Thursday, March 3, 2011

अरुणोदय झाला----१६
ऐका हो ऐका ! भाषेचे मूळ !
माणसाकडे पाहणे, ऐकणे-बोलणे, स्पर्शणे, चाखणे व वास घेणे, एवढया संवेदना होत्या. ह्यापैकी त्याला एखाद्या संवेदनेची, भाषेसाठी म्हणजे एकमेकांशी संदेशवहनासाठी, निवड करायची होती. ह्यात चाखणे आणि स्पर्शणे ह्या अवगत असलेल्या संवेदना अर्थातच पहिल्याच फेरीत बाद होतात. अर्थात आंधळ्या माणसांसाठी मग स्पर्शाने ओळखायची ब्रेल लिपी वापरण्यात आली खरी, पण भाषा मात्र तो बोलत असेल तीच उच्चारांवरून बोलली गेली. कुत्र्यांच्या भाषेत माणूस चांगला की वाईट ते बहुतेक चाटूनच, वा वासावरून वाचतात. तसे आपण मात्र करू गेलो तर हास्यास्पद होईल. जमणार तर नाहीच. ( शिवाय चाखूनच ठरवायचे तर चांगले पदार्थ पटकन संपून गेले असते, व उरला असता सर्वत्र कडवटपणा व दुर्गंध ! ).
पाहण्याचे आपल्या संवेदनात फार प्राबल्य आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहात नाही तोवर पटतही नाही. एवढेच काय सत्याच्या प्रकारामध्येही सर्वात उच्च कोटीचे सत्य म्हणजे "चक्षुर्वै सत्यम"! आपल्याला सर्व दिसायला चांगले असावे लागते. "आय विटनेस" असला तर नक्कीच खुन्याला फाशी ! एवढा पाहण्या-दिसण्याचा दरारा ! पण वृद्धापकाळी दिसायला कमी झाले तर केवढा त्रास ! मग का बरे, आपण ही संवेदना, संदेशवहनासाठी वापरली नाही. तर अडचणी अशा आल्या की रात्री दिसत नाही. शिवाय दिसणे सुद्धा म्हणतात एका विशिष्ट कोनातच ( एकूण ८० अंशातच दिसते ! ) व पुढचेच दिसते. मागचे दिसले नाही तर नाही का आपण म्हणत, की काय माझ्या पाठीला डोळे लावू का ? शिवाय जे दिसले ते तसेच दुसर्‍याला सांगायचे म्हणजे एकतर हावभाव करून सांगायला पाहिजे किंवा चित्र काढून दाखवायला पाहिजे. बरे सगळ्यांनाच चित्रकला अवगत होत नव्हती. त्यांना गणपतीने दर्शन दिले असे सांगण्यासाठी गणपतीचे चित्र काढावे लागे. ते जर हुबेहुब आले तर ठीक, कळेल, पण दिव्य कलेने ते माकडासारखे दिसले तर समोरचा ह्याला बहुतेक माकडच दिसले असावे, असे समजून माकडाला पकडण्यासाठी जाळे घेऊन यायचा ! आणि हावभाव एवढे करावे लागले असते की आजकाल गुडघे बदलतात, तसे दोन तीन जोडया हात एका आयुष्यात सहज लागले असते !
शिवाय दिसते ते, सर्व दृश्य एकदम सगळीकडचे, दिसते. "मी ताजमहाल पहात असताना तिथल्या पायरीवर पडलो" असे चित्राने सांगायला जावे व पाहणार्‍याने त्यातला फक्त ताजमहाल पाहूनच "व्वा व्वा " करावे म्हणजे कसला संदेश पोचणार ? मी दिल्लीहून आग्र्याला गेलो, तिथे ताजमहाल पाहिला, तिथल्या पायरीवर....असे मालिकेदार संदेश द्यायचे, तर फक्त कॉमिक्सचीच राष्ट्रीय भाषा झाली असती.
ह्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ऐकणे-बोलणे हे खूपच सोयीस्कर पडते. आपल्याला कुठलेही ऐकू येते. मागचे पुढचे वगैरे. शिवाय अंधारातही ऐकू येणे-बोलणे चालूच असते. आणि मुख्य म्हणजे ऐकणे बोलणे एकानंतर एक अशा क्रमाने घडते. त्यामुळे संदेशवहनाला चांगला थेट आकार मिळतो. खरे तर बोललेले वार्‍यावर लगेच विरून जाते, पण मग भाषेने लिपीचा शोध लावून त्या उच्चाराला भाषेत पकडून ठेवायची व्यवस्था झाली. तसेच कुठल्याही रेकॉर्ड-प्लेयर शिवाय, एक माणूस बोलला वा त्याने लिहिले तर तेच दुसरा माणूस, लिहिलेले आहे ते वाचून तसे म्हणूही लागला.
ऐका हो ऐका ! ऐकण्या-बोलण्याचा असा विजय झाला ! ( असं ऐकलं आहे ! )

----------------------------------------
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment