Friday, December 2, 2011

अरुणोदय झाला---२६

नाही हो नाही हो नाही......

    माणसाला ठामपणाचे खूप आकर्षण असते व आदर्श चांगला माणूस हा अगदी ठाम असाच असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस बर्‍याच बाबतीत हो नाही च्या अध्येमध्येच घोटाळत असतो. सोनियांचा आजार लोकांना सांगावा का नाही ?  राहूलने व्हेनेझुएलिन मुलीशी लग्न करावे का नाही ? राहूलने आत्ता लगेच पंतप्रधान व्हावे का पुढच्या निवडणुकी नंतर ? का प्रियांकालाच पंतप्रधानपद द्यावे ? हे खरे तर भारताचे मोठ्ठे प्रश्न असायला हवेत. पण लोकांना पडलेत एफडीआय-रिटेल, लोकपाल, महागाई, काळे धन, लाल दिवे वगैरे क्षुल्लक प्रश्न...
    लोकपाल बिलात अगोदरच लोकसभेने तीन मुद्यांवर होकाराचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणून मग आता कशाला नाही म्हणता येत नाही का ? कोण लागून गेली आहे स्टॅंडिंग कमीटी ? खुद्द सम्राज्ञीला अमेरिकेला ऑपरेशनसाठी जावे लागले, हे खरे, पण कोणता आजार होता हे आम्ही सांगू शकलो का ? सांगितले का ? अभिषेक मनु सिंघवी आहेत खूप हुशार पण त्यांना सुद्धा आम्ही कॉंग्रेसच्या प्रवक्तेगिरीवरून एकदा काढून टाकलेच होते ना ? प्रणबदा आहेत खूप अनुभवी पण राजीवजींच्या काळात त्यांनासुद्धा आम्ही चांगले बदडले होते ना ? मग नक्की नक्की असे काय असते ? नक्की कशाचे नक्की नसतेच.
    आमच्या नाही नाही म्हणण्याचे एवढे काय घेऊन बसलात. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ).  अहो देवाची व्याख्या करताना सुद्धा भारतीय तत्वज्ञान म्हणून गेले आहे की "नेति नेति". मग आम्ही थोडे हो नाही, हो नाही, केले तर त्यात काय एवढे ? न, ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त,  "न करणे" ही असते. पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).
    साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो.
    मग काय समजलात ? लोकपाल आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    एफडीआय-रिटेल मागे घेणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    काळे धन माघारी आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    महागाई कमी होणार का नाही ?  उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    २-जी चे राजे सुटणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    राहूलच लग्न होणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    आमचेच राज्य परत येणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
( हे सगळे खरे समजायचे का ? नाही हो नाही हो नाही हो...........)
-------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------------

Tuesday, October 18, 2011

मु.पो.कुसुमाग्रज व भाषांतराचे पक्षी:
फारा वर्षानंतर एका अभिजात कार्यक्रमाला जायला मिळाले. दि.१५ आक्टोबरला ( २०११) यशवंतराव चव्हाण सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे कुसुमाग्रजांच्या कवितांवर कवी सौमित्र ( नट, किशोर कदम) व गुलजार ह्यांच्या कवितावाचनाचा हा कार्यक्रम होता. खालचे प्रेक्षागृह भरल्याने वरच्या बाल्कनीत बसावे लागले. अर्थात बाल्कनीही भरली हे या कार्यक्रमाचे दिसणारे यशच.म्हणतात की हा चौथाच कार्यक्रम होता आणि असे बरेच व्हावेत असे वाटावे इतका ह्रद्य !
स्टेजवर गुलजार व कुसुमाग्रजांचे भव्य चित्र, आणि दोन पोडियम्स इतकाच नेटका रंगमंच होता व तो फारच प्रभावी जाणवत होता. प्रेक्षकात डॉक्टर जब्बार पटेल, गुरू ठाकूर व मुंबईच्या धकाधकीतून निवांतपणा काढणारे रसिक होते. कवी सौमित्र कुसुमाग्रजांची कविता अतिशय भावोत्कटतेने वाचीत व नंतर गुलजार त्याचे हिंदी-उर्दूतले भाषांतर पेश करीत, काही स्पष्टिकरणेही देत. असे एका भाषेतले कवितेचे पक्षी मु.पो, कुसुमाग्रज ह्या कवीच्या गावाहून भरारी घेत गुलजार ह्यांच्या कवितेच्या गावी सुखेनैव पोंचत व दोन्हीही कवी किती प्रचंड ताकदीचे होते त्याचा प्रत्यय येई. मध्ये मध्ये सौमित्र त्यांना काही कविताविषयक, सृजनविषयक, तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारीत व त्यांची चपखल उत्तरे तितक्याच लीलया गुलजार देत. असा मन खिळवून टाकणारा हा कार्यक्रम फारच वेधक झाला. अखेर गुलजार म्हणाले तसे, अनेक कवींचे मुशायरे टाळून एकाच कवीची कवने व तिची भाषांतरे ह्यांचा मरातब करणारी ही मराठी अभिरुची त्यांना तसेच प्रेक्षकांना अपार भावली.
कवितांच्या निवडीबद्दल सौमित्रांचे, अमृता सुभाष ह्यांचे अवश्य अभिनंदन करायला हवे. कारण कुसुमाग्रजांची आपल्या मनात असलेली प्रतिमा गर्जा जयजयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, आगगाडी व जमीन, जालीयनवाला बाग, जा जरा पूर्वेकडे, वेडात मराठे वीर दौडले सात, टिळकांच्या पुतळ्याजवळ वगैरे शालेय जीवनात भेटलेल्या शिरवाडकरांना ( कुसुमाग्रज) दाट ओळखीची होती. त्यात समकालीन कवी जी जीवनावरची, नात्यांवरची, मृत्यूवरची तत्वज्ञानात्मक भाव-कवने रचतात तशाच कविता निवडून त्यांची भाषांतरे पेश करण्याने एका ज्ञानपीठ विजेत्या कवीची भारदस्त बाजू पहायला मिळाली. शिवाय मूळ कवितेचे लगेच भाषांतर पेश करण्याने ती कविता मनावर चांगली पक्की कोरल्या जायची हेही वाखाणण्यासारखे झाले. कविता वाचनाच्या निमित्ताने सृजनाचे व आयुष्याच्या तत्वज्ञानाचे जरा रंगतदार दर्शन झाले. मृत्यूबद्दल सौमित्रांनी विचारलेल्या प्रश्नावर गुलजारांनी एक काव्यमय कल्पना सांगितली. त्यांना मृत्यू आजाराने शय्येवर यायला नको आहे, क्षणात चिंध्या करणार्‍या अपघाताने यायला नको आहे, तर कविता लिहिता लिहिता पेनमधली शाई संपून जावी तसा यायला हवा आहे. कवी गुलजारांची भाषांतरे चपखल तर होतीच, शिवाय एका थोर कवीने दुसर्‍यासमोर किती प्रांजळपणे नतमस्तक व्हावे ह्याचा आदर्श दाखविणारी होती. त्यांच्या एका कवितेवर प्रेक्षकांची दाद आल्यावर ते म्हणाले की ही दाद मूळच्या कुसुमाग्रजांना आहे ! केव्हढी ही विनम्रता व किती देखणी !
आजकाल आपल्याच नात्यांबद्दल विमनस्क करणारी भावना दाखवणारी एक कविता मोठी बोलकी होती. कवीने मोठ्या मशागतीने रोप लावले आहे व त्याची निगराणी केली आहे. पण आता ते झाड उन्हपावसात बहरत असताना कवीला आता त्याच्याशी संबंध तुटल्यासारखा वाटतो आहे. आणि तरीही तो म्हणतो की हे बहरणे, निसर्गाचे कवतिक वगैरे त्या झाडाच्या मुळांतून जमीनीच्या कुशीत जाणारे आहे. आजकालच्या पोटच्या मुलांना अंतरणार्‍या पालकांना ह्या कवित्तेचे तत्वज्ञान क्षणभर हेलावून सोडते. तसेच म्हातारपणी एकटेपणाचे दु:ख सोसणार्‍या पुरुषांची व्यथा कवीने सात चमच्याच्या स्टॅंड ह्या हलक्या-फुलक्या वाटणार्‍या कवितेने छान रेखाटली आहे. घरची मालकीण असती तर तिच्या देखरेखीत सातवा चमचा हरवला नसता ह्या अगदी सोप्या, घरगुती निरिक्षणाला पुष्टी देत जेव्हा कवी म्हणतो की तर मग मीही हरवलो नसतो, तेव्हा एकटेपणाची हळहळ साक्षात समोर उभी राहते. ह्या कवितेच्या भाषांतरादरम्यान गुलजारांनी एक छान उत्तर दिले. सौमित्रांनी विचारले होते की तुम्हाला निसर्गाच्या रूपांचे सुचते कसे ? त्यावर गुलजार म्हणाले की निसर्गाचे सोडा, इथे कुसुमाग्रज तर निर्जीव अशा चमच्याच्या स्टॅंडला जिवंत करीत आहेत ! सृजनाला अजून वेगळी दाद ती काय असावी ? सृजनाबाबत एक कवी म्हणून सौमित्रांना कुतुहूल असणे स्वाभाविक. मग ते विचारतात की तुम्ही चालीवर गीते कशी लिहिता. ह्यावर ते सांगतात की दोनशे वर्षांपासून अशीच रीत चालत आली आहे. प्रक्रीया समजली नाही पण रीत अशीच हे उमगले.
कुसुमाग्रजांच्या ज्वलंत राजकीय उपरोधाची खूण पटविणारी एक कविता, महात्मा गांधींच्या सरकारी भिंतींवर टांगले असण्याची, नेहमीप्रमाणे भरघोस दाद मिळवती झाली. शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दु:खाची किंवा कंगालपणाची खिल्ली न उडवता त्याचा मानमरातब ( डिग्निटी ) कुसुमाग्रज "कलोजस" ह्या कवितेत कसा सांभाळतात ते गुलजारांनी कवितेच्या भाषांतरात अप्रतीमपणे बोलून दाखविले. कुर्ल्याच्या चाळीत एका बंदिस्त खोलीत त्या गरीबाला, कंदिलात, एका सूर्यनारायणाचे कसे दर्शन होते व तो कलोजस कसा घनगंभीर होतो हा अनोखा रसास्वाद गुलजार इथे आपल्याला शिकवून जातात. पुराने घर खचले तरीही उभारीने, ताठ कण्याने, लढणार्‍या शिष्यावरची कविता "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" ह्यात गुलजार कुसुमाग्रजांचे नेमक्या व मोजक्या शब्दात चित्र उभारण्याचे कसब आवर्जून दाखवतात. "बायको मात्र वाचली" एवढे म्हणण्याने बाकीची हलाखी आपल्यापुढे साक्षात उभी राहते असे जेव्हा गुलजार निदर्शनास आणून देतात तेव्हा एका कवीचे रसग्रहण कसे असते त्याचा नमूनाच पहायला मिळतो.
कवी सौमित्र म्हणजेच कसलेले नट किशोर कदम व गुलजार हेही थेटर सिनेमातले, व कुसुमाग्रजही थोर नाटककार, तेव्हा नाटकावरची कविता नसती तर चुकचुकल्यासारखे झाले असते. "नट" नावाची एका नटाच्या अखेराची अप्रतीम कविता अशीच रंगते. रिकाम्या प्रेक्षागृहात रिकाम्या खुर्च्यांकडे प्रयोगाअंती पहात हा नट आशा करतो की जे प्रेक्षक माझी स्मृती घेऊन गेले आहेत त्यांच्यात अंशा अंशाने तरी मी वाटला गेलो आहे ह्याचे मला समाधान आहे. अशा कार्यक्रमानिमित्त धावपळीतल्या रसिकांना थोर कवींचे अंश अशाच रितीने आपल्यात झिरपले असावेत अशी सुखद जाणीव होते, जी "मु.पो.कुसुमाग्रज, भाषांतराचे पक्षी" ह्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मिळणारी पोचपावतीच आहे जणु.

------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

Wednesday, July 27, 2011

---------------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----२४
हीना रब्बानी खार !
भारतीय माणूस, मग तो मुस्लिम असो वा हिंदू, पाकीस्तानवर जरा खार खाऊनच असतो. पाकीस्तानशी बोलणी करताना त्याला नेहमीचे सर्व हातखंडे पाठ झालेले असतात. आम्ही मुंबई हल्ला काढला की त्यांनी समझौता एक्स्प्रेस काढायची, आम्ही घुसखोर काढले की त्यांनी बलुचिस्थान मध्ये होणारे हल्ले काढायचे. काश्मीर तर नेहमीचाच प्रश्न असतो. तशात पाकीस्तानने हीना रब्बानी खार ह्या ३० वर्षीय सुंदरीला परराष्ट्रमंत्री म्हणून भारतात पाठवावे हा खरेच एक मास्टरस्ट्रोक म्हणता येईल अशी चाल आहे. आणि त्यात एक प्रकारचे अप्रतीम काव्यही आहे. कसे ? अहो, ज्या पाकीस्तानावर आपण कायम खार खाऊन असतो त्यांनी त्यांचा परराष्ट्रमंत्रीच "खार" नावाचा पाठवावा ? म्हणजे हे अगदीच जशास तसे झाले !
शिवाय नेमेचि येतो मग पावसाळा सारख्या नेमाने होणार्‍या शांततेच्या बैठकी किती कंटाळवाण्या व्हायच्या. आणि आता पहा बरे ! बाईंवरून नजर हटत नाही इतके सौंदर्य ! किती माफक आणि भारी साजश्रृंगार ! १७ लाख रुपायांची म्हणे नुसती पर्स आहे. बिर्किन्स नावाच्या ब्रॅंडची आणि गॉगलही काय सुरेख, डोळ्यांना म्हटले तर लपवणारा, म्हटले तर खुलवणारा ! उंचनीच बाई, बोलतेही किती आर्जवी ! पाकीस्तानचे आता ऐकायला हरकत नाही !
आता भारतानेही ह्यापासून धडा घ्यायला हवा व आपला परराष्ट्रमंत्री असाच देखणा ठेवायला हवा. जर शशी थारूर ह्यांना परत आणू शकत नसतील तर त्यांची नववधू सुनंदा पुष्कर ही ह्या हीनाला तोडीस तोड होईल ! राहूलने स्वत: जरी अजून लग्न अथवा नारीवलय जवळ केलेले नसले तरी जरा देखणे लोक राजकारणात ठेवावेत म्हणजे आपल्या देशाचा टीआरपी जरा तरी वाढेल. हिलरी क्लिंटन बाईंचे नित्यनूतन बदलणारी केशभूषा पाहून सोनियांनीही जरा स्फूर्ती घ्यायला हरकत नाही.
माणसांचा तसाच देशांचा मूळ स्वभाव काही जाता जात नाही म्हणतात. पाकीस्तानाचा स्वभाव पहिल्यापासूनच उलटे बोलण्याचा, उलटे करण्याचा आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग ह्या "हीना रब्बानि खार" बाईला नेमताना त्यांच्या मनात नेमके उलटे नसेल ह्याचा काय भरवसा ? काय असेल ह्या बाईच्या उलटे ?--- हीना रब्बानि खार--ह्याच्या उलटे काय होते बरे ? अरेच्चा ! ते होते : रखा निब्बार नाही ! निब्बर नाही म्हणजे मऊ आहे, हेहि चांगलेच आहे म्हणायचे ! उलटे अथवा सुलटे बाईच जिंकते की !

-------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, July 13, 2011

कवितांच्या प्रतिमा--प्रतिमांच्या कविता
कै.पु.शि.रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या अंकात ( कविता-रती मार्च-जून २०११ ) प्रा.गंगाधर पाटील ह्यांचा एक "गाणारं झाड" नावाचा रेगे यांच्या आठवणींवरचा लेख आहे. त्या लेखात त्यांनी रेगे ह्यांना कशा काही कविता "दिसत" असत व ते लगेच त्या टिपून घेण्यासाठी रात्री उशाशी कागद-लेखणी ठेवीत असत असे सांगितले आहे. चक्क दिसलेली कविता व जोडून मोडून केलेली कविता ह्या संबंधी आपल्याला नेहमीच कुतुहूल असते. काही प्रमाण असो वा नसो, एक असे वाटत असते की जी कविता अशी "दिसते" ती दैवीच म्हणावी लागेल. ( मराठीतल्या विदुषी दुर्गा भागवत ह्या ग्रेस ह्यांच्या कवितांना असेच विशेषण लावीत. ). अशा दैवी कवितात कोलेरिज ह्यांच्या "कुबला-खान" ह्या शंभर ओळींच्या कवितेला सर्वात उच्च स्थान असावे, कारण ती म्हणे त्यांना शीर्षकासह दिसली होती. ह्यावर लगेच इस्लामवादी म्हणतील की मोहमंद पैगंबराला अपरिचित अशा भाषेत ज्या कविता दिसल्या ( म्हणजे आजचे कुराण ) त्यांनाच हे स्थान द्यावे, कारण त्या नुस्त्याच टिकल्या नाहीत तर त्यामागे आज एव्हडी प्रचंड संस्कृती उभारलेली आहे .
महाराष्ट्र काव्यभूषण श्री.मंगेश पाडगावकर सांगतात की त्यांना अकस्मात कवितेची एक ओळ सुचते व ती बरेच दिवस त्यांचा पिच्छा पुरवते व मग ते त्या ओळीतल्या भावनेनुसार त्याची चारोळी, वात्रटिका, गजल, सुनीत, भावगीत, गीत किंवा कविता अशी कलाकृती करतात. त्यांना प्रसंग, चित्र, देखावा दिसतो असे ते म्हणत नाहीत. कवी ग्रेस ह्यांना मात्र रात्री अपरात्री देखावे, दृश्ये दिसतात व त्यांच्या ते कविता करतात. असेच पु.शि.रेगे ह्यांना प्रसंग, देखावे दिसले व त्यावर त्यांनी कविता रेखल्या असे प्रा.गंगाधर पाटील ह्यांनी मांडले आहे. शास्त्रीय ( मेंदू बाबत ) दृष्टीने माग काढला तर असे आढळते की आपल्या मेंदूत विचार करण्याची काही कळच नाही.आपण एक तर साठवलेल्या आठवणी माघारी काढू शकतो किंवा येत असलेले अनुभव अगोदर असलेल्या अनुभवांशी पडताळून त्यांना योग्य कप्प्यात साठवू शकतो. पण आपल्याला स्वप्ने पडतात, चित्रे दिसतात हे तर नाकारता येतच नाही. स्वप्ने वा चित्रे दिसणे हे आपल्या मेंदूला खूपच सोयीचे आहे. कारण चित्रांऐवजी येणारे विचार जर शब्दात आले असते तर एखादे स्वप्न वाचायला आपल्याला कैक दिवस लागले असते. ( आपला लिहिण्याचा वेग असतो ४०/५० शब्द दर मिनिटाला, तर वाचण्याचा वेग असतो ८०/९० शब्द दर मिनिटाला. मनात वाचण्याचा वेग असतो १५०/१६० शब्द दर मिनिटाला. ) त्या मानाने अनेक शब्द लागणार्‍या वर्णनाचे एक चित्र ( फ्रेम ) धरले तर आपल्या पाहण्याचा वेगच असतो २४ फ्रेम्स दर सेकंदाला. म्हणजे क्षणात आपण कित्येक शब्दांचे चित्र ( फ्रेम ) वाचू शकतो, पण चित्राच्या भाषेत. आता ही चित्रेच म्हणजे प्रतिमा, असे धरले तर, ज्या कवींना कविता दिसतात असे मानले तर कवितेतल्या प्रतिमा ह्याच त्यांना दिसलेल्या प्रतिमा असे होईल. त्या प्रतिमा आपणही त्यांच्या कवितेतून पाहू शकतो.
नेमकेपणासाठी आपण पु.शि.रेगे ह्यांचीच अशी कविता-रतीने ह्या अंकात छापलेली ( मुखपृष्ठामागे ) एक कविता घेऊ :
पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो.

सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते बजावून सांगतो.

हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो.

मी कविता करीत नाही
माझ्या मनाची आणि तुझ्या धांव घेतो.

ह्या कवितेतल्या प्रतिमांची ( कवीला दिसलेल्या चित्रांची ) जंत्री केली तर तीत अशी चित्रे दिसतात : १) गाणारा पक्षी २) डरकाळ्या फोडणारा सिंह ३) झाडांना अंग घासणारा हत्ती ४) कविता करणारा कवी ( मी ) ५) पक्षी सीमा घोषित करतो आहे ६) सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय ७) हत्ती आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवतोय ८) कवी आपल्या मनाची व प्रेयसीची धांव घेतोय. ह्यातील १) ते ४) ही चित्रे अगदी सरळ-साधी चित्रणे आहेत तर ५) ते ८) चित्रे ही पहिल्या गटातील (१ ते ४) चित्रांचा अर्थ लावणारी चित्रे आहेत. सकृदर्शनी कवीने नुसती चित्रे सादर केली आहेत असे दिसते. पण जरा काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक चित्रावर त्याने आपला तर्क चालवलेला आहे व त्याचा अर्थ दिला आहे असे दिसेल. जसे: गाणारा पक्षी नुसते गात नाहीये तर तो आपल्या सीमा घोषित करतो आहे. डरकाळ्या फोडणारा सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय. झाडांना अंग घासणारा हत्ती आपल्या वावर-प्रदेशाच्या खुणा ठरवतोय. कवी कविता करीत नाहीय तर त्याच्या मनाची व प्रेयसीची धांव घेतो आहे.
कोणाही जाणकार प्राणी-मित्राला विचारले तर सिंहाचे, हत्तीचे ( एव्हढेच काय कुत्र्यांचेही ) हे आपली सत्ता-प्रदेश इतरांना दाखवून देण्याचे प्रघात आहेत, असे कळेल. म्हणजे हे नैसर्गिक आहे हे ठाम झाले. इथे कवी क्रमा क्रमाने आपल्याला ह्या तर्काला बांधून शेवटाला घेऊन जातो व म्हणतो की असेच माझी कविता ही कविता नसून तुझे व माझे प्रदेश दाखवणे आहे. शिवाय हे किती नैसर्गिकही आहे, सुंदर आहे. हे रेगे ह्यांचे प्रामाणिकपणे आपल्याला दिसलेल्या चित्रांचे दाखवणे आहे की नेटाने तर्क लढवून कविता ही त्यांच्या व प्रेयसीचे प्रदेश दाखवणे आहे हे पटवणे आहे ? आता ही काही लबाडी म्हणता येणार नाही. प्रख्यात विदुषी मार्जोरी बोल्टन ह्यांच्या "ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या पुस्तकातल्या "इंटेलेक्च्युयल फॉर्म:द टू मेन पॅटर्न्स ऑफ इमेजरी" ह्या प्रकरणातले हे वाक्य पहा (पृ.११२ ) : "तर्कसंगती हे जागृत मनाचे लक्षण आहे व भावनेच्या विरोधी आहे. श्रेष्ठ कवितेत भावनेचा भडिमार असून त्याचबरोबर सुसंबंद्ध आंतरिक तर्कही असेल. तर्काची सुसंगती ही चांगल्या कवितेच्या रचनेचा महत्वाचा भाग असतो, व तो प्रतिमांच्या अनाकलनीय परिणामांपेक्षा जोरदार असतो. " ह्या अंगाने, प्रत्येक प्राणीमात्र आपल्या वावर-सत्तेच्या प्रदेशाच्या खुणा दाखवीत असतो, हे ह्या कवितेतल्या तर्कामागचे मूलसूत्र होते.
प्रत्येक संबंधात (रिलेशन) त्यातल्या घटकांना आपला स्वतंत्र प्रदेश ( स्पेस ) लागतो हे आता जवळ जवळ मान्यच झाले आहे. ह्या स्वतंत्र वावराला वाव मिळाला नाही तर संबंध विकोपाला जातात हे कोणत्याही कौटुंबिक कोर्टात न जाताही आपण मान्य करू इतके ते पटण्याजोगे आहे. असे असताना कवीने असे जर म्हटले असते की माझ्या कवितेत तुझे प्रदेश व माझे प्रदेश असे मी दाखवतोय तर ते ह्या तर्क-संगतीची पुढची कडी झाले असते. रेगे ह्यांच्या वैयक्तिक चरित्रातही ते रास्त ठरते. जसे : बायको सरिताबाईंचा एक प्रदेश, जर्मन प्रेयसी केठ ह्यांचा एक प्रदेश, मुलाबाळांचा एक प्रदेश, मित्रांचा एक वगैरे. पण ते जेव्हा शेवटच्या ओळीत म्हणतात की माझ्या कवितेत मी माझ्या मनाची व तुझ्या ( मनाची ) धांव ( ओढ ) घेतोय तर ते ह्या प्रादेशिक रचना करण्याच्या तर्काविरुद्ध जाते. प्रियकर प्रेयसी ह्यांचे मनोमीलन हे रोमॅंटिक व आदर्श खासच असते पण मग त्यासाठी सिंह, हत्ती हे आपले वेगळे प्रदेश करतात ( इतरांपासून ) ही तर्काची दोरी रास्त ठरत नाही.
कवी भले म्हणो की मी माझ्या मनाची व तुझ्या मनाची धांव घेतोय पण वाचकरूपी तिसर्‍या अंपायरला विचारलेत तर तो धांव-चित ( रन-आऊट) झालाय असाच निर्णय द्यावा लागेल. कारण ह्या कवितेत केवळ प्रतिमांचा खेळ असता, नुसती पक्षी, सिंह, हत्ती ह्यांची चित्रे असती, तर कसल्याही निर्णयाचे कवीचे म्हणणे चालले असते. त्याला समीक्षकांप्रमाणे वाचकही अप्रतीम म्हणते झाले असते. पण ह्या कवितेत तर्क हीच मोठी प्रतिमा आहे व शेवटचे चित्र हे तर्क-विसंगत ठरते !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-----------------------------------------------------

Sunday, June 5, 2011

-------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----२२
अलिप्त नग्नता
नग्नता ह्या विषयाला नागडे उघडे करण्याबद्दल श्री. संजीव खांडेकर ह्यांचे अभिनंदन करायला हवे ( संदर्भ: लोकसत्ता : दि.५ जून२०११ "अलिप्त नग्नता" हे जाणीवा सदरात आलेले स्फुट )
लेखाचे नाव जरी "अलिप्त नग्नता" असले तरी समाजात जागोजागी भेटणारा ( समाज-लिप्त ) हा विषय आहे, हे दाखविण्यासाठी श्री.खांडेकर क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान एका मॉडेलने भारत जिंकला तर मी नागडी होईन असे म्हटले होते ह्या बातमीची आपल्याला आठवण करून देतात. योगायोगाने त्याच दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियातली अजून एक बातमीही ह्या विषयाची व्याप्ती अधोरेखित करणारी आहे. बातमी अशी :लंडनच्या वुरसेस्टर कॉलेजच्या लायब्ररीत म्हणे ४० मुलामुलींचा एक ब्रेकफास्ट क्लब आहे, जो दुपारी ३ ते ४ दरम्यान नग्नतेचा ( स्ट्रिपिंग ) प्रयोग करतात. त्यावर लायब्रेरीयनने बंदी घातली. कारण ह्याने इतरांचे लक्ष विचलित होते व हे विनापरवाना कृत्य आहे. त्यावर ह्या विद्यार्थ्यांचे म्हणणे की ही इथली परंपरा आहे व ह्याने कंटाळा टळतो व गर्मीपासून सुटका होते. वाद कसलाही असला तरी नग्नता हा विषय केवळ कल्पनेतला नसून सर्वव्याप्त आहे एवढे तरी ह्या बातमीने ठसते.
नग्नतेचे तात्विक चिंतन वा समर्थन करण्यासाठी श्री.खाडेकर ज्या फ्रेंच तत्ववेत्त्याचा ( जॅकस्‌ लाकान्‌ Jacques Lacan ) उल्लेख करतात ते संभ्रम निर्माण करणारे आहे. हे ह्या लाकान्‌ महाशयांच्या एकूण चरित्राला साजेसेच म्हणावे लागेल . ( कारण फ्रॉईडचे शिष्यत्व पत्करूनही त्यांना फ्रॉईडवाद्यांनी बहिष्कृतच केलेले होते.). खांडेकर म्हणतात तशा "गेझ"चे नव्हे तर "मिरर स्टेज"चा निर्देश लाकान्‌ करतो. तो नेणीव हेच वास्तव असे मत मांडणार्‍या फ्रॉईडचा शिष्य असला, तरी त्याला, ईगो हा एक भ्रम आहे, नेणीवेतून तयार झालेला आहे, असे "मिरर स्टेज"च्या उदाहरणाने दाखवायचे होते. मुलाच्या विकासातला महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा मूल स्वत:ला ओळखायला लागते तो. त्याच "मिरर स्टेज" बद्दल तो म्हणतो, की सहा महिन्याचे मूल, जेव्हा त्याचा त्याच्या शारिरिक अवयवांवर अधिकारही चालत नसतो, आणि ते जेव्हा आरशात पाहते व स्वत:ला त्या प्रतिबिंबात ओळखते तेव्हाच त्याची स्वत्वाची जाणीव ( ईगो ) निर्माण होते. प्रतिबिंब म्हणजे ते मूल नसते . तो त्याचा भ्रमच असतो असे लाकान्‌ आपल्याला सांगतो. त्याला तो "मिस-रेकॉग्निशन" असेही म्हणतो. हे असे का होते ह्याचे समर्थन तो नेणीव ही भाषाशास्त्राच्या अंगाने स्वची जाणीव करून घेते असे दाखवतो. ( पहा: आधुनिक समीक्षा-सिद्धान्त ले: मिलिंद मालशे, अशोक जोशी पृ.२२६ ते २२९ ) आणि इगो हा भ्रम आहे असे मानतो.
ह्याचा नग्नतेशी काय संबंध पोचतो असे कोणालाही वाटू शकते. कदाचित आपले शरीर म्हणजेच आपण, असे ईगोला वाटणे हेच ह्या नग्नतेच्या जाणीवेच्या मुळाशी असावे. एका गोष्टीने हे स्पष्ट करता येईल. गोष्ट अशी : एका नर्तिकेला गौतम बुद्धाची सेवा करावी असे मनात येते. तिचा पेशाच असल्याने कामुक नर्तन करणे एवढेच तिला अवगत होते. गौतम बुद्ध तयार होतात. ती त्यांच्या पुढ्यात नाच करू लागते. करता करता ती एकेक कपडा अनावृत्त करीत जाते ( म्हणजे स्ट्रिपिंग हो, ). संपूर्ण नग्नावस्थेत जाऊन नर्तन झाल्यावर ती थांबते. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की का थांबलीस ? ही जी तुझ्या शरीरावरची चामडी आहे तीही, कपडयासारखी उतरवून टाक ना ! आपल्या गीतेत नाही का सांगत की शरीर जीर्ण झाले की जुन्या कपडयासारखे आपला आत्मा ते बदलतो व नवीन शरीर धारण करतो. आपले शरीर म्हणजेच आपण, असे वाटणे हेच ह्या नग्नतेच्या जाणिवेच्या मुळाशी आहे, ते असे.
बाजारपेठेतला नग्नतेचा भाव व कदाचित त्या भावाचे घसरणे ह्या बद्दलचे विवेचन मात्र खांडेकरांचे अचूकच आहे. ह्या बद्दल माझा स्वत:चा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. आज २० वर्षांपूर्वी मी नोकरीनिमित्त वेस्ट ईंडीज येथे चार वर्षे होतो. तिथे मुक्त अमेरिकन संस्कृती नांदत होती, व ५० टक्के लोक भारतीय वंशाचे होते. पण ते वेशभूषेत अगदी पाश्चात्यच असत. भारतातून नुकत्याच तिथे गेलेल्या आमच्या साडीतल्या बायका पाहून त्यांना खूपच गंमत वाटे. शरीराचा जो भाग भारतीय साडी झाकते तो त्यांच्या पोशाखात उघडा असे, तर ते जो भाग झाकीत ( साडीतला ओटीपोटाचा भाग, बेंबी वगैरे ) तो भारतीय साडी बिनदिक्कत उघडा ठेवी. हे त्यांना फारच सेक्सी वाटे. ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करू लागलो तेव्हा आमच्या बायकांनीही साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली. आता तो त्यांना नॉर्मल वाटू लागला. अगदी क्लीव्हेज दिसले तरी ! शेवटी सौंदर्य काय आणि नग्नता काय, ही पाहणार्‍याच्याच दृष्टीत वसते नाही का ? ( मी एकदा माझ्या दोन वर्षाच्या नातवाबरोबर गाण्याच्या सीडीज घेत होतो. चित्रात ऐश्वर्या राय हिची एक मादक पोज होती . माझी नजर, "जशी पाप्याची नजर वळावी, अनोळखीच्या वक्षावरूनी " फिरत होती, तेव्हाच माझा नातू मला दाखवत होता व त्याला तेव्हा अवगत असलेल्या शब्दात म्हणत होता, "अजोबा, नाईस दुदू नो ?").
असेच आपण कोणत्या वेळी कोणता दृष्टिकोण ठेवतो, त्यावरही नग्नतेची श्रेणी अवलंबून असते. ह्याचे उदाहरण असे : माझी मुलगी अमेरिकेत हायस्कूल ( आपल्याकडचे ज्युनिअर कॉलेज, १२ वी पर्यंत ) मध्ये सायन्स शिकवते. तिथल्या मुली अगदी तोकड्या अशा शॉर्टस्‌ घालून वर्गात येतात. वर्गात चाललेले असते शिक्षण व त्यात असा मादक पोशाख, हे माझ्या मुलीला योग्य वाटेना. तिने एक युक्ती केली. ती दुसर्‍या एका मुलीच्या हाती टेप देई व तिला उशीरा व तोकडी शॉर्ट घालून आलेल्या मुलीच्या शॉर्टची उंची मोजायला सांगे. समजा ५ इंच ( सगळ्या जगात जरी सेंटीमिटर्स मध्ये मोजमाप असले तरी अजून अमेरिकेत इंचच वापरतात ). आता ती त्या शॉर्टवाल्या मुलीला त्याचे सेंटिमिटर मध्ये रूपांतर करायला सांगे. अगदी कॅलक्युलेटर घेऊन. जर बरोबर आले, तर वर्गात बसू देई. नसता नाही. ह्याने परस्पर जरा लांब शॉर्ट घालावी हा संदेश जाई व वर्गात शॉर्ट पेक्षा गणिताचे, शिक्षणाचे, महत्वही ठसवल्या जाई.

--------------------------------------------------------------------------------

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, May 31, 2011

-------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला---२१
हे असे करावे का ?
परवा पार्ल्याला एका भाषणादरम्यान मी श्री. भालचंद्र नेमाडेंवर एक आक्षेप घेतला की तुम्ही "हिंदू" चांगली खपावी म्हणून त्यात ब्राह्मणद्वेष पेरला आहे, संतांची टर उडविली आहे. त्यावर ते म्हणाले की अहो, मराठी पुस्तक खपून खपून किती खपणार व त्याच्या रॉयल्टीमधून असे किती मिळणार ? माझी सध्याची मिळणारी शिष्यवृत्तीच मुळी महिना ७० हजाराची आहे. तुम्हाला जर पुस्तक आवडले नसेल तर परत घेऊन या, मी पैसे परत देईन.
ज्या पुस्तकाचा एवढा गाजावाजा झाला, त्याच्या लेखकालाच जर त्यातून म्हणावे तितके पैसे मिळत नसतील, तर जे इतर हौशी लेखक असतात त्यांचे तर पुस्तकामागे स्वत:चेच पैसे जात असणार हे उघड आहे. जर लेखकाला पैसे मिळणे दुरापास्त असेल तर मग इतके लोक पुस्तके का काढतात, ती का छापतात, ती का विकतात ? लोकांनी आपण जे लिहिले आहे ते वाचावे त्याची प्रशंसा करावी हाच त्यांचा मुख्य हेतू असायला हवा.
मी अजूनही पायरेटेड पुस्तके हमखास घेतो. अगदी त्यांचे छुपे अड्डे असतात तिथे जाऊन घेतो. त्यात एक फायदा असा असतो की पुस्तक हमखास चांगले असते. वाईट पुस्तकासाठी पायरसी करण्याचे कोण अकारण कष्ट करणार ? आणि त्याच मजकूराचे किती कमी पैसे मोजावे लागतात, वाचण्यासाठी . जे इंग्रजी पुस्तक चारशेला घ्यायचे ते पायरेटेड मध्ये शंभरात मिळते. मुळात पुस्तके इतकी महाग का असावीत ? म्हणतात की पुस्तकाचा जेव्हढा खर्च येतो त्याच्या पाचपट विक्रीची किंमत ठेवावी लागते. पण लोकांनी वाचावे अशी लेखकाची प्रबळ इच्छा असते, तर प्रकाशकांनी किंमत ज्यास्त ठेवल्याने ती वाचू नयेत हा परिणाम/हकीकत होतो. मला प्रथम चेतन भगत त्याच्या भाषेसाठी नाही तर त्याच्या पुस्तके ९० रुपायात देण्यामुळे आवडला होता ( रूपा प्रकाशन, दिल्ली ). मी डॉ.नरेंद्र जाधवांच्या "आम्ही आणि आमचा बाप" ह्या पुस्तकाला प्रथम मानले ते, ते त्याच्या एकमेव पायरेटेड मराठी पुस्तक असल्याने. नंतर ग्रंथालीने त्याची जन-आवृत्ती अवघ्या ६० रुपायात काढली, तेही मला खूप भावले.
आता तर मला संगणकावर हवे ते नवे, जुने, पुस्तक फुकटच मिळवायचा नाद लागलाय. एक संकेत-स्थळ आहे : गटेनबर्ग.कॉम नावाचे. ह्यावर इंग्रजीतली लाखो पुस्तके फुकट उतरवून घेण्यासाठी आहेत. मेल्यानंतर ६०/७० वर्षांनी कोणत्याही लेखकाचे पुस्तक कोणीही, (कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन न करता), हे करू शकतो. आजकाल मराठीतही अशी पुस्तके संगणकावर फुकट मिळतात. अजून एक फारसे माहीत नसलेले एक संकेत-स्थळ आहे : लायब्ररी.एन्‌यू नावाचे. हे अमेरिकेतल्या एका विद्यापीठाचे स्थळ आहे. ह्याला लोक आपल्याकडची पुस्तके संगणकावरून पाठवतात व ती आपण फुकट उतरवून घेऊ शकतो. कितीतरी नवी कोरी, ताजी पुस्तके मी त्यातून घेतलेली आहेत.
आता आपले मराठी मन धास्तावायला सुरुवात होईल. हे बेकायदेशीर तर नाही ? हे करावे का ? तर ह्यावरचे "फेअर यूज" नावाचे एक कायद्याचे पुस्तक मी त्याच संकेतस्थळावरून ( फुकटच !) उतरवून घेतले. टीका, अभ्यास, प्रसार-माध्यमात मत मांडणे ह्या सर्व प्रकारासाठी कायदेशीर मुभा आहे असे हे पुस्तक सांगते. अमेरिकेत, विशेषत: गाण्यांसाठी, ह्यावर खूप खटले झालेत. शेवटी जी संकेत-स्थळे ही गाणी ठेवतात त्यांनाही वेठीस धरण्यात आले. आठ-दहा वर्षांच्या पोरांसोरांवरही खटले केले, प्रकाशक कंपन्यांनी. पण आजकाल हा प्रकार इतका बोकाळलाय की कायदेशीर काहीच कारवाई संभवनीय होत नाही. मजकूर नुस्ता उपलब्ध करून देणे हा काही गुन्हा होत नाही. शिवाय ह्यातून संकेतस्थळांना काही धंदा होत नाही. उलट साहित्याचा प्रसार करण्याचे उच्च कोटीचे काम आपसुक होते. एक डिजिटल कॅमेरा (किंवा मोबाईल) असेल तर फुकटात पुस्तकाची चित्रे ( सर्व पानांची ) काढून ती सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
मला खूप दिवसांपासून विंदा करंदीकरांचे "एरिस्टॉटलचे काव्यशास्त्र" हे पुस्तक वाचायचे होते. मौजेचे प्रकाशन. कुठे मिळाले नाही. आयाआयटीतल्या काही विद्यार्थ्यांना हे पुस्तक अभ्यासासाठी हवे होते. त्यांना एक प्रत मिळाली. त्याची त्यांनी झेरॉक्स केली व त्याचबरोबर दोनशे रुपायात पीडीएफ फाइल झाली, जी आम्ही चारपाच जणांनी वाटून घेतली, तर केवळ ५० रुपायात पुस्तक पडले. आता मी हे एखाद्या संकेतस्थळावर ठेवले तर हजारो जण ते उतरवून घेऊ शकतील, फुकटात. कायद्याने पाहिले तर हे सगळे बेकायदेशीरच वाटेल . पण, श्रीपु किंवा सध्याचे मौजेचे मालक ह्यावर केस करण्यापेक्षा वाचणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून धन्यवादच देतील. विंदांनीही हरकत घेतली नसती. ( आणि हे पुस्तक वाचून माझा असा काय धंदा झाला बरे ? ).
म्हणतात की जेव्हा चहा भारतात विकायला सुरुवात केली तेव्हा तो कोणी विशेष खरेदी करीत नसत. मग गावोगाव माणसे पगारी नेमली, जी त्या त्या ठिकाणी चहा बनवीत व लोकांना फुकट प्यायला देत. कालांतराने लोक चहानशीन झाले व चहाचा धंदा फळफळला. सध्याचा मराठी लेखक हा लेखनाच्या उत्पन्नावर जगूच शकत नाही, इतके ते नगण्य असते. तो अथवा त्याच्या प्रकाशकाला १०० ( समजा ) इंटरनेटवरून फुकटात पुस्तके घेणार्‍यांविरुद्ध खटले भरायचे म्हटले तर केव्हढा द्राविडी प्राणायाम ! त्यापेक्षा तो पुस्तक वाचणार्‍याला धन्यवादच देईल.
आणि मार्केटही हळू हळू बदलते आहे. वर्तमानपत्रे, मासिके, एरव्ही आपल्याला कोणी मोफत देत नाहीत . पण इंटरनेटवर हवे ते फुकट वाचता येते, उतरवून घेता येते. उलट त्यामुळे त्यांचा खप वाढतोच असे दिसून येते. आजकाल तर अमेरिकेत पुस्तक (रिलीज) प्रकाशित करताना त्याचबरोबर त्याची ई-बुक आवृत्तीही प्रकाशित करतात, ज्यामुळे छापील पुस्तक ज्यास्त खपते. फुकटात हे मिळाल्याने प्रकाशकाचा जर खर्चच होत नसेल व म्हणून नुकसान होत नसेल तर वाईट काय तर फक्त लेखकाची रॉयल्टी तेव्हढी बुडते. पण किती असते रॉयल्टी ? माझ्या वडिलांची पाच सहा पुस्तके (अगदी मौजेची ) होती. पण रॉयल्टी यायची अवघी १२३रु.५० पैसे. त्यांचे वाचणार्‍याला ती त्यांनी नक्कीच माफ केली असती .
हे असे करावे का ?

-------------------------------------------------------------------------------------

Tuesday, May 3, 2011

अरुणोदय झाला----२०
कवी का गीतकार ?
आपल्याकडे फारा दिवसांपासून एक वाद आहे की ग.दि.मा. वा जगदीश खेबुडकर ह्यांना कवी म्हणायचे की गीतकार ? कोण मोठा ? कवी का गीतकार ?
भाषाशास्त्रात "रेजिस्टर ऑफ लॅंग्वेज" नावाचा एक शैलीप्रकार आहे. जसे: समजा आपण कोणाला प्रेमपत्र लिहितो आहे तर त्याची भाषाशैली अगदीच वेगळी, मृदू, मुलायम, रोमॅंटिक, खाजगी अशी असते. आणि समजा एक वकील एक नोटीस लिहितो आहे, तर त्याच्यातली भाषाशैली ही खासच थेट वळणाची, नेमकी व कोरडी असते. आता कादंबरी, लघुकथा, कविता, गीते, निबंध, लघु-निबंध, संशोधनपर निबंध वगैरे साहित्याचे वेगवेगळे वाण आपण पाहतो. प्रत्येकाची शैली ही खास वेगळीच असते व ती त्या त्या वाङमयप्रकाराला साजेशीच असते, असावी लागते. ह्या पैकी आजच्या वादाला घेऊ : कविता आणि गीते.
गीते अर्थातच, गेय असावी लागतात. अर्थात एक अपवाद म्हणून कधी कधी अजिबात न गाता येणारी गीतेही गाजून जातात. पण ते अपवादच. ( वेस्ट-इंडीज येथे कॅलिप्सो गाण्यांची परंपरा आहे. दरवर्षी कार्निव्हलला स्पर्धा आयोजून ते एक कॅलिप्सो-किंग व कॅलिप्सो-क्वीन निवडतात. त्या गाण्यात एक चायनीज माणूस एक विचित्र गाणे, जे अजिबात गाता येत नव्हते, गायला. त्याला चायनीज कॅलिप्सो-किंग म्हणत लोकांनी प्रचंड हास्यकल्लोळ केला. गाता न येणारं गीत हा तसा विनोदच ! ). गीतात गेयतेसाठी छोटे छोटे शब्द, सोपा अर्थ असलेले शब्द, आणि यमके, अनुप्रास, असे आवाजी अलंकार ह्यांचे प्राबल्य असते. कित्येकवेळा केवळ गीतासाठी काही विचित्र आवाज असलेले शब्दही योजतात. जसे: किशोरकुमारचे डुडलींग--डिडली ए---या--हू--वगैरे. गीतांची योजना सिनेमात वा भावगीतात एक प्रकारचा मूड, भाव, वातावरण, निर्माण करण्यासाठी असते. त्यामुळे त्यात अगम्य शब्द, अर्थ न निघणारे शब्द, असून चालत नाही. शिवाय काही काही कठोर आवाजाचे शब्द वापरता येत नाहीत. वीरश्रीची गीते असतील तर त्यात वेगळेच साहस निर्माण करणारे शब्द वापरावे लागतात.
त्या मानाने कवितेला काही बंधने नसतात. कविता कशीही करू शकता. पूर्वी वृत्तात कविता करणे आवश्यक असे. किंवा भक्तिभावाच्या कविता अभंग वा ओवी ह्या वृत्तातच असत. आजकाल असे काही बंधन नसते. आजकाल बहुतेक कवितेचा मामला हा मुक्तछंदात कुठल्याही निर्बंधाविना असतो. शिवाय कवितेचा अर्थ समजलाच पाहिजे असे बंधनही नसते. किंबहुना जेवढी कविता दुर्बोध तेवढा तिचा दर्जा चांगला, असा सामान्यांचा संशय असतो. कवितेला मूड, भाव, वातावरण निर्मिती वगैरेचेही उत्तरदायीत्व नसते. कविता फक्त असावी लागते. कशी का असेना. ह्या वर्णनावरून सगळी गीते ही कविता ह्या प्रकारात मोडू शकतात पण सगळ्या कविता गीतात घेता येत नाहीत. काही मोजक्याच कवितांना गीतेही म्हणता येईल.
संगीतकाराच्या चाली बरहुकूम, ताल-लयाला धरून, गीते लिहिणे, हे सर्जन प्रक्रियेत खूपच कसबाचे काम आहे. त्यामानाने कविता जन्माला घालणे हे फारच सोपे काम असते. ( म्हणूनच कुठल्याही साहित्य-संमेलनात कवी व काव्य-वाचनवाले प्रचंड प्रमाणात असतात, दुसर्‍या कुठल्याही साहित्यप्रकाराच्या तुलनेत.). ते सगळ्यांनाच जमणे फार अवघड. तसेच गीते समजणे, त्यांचे रसग्रहण करणे हे जरा कौशल्याचे काम आहे. गेयतेचे अंग सगळ्याच ऐकणार्‍यांना असते, असे नाही. बहुसंख्यांना त्यात फारसे गम्य नसते.
साहित्याचे प्रयोजन तुम्हाला अभिव्यक्ती करू देण्याचे असते. तुम्ही तुम्हाला काय वाटते ते लिहू शकाल, ते साहित्य. गीते लिहिणे हे खूपच कसबाचे व कठिण काम खरेच, पण ते एका विशिष्ट हेतूपायी योजलेले सर्जन असते. ते कविते सारखे सहजी स्फुरलेले व सर्जकाला मुभा देणारे असत नाही. त्यामुळे ते अटी-तटी-चेच ठरवण्याचा सामान्यांचा कल असतो. पूर्वी मात्रा-वृत्तात कविता लिहिणे हे सर्जनापेक्षा कसबाला वाव देणारे असे. म्हणूनच ते आता बाद करण्यात आले आहे. चित्रकलेत सुद्धा हुबेहुब रेखाटण, हे ज्यास्त कुसरीचे काम आहे, ते दिसायलाही मोहक असते. पण आजकालच्या आधुनिक चित्रकलेत म्हणूनच त्याला मानाचे स्थान देत नाहीत. आडव्या-तिडव्या रेघा, रंगांचे वाट्‌टेल तसे पुंजके व मन मानेल तो विषय ( तोही समजेलच असा काही नेम नाही ), असे आजकालच्या चित्रकलेचे झाले आहे. ह्याच कला मुळे ( ट्रेंड ह्या अर्थी ), साहित्यात बंधने असलेले अविष्कार, आजकाल मान्यता पावत नाहीत. हे इतके टोकाला जाते की वाचकाला कधी कधी एखाद्या कलाकृतीला कथा म्हणावे, निबंध म्हणावे, का कादंबरी म्हणावे असा संभ्रम पडू शकतो.( जसे श्याम मनोहर यांच्या कादंबर्‍या ). पण ज्यांच्याकडे साहित्याची व्यवस्था सोपविलेली असते त्यांना ह्या संभ्रमापेक्षा सर्जकांच्या मुक्त आविष्काराचे ज्यास्त अप्रूप असते व महत्वही असते व त्याचीच तळी ते उचलून धरतात. ते त्यांच्या सोयीचे असते.
पण सुदैवाने साहित्य हा प्रकार अजून तरी कोणा एका गटाकडे गेलेला नाहीय. त्यामुळे आपल्याला वाखाणायचे तर आपण एखाद्या गीतकाराला अप्रतीम कवी म्हणू शकतो व तसा सन्मानही देऊ शकतो. तो तसा ग.दि.माडगूळकर व जगदीश खेबुडकर ह्यांना रसिकांनी दिलेला आहेच. साहित्याचे शास्त्र गुंडाळून ठेवून ! तर काय हे दोघेही फार मोठे गीतकार व कवी आहेतच !

--------------------------------------------------------------------------------------

Saturday, April 9, 2011

अरुणोदय झाला----१९
लिंगाचे बिंग
ह्या २०११ च्या जनगणनेत दर १००० पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, त्याचे आकडे आले आहेत. त्यात भारताची सरासरी आहे दर १००० मागे ९४० स्त्रिया. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण आहे दर १००० मागे ९२५ स्त्रिया . म्हणजे मराठी स्त्रिया, पुरुषांपेक्षा संख्येने इतक्या कमी आहेत. अमेरिकेत ह्या उलट ह्या वर्षी हा आकडा आहे १०२५. म्हणजे पुरुषांपेक्षा कितीतरी ज्यास्त.
मराठी भाषेत पुरुषवाचक शब्द किती व स्त्रीवाचक शब्द किती असे कोणी अजून मोजून पाहिलेले नाही. शब्दकोशात प्रत्येक शब्दाचे तो पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक, अशी नोंद कंसात दिलेली असते. जसे : १) सळ ( पु ): तलवारीचे म्यान; तिच्या मुठीला अडकवण्याची दोरी; घडीचा मोड, दुमड , सोन्याची लगड, पीक कापल्यानंतर उरणारा बुडखा २) सळई ( स्त्री ) : शलाका ; धातूची बारीक काडी; गणना करताना संख्या समजण्यासाठी काढून ठेवलेला भाग; लोखंडाचे कडे बसविल्यावाचून असलेले मुसळाचे लाकूड; जनानी मुकट्यावरच्या उभ्या रेघा.
वा.गो.आपटयांच्या "शब्दरत्नाकर" ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत, पैकी स पासून सुरू होणार्‍या शब्दांचा गट हा सगळ्यात मोठा असून त्यात ५८८८ शब्द आहेत. आता ह्यापैकी पुरुषवाचक व स्त्रीवाचक शब्द मोजले ( एक मोठा नमुना म्हणून ) तर ते भरतात: पुरुषवाचक : १३३९ तर स्त्रीवाचक : ९३६. आता लिंगभेद जसा दर १०००वर मोजतात तसे स्त्रीवाचक शब्दांचे प्रमाण काढले तर ते भरते : दर १००० पुरुषवाचक शब्दांमागे : ६९९ स्त्रीवाचक शब्द. नशीब आपल्या भाषेचे नाव "मराठी" हे स्त्रीवाचक आहे व "भाषा" हेही स्त्रीवाचक आहे. तरीही स्त्रीवाचक शब्द ( हा मात्र पुरुषवाचक) असे कमी आहेत.
कधी कधी वाटते की शब्दकोशात काय, शब्द असतात भरपूर, पण आपण वापरतो त्यातले मोजकेच. तर मग त्यापैकी आपण किती पुरुषवाचक वापरतो व किती स्त्रीवाचक वापरतो हे रॅंडमली पहावे तर असे आढळून आले:
मंगला गोडबोले : पुस्तक "आडवळण"( पृ.३३ )--पु:३६;स्त्री:१९ ( दर १००० मागे ५२७ स्त्रीवाचक शब्द )
शांता शेळके : पुस्तक "सांगावेसे वाटले म्हणून" ( पृ.५७ ) पु:४३;स्त्री:२० ( दर १००० मागे ४५६ स्त्रीवाचक शब्द )
अशोक रा. केळकर : पुस्तक "वैखरी" ( पृ.९२ ) पु: २०; स्त्री: ५० ( दर १००० मागे २५०० स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "तुकाराम गाथा" ( पृ.११ ): पु: ८३; स्त्री: २२ ( दर १००० मागे २६५ स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "टीकास्वयंवर" ( पृ.३४ ) : पु: २६; स्त्री: २४ ( दर १००० मागे ९२३ स्त्रीवाचक शब्द )
ज्ञानेश्वर नाडकर्णी: पुस्तक "अश्वत्थाची सळसळ" ( पृ.३५ ) पु:२३; स्त्री: २३ ( दर १००० मागे १००० स्त्रीवाचक शब्द )
एक केळकरांचा अपवाद वगळला, तर स्त्रीवाचक शब्द आपण कितीतरी कमी वापरतो असे दिसते.
संपत्तीदर्शक, मालमत्तादर्शक असे शब्द जमा केले व त्यात स्त्रीवाचक किती हे पाहिले तर चित्र असे दिसते : खालील ७७ शब्दात पुरुषवाचक आहेत: १७, तर स्त्रीवाचक आहेत: ३७ ( नपुसक : २२) ( माल, संपत्ती, स्थावर, मिळकत, पैसा, रोकड, धन, मालमत्ता, वित्त, बंगला, गाडी, जमीन, शेती, शेत, प्लॉट, भूखंड, फ्लॅट, सदनिका, बॅंक, नोट, चिल्लर, कपडे, दागिने, अलंकार, सोने, वळी, हार, अंगठी, पाटली, बांगडी, जमा, फर्निचर, हिरा, चांदी, माणिक, मोती, कोठार, रत्न, वाडा, बंगली, देवडी, वस्त्र, मेजवानी, जहागीर, मोहरा, सिक्के, गोधन, स्त्रीधन, घर, शेअर्स, गुंतवणूक, भांडवल, पत, नगद, मान/मरातब, श्रीमंती/गरीबी, गडगंज, विपुल/ता, वाडी, कंपनी, उद्योग, उद्योगपती, उद्योजिका, खाते, आंदण, बक्षीस/सी, भेट, आहेर, मानपान, पगडी, जमा/डिपॉझिट, लाच/लुचपत, वास्तू, महाग, महागाई, दान, दाता )
लिंगाचे बिंग असे उघडे पडते, मराठी भाषेत !

---------------------------------------------------------------------------------------

Sunday, March 13, 2011

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----१७
सु-संस्कृत मराठी माणूस !
परवा म.टा.त अवधूत परळकरांचे एक पत्र आले. त्यात त्यांनी जनगणनेत, मला संस्कृत भाषा येते, असे नोंदवण्याविरुद्ध मत दिले आहे. त्यांचे म्हणणे की ते संस्कृत शिकले असले तरी आता बोलू शकत नाहीत, त्यामुळे संस्कृत भाषा येते, असे नोंदवणे त्यांना फसवणूकीचे वाटते. तर ही खरेच फसवणूक का भाषा-व्यवहाराबद्दलचे अज्ञान, गैरसमज ?
मेंगलोरी माणसे तुळू बोलतात, पण तुळू ला स्वत:ची लिपी नाही. काही जण कन्नड वापरतात तर काही तेलुगु. लोक तुळू बोलतात पण कित्येक ती वाचू शकत नाहीत. मग ती भाषा आहे की नाही ?
अमेरिकेतली पुढची पिढी आणि इथल्या संगणकवाल्यांचीही, अर्थातच मराठी बोलू शकत नाही. पण तिन्ही सांजा झाल्या की तिथेही बहुतेक मराठी घरातून "शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा..." ही प्रार्थना मुले हमखास म्हणतात. महाराष्ट्रात तर ज्यास्तच प्रमाणात हे म्हटल्या जाते. त्याशिवाय "शांताकारं भुजगशयनं..." हेही म्हणतात. हे सर्व संस्कृत आहे हेही कित्येकांना माहीत नसते. आपल्याला "जन गण मन..." ह्या राष्ट्रगीताशिवाय "वंदे मातरमं, सुजलां सुफलां, मलयज शीतलां...." हे गीत म्हणता येतेच. हे तर राष्ट्रगीतच होणार होते. भारताच्या पैशावर अशोक स्तंभाखाली व नाण्यांवर आपण लिहितो "सत्यमेव जयते". लग्नात आपण म्हणतो, "कुर्यात सदा मंगलम.." आशिर्वाद देताना "अष्ट पुत्रा सौभाग्यवती भव" म्हणतो. कित्येक मुले "रामरक्षा " म्हणतात, जी संस्कृतात आहे. "अर्थ-संकल्प, विद्यापीठ, ज्ञानपीठ, चांद्रयान, वृद्धाश्रम, प्राचार्य, ..." ही सगळी मानाची नावं, पदं, संस्कृतातली आहेत.
ज्ञानेश्वरी, तुकाराम-गाथा, वगैरे टिकलेले संत-साहित्य हे लोकांनी म्हटले, पाठ केले, पारायणं केली म्हणूनच टिकली आहेत. आज कुठल्याही मान्यवर लेखकाचे साहित्य त्याच्या हयातीत, वा फार तर, एका शतकात, विस्मरणात जाते. कारण त्याचे कोणी पारायणं करीत नाही. कित्येक संस्कृत म्हणी, सुभाषिते, मराठी साहित्यात इतक्या अंगवळणाच्या झाल्या आहेत की त्या मराठीच आहेत असे आपण समजतो. जसे: शुभस्य शीघ्रमं, शुभास्ते पंथानां, चक्षुर्वै सत्यम, तमसो मा ज्योतिर्गमया..., त्वमेव माता च पिता त्वमेव..., वक्रतुंड महाकाय..., यथा राजा तथा प्रजा...,सदरक्षणाय खलनिग्रहणाय ( पोलीसांचे ब्रीद-वाक्य ), अहिंसा परमो धर्म:..,यथा काष्ठं च काष्ठं च...., अतिपरिचयाद अवज्ञा, जीवेत शरद शतम, पिंडे पिंडे मति भिन्न:, वगैरे.
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री.अशोक केळकर त्यांच्या "रुजुवात" ह्या पुस्तकात म्हणतात की वाणीचे तीन प्रकार असतात, बोलणे, म्हणणे आणि गाणे. त्यात ते असेही म्हणतात की म्हणणे हे बोलण्यातच मोडते. हे आपल्याला सहजी ध्यानात येत नाही. जसे समजा आपण पोलीस आहोत व हिंदी सिनेमातल्यासारखे आपल्याला म्हणायचेय "कानून के हाथ बडे लंबे होते है" आणि त्या ऐवजी आपण पोलिसांचे ब्रीदवाक्य जर म्हणालो ( सदरक्षणाय, खल निग्रहाणाय ) तर आपण असेच बोललो की पोलीस हे सज्जनांची रक्षा करतात तर खळांना/दुष्टांना नियंत्रणात ठेवतात.. तर हे संस्कृतात म्हणणे म्हणजे एक प्रकारचे बोलणेच होते. किंवा आपल्याला म्हणायचेय की तुम्ही कितीही बनवाबनवी करा शेवटी विजय हा सत्याचाच होणार. हेच म्हणण्यासाठी जर आपण संस्कृत वचन म्हटले की, सत्यमेव जयते, तर आपण हेच तर बोललो असे झाले की नाही. मग झाले की, मला तर संस्कृत बोलता येते हे सहजी दिसून येते.
एवढे आपण जर संस्कृत प्रत्यक्षात म्हणत असूत तर, तुम्ही नोंदवा अथवा न नोंदवा, तुम्ही सु-संस्कृत म्हणूनच गणल्या जाणार व संस्कृत तगणारच !. नोंदवल्यास न जाणो, पुढे कोणाला सदबुद्धी झाली तर, संस्कृत भाषेसाठी अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळायचा . मग कोणा सु-संस्कृत राजकारण्याला "भ्रष्टाचार" ह्या मूळ संस्कृत शब्दाचे आचरण करावे लागायचे !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, March 3, 2011

अरुणोदय झाला----१६
ऐका हो ऐका ! भाषेचे मूळ !
माणसाकडे पाहणे, ऐकणे-बोलणे, स्पर्शणे, चाखणे व वास घेणे, एवढया संवेदना होत्या. ह्यापैकी त्याला एखाद्या संवेदनेची, भाषेसाठी म्हणजे एकमेकांशी संदेशवहनासाठी, निवड करायची होती. ह्यात चाखणे आणि स्पर्शणे ह्या अवगत असलेल्या संवेदना अर्थातच पहिल्याच फेरीत बाद होतात. अर्थात आंधळ्या माणसांसाठी मग स्पर्शाने ओळखायची ब्रेल लिपी वापरण्यात आली खरी, पण भाषा मात्र तो बोलत असेल तीच उच्चारांवरून बोलली गेली. कुत्र्यांच्या भाषेत माणूस चांगला की वाईट ते बहुतेक चाटूनच, वा वासावरून वाचतात. तसे आपण मात्र करू गेलो तर हास्यास्पद होईल. जमणार तर नाहीच. ( शिवाय चाखूनच ठरवायचे तर चांगले पदार्थ पटकन संपून गेले असते, व उरला असता सर्वत्र कडवटपणा व दुर्गंध ! ).
पाहण्याचे आपल्या संवेदनात फार प्राबल्य आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहात नाही तोवर पटतही नाही. एवढेच काय सत्याच्या प्रकारामध्येही सर्वात उच्च कोटीचे सत्य म्हणजे "चक्षुर्वै सत्यम"! आपल्याला सर्व दिसायला चांगले असावे लागते. "आय विटनेस" असला तर नक्कीच खुन्याला फाशी ! एवढा पाहण्या-दिसण्याचा दरारा ! पण वृद्धापकाळी दिसायला कमी झाले तर केवढा त्रास ! मग का बरे, आपण ही संवेदना, संदेशवहनासाठी वापरली नाही. तर अडचणी अशा आल्या की रात्री दिसत नाही. शिवाय दिसणे सुद्धा म्हणतात एका विशिष्ट कोनातच ( एकूण ८० अंशातच दिसते ! ) व पुढचेच दिसते. मागचे दिसले नाही तर नाही का आपण म्हणत, की काय माझ्या पाठीला डोळे लावू का ? शिवाय जे दिसले ते तसेच दुसर्‍याला सांगायचे म्हणजे एकतर हावभाव करून सांगायला पाहिजे किंवा चित्र काढून दाखवायला पाहिजे. बरे सगळ्यांनाच चित्रकला अवगत होत नव्हती. त्यांना गणपतीने दर्शन दिले असे सांगण्यासाठी गणपतीचे चित्र काढावे लागे. ते जर हुबेहुब आले तर ठीक, कळेल, पण दिव्य कलेने ते माकडासारखे दिसले तर समोरचा ह्याला बहुतेक माकडच दिसले असावे, असे समजून माकडाला पकडण्यासाठी जाळे घेऊन यायचा ! आणि हावभाव एवढे करावे लागले असते की आजकाल गुडघे बदलतात, तसे दोन तीन जोडया हात एका आयुष्यात सहज लागले असते !
शिवाय दिसते ते, सर्व दृश्य एकदम सगळीकडचे, दिसते. "मी ताजमहाल पहात असताना तिथल्या पायरीवर पडलो" असे चित्राने सांगायला जावे व पाहणार्‍याने त्यातला फक्त ताजमहाल पाहूनच "व्वा व्वा " करावे म्हणजे कसला संदेश पोचणार ? मी दिल्लीहून आग्र्याला गेलो, तिथे ताजमहाल पाहिला, तिथल्या पायरीवर....असे मालिकेदार संदेश द्यायचे, तर फक्त कॉमिक्सचीच राष्ट्रीय भाषा झाली असती.
ह्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ऐकणे-बोलणे हे खूपच सोयीस्कर पडते. आपल्याला कुठलेही ऐकू येते. मागचे पुढचे वगैरे. शिवाय अंधारातही ऐकू येणे-बोलणे चालूच असते. आणि मुख्य म्हणजे ऐकणे बोलणे एकानंतर एक अशा क्रमाने घडते. त्यामुळे संदेशवहनाला चांगला थेट आकार मिळतो. खरे तर बोललेले वार्‍यावर लगेच विरून जाते, पण मग भाषेने लिपीचा शोध लावून त्या उच्चाराला भाषेत पकडून ठेवायची व्यवस्था झाली. तसेच कुठल्याही रेकॉर्ड-प्लेयर शिवाय, एक माणूस बोलला वा त्याने लिहिले तर तेच दुसरा माणूस, लिहिलेले आहे ते वाचून तसे म्हणूही लागला.
ऐका हो ऐका ! ऐकण्या-बोलण्याचा असा विजय झाला ! ( असं ऐकलं आहे ! )

----------------------------------------
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, February 10, 2011

अरुणोदय झाला---१५
बनाना रिपब्लिक
जरा कुठे गोंधळ, गडबड, माजली की आजकाल हमखास शब्द वापरला जातो की हे कायद्याचे राज्य आहे का "बनाना रिपब्लिक"? काय आहे बनाना रिपब्लिक ?
बनाना म्हणजे केळी. केळी नेहमी घडात असतात. घड आठ दहा डझनांचा तरी असतो. एकटे केळ घडात असते तोंवर बिनधोक असते. एकटे पडले की ते सोलल्या जाते, खाल्ल्या जाते. ह्याच मानसशास्त्राचा अवलंब करून बरीच राज्ये अशी चालविली जातात की खरे राज्य लष्कराच्या एका प्रमुखाचे असते. बाकी लष्कर-प्रमुख त्याला मदत करतात, एकी ठेवतात. जणु केळ्यांचा घडच. ते त्यांच्यातल्या कोणाला एकटे न पडू देता आपला कार्यभाग साधतात. सर्व नीती, वागणे असे असते की सगळे एकमेकाला साह्य करीत व्यवस्था चालू ठेवतात.
अमेरिकेत पूर्वी केळी जमेकाहून, ग्वाटेमाला, होंडुरास इथून येत. ह्या केळींच्या निर्यातीवरच तिथले राज्य चाले. ह्यात मग जमीनदार लोक महत्वाचे असत. ७५ टक्के जमीन एक दोन टक्के लोकांकडे असे. बहुजन शेतकरी अगदी नगण्य जमीनीचे मालक असत. केळीची लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात होई. त्यासाठी जमीनदार वर्ग ठरवील तसे सरकार वागे. हा व्यवहार इतका प्रचंड व महत्वाचा झाला की अमेरिकेने हे जमीनमालक रशियन-धार्जिणे होऊन त्यांना मिळतील असे दाखवून ग्वाटेमालाचे राज्य उलथूनही पाडले होते.
अमेरिकेचा एक लेखक ओ.हेनरी ह्याने प्रथम त्याच्या कथांत बनाना रिपब्लिक हा शब्द वापरला होता. नंतर प्रसिद्ध नोबेल पुरस्कार-प्राप्त कवी पाब्लो नेरुदा ह्यांनीही "बनाना" नावाची प्रसिद्ध कविता लिहिली होती.
सगळा देश मिळून शेतीचा व्यवसाय करतोय, त्याचे उत्पन्न येईल ते म्होरके लोक आपापसात वाटून, लुटून घेतात, व देशाला जे कर्ज वगैरे होते त्यात मात्र त्यांचा सहभाग नसतो, असे बनाना रिपब्लिकचे धोरण असते.
सध्याच्या घोटाळ्यांच्या संदर्भात, शेतकर्‍यांच्या कष्टानंतरही होत राहणार्‍या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, व हताश कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीला पाहून आपले "बनाना रिपब्लिक" कधी होतेय ह्याची चिंता आहे का ? काय म्हणता ? झालेय आधीच !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Monday, January 10, 2011

अरुणोदय झाला---१४
विकी-लीक्स फिकी ?
सत्याचे मोठे गमतीचे असते. जोपर्यंत ते माहीत नसते तोपर्यंत त्याचे वेडच असते. पण एकदा उघड झाले की तीच माणसे त्याला तोंडीही लावीत नाहीत. विकी-लीक्स चे असेच होत आहे, होणार आहे.
खरे तर ह्यांची खूप लीक्स अगोदरच लोकांना माहीत होती. आता राहूल गांधी हिंदू दहशतवादाचा बाऊ करणार नाहीत तर कोण करणार ? त्यांनी तो केला तर असे काय मोठे होते ? अमेरिका अफगाणिस्तानाच्या लढाईत नको तिथे निरपराध माणसे मारते हे काय नवीन आहे ?
ह्या खळबळजनक लीक्स नी काहीच कसे जनमानस हलत नाही ? जनमानसात चाललेय तरी काय ? जनमानस तयार तरी कसे होते ?
महात्मा गांधी आयुष्यभर सत्याच्या त्वेषाने जीव टाकत राहिले. अगदी सत्याचे प्रयोग करीत राहिले. ज्या जनमानसाने ह्या नंग्या फकीराला परमोच्च स्थान दिले त्याच्या लेखी तरी त्यांची प्रतिमा आता सच्ची आहे का ? भारतातल्या हिंदूंना वाटते की त्यांनी मुसलमानांची उगाच जरा ज्यास्त बडदास्त ठेवली तर पाकिस्तानातल्या मुसलमानांना वाटते की हे तर कटटर हिंदूच होते. सत्याच्या सत्याग्रहीचे असे चित्र जनमानसात असावे ? बरे जे कधीच खरे नव्हते ते मात्र जनमानसात कोरलेच जाते. जसे गोळी लागल्यावर त्यांचे "हे राम !" म्हणणे. त्यांच्या स्वीय सहायकाने लिहून ठेवलेय की असे ते काही म्हणालेच नव्हते, तरी लोक ते मानायला तयार नाहीत.
शिवाजी महाराजांचेही असेच आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणल्यावर तिला मानाने सोडून देताना तिचा मातेसमान मान केला ( आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही इतके सुंदर झालो असतो ) असे आपण तमाम मानतो. पण इतिहासकार म्हणतात असे काही घडलेच नव्हते. त्याला काही पुरावा नाही. म्हणजे जे झालेच नाही ते जनमानसात लीलया कोरले जाते.
सोनिया गांधी पंतप्रधान नसल्या तरी त्यांच्याशिवाय पान किंवा पगडी हलत नाही हे लोकांना माहीत आहेच. तरीही त्या बिचारीच वाटतात. आता तुम्ही कितीही आकडेवारीने सिद्ध केले की इतके इतके पैसे त्यांनी स्विस बॅंकेत नेले, तरी त्याचा काही उपयोग नाही. जवाहरलाल नेहरू जरा छानछोकीचे होते हे लोकांना माहीतच होते, त्यासाठी माउंटबेटनच्या मुलीने आत्मचरित्रात त्यांचे माझ्या आईवर प्रेम होते असे लिहिले तरी काय झाले ? लाडक्या नेहरूंची प्रतिमा जराही डागाळली नाही. म्हणूनच तर ते लाडके !
शिकार एकट्या दुकट्याने साधत नाही. त्याला सगळ्या कोलाहलाने रान पेटवावे लागते, डंके वाजवत सावजाची कोंडी करावी लागते, तेव्हा सावज आटोक्यात येते. बिचार्‍या विकीलीक्सला दिवस कठीण आहेत, बलाढ्य अमेरिका त्याच्या हात धुवून मागे लागली आहे, बॅंकांनी त्याची कोंडी केली आहे, आणि थोड्याच दिवसात शिकार्‍याचीच शिकार होणार आहे ! विकी पडतेय फिकी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com