Tuesday, January 3, 2012



अरुणोदय झाला---२७

___" सह नौ टरक्‌तु !
सहवीर्यं डरवावहै ! "
  
    काल कानपूरला एक अफवा उठली आहे. अफवा अशी की तिथे भूकंप येऊ घातला आहे व तशात जे लोक बाहेर असतील, बाहेर झोपलेले असतील, त्यांची होईल, दगड आणि माती !
    क्षणभर हसू आले. पण जरा विचार केला तर आपली दगड आणि माती झाली आहे असेच दिसून आले. कशाचेच आता कौतुक नाहीय. कोणी अनाम पूर्वजांनी केव्हा तरी करुणा भाकली असेल की "माझ्या मना बन दगड !" आणि आपण आताशी दगडासारखे मख्ख झालेलो असू. हा कसला कंप आला आणि आपण बनलो दगड आणि माती ?
    समाजाचे राहू द्या, कुटुंबातली नाती सुद्धा व्हावी दगड आणि माती ? आणि पांगली किती माणसे ! आई-बाप इथे तर मुले तिथे परदेशी. देशात असली तरी परमुलुखात . प्रगती आणि सुधारणा म्हणजे, नेहमीचे बसकर सोडायचे व दुसरे शोधायचे, असेच का व्हावे ? आणि असे झाले म्हणून मनातले एकमेकांविषयी वाटणे, अनुकंपा, कमी का व्हावे ? ह्या अनुकंपेच्या न येण्यानेच होणार आहे का आपली दगड आणि माती ? का ह्या अनुकंपेपायी मोजावी लागणारी किंमत पाहूनच आपल्याला भीती वाटायला लागली आहे ? आताशी ह्या अंधाराची चीड येण्याऐवजी ह्याचा धाकच उदंड वाटतो आहे. हिंमतीने आणलेले पाणी बाळगणारी ओली जिवणीही अशी धाकाची रात्र कोरडी पडते आहे. मनाच्या ह्या खिंडारांवर आपण भीतीचा गाळ थापून काही डागडुजी करतो आहोत का ? ब्यूरोच्या बायका नेमल्या की झाले कर्तव्य, हीच का जनरीती होऊ लागलेली आहे ? हे भळभळणारे नात्यांचे रक्तस्त्राव लगेच थांबावेत म्हणून का आपण ह्या जनरीतींचा बर्फ त्यावर धरतो आहोत ? हे सगळे भयाण आहे . पण सगळीकडे असे भयाणतेचेच बुरुज दिसत आहेत. ह्या बुरुजांवरून शेवटची परवलीची शीळ येईल, जिच्या येण्याबरोबरच सगळे होईल दगड आणि माती ! ह्या शीळेलाच गिळू यात व मंत्र म्हणू यात __"सह नौ टरक्‌तु ! सहवीर्यं डरवावहै !"
    कानपूरला केव्हा बरे पोचले असतील मर्ढेकर ? कारण मर्ढेकरच म्हणाले होते :
            मनास पडली जर खिंडारें
            भकास, थापा गाळ भीतीचा,
            अन्‌ धमन्यांतिल धारांवरती
            बर्फ रचा मग जन-रीतीचा.
              
                अंधाराचा धाक उदंड,
                काळोखाची हाक अकल्पित,
                ओल्या जिवणीमधील पाणी
                पळविल ऐशी रात्र अशिल्पित;
              
                भयाणतेच्या बुरुजावरुनी
                येइल केव्हा शीळ अनामिक;
                गिळा तिला अन्‌ मंत्र आठवा
                मनातल्या पण मनांत, लौकिक:
          
            __"सह नौ टरक्‌तु !
            सहवीर्यं डरवावहै !"
( कवी : बा.सी. मर्ढेकर, १४, "काही कविता" मधून )
---------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
--------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment