अरुणोदय झाला---११
"भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी"
मानवी व्यवहारात सत्य शोधण्याचे फार अप्रूप आहे. चांगली बुद्धिमत्ता असलेले लोक शास्त्रज्ञ होतात व ह्या विश्वातील सत्यतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यालाच आपण वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणू शकतो. त्यात असते कसोटी घेणे व त्याला खरे उतरणे. आणि इतर लोक हे प्रत्यही करीत असतात व म्हणूनच शास्त्रकाटयाची कसोटी ही त्या सत्य-शोधण्याची एक मूलभूत प्रक्रिया राहते.
साहित्यात असे मात्र होत नाही. कला व विज्ञान ह्या दोहोंचा सत्य शोधण्याचाच हेतु असतो पण कला आधीच ठरवते की तिच्या दृष्टीने सत्य काय आहे व मग ते इतरांनी पटले तर पत्करावे. विज्ञानातही गृहितके मानण्याची परंपरा आहे. पण विज्ञान कसोटीला सामोरे जाते तसे कला किंवा कलाकृती सत्याला सामोरे जात नाहीत.
आता भालचंद्र नेमाडे इतिहासातून "हिंदू" कादंबरी द्वारे सत्य त्यांना काय सापडले ते सांगतात. ते म्हणतात त्याप्रमाणे "ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला" व "हिंदू धर्माने जिंकलेल्या लोकांची संस्कृती स्वीकारत एक समृद्ध अडगळ आपल्या जीवनात निर्माण केली". आता त्यांचे हे म्हणणे खरे किती हे तपासायचे कोणी प्रयत्न करीत नाही. दरम्यान ५०० रुपयांच्या १५ हजार प्रती खपतात.
(म्हणजे गेला बाजार ७५ लाखांचा गल्ला जमतो ). म्हणजे कमीत कमी २५/३० हजार लोक ते म्हणणे ऐकून घेतात. आता हेच त्यांनी एखाद्या संशोधनार्थ प्रबंध लिहिला असता ( कोणी सांगावे लिहिला असेलही ! ) तर त्यावर किंवा त्याविरुद्ध कोणाला हे म्हणणे पडताळता तरी आले असते. पण कादंबरीत हे मांडलेले असल्याने तशी काही सोय नसते. वाटले तर वाचा, नाही तर वाचालच !
ज्यास्त प्रती खपल्या म्हणजे जे सांगितले आहे ते खरेच आहे असे होत नाही. कारण प्रती आधी खपतात व मग त्या लोक वाचतात ( किंवा बहुदा तशाच न वाचता ठेवून देतात ! ). तसेच उद्या ह्या कादंबरीला मोठमोठे पुरस्कार मिळाले तरी त्यावरून त्यातले प्रतिपादन सिद्ध झाले असे होत नाही. पटणे व खरे निघणे तर फारच दूर.
ह्याच अडचणी पायी तर बा.सी.मर्ढेकर म्हणाले नसतील ना की "भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी " ?
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
No comments:
Post a Comment