स्मरण मुक्ताचे !
आज मुंबई मिरर मध्ये युनिस डिसोझा ह्यांनी नझिम हिकमत ह्यांच्या तुरुंगाच्या भिंतीवरच्या कवितात एक कविता उद्धृत केली आहे. ती अशी :
“Today is Sunday. For the first time they took me out in the sun today.
And for the first time in my life I was aghast That the sky is so far away And so blue And so vast.
I stood there without a motion.
Then I sat on the ground with respectful devotion Leaning against the white wall.
Who cares about the waves with which I yearn to roll Or about strife or my wife right now The soil, the sun and me.
I feel joyful and how.“
तुरुंगातल्या एका कवीला सूर्याच्या मुक्ततेचे स्मरण व्हावे व ह्या ओळी वाचून तुरुंगाच्या भिंतीवर काव्य लिहिणाऱ्या सावरकरांची आठवण झाली व त्या शोधताना मला अंदमानच्या संकेतस्थळावर सावरकरांचे एक चित्र दिसले ज्यात भिंतीवरच्या काही ओळी दिसल्या. त्या शोधल्यावर अशा होत्या :
:
कमला काव्य
आणि हे सोनचाफ्या, तू शिकलासि तरी कुठे
ही दिव्य किमया ? आम्हा स्वयमन्य नरां जिथे
रुप्याचेही करायासी जड स्वर्ण न साधते
ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळुनी तिथे
मृदूचेतन सोन्याची, स्वर्णचंपक ! ही फुले
सुगंधी तुज पाहुनी निर्मितां मन हे भुले
प्रियाच सोनचाप्याची, चमेली किती ही खुले
तो तिच्यावरी, ती त्याच्यावरती उधळी फुले !
काय गंमत, हे कमला काव्य मला इंटरनेट वर मिळाले व ते ज्यांनी ( कवी वा.गो. मायदेव ) संपादित केले त्यांचीही मला आठवण झाली. मी पुण्याला इंजिनीअरिंग हॉस्टेलला असताना दर रविवारी मायदेवांच्या घरी जात असे. हे आपल्या सौ. सुधाताई काळदाते ह्यांचे वडील होत. ते रविकिरण मंडळातले कवी असून जुन्या काळातले लहान मुलांच्या कविता लिहिणारे कवी होते व त्यांचे बोलणे अतिशय मृदू व प्रांजळ असे. अशा कवीने हे कमला काव्य संपादित करावे हा मोठा काव्यमय न्याय आहे. ह्या ओळीत तुम्हाला दिसेल की तुरुंगातल्या कवीला सोनचाफ्याचे स्मरण व्हावे हे अपार काव्यमय आहे.
असेच माझे वडील ( कै. अनंत भालेराव ) हे एकदा तीन महिन्याचा तुरुंगवास भोगून घरी आले तेव्हा सांगत होते की आम्ही तुरुंगातून बाहेर पडलो व आम्हाला शेतात एक गाय चारा खात असलेली दिसली व आम्हाला इतका आनंद झाला की काय स्वातंत्र्याचे मूर्तिमंत चित्र आहे, की खुल्या आभाळाखाली एक गाय मुक्तपणे चारा खात आहे !
मुक्ततेचे एव्हढे बोलके चित्र व भावना मी पहिल्यांदाच पहात होतो. माझ्या अत्याचेच नाव मुक्ता असल्याने ह्या निमित्ताने आज तिचीही आठवण झाली.
हेच स्मरण मुक्तांचे !
------------------------