Friday, April 29, 2016

एकनिष्ठतेचे सगेसोयरे

एकनिष्ठतेचे सगेसोयरे !
१)    त्या काळी फॅमीली कोर्ट नुकतेच आले होते व आम्हाला एम बी ए ला एका न्याय-विषयात त्याचा अभ्यास होता . सौ पाटील ह्या खरे तर गणिताच्या प्राध्यापिका पण त्या डीन असल्याने त्यांना वाटले की आम्ही प्रत्यक्ष कुटुंब न्यायालयात जाऊन एक केस स्टडी करावी . नेमकी एक विचित्र केस माझ्या वाट्याला आली होती. एक मराठी नवरा बायको होते. साधारण साठीच्या आसपासचे. मुले मोठी झाली होती, त्यांची लग्नेही झालेली होती व आता त्यांना घटस्फोट हवा होता.  कारण काय तर म्हणाले की त्यांना जेव्हा कळाले की त्यांचे पटत नाही तोवर दोन मुले झाली होती. त्यांनी ठरवले की आपण आत्ता जर वेगळे झालो तर मुलांचे नुकसान होईल. तर त्यांनी तडजोड म्हणून असे नक्की केले होते की मुले मोठी झाली की घटस्फोट घ्यायचा व त्याप्रमाणे आता त्यांना वेगळे व्हायचे आहे. आता ही केस वर्गात चर्चा करताना बहुमताने त्यांना घटस्फोट देऊ नये असा निर्णय झाला, कारण Incompatability ( अनुरूप स्वभाव नसणे ) इथे न दिसता उलट एक कमीटमेंटच दिसत होती. ( सहा महिन्यांनी आम्ही नक्की काय झाले त्याचा तपास केला असता त्यांना घटस्फोट मिळाला नाही असे कळले ).
तर बऱ्याच वेळा इतर कौटुंबिक नडीपायी एकनिष्ठता अशी वरपांगी वसून असते.
२)    लोकलज्जा व एकनिष्ठता
आज ४० वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक मद्रासी कुटुंब होते. त्या काळी मुंबईत मद्रासी खूप होते व ते जसे चौकोनी असतात तसेच हे कुटुंब होते. नवरा नुकताच निवृत्त झाला होता पण बाई अजून नोकरीत होत्या. त्यांच्याकडे एक फाकडू बाई घरकामाला होती. ( अशांनाच अशा बायका बऱ्या मिळतात ! ). तिच्या दिसण्यावरून व एकंदर असूयेपायी आजूबाजूच्या बायका तिच्याविषयी अनेक कथा रचून सांगत असत. अशावेळी जशा सगळ्या पुरुषांच्या मनात येते तसेच त्या नवर्याच्या मनात आले व त्याने जरा धीर करून....आणि मग खूपच बोभाटा झाला. त्या बाईने आरडओरड केली, लोक गोळा झाले वगैरे. त्याकाळी ह्या गोष्टींचे इतके कायदे नसल्याने पोलीस वगैरे भानगडी झाल्या नाही, पण गडी अगदी डिप्रेस्ड झाला व आधीच निवृत्तीने गळ्हाटला होता त्यात ही बदनामी. नंतर दोन चार वर्षातच बिचारा वारला. त्याचे हे असे झालेले पाहून शेजारच्या तमाम पुरुषांना ही फारच जोखीम आहे ह्याचे भान झाले व ते एकनिष्ठच राहिले.
तर कित्येक वेळा लोकलज्जेपायी एकनिष्ठता वाढीस लागते !
३)    एकनिष्ठतेचे सगेसोयरे ---वार्धक्य
आर्तः देवान् नमस्यन्ति, तप: कुर्वन्ति रोगीण |
निर्धना: दानं इच्छन्ति, वृद्धा: नारी पतिव्रता ||
( दुःखात किंवा संकटात पडलेली माणसे देवांना नमस्कार करतात, रोगी लोक पथ्यपाणी तप करतात, दरिद्री माणसे दान करू इच्छितात आणि वृद्ध स्त्री ही पतिव्रता असते. वृद्ध स्त्री कोणाला आकर्षक वाटत नसल्याने ती पतिव्रता असते.
आमच्या ओळखीच्या एक बाई आहेत. ६५ च्या. पण तरुणपणी सुंदरच असाव्यात कारण अजूनही चांगल्याच दिसतात. नवर्याने छळले, धंदा बुडीत गेल्याने त्रासला होता व तशात त्याने एकदा जे घराबाहेर काढले ते त्यानंतर त्या परत गेल्याच नाहीत. नंतर नवराही वारला. नंतर दिरांनी मदत केली, नोकरी केली, मुले आज डॉक्टर झाली आहेत व ह्या बाई आता एकट्याच राहतात. मनमानी करतात. मनात आले तर दादरला गोमंतक मध्ये जेवायला जातात, नाटक सिनेमे पाहतात, पर्यटन करतात वगैरे. खरे तर ह्यांचा  स्वभाव पाहता  त्यांनी उच्छ्रंखल असायला हवे. पण आता ह्या वयात परत संसाराची कीटकीट त्यांना नको वाटते. त्यामुळे त्या नसलेल्या नवर्याला एकनिष्ठ राहतात.
खरे तर वरच्या संस्कृत श्लोकात जे वृद्ध स्त्री बद्दल म्हटले आहे ते अनुदार आहे पण प्रत्यक्षात वृद्ध स्त्रिया पतिव्रता होतात !
-----------------                        


Sunday, April 10, 2016

पनामा कावा

पनामा कावा का कालवाकालव
जे कोपऱ्यावरून जाते तेच परत येत असते अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. त्यावरून हे “पनामा पेपर्स” असे मधेच कसे उपटले ह्याचे एक गूढच वाटत होते. आणि ह्यात सगळेच कसे ओवळे निघत आहेत त्याचेही आश्चर्यच वाटत होते. शेवटी निकराने शोधाशोध केली आणि सापडले गौड-बंगाल.
मागे विकीलीक्स प्रकरण झाले तेव्हा त्याच्या बातम्या केवळ “हिंदू”त येत, तेव्हा कळले की त्यांनी प्रचंड पैसे खर्चून त्या विकत घेतल्या होत्या. तर मग आज हे “पनामा पेपर्स”चे कारनामे केवळ इंडियन एक्स्प्रेस मध्येच कसे येतात ? तर असे आढळले की एक ICIJ नावाची शोध पत्रकारांची एक अमेरिकेत संस्था आहे त्याच्याशी एक्स्प्रेस संबंधित आहेत. काय करते ही संस्था ?
सगळ्या प्रगत जगात अॅसबेस्टॉस वर बंदी आहे कारण त्याने फुफ्फुसांचा कर्क रोग होतो. अमेरिकेत ह्याची एव्हढी प्रकरणे झाली की ह्यासंबंधीत उद्योग तर बंद झालेच शिवाय जी नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागली त्याने विमा कंपन्याही बुडीत आल्या. पण रशिया, ब्राझील, कॅनडा इथे हे उद्योग आजही खूप जोरात आहेत व त्याला तिथले सरकार संरक्षण देते. चीन व भारत हे ह्या अॅसबेस्टॉसचे जगातले मोट्ठे ग्राहक आहे. अॅसबेस्टॉसच्या खाणी रशियात प्रचंड प्रमाणात आहेत व पुतीन त्यांना संरक्षण देण्यात आग्रही आहेत.
सीएनएन वरची अमान्पोर हीही ह्या संस्थेशी निगडीत होती. फोर्ड फौंडेशन, रॉकफेल्रर व जॉर्ज सोरोस हेही ह्या संस्थेत कार्यरत आहेत व त्यांना सध्या रशिया सिरीयात जी चढाई करीत आहे त्याला लगाम घालायचा आहे व त्याला काही मुस्लीम राज्ये मदत करीत आहेत त्यांनाही वठणीवर आणायचे आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या विरुद्ध खुन्नसने अॅसबेस्टॉस विरोधी संशोधन करताना जी  माहिती हाती लागले होती त्याचा आता बोभाटा केला तर ह्या धोरणाने हे सगळे प्रकरण बाहेर येत आहे. गरीब देशांना अॅसबेस्टॉसचे पत्रे छत म्हणून हवे आहेत तर ते ह्या कर्क रोगापायी वापरू नयेत असा चांगला हेतूही त्यामागे आहे.
आणि ह्याच मुळे ह्या पनामा पेपर्स मध्ये अमेरिकन नावे नाहीत. कर भरला तर ज्यांची नावे आलीत त्यांना काही डर नाही. पण मुख्य भर रशियाच्या पुतीन ह्यांना अडचणीत आणणे मात्र ह्याने चांगले साधते आहे !

---------------------------------------------