आले.
      काळा असूनही प्रचंड लोकप्रीय झालेला दुसरा एक नट म्हणजे रजनीकांत. अर्थात हा मराठी माणूस दक्षिणेत गेला व मग तिकडे लोकप्रिय झाला हे खरे असले तरी काळ्या रंगाला एक सार्थ अभिमान देवविणारे हे व्यक्तिमत्व आहे ह्यात शंका नाही.
            काळ्या रंगाचे न आवडणे किंवा त्यासंबंधीची भीती वाटणे ह्या भावनेवर इंग्रजीत सॅम्युअल जॉन्सन ह्यांचे एक प्रसिद्ध सुभाषित आहे व ते फार बोलके आहे. "भीतीची भावना ही आपल्यात ह्यासाठी रोवलेली असते की तिने वाईटापासून आपले रक्षण करावे. पण ह्या भावनेचे कर्तव्य हे आहे की तिने इतर भावनांबरोबर आपल्याला वाहून जाण्यासाठी मदत न करता आपल्या विवेकाला मदत करावी.". म्हणूनच काळ्या रंगाकडे मी भीतीने न पाहता चोखंदळपणे पाहण्याचे ठरवले व तशी मला बुद्धी वेळीच झाली हे अगदी दैवीच मानायला हवे.
      काळेपणाचे हे खूळ केवळ आपल्यालाच आहे, असे वाटले तर ते चुकीचे ठरावे इतके मुबलक आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानात काळेपणाची चर्चा झालेली आहे. जसे प्रसिद्ध तत्ववेत्ता सार्त्र ह्याने फ्रेंच नीग्रो चळवळीमागे असणार्‍या संकल्पनेला "नेग्रीट्यूड" असे नाव देऊन त्याची चर्चा केलेली आहे. तसेच फनां नावाच्या तत्ववेत्त्याने "ब्लॅक स्किन, व्हाइट मास्क" ह्या ग्रंथात काळेपणाची चर्चा "द फॅक्ट ऑफ ब्लॅकनेस" ह्या प्रकरणात केली आहे. अमेरिकेतल्या काळ्या निग्रोंचे लढे ज्या मार्टिन ल्यूथर किंगने लढवले त्याचे प्रसिद्ध गीत "हम होंगे कामयाब" तर आपण अजूनही गातोच की. ओबामांच्या निवडून येण्यात व आजही टिकण्यात त्यांच्या काळे असण्याचे भान जगाला ठेवावेच लागते, एवढा काळेपणाचा महिमा आहे.
      तमाम काळ्या लोकांचे दैवत शोभावे असे दैवत आहे पंढरपूरचे पांडुरंगाचे किंवा विठठलाचे. एकदम ठार काळ्या दगडात रेखलेली ही मूर्ती, त्याचे काळेपण सगळ्या दैवतात वेगळेपणाने मिरवीत असते. आपल्या देवादिकांमध्ये कृष्ण हा निळा आहे तर राम गोरा आहे. शंकर सुद्धा काळा निळाच आहे. ह्या सगळ्यात विठठलाचे काळेपण अगदी ठार काळे प्रकारातले आहे. कदाचित आपण सोयीसाठी विठठलाला साकार स्वरूपात पाहतो आहोत खरे, पण देवाला निर्गुण रूपातच पहावे ह्या विचारापोटीच विठठलाचा रंग काळा करण्यात आला असावा. आपल्या देहाला तुकाराम महाराज ह्याच विचाराने कलेवर म्हणतात, देहाची देहावर जी आवडी आहे ती अंतरंगात निर्गुण निराकाराचा अनुभव घेतल्यावर कमी होईल, तीही निर्गुणमय होईल असे ह्या अभंगात तुकाराम असे म्हणतात :
"आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥
आवडी आवडी कळिवरा कळिवरी । वरिली अंतरीं ताळा पडे ॥"
माझे काळ्या रंगाचे भय आता संपले, तसे ते तुम्हा आम्हा सर्वांचे संपो, हीच काळ्या विठठलचरणी विनंती !

----------------------------------------------------------------------------------------------

अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२

ई-मेल: arunbhalerao67@gmail.com