“नीच” राजनीती !
एखाद्या शब्दाचा अर्थ काढताना त्यातल्या अक्षरांनाही काही अर्थ असतो का ? बघू
या .
“न” हे अक्षर मराठीतले अनुनासिक आहे. मराठीत अ ते अ: हे बारा स्वर व क, ख
,...ते ज्ञ ही ३६ व्यंजने अशी एकूण ४८ अक्षरे आहेत. म्हणजे दर शंभर अक्षरात एखादेच
अक्षर पुन्हा येण्याची शक्यता अवघी दोन टक्क्याची आहे. पण कोणतेही लिहिणे वा बोलणे
तपासले तर त्यात सगळ्यात जास्त येणारी अक्षरे आहेत अनुनासिके. जसे आपण म्हटले की “संध्याकाळी
येणारी डेक्कन क्वीन वेळेवर येणार आहे का ?” तर ह्या २२ अक्षरात अनुनासिके (
अनुस्वार, णा, न , न , णा ) येतात ५ , म्हणजे प्रमाण पडते २२%. असे अनेक उतारे
तपासले तर १८ ते २०% टक्के हे अनुनासिकांचे वापरातील सातत्याचे प्रमाण दिसेल .
ह्या शिवाय फोनोलॉजी ह्या विषयात सोनोरीटी स्केल मध्ये असे दाखवतात की सर्वात
मोठ्याने ऐकू येतात ते स्वर व त्यानंतर य र ल हे द्रव व त्यानंतर अनुनासिके.
म्हणजे श्रवणसुलभतेसाठी अनुनासिके फायद्याची ठरतात .
जेव्हा आपण कोणाला शिव्या घालण्याचे ठरवतो तेव्हा त्याचा भरपूर उपमर्द
करण्याचा आपला मानस असतो . तेव्हा जास्त वापरातील व मोठ्याने ऐकू येणारी अनुनासिके
वापरणे हे रास्त धोरण ठरते. शिवाय “न” ह्या अक्षरात नकारात्मकता ठासून भरलेली आहे हे
कोणाच्याही लक्षात येतेच. त्यामुळे शिवी द्यायची तर ती “नी” पासून असावी हे साहजिकच म्हणायला हवे.
आता राहता राहिले दुसरे अक्षर “च”. मराठीत ह्या अक्षराची एक वेगळीच खुमारी
आहे. “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मागणीत “च”
नसता तर आचार्य अत्रे म्हणायचे तसे चव्हाण मधले “च” काढले तर जे राहते ( “वहाण” )
तेच मारावे लागले असते. तंत्रशास्त्रात च ह्या अक्षराचे दैवत “इच्छाशक्ती” आहे व
म्हणूनच “नीच” मध्ये प्रतवारी करणार्याची इच्छाशक्ती प्रकर्षाने दिसून येते.
त्यामुळेच “नीच” ही फार परिणामकारक शिवी होते व म्हणूनच ती फार झोंबते !
------------------------------------