Monday, June 6, 2016

पसारा

-------------------------
पसारा
----------
पसार्‍याला सुगृहिणी आठ्या चढवतात पण हा शब्द मूळ संस्कृत "प्रसर" पासून आलेला आणि चांगला "पसरलेला" असा अर्थ असलेला शब्द आहे. एखाद्याचे गुण अनेक असून ते निरनिराळ्या क्षेत्रात पसरलेले असतील तर ती व्यक्ती नक्कीच प्रशंसनीय आपण मानू. मुळात जे शब्द प्र पासून सुरू होतात त्यांची एक खासियत अशी आहे की हे बहुतेक शब्द प्रशंसात्मक असतात. मराठी शब्दकोशात ( माझ्याकडे शब्दरत्नाकर हा वा.गो.आपटे ह्यांचा शब्दकोश आहे, त्यातून ) एकूण ८४४ शब्द प्र पासून सुरू होणारे असून त्यापैकी २६५ शब्द ( म्हणजे ३१ % ) हे प्रशंसात्मक आहेत. उदाहरणार्थ पहा : प्रकांड , प्रकृष्ट , प्रख्यात , प्रगल्भ , प्रगती , प्रचंड , प्रचुर , प्रणय , प्रणाम , प्रताप , प्रतिभा , प्रतिमान , प्रतिष्ठा , प्रदीप , प्रधान , प्रबोधन , प्रमाण , प्रवृत्त , प्रसर , प्रसाद , प्रस्थ , प्रज्ञा , प्राण , प्रार्थना , प्राविण्य , प्राज्ञा , प्रीत , प्रेरणा , प्रेषित , प्रेक्षणीय , प्रोफेसर, वगैरे. ३१ टक्क्याचे प्रमाण हे चांगलेच प्रभावी असल्याने प्र ह्या अक्षरामुळे शब्दांना एक चांगुलपणा येतो असा तर्क केला तर तो रास्त ठरावा.
मग "पसारा" ह्या शब्दाला नकारात्मक अर्थ का बरे आला असावा ? तर, जे चांगुलपण एकत्र नसून पसरलेले असते, इतके की ते इतस्त: पसरलेले आहे असे वाटते, व असे झाले की माणसाला गोंधळायला होते. ह्या गोंधळामुळेच पसारा म्हणजे "पसरलेल्या वस्तू , गोंधळ" हा अर्थ ह्या शब्दाला चिकटला. ग्रामीण भागात पसार्‍याला अडगळ/आडगळ असे म्हणतात. त्यातल्या "आड" ह्या प्रत्ययाने आपण "मुख्य नसलेली वस्तु" हे खुणावत असतो. ( जसे : आडमार्ग, आडनाव, आडचण, आडरस्ता वगैरे ) . "गळ" ने नेमक्या वस्तू कळत असले तरी आड मुळे मुख्य नसलेल्या वस्तू म्हणजे पसारा हा अर्थ चांगलाच चित्रित होतो.
------------------------------------------

No comments:

Post a Comment