Wednesday, March 23, 2016

चला “वेगळे” होऊ या !
सगळ्यांच्या रंगात एकरंग होऊन झाले की मग आपला रंग “वेगळा” असावा असे वाटायला लागते. हे म्हणजे एक प्रकारे लपाछपी खेळल्यासारखे आहे. लपायचे असले की आजूबाजूच्या रंगात मिसळून जायचे व कंटाळा आला, जेलस्  झाले  की “वेगळे” व्हायचे.
“वेगळा” हा शब्दच वेगळा आहे. ह्यात गळ्यात गळे घालून एकत्र नांदणे दर्शविणारे “गळा” आहे, तर झटक्यासरशी वेगळे कसे व्हावे हे सांगणारा “वेग” आहे. शिवाय “वे” ह्या संस्कृत अक्षराने वेणीची वीण वा वेणीचे पेड हे कसे एकमेकात गुंतलेले असतात ( वेगळे नसतात ) तसे हे गळ्याशी कसे गुंतलेले आहे ते दाखवणारे एकजीवपण आहे. आणि तरी हे “वेगळे”पण आहे !
मराठवाडा पहिल्यांदा निझामाच्या हैद्राबाद राज्यात होता. तिथे तेलुगु, कानडी व उर्दू ह्यांची चलती. मराठी लोकही नेहमी उर्दू बोलत. मराठीला लपून राहावे लागे. मग महाराष्ट्रातल्या मराठीची जेलसी वाटायला लागली, हे लोक कसे मराठी नाटके बघतात, मराठी कार्यक्रम करतात वगैरेचे आकर्षण वाटू लागले, हैद्राबाद पासून वेगळे व्हावे असे वाटू लागले.
झालो वेगळे, तर काय गंमत इथली वऱ्हाडी मराठी वेगळी, पुण्या-मुंबईची मराठी वेगळी असे बारकावे आता ठळक जाणवू लागले, त्यांची प्रगती डोळ्यात खुपू लागली, जेलसी वाटू लागली. त्यांच्याबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलो खरे, पण हाती काही लागले नाही, असे दिसो आले. आता वाटायलय, नग, वायलच बर !
बा म्हणायचा ब्रिटीषच बरा होता. तर मग आता त्यानं स्वातंत्र्य सैनिक बनून आणलेलं स्वातंत्र्य परत कराव का ? आणावं का पारतंत्र्य ? पारतंत्र्यात निदान मला पारतंत्र्य-सैनिकाची पेन्शन तरी गावल !
तसच, परत जावं का निझामाच्या राज्यात ? नकोच हे इथलं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व त्यांची प्रगती. आंध्र व तेलंगण काय टपलेले आहेतच. सहज घेतील एव्हढे पाच जिल्हे ! उर्दू तर आपल्याला येतेच !
चला “वेगळे” होऊ या !

--------------------------------------  

Saturday, March 19, 2016

जयंती, मयंती
मुळात “जय” होण्यात “ज” का असावा ? खरे तर नुसते “ज” म्हणजे “जन्मणे”. कुसुम च्या आधी जन्मलेला म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ तो “कुसुमाग्रज” मध्ये नाही का नुसते “ज” म्हणजे जन्मणे होते. एखाद्या गोष्टीचा जन्म होणे हाच “जय” आहे हा विचारच मोठा रम्य आहे.
जयंती किंवा जयंत मध्ये हे “अंत” का असेल ? अंत ह्याचा सर्वसामान्यपणे माहीत असलेला अर्थ म्हणजे शेवट.
आता अंत ही जोडणी लागलेले काही शब्द पहा : बाळंत, खंत, अनंत, सुखांत, भ्रांत, प्रांत, संत, वसंत, बुंत, जंत, दंत, पंत, वांत, शांत, हंत, कांत, धादांत, पसंत, श्रीमंत, श्रांत, अशांत, अत्यंत, सुमंत, क्रुदंत, एकदंत, दिगंत, आकांत, आसमंत, सामंत, नखशिखांत, पर्यंत, उसंत, दृष्टांत.....वगैरे.
बाळंत म्हणजे प्रसूत झालेली स्त्री किंवा बाळ झालेली स्त्री. इथे कोणाचा अंत आहे ? बाळाचा तर नक्कीच नाही. मग इथे अंतचा अर्थ कसा लावायचा ? बाळ झाल्याने जिच्या गर्भारपणाचा अंत झाला अशी ती बाळंत, असे होऊ शकते. किंवा जिची स्थीती बाळाने अंत पावली आहे ती बाळंत असे होऊ शकते. असेच ख म्हणजे आकाश व आकाशाएवढ्या व्यापाने/काळजीने ज्याचा अंत ती खंत असे होऊ शकेल ? अनंत मध्ये अन्‌ म्हणजे अन्य ने अंत होणारे ते अनंत असे धरू शकतो ? सुखाने ज्याचा अंत होतो ते नक्कीच सुखांत होते. भ्र म्हणजे भ्रमणने ज्याचा अंत होईल ती भ्रांत ? प्र म्हणजे प्रदेशाने ज्याची सीमा/शेवट तो प्रांत ? बु म्हणजे मूर्ती व तिचा अंत म्हणजे बुंत ( बुरखा ) असे होईल ? अति ने ज्याचा अंत ते अत्यंत ? नखापासून शेंडीत ज्याचा अंत ते नखशिखांत ?
ह्या धर्तीवर जयंती म्हणजे ज्याचा शेवट जयाने झाला आहे असा तो दिवस किंवा ज्याचा शेवट जन्माने झाला आहे तो दिवस.
आता मय म्हणजे कशाशी तरी एकरूप होणे. जसे शांततामय. मेल्यावर आपण ब्रह्मात विलीन होतो, ब्रह्ममय होतो असे धरले तर पुण्यतिथीला मयंती म्हणता येईल. किंवा मरंती म्हणजे पुण्यतिथी असे होऊ शकेल !

-------------------------------