Sunday, March 18, 2012



अरुणोदय झाला--२८

पानसिंग तोमार,
बोलीचा खुमार !

    हिंदी सिनेमाचे एक चांगले असते की तो कोणाला कशासाठी आवडतो तर कोणाला कशासाठी !
    मला हा सिनेमा बोली भाषेच्या खुमारी साठी आवडला.
    पानसिंग तोमार हा सैन्यात जातो. खायला मुबलक मिळते म्हणून सैन्यातल्या स्पोर्टस्‌ मध्ये रनिंग मध्ये प्राविण्य मिळवतो. इकडे त्याची शेती बळकावल्या जाते म्हणून तो बागी बनतो. चंबळचा डाकू बनतो. सिनेमाची गोष्ट एका पत्रकाराच्या मुलाखतीने उलगडत जाते. हाडाचा स्पोर्टमन जसा शर्यत पूर्ण केल्याविना रहात नाही त्या प्रमाणे हा शेवटी शरण न येता पोलिसांशी लढताना प्राण ठेवतो. सिनेमा जे खेळाडू हलाखीने मेले त्यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.
    आता बोली भाषेच्या खुमारी बद्दल. संवाद लेखकाने कमालीच्या प्रांजळपणाने संवाद थेट चंबळच्या बोलीतच ठेवले आहेत व इरफान ह्या नटाने त्याला त्याच्या नेहमीच्या तुसड्या फेकीने चांगलाच न्याय दिला आहे. एक साधे उदाहरण: मुलाखत घेणार्‍या पत्रकाराला तो मटण खाऊ देत नाही ( कारण पत्रकार मोटा असतो ) पण त्याला आइस-क्रीम विथ गुलाबजाम देतो. गरम गुलाबजाम आईसक्रीम बरोबर खाण्याच्या विदेशी लज्जतीचे बहारदार वर्णन करताना तोमार म्हणतो : एकै स्वाद है, लेकिन डबल मिजाज है !
    साध्या साध्या माणसांनाही विचारांचे गारूड कसे मोहवून अचाट कामे करून घेते तेही ह्या सिनेमात फार नजाकतीने दाखविले आहे. जसे सगळे जण पानसिंग तोमार ह्याला शेवटी शरणागती पत्कर असे सांगत असतात. पोलिटिकल करेक्टनेस प्रमाणे ते रास्तही ठरते. पण पानसिंग म्हणतो हम ठहरे पगबाधा रनर ( स्टीपल-चेस रेसचा रनर), हमार लक्ष्य फिनिश लाइन. भले जिते या हरे, रेस तो पूरी करनीही है ! एक साधे तत्व, पराकोटीच्या वेडेपणाला भाग पाडते !
    असेच सैन्याधिकारी त्याची चौकशी करीत असताना त्याला विचारतात की त्याच्यापैकी कोणाला पोलिसांनी कधी पकडलेले होते काय ? म्हणजे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? तर पानसिंग कौतुकाने म्हणतो, पोलिस पकडही नही पाये ! म्हणजे पकडल्या जातो तो चोर व पकडल्या जात नाही तो नेता असाच जनमानसाचा कौल दिसतो !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------------------------

Friday, January 27, 2012

अरुणोदय झाला---२७
पुरस्कार केव्हा मिळावेत ?
    विंदा करंदीकरांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्या कितीतरी आधी त्यांनी कविता करायचे सोडले होते. जवळ जवळ जीवनाच्या शेवटालाच त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रात वसंत बापट, मंगेश पाडगावकर व विंदा करंदीकर ह्यांचे त्रिकूट एकेकाळी गावोगाव जाऊन काव्यगायनाचे कार्यक्रम करीत असत. खरे तर तेव्हढया एका कार्यासाठी, मराठी कविता व अभिरूचीच्या संगोपनासाठी, त्यांना दिले असते तितके पुरस्कार कमीच पडले असते, इतके ते मोलाचे काम होते. पण त्या वेळी हे तिन्ही कवी तरुण होते व त्यांची मस्ती, निर्मिती हाच त्यांना मोठा पुरस्कार वाटत असावा.
    कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कॉलेजमध्ये असताना जीवनानुभवाच्या महत्तेपोटी शिक्षण सोडून दक्षिणेकडे गेले होते व आतंकवादी समजून त्यांना तुरुंगवासही तेव्हा झाला होता. पण त्या तरुण कवीला "महाराष्ट्र काव्य-भूषण" हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने आत्ता चार-पाच वर्षापूर्वी दिला.
    कवी वसंत बापट कुठला पुरस्कार मिळण्याआधीच वारले.
    मागच्या वर्षी ठाण्याला एका कार्यक्रमात सगळे मान्यवर कवी रांकेत पहायला मिळाले. त्यात शंकर वैद्य दिसले. कोणी तरी त्यांची स्वाक्षरी मागत होते. वही, पेन, चष्मा, ह्या सगळ्या जामानिम्याला सांभाळत त्यांचा थरथरता हात कितीतरी वेळ स्वाक्षरी काढण्याचा प्रयत्न करीत होता. एके काळी दूरदर्शनवर काय अप्रतीम मुलाखती, काव्यगायन हा कवी करीत असे ते आठवून मन गहिवरून आले.
    ग.दि.माडगूळकर व शांताबाई शेळकेंना तर खास मानाचे असे पुरस्कार मिळायला खूपच उशीर झाला.
    कवी लोकांना जेव्हा आपण पुरस्कार देतो तेव्हा तो आपण त्यांच्या निर्मितीला केलेला एक सलाम असतो. तो आपण त्यांच्या निर्मितीच्या भरात असतानाच करायला हवा. निर्मितीची गात्रे गळित-गात्र झाल्यावर आपण त्यांना पुरस्कार देतो हा खरोखर त्यांच्यावरच्या आटलेल्या निर्मितीचा उपहासच नाही का ? प्रकृतीला न जुमानता जेव्हा कवी त्याला दिसणार्‍या वाटेने, आडवाटेने, चौखूर उधळत असतो तेव्हा आपण त्याच्या मार्गापासून दूरवर उभे राहतो व प्रकृती जेव्हा त्याचे सगळे निर्मिती-रस आटवते तेव्हा आपण त्याला मान देतो. हे आपले वागणे साहित्य-बाह्य लक्षणांना जोपासणारे आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------------

Tuesday, January 3, 2012



अरुणोदय झाला---२७

___" सह नौ टरक्‌तु !
सहवीर्यं डरवावहै ! "
  
    काल कानपूरला एक अफवा उठली आहे. अफवा अशी की तिथे भूकंप येऊ घातला आहे व तशात जे लोक बाहेर असतील, बाहेर झोपलेले असतील, त्यांची होईल, दगड आणि माती !
    क्षणभर हसू आले. पण जरा विचार केला तर आपली दगड आणि माती झाली आहे असेच दिसून आले. कशाचेच आता कौतुक नाहीय. कोणी अनाम पूर्वजांनी केव्हा तरी करुणा भाकली असेल की "माझ्या मना बन दगड !" आणि आपण आताशी दगडासारखे मख्ख झालेलो असू. हा कसला कंप आला आणि आपण बनलो दगड आणि माती ?
    समाजाचे राहू द्या, कुटुंबातली नाती सुद्धा व्हावी दगड आणि माती ? आणि पांगली किती माणसे ! आई-बाप इथे तर मुले तिथे परदेशी. देशात असली तरी परमुलुखात . प्रगती आणि सुधारणा म्हणजे, नेहमीचे बसकर सोडायचे व दुसरे शोधायचे, असेच का व्हावे ? आणि असे झाले म्हणून मनातले एकमेकांविषयी वाटणे, अनुकंपा, कमी का व्हावे ? ह्या अनुकंपेच्या न येण्यानेच होणार आहे का आपली दगड आणि माती ? का ह्या अनुकंपेपायी मोजावी लागणारी किंमत पाहूनच आपल्याला भीती वाटायला लागली आहे ? आताशी ह्या अंधाराची चीड येण्याऐवजी ह्याचा धाकच उदंड वाटतो आहे. हिंमतीने आणलेले पाणी बाळगणारी ओली जिवणीही अशी धाकाची रात्र कोरडी पडते आहे. मनाच्या ह्या खिंडारांवर आपण भीतीचा गाळ थापून काही डागडुजी करतो आहोत का ? ब्यूरोच्या बायका नेमल्या की झाले कर्तव्य, हीच का जनरीती होऊ लागलेली आहे ? हे भळभळणारे नात्यांचे रक्तस्त्राव लगेच थांबावेत म्हणून का आपण ह्या जनरीतींचा बर्फ त्यावर धरतो आहोत ? हे सगळे भयाण आहे . पण सगळीकडे असे भयाणतेचेच बुरुज दिसत आहेत. ह्या बुरुजांवरून शेवटची परवलीची शीळ येईल, जिच्या येण्याबरोबरच सगळे होईल दगड आणि माती ! ह्या शीळेलाच गिळू यात व मंत्र म्हणू यात __"सह नौ टरक्‌तु ! सहवीर्यं डरवावहै !"
    कानपूरला केव्हा बरे पोचले असतील मर्ढेकर ? कारण मर्ढेकरच म्हणाले होते :
            मनास पडली जर खिंडारें
            भकास, थापा गाळ भीतीचा,
            अन्‌ धमन्यांतिल धारांवरती
            बर्फ रचा मग जन-रीतीचा.
              
                अंधाराचा धाक उदंड,
                काळोखाची हाक अकल्पित,
                ओल्या जिवणीमधील पाणी
                पळविल ऐशी रात्र अशिल्पित;
              
                भयाणतेच्या बुरुजावरुनी
                येइल केव्हा शीळ अनामिक;
                गिळा तिला अन्‌ मंत्र आठवा
                मनातल्या पण मनांत, लौकिक:
          
            __"सह नौ टरक्‌तु !
            सहवीर्यं डरवावहै !"
( कवी : बा.सी. मर्ढेकर, १४, "काही कविता" मधून )
---------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
--------------------------------------------------------------------------------------