Saturday, November 14, 2015











निरागसाला बारा खून माफ ! अर्थात कट्यार काळजात घुसली !
गाण्याच्या स्पर्धेत जिंकणाऱ्याला “कट्यार” द्यावी हे मोठे काव्यमय आहे व तिने जिंकणाऱ्याने आपला गर्व भोसकावा ही अपेक्षा त्याहूनही काव्यमय. हे कागदावर जरा आदर्शवत वाटते खरे पण गाण्याचे क्षेत्र खरेच अति-स्पर्धेचे आहे. आमच्या हैद्राबादला माझ्या वर्गात एक आशालता म्हणून मुलगी होती. ती अप्रतीम गायची. तिकडे तिचे चाहते तिला आन्ध्र-लता म्हणत इतकी तिची तिकडे ख्याती होती. त्याचवेळेस कित्येक गुणी गायिका इतरत्र होत्या, पण अफवा अशी पसरलेली आपण ऐकलेली आहे की लता मंगेशकर इतक्या प्रभावशाली होत्या की त्या कोणा नव्या गायिकेला वर येउच द्यायच्या नाहीत. अनभिषिक्त सम्राज्ञीपद भोगताना त्यांना हे सर्व हातखंडे वापरावेच लागले असे काही म्हणतात. खरे नसेलही हे, पण अशी अफवा असणे हे गाण्याच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा होती हे निर्विवाद दाखवते. प्रत्यक्षात असे अनुभव असताना त्यावर नाटक व त्याचा सिनेमा करताना सुबोध भावे ह्यांनी मराठी सिनेमाला स्पर्धा नसताना एका प्रचंड उंचीवर नेउन बसविले आहे.
शंकर महादेवन व इतरांची गाणी तर अप्रतीम व अभिरुची-संपन्न आहेतच पण सचिन पिळगावकर ह्यांनी उच्च दर्जाचा अभिनय साकार केलेला आहे. जिंकणाऱ्याला स्पर्धा सोपी करणारा एक खून माफी देणारा वर व तो वापरताना खान-साहेबांची होणारी द्विधा अवस्था त्यांनी बहारदारपणे साकारली आहे. ह्या सिनेमात गाण्याच्या क्षेत्रात निरागसतेचे महत्व कसे अहम् आहे हे जसे कथेतून दाखविले आहे तसेच सुबोध भावे ह्यांनी आवर्जून राखले आहे. जिंकणाऱ्याला जसा कथेत एक खून माफ होता तसे ह्या निरागसतेचे महत्व पूर्ण सिनेभाभर मिरवणाऱ्या सुबोध भावे ह्यांना एकच काय बारा खून माफ व्हावेत इतक्या गुणाचा त्यांचा हा सिनेमा आहे.
खून नंतर माफ करूत, पण आधी हा सिनेमा लवकर पहा बर !

---------------------------------------------- 

No comments:

Post a Comment