जय हो-मराठी-२०: र चा रेटा
------------------------------
"र"चा रेटा !
--------------------------------
"र" ह्या वर्णाला मराठी वर्णमालेत अर्ध-स्वर ( सेमी व्हॉवेल ) असे मानतात. जीभ तयार न झाल्यामुळे लहान बालके बोबडे बोलतात हे आपण जाणतोच. तेव्हा सगळ्यात अवघड वर्ण "र" हाच असतो. हे ह्यामुळे होत असावे की "र" हे मूर्धन्य प्रकारात मोडते ( म्हणजे टाळूच्या वर जीभ लावून हा आवाज काढावा लागतो, ज्यासाठी जिभेचे वळणे तयार व्हावे लागते .). तसेच फोनोलॉजी शास्त्रातल्या, सोनोरिटी स्केल मध्ये जे वर्ण सगळ्यात मोठेपणे आपल्याला ऐकू येतात असे शोधून काढलेले आहे, त्यात स्वरानंतर सगळ्यात ज्यास्त मोठेपणी ऐकू येणारे वर्ण दिले आहेत : य, र, ल, व. त्यामुळे "र" ह्या वर्णाची योजना आपण सहजी स्पष्टपणे ऐकू येणार्या शब्दांसाठी करत असू, असे अनुमान निघते. त्यामुळे एखाद्या शब्दात "र"ची योजना असेल तर तो ठळक होतो असा परिणाम साधल्या जातो. ह्या पार्श्वभूमीवर शब्दकोशातल्या "र"पासून सुरू होणार्या एकूण २०६८ शब्दांची तपासणी केली तर हे सर्वच शब्द ठळकपणा आणणारे, महत्वाचा अर्थ असणारे दिसतात. ( एकूण २०६८ पैकी ५२५ शब्द महत्वाचे अर्थ असणारे, ठळकपणा आणणारे आढळतील. वानगीदाखल पहा: रक्त, रखडपटटी,रंजक, रंजलेगांजले, रटाळ, रडका, रंडी, रण, रत्न,रद्दी, रसाळ, रहाटगाडगे, राई, राकट, राग, रांजण,राजतिलक, राजबिंडा, रानदांडगा, रामराज्य, राष्ट्र,राक्षस, रुका, रुपया, रुग्ण, रुद्र, रुचिर, रुसणे, रूप,रौद्र, वगैरे.). सामान्यापासून मोठेपण देणारा "राजा", कपाळावरच्या गंधात ठळकपणा आणणारा "राजतिलक", लहान पदार्थात स्पष्टपणे लहान असलेला पदार्थ "राई", नापसंतीच्या शब्दात प्रभावी असते:"अरेरे", छोट्यामोठ्या लढाया, युद्धे ह्यात स्पष्टपणे मोठे युद्ध म्हणजे "रण", मौल्यवान वस्तूत जादा मोल असलेले "रत्न", वगैरे. र-पासून सुरू होत असलेले बहुतेक शब्द असे हे त्यांच्या त्यांच्या प्रकारात मोठेपण, ठळकपण दाखवतात असेच दिसते. हाच "र"चा रेटा !
---------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------