Sunday, March 13, 2011

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----१७
सु-संस्कृत मराठी माणूस !
परवा म.टा.त अवधूत परळकरांचे एक पत्र आले. त्यात त्यांनी जनगणनेत, मला संस्कृत भाषा येते, असे नोंदवण्याविरुद्ध मत दिले आहे. त्यांचे म्हणणे की ते संस्कृत शिकले असले तरी आता बोलू शकत नाहीत, त्यामुळे संस्कृत भाषा येते, असे नोंदवणे त्यांना फसवणूकीचे वाटते. तर ही खरेच फसवणूक का भाषा-व्यवहाराबद्दलचे अज्ञान, गैरसमज ?
मेंगलोरी माणसे तुळू बोलतात, पण तुळू ला स्वत:ची लिपी नाही. काही जण कन्नड वापरतात तर काही तेलुगु. लोक तुळू बोलतात पण कित्येक ती वाचू शकत नाहीत. मग ती भाषा आहे की नाही ?
अमेरिकेतली पुढची पिढी आणि इथल्या संगणकवाल्यांचीही, अर्थातच मराठी बोलू शकत नाही. पण तिन्ही सांजा झाल्या की तिथेही बहुतेक मराठी घरातून "शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा..." ही प्रार्थना मुले हमखास म्हणतात. महाराष्ट्रात तर ज्यास्तच प्रमाणात हे म्हटल्या जाते. त्याशिवाय "शांताकारं भुजगशयनं..." हेही म्हणतात. हे सर्व संस्कृत आहे हेही कित्येकांना माहीत नसते. आपल्याला "जन गण मन..." ह्या राष्ट्रगीताशिवाय "वंदे मातरमं, सुजलां सुफलां, मलयज शीतलां...." हे गीत म्हणता येतेच. हे तर राष्ट्रगीतच होणार होते. भारताच्या पैशावर अशोक स्तंभाखाली व नाण्यांवर आपण लिहितो "सत्यमेव जयते". लग्नात आपण म्हणतो, "कुर्यात सदा मंगलम.." आशिर्वाद देताना "अष्ट पुत्रा सौभाग्यवती भव" म्हणतो. कित्येक मुले "रामरक्षा " म्हणतात, जी संस्कृतात आहे. "अर्थ-संकल्प, विद्यापीठ, ज्ञानपीठ, चांद्रयान, वृद्धाश्रम, प्राचार्य, ..." ही सगळी मानाची नावं, पदं, संस्कृतातली आहेत.
ज्ञानेश्वरी, तुकाराम-गाथा, वगैरे टिकलेले संत-साहित्य हे लोकांनी म्हटले, पाठ केले, पारायणं केली म्हणूनच टिकली आहेत. आज कुठल्याही मान्यवर लेखकाचे साहित्य त्याच्या हयातीत, वा फार तर, एका शतकात, विस्मरणात जाते. कारण त्याचे कोणी पारायणं करीत नाही. कित्येक संस्कृत म्हणी, सुभाषिते, मराठी साहित्यात इतक्या अंगवळणाच्या झाल्या आहेत की त्या मराठीच आहेत असे आपण समजतो. जसे: शुभस्य शीघ्रमं, शुभास्ते पंथानां, चक्षुर्वै सत्यम, तमसो मा ज्योतिर्गमया..., त्वमेव माता च पिता त्वमेव..., वक्रतुंड महाकाय..., यथा राजा तथा प्रजा...,सदरक्षणाय खलनिग्रहणाय ( पोलीसांचे ब्रीद-वाक्य ), अहिंसा परमो धर्म:..,यथा काष्ठं च काष्ठं च...., अतिपरिचयाद अवज्ञा, जीवेत शरद शतम, पिंडे पिंडे मति भिन्न:, वगैरे.
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री.अशोक केळकर त्यांच्या "रुजुवात" ह्या पुस्तकात म्हणतात की वाणीचे तीन प्रकार असतात, बोलणे, म्हणणे आणि गाणे. त्यात ते असेही म्हणतात की म्हणणे हे बोलण्यातच मोडते. हे आपल्याला सहजी ध्यानात येत नाही. जसे समजा आपण पोलीस आहोत व हिंदी सिनेमातल्यासारखे आपल्याला म्हणायचेय "कानून के हाथ बडे लंबे होते है" आणि त्या ऐवजी आपण पोलिसांचे ब्रीदवाक्य जर म्हणालो ( सदरक्षणाय, खल निग्रहाणाय ) तर आपण असेच बोललो की पोलीस हे सज्जनांची रक्षा करतात तर खळांना/दुष्टांना नियंत्रणात ठेवतात.. तर हे संस्कृतात म्हणणे म्हणजे एक प्रकारचे बोलणेच होते. किंवा आपल्याला म्हणायचेय की तुम्ही कितीही बनवाबनवी करा शेवटी विजय हा सत्याचाच होणार. हेच म्हणण्यासाठी जर आपण संस्कृत वचन म्हटले की, सत्यमेव जयते, तर आपण हेच तर बोललो असे झाले की नाही. मग झाले की, मला तर संस्कृत बोलता येते हे सहजी दिसून येते.
एवढे आपण जर संस्कृत प्रत्यक्षात म्हणत असूत तर, तुम्ही नोंदवा अथवा न नोंदवा, तुम्ही सु-संस्कृत म्हणूनच गणल्या जाणार व संस्कृत तगणारच !. नोंदवल्यास न जाणो, पुढे कोणाला सदबुद्धी झाली तर, संस्कृत भाषेसाठी अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळायचा . मग कोणा सु-संस्कृत राजकारण्याला "भ्रष्टाचार" ह्या मूळ संस्कृत शब्दाचे आचरण करावे लागायचे !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, March 3, 2011

अरुणोदय झाला----१६
ऐका हो ऐका ! भाषेचे मूळ !
माणसाकडे पाहणे, ऐकणे-बोलणे, स्पर्शणे, चाखणे व वास घेणे, एवढया संवेदना होत्या. ह्यापैकी त्याला एखाद्या संवेदनेची, भाषेसाठी म्हणजे एकमेकांशी संदेशवहनासाठी, निवड करायची होती. ह्यात चाखणे आणि स्पर्शणे ह्या अवगत असलेल्या संवेदना अर्थातच पहिल्याच फेरीत बाद होतात. अर्थात आंधळ्या माणसांसाठी मग स्पर्शाने ओळखायची ब्रेल लिपी वापरण्यात आली खरी, पण भाषा मात्र तो बोलत असेल तीच उच्चारांवरून बोलली गेली. कुत्र्यांच्या भाषेत माणूस चांगला की वाईट ते बहुतेक चाटूनच, वा वासावरून वाचतात. तसे आपण मात्र करू गेलो तर हास्यास्पद होईल. जमणार तर नाहीच. ( शिवाय चाखूनच ठरवायचे तर चांगले पदार्थ पटकन संपून गेले असते, व उरला असता सर्वत्र कडवटपणा व दुर्गंध ! ).
पाहण्याचे आपल्या संवेदनात फार प्राबल्य आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहात नाही तोवर पटतही नाही. एवढेच काय सत्याच्या प्रकारामध्येही सर्वात उच्च कोटीचे सत्य म्हणजे "चक्षुर्वै सत्यम"! आपल्याला सर्व दिसायला चांगले असावे लागते. "आय विटनेस" असला तर नक्कीच खुन्याला फाशी ! एवढा पाहण्या-दिसण्याचा दरारा ! पण वृद्धापकाळी दिसायला कमी झाले तर केवढा त्रास ! मग का बरे, आपण ही संवेदना, संदेशवहनासाठी वापरली नाही. तर अडचणी अशा आल्या की रात्री दिसत नाही. शिवाय दिसणे सुद्धा म्हणतात एका विशिष्ट कोनातच ( एकूण ८० अंशातच दिसते ! ) व पुढचेच दिसते. मागचे दिसले नाही तर नाही का आपण म्हणत, की काय माझ्या पाठीला डोळे लावू का ? शिवाय जे दिसले ते तसेच दुसर्‍याला सांगायचे म्हणजे एकतर हावभाव करून सांगायला पाहिजे किंवा चित्र काढून दाखवायला पाहिजे. बरे सगळ्यांनाच चित्रकला अवगत होत नव्हती. त्यांना गणपतीने दर्शन दिले असे सांगण्यासाठी गणपतीचे चित्र काढावे लागे. ते जर हुबेहुब आले तर ठीक, कळेल, पण दिव्य कलेने ते माकडासारखे दिसले तर समोरचा ह्याला बहुतेक माकडच दिसले असावे, असे समजून माकडाला पकडण्यासाठी जाळे घेऊन यायचा ! आणि हावभाव एवढे करावे लागले असते की आजकाल गुडघे बदलतात, तसे दोन तीन जोडया हात एका आयुष्यात सहज लागले असते !
शिवाय दिसते ते, सर्व दृश्य एकदम सगळीकडचे, दिसते. "मी ताजमहाल पहात असताना तिथल्या पायरीवर पडलो" असे चित्राने सांगायला जावे व पाहणार्‍याने त्यातला फक्त ताजमहाल पाहूनच "व्वा व्वा " करावे म्हणजे कसला संदेश पोचणार ? मी दिल्लीहून आग्र्याला गेलो, तिथे ताजमहाल पाहिला, तिथल्या पायरीवर....असे मालिकेदार संदेश द्यायचे, तर फक्त कॉमिक्सचीच राष्ट्रीय भाषा झाली असती.
ह्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ऐकणे-बोलणे हे खूपच सोयीस्कर पडते. आपल्याला कुठलेही ऐकू येते. मागचे पुढचे वगैरे. शिवाय अंधारातही ऐकू येणे-बोलणे चालूच असते. आणि मुख्य म्हणजे ऐकणे बोलणे एकानंतर एक अशा क्रमाने घडते. त्यामुळे संदेशवहनाला चांगला थेट आकार मिळतो. खरे तर बोललेले वार्‍यावर लगेच विरून जाते, पण मग भाषेने लिपीचा शोध लावून त्या उच्चाराला भाषेत पकडून ठेवायची व्यवस्था झाली. तसेच कुठल्याही रेकॉर्ड-प्लेयर शिवाय, एक माणूस बोलला वा त्याने लिहिले तर तेच दुसरा माणूस, लिहिलेले आहे ते वाचून तसे म्हणूही लागला.
ऐका हो ऐका ! ऐकण्या-बोलण्याचा असा विजय झाला ! ( असं ऐकलं आहे ! )

----------------------------------------
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------