Thursday, December 3, 2015

मोजण्याच्या तऱ्हा
फारा वर्षापूर्वी खेड्यात आंबे घेत तेव्हा ते फाड्यावर देत असत. एका हातात तीन व दुसऱ्या हातात तीन असे मिळून सहा आंब्यांचा एक फाडा. शेकडा म्हणजे २२ फाडे. म्हणजे एकूण आंबे घ्यायचे १३२ व म्हणायचे/पैसे द्यायचे शंभर आंब्यांचे.
पूर्वी मुंबईत कापड वजनावर मिळे. तेही रत्तल नावाचे वजन असे.
आता कापड मिटर वर देतात पण हा मीटर पूर्वी एक हात, दोन हात असे मोजत व हात म्हणजे खांद्यापासून बोटाच्या टोकापर्यंत मोजत. ( म्हणतात की माणसाची उंची त्याच्या हाताने मोजली तर ती साडे तीन हात किंवा सात वीत भरते. ). ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी कापड मोजण्यासाठी एक ( स्टॅंडर्ड) माणूसच असे, असे लिहिलेले आहे.
मास्तर रागावले की म्हणत शंभर चपला मारीन व एक मोजीन. अशा मोजण्याने काय दोन चपला व काय दोनशे ? मारच सगळा ! ( असेच आहे हजारात देखणी किंवा लाखात देखणी ! आफ्रिकेतल्या लाखात देखणीला युरोपात हजारात देखणीही म्हणता येणार नाही ! ).
माझी आजी एक लोकगीत म्हणे :
घुसळम घुसळी, 
रखमा बाई, 
अजून का ग 
लोणी नाही ? 
लोणी खातो 
पांडुरंग, 
नको खाऊ फिक्क लोणी, 
साखर देतो 
तुकाराम वाणी, 
तुकाराम वाण्याच्या 
भरल्या गोण्या, 
माप दे रे, 
विठ्ठल वाण्या ! 


शेवटी कुठलाही आनंद मोजायचा म्हटले तर त्याचे मापही विठ्ठलाने दिले तेच ! तेव्हढाच आनंद !
-------------------------


No comments:

Post a Comment