-------------------------------------------------------------------------------------
अरुणोदय झाला---२१
हे असे करावे का ?
परवा पार्ल्याला एका भाषणादरम्यान मी श्री. भालचंद्र नेमाडेंवर एक आक्षेप घेतला की तुम्ही "हिंदू" चांगली खपावी म्हणून त्यात ब्राह्मणद्वेष पेरला आहे, संतांची टर उडविली आहे. त्यावर ते म्हणाले की अहो, मराठी पुस्तक खपून खपून किती खपणार व त्याच्या रॉयल्टीमधून असे किती मिळणार ? माझी सध्याची मिळणारी शिष्यवृत्तीच मुळी महिना ७० हजाराची आहे. तुम्हाला जर पुस्तक आवडले नसेल तर परत घेऊन या, मी पैसे परत देईन.
ज्या पुस्तकाचा एवढा गाजावाजा झाला, त्याच्या लेखकालाच जर त्यातून म्हणावे तितके पैसे मिळत नसतील, तर जे इतर हौशी लेखक असतात त्यांचे तर पुस्तकामागे स्वत:चेच पैसे जात असणार हे उघड आहे. जर लेखकाला पैसे मिळणे दुरापास्त असेल तर मग इतके लोक पुस्तके का काढतात, ती का छापतात, ती का विकतात ? लोकांनी आपण जे लिहिले आहे ते वाचावे त्याची प्रशंसा करावी हाच त्यांचा मुख्य हेतू असायला हवा.
मी अजूनही पायरेटेड पुस्तके हमखास घेतो. अगदी त्यांचे छुपे अड्डे असतात तिथे जाऊन घेतो. त्यात एक फायदा असा असतो की पुस्तक हमखास चांगले असते. वाईट पुस्तकासाठी पायरसी करण्याचे कोण अकारण कष्ट करणार ? आणि त्याच मजकूराचे किती कमी पैसे मोजावे लागतात, वाचण्यासाठी . जे इंग्रजी पुस्तक चारशेला घ्यायचे ते पायरेटेड मध्ये शंभरात मिळते. मुळात पुस्तके इतकी महाग का असावीत ? म्हणतात की पुस्तकाचा जेव्हढा खर्च येतो त्याच्या पाचपट विक्रीची किंमत ठेवावी लागते. पण लोकांनी वाचावे अशी लेखकाची प्रबळ इच्छा असते, तर प्रकाशकांनी किंमत ज्यास्त ठेवल्याने ती वाचू नयेत हा परिणाम/हकीकत होतो. मला प्रथम चेतन भगत त्याच्या भाषेसाठी नाही तर त्याच्या पुस्तके ९० रुपायात देण्यामुळे आवडला होता ( रूपा प्रकाशन, दिल्ली ). मी डॉ.नरेंद्र जाधवांच्या "आम्ही आणि आमचा बाप" ह्या पुस्तकाला प्रथम मानले ते, ते त्याच्या एकमेव पायरेटेड मराठी पुस्तक असल्याने. नंतर ग्रंथालीने त्याची जन-आवृत्ती अवघ्या ६० रुपायात काढली, तेही मला खूप भावले.
आता तर मला संगणकावर हवे ते नवे, जुने, पुस्तक फुकटच मिळवायचा नाद लागलाय. एक संकेत-स्थळ आहे : गटेनबर्ग.कॉम नावाचे. ह्यावर इंग्रजीतली लाखो पुस्तके फुकट उतरवून घेण्यासाठी आहेत. मेल्यानंतर ६०/७० वर्षांनी कोणत्याही लेखकाचे पुस्तक कोणीही, (कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन न करता), हे करू शकतो. आजकाल मराठीतही अशी पुस्तके संगणकावर फुकट मिळतात. अजून एक फारसे माहीत नसलेले एक संकेत-स्थळ आहे : लायब्ररी.एन्यू नावाचे. हे अमेरिकेतल्या एका विद्यापीठाचे स्थळ आहे. ह्याला लोक आपल्याकडची पुस्तके संगणकावरून पाठवतात व ती आपण फुकट उतरवून घेऊ शकतो. कितीतरी नवी कोरी, ताजी पुस्तके मी त्यातून घेतलेली आहेत.
आता आपले मराठी मन धास्तावायला सुरुवात होईल. हे बेकायदेशीर तर नाही ? हे करावे का ? तर ह्यावरचे "फेअर यूज" नावाचे एक कायद्याचे पुस्तक मी त्याच संकेतस्थळावरून ( फुकटच !) उतरवून घेतले. टीका, अभ्यास, प्रसार-माध्यमात मत मांडणे ह्या सर्व प्रकारासाठी कायदेशीर मुभा आहे असे हे पुस्तक सांगते. अमेरिकेत, विशेषत: गाण्यांसाठी, ह्यावर खूप खटले झालेत. शेवटी जी संकेत-स्थळे ही गाणी ठेवतात त्यांनाही वेठीस धरण्यात आले. आठ-दहा वर्षांच्या पोरांसोरांवरही खटले केले, प्रकाशक कंपन्यांनी. पण आजकाल हा प्रकार इतका बोकाळलाय की कायदेशीर काहीच कारवाई संभवनीय होत नाही. मजकूर नुस्ता उपलब्ध करून देणे हा काही गुन्हा होत नाही. शिवाय ह्यातून संकेतस्थळांना काही धंदा होत नाही. उलट साहित्याचा प्रसार करण्याचे उच्च कोटीचे काम आपसुक होते. एक डिजिटल कॅमेरा (किंवा मोबाईल) असेल तर फुकटात पुस्तकाची चित्रे ( सर्व पानांची ) काढून ती सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
मला खूप दिवसांपासून विंदा करंदीकरांचे "एरिस्टॉटलचे काव्यशास्त्र" हे पुस्तक वाचायचे होते. मौजेचे प्रकाशन. कुठे मिळाले नाही. आयाआयटीतल्या काही विद्यार्थ्यांना हे पुस्तक अभ्यासासाठी हवे होते. त्यांना एक प्रत मिळाली. त्याची त्यांनी झेरॉक्स केली व त्याचबरोबर दोनशे रुपायात पीडीएफ फाइल झाली, जी आम्ही चारपाच जणांनी वाटून घेतली, तर केवळ ५० रुपायात पुस्तक पडले. आता मी हे एखाद्या संकेतस्थळावर ठेवले तर हजारो जण ते उतरवून घेऊ शकतील, फुकटात. कायद्याने पाहिले तर हे सगळे बेकायदेशीरच वाटेल . पण, श्रीपु किंवा सध्याचे मौजेचे मालक ह्यावर केस करण्यापेक्षा वाचणार्यांना प्रोत्साहन म्हणून धन्यवादच देतील. विंदांनीही हरकत घेतली नसती. ( आणि हे पुस्तक वाचून माझा असा काय धंदा झाला बरे ? ).
म्हणतात की जेव्हा चहा भारतात विकायला सुरुवात केली तेव्हा तो कोणी विशेष खरेदी करीत नसत. मग गावोगाव माणसे पगारी नेमली, जी त्या त्या ठिकाणी चहा बनवीत व लोकांना फुकट प्यायला देत. कालांतराने लोक चहानशीन झाले व चहाचा धंदा फळफळला. सध्याचा मराठी लेखक हा लेखनाच्या उत्पन्नावर जगूच शकत नाही, इतके ते नगण्य असते. तो अथवा त्याच्या प्रकाशकाला १०० ( समजा ) इंटरनेटवरून फुकटात पुस्तके घेणार्यांविरुद्ध खटले भरायचे म्हटले तर केव्हढा द्राविडी प्राणायाम ! त्यापेक्षा तो पुस्तक वाचणार्याला धन्यवादच देईल.
आणि मार्केटही हळू हळू बदलते आहे. वर्तमानपत्रे, मासिके, एरव्ही आपल्याला कोणी मोफत देत नाहीत . पण इंटरनेटवर हवे ते फुकट वाचता येते, उतरवून घेता येते. उलट त्यामुळे त्यांचा खप वाढतोच असे दिसून येते. आजकाल तर अमेरिकेत पुस्तक (रिलीज) प्रकाशित करताना त्याचबरोबर त्याची ई-बुक आवृत्तीही प्रकाशित करतात, ज्यामुळे छापील पुस्तक ज्यास्त खपते. फुकटात हे मिळाल्याने प्रकाशकाचा जर खर्चच होत नसेल व म्हणून नुकसान होत नसेल तर वाईट काय तर फक्त लेखकाची रॉयल्टी तेव्हढी बुडते. पण किती असते रॉयल्टी ? माझ्या वडिलांची पाच सहा पुस्तके (अगदी मौजेची ) होती. पण रॉयल्टी यायची अवघी १२३रु.५० पैसे. त्यांचे वाचणार्याला ती त्यांनी नक्कीच माफ केली असती .
हे असे करावे का ?
-------------------------------------------------------------------------------------
Tuesday, May 31, 2011
Tuesday, May 3, 2011
अरुणोदय झाला----२०
कवी का गीतकार ?
आपल्याकडे फारा दिवसांपासून एक वाद आहे की ग.दि.मा. वा जगदीश खेबुडकर ह्यांना कवी म्हणायचे की गीतकार ? कोण मोठा ? कवी का गीतकार ?
भाषाशास्त्रात "रेजिस्टर ऑफ लॅंग्वेज" नावाचा एक शैलीप्रकार आहे. जसे: समजा आपण कोणाला प्रेमपत्र लिहितो आहे तर त्याची भाषाशैली अगदीच वेगळी, मृदू, मुलायम, रोमॅंटिक, खाजगी अशी असते. आणि समजा एक वकील एक नोटीस लिहितो आहे, तर त्याच्यातली भाषाशैली ही खासच थेट वळणाची, नेमकी व कोरडी असते. आता कादंबरी, लघुकथा, कविता, गीते, निबंध, लघु-निबंध, संशोधनपर निबंध वगैरे साहित्याचे वेगवेगळे वाण आपण पाहतो. प्रत्येकाची शैली ही खास वेगळीच असते व ती त्या त्या वाङमयप्रकाराला साजेशीच असते, असावी लागते. ह्या पैकी आजच्या वादाला घेऊ : कविता आणि गीते.
गीते अर्थातच, गेय असावी लागतात. अर्थात एक अपवाद म्हणून कधी कधी अजिबात न गाता येणारी गीतेही गाजून जातात. पण ते अपवादच. ( वेस्ट-इंडीज येथे कॅलिप्सो गाण्यांची परंपरा आहे. दरवर्षी कार्निव्हलला स्पर्धा आयोजून ते एक कॅलिप्सो-किंग व कॅलिप्सो-क्वीन निवडतात. त्या गाण्यात एक चायनीज माणूस एक विचित्र गाणे, जे अजिबात गाता येत नव्हते, गायला. त्याला चायनीज कॅलिप्सो-किंग म्हणत लोकांनी प्रचंड हास्यकल्लोळ केला. गाता न येणारं गीत हा तसा विनोदच ! ). गीतात गेयतेसाठी छोटे छोटे शब्द, सोपा अर्थ असलेले शब्द, आणि यमके, अनुप्रास, असे आवाजी अलंकार ह्यांचे प्राबल्य असते. कित्येकवेळा केवळ गीतासाठी काही विचित्र आवाज असलेले शब्दही योजतात. जसे: किशोरकुमारचे डुडलींग--डिडली ए---या--हू--वगैरे. गीतांची योजना सिनेमात वा भावगीतात एक प्रकारचा मूड, भाव, वातावरण, निर्माण करण्यासाठी असते. त्यामुळे त्यात अगम्य शब्द, अर्थ न निघणारे शब्द, असून चालत नाही. शिवाय काही काही कठोर आवाजाचे शब्द वापरता येत नाहीत. वीरश्रीची गीते असतील तर त्यात वेगळेच साहस निर्माण करणारे शब्द वापरावे लागतात.
त्या मानाने कवितेला काही बंधने नसतात. कविता कशीही करू शकता. पूर्वी वृत्तात कविता करणे आवश्यक असे. किंवा भक्तिभावाच्या कविता अभंग वा ओवी ह्या वृत्तातच असत. आजकाल असे काही बंधन नसते. आजकाल बहुतेक कवितेचा मामला हा मुक्तछंदात कुठल्याही निर्बंधाविना असतो. शिवाय कवितेचा अर्थ समजलाच पाहिजे असे बंधनही नसते. किंबहुना जेवढी कविता दुर्बोध तेवढा तिचा दर्जा चांगला, असा सामान्यांचा संशय असतो. कवितेला मूड, भाव, वातावरण निर्मिती वगैरेचेही उत्तरदायीत्व नसते. कविता फक्त असावी लागते. कशी का असेना. ह्या वर्णनावरून सगळी गीते ही कविता ह्या प्रकारात मोडू शकतात पण सगळ्या कविता गीतात घेता येत नाहीत. काही मोजक्याच कवितांना गीतेही म्हणता येईल.
संगीतकाराच्या चाली बरहुकूम, ताल-लयाला धरून, गीते लिहिणे, हे सर्जन प्रक्रियेत खूपच कसबाचे काम आहे. त्यामानाने कविता जन्माला घालणे हे फारच सोपे काम असते. ( म्हणूनच कुठल्याही साहित्य-संमेलनात कवी व काव्य-वाचनवाले प्रचंड प्रमाणात असतात, दुसर्या कुठल्याही साहित्यप्रकाराच्या तुलनेत.). ते सगळ्यांनाच जमणे फार अवघड. तसेच गीते समजणे, त्यांचे रसग्रहण करणे हे जरा कौशल्याचे काम आहे. गेयतेचे अंग सगळ्याच ऐकणार्यांना असते, असे नाही. बहुसंख्यांना त्यात फारसे गम्य नसते.
साहित्याचे प्रयोजन तुम्हाला अभिव्यक्ती करू देण्याचे असते. तुम्ही तुम्हाला काय वाटते ते लिहू शकाल, ते साहित्य. गीते लिहिणे हे खूपच कसबाचे व कठिण काम खरेच, पण ते एका विशिष्ट हेतूपायी योजलेले सर्जन असते. ते कविते सारखे सहजी स्फुरलेले व सर्जकाला मुभा देणारे असत नाही. त्यामुळे ते अटी-तटी-चेच ठरवण्याचा सामान्यांचा कल असतो. पूर्वी मात्रा-वृत्तात कविता लिहिणे हे सर्जनापेक्षा कसबाला वाव देणारे असे. म्हणूनच ते आता बाद करण्यात आले आहे. चित्रकलेत सुद्धा हुबेहुब रेखाटण, हे ज्यास्त कुसरीचे काम आहे, ते दिसायलाही मोहक असते. पण आजकालच्या आधुनिक चित्रकलेत म्हणूनच त्याला मानाचे स्थान देत नाहीत. आडव्या-तिडव्या रेघा, रंगांचे वाट्टेल तसे पुंजके व मन मानेल तो विषय ( तोही समजेलच असा काही नेम नाही ), असे आजकालच्या चित्रकलेचे झाले आहे. ह्याच कला मुळे ( ट्रेंड ह्या अर्थी ), साहित्यात बंधने असलेले अविष्कार, आजकाल मान्यता पावत नाहीत. हे इतके टोकाला जाते की वाचकाला कधी कधी एखाद्या कलाकृतीला कथा म्हणावे, निबंध म्हणावे, का कादंबरी म्हणावे असा संभ्रम पडू शकतो.( जसे श्याम मनोहर यांच्या कादंबर्या ). पण ज्यांच्याकडे साहित्याची व्यवस्था सोपविलेली असते त्यांना ह्या संभ्रमापेक्षा सर्जकांच्या मुक्त आविष्काराचे ज्यास्त अप्रूप असते व महत्वही असते व त्याचीच तळी ते उचलून धरतात. ते त्यांच्या सोयीचे असते.
पण सुदैवाने साहित्य हा प्रकार अजून तरी कोणा एका गटाकडे गेलेला नाहीय. त्यामुळे आपल्याला वाखाणायचे तर आपण एखाद्या गीतकाराला अप्रतीम कवी म्हणू शकतो व तसा सन्मानही देऊ शकतो. तो तसा ग.दि.माडगूळकर व जगदीश खेबुडकर ह्यांना रसिकांनी दिलेला आहेच. साहित्याचे शास्त्र गुंडाळून ठेवून ! तर काय हे दोघेही फार मोठे गीतकार व कवी आहेतच !
--------------------------------------------------------------------------------------

Subscribe to:
Posts (Atom)