Sunday, June 12, 2016

जप, जपजाप्य


जप, जपजाप्य
-------------------
जप म्हणजे जपाची माळ मोजत देवाच्या नामाची पुनरावृत्ती करणे हे बहुतेकांना माहीतच असते. पण गंमत अशी की जे माहीत असते त्यातच माहीत नसलेले ज्यास्त असते. उदाहरणार्थ ?
सध्या मराठी विश्वकोशाचे संकेत-स्थळ बरेच दिवसांपासून डागडुजीमुळे बंद आहे म्हणून केतकरांच्या ज्ञानकोशावर "जप" असा शोध टाकला आणि उडालोच ! काहीच माहीती आली नाही. असे कधी होत नाही, म्हणून खाली पाहिले तर टीप होती की शोध करायचाय त्या शब्दात निदान तीन तरी कॅरेक्टर्स असावीत. आता "जप" मध्ये दोनच, एक ज व दुसरे प . खरेच आहे. इतका छोटा "जप" असेलच कसा ? म्हणूनच शब्दकोशवाले ह्या "जप"ला जरा भारदस्त करीत त्याचे "जपजाप्य" करतात व अर्थ देतात "जप व त्यासारखी धर्मकृत्ये". ( जाप्य हा शब्द शब्दकोशात सापडत नाही. ) . लहानपणी खेडयापाडयातून "जप" शब्दाला खेडुत "जल्प" म्हणत असे आठवले तर हा अपभ्रंश असावा असे वाटत असताना "जप" ह्या संस्कृत धातू नंतर चक्क "जल्प" हा धातू दिसतो. संस्कृत "जप"चा अर्थ to mutter असा, तर "जल्प"चा to murmur असा. म्हणजे साधारण सारखाच. उगाच आपण खेडुतांची खिल्ली उडवत होतो. जल्प हे तर शास्त्रशुद्धच निघाले की !
जप/जल्प म्हणजे mutter, murmur हे किती रास्त आहे. जप काही लाऊडस्पीकरवरनं करीत नाहीत. तो नुसता पुटपुटायचा असतो. पुटपुटणे का तर, पुटपुटणे जेवढे आपल्याला नीट ऐकू येते तेव्हढे ओरडणे ऐकू येत नाही. आजकाल तर आवाज बंद करण्याच्या तंत्रज्ञानात तोच आवाज मायक्रोफोनला दिला तर आवाज बंद होतो असे आहे. ज म्हणजे जन्मणे ( जसे: कुसुमाग्रज म्हणजे कुसुम च्या अग्र, म्हणजे आधी, ज म्हणजे जन्मलेला म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ ) असा ज चा साधारण अर्थ होतो. लहान बाळे जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या बडबडीत ( babbling ) ओठ तयार होत असल्याने ओष्ठ्य शब्दच प्रथम येतात. जसे प, ब, म. त्यामुळेच बाळशब्द शोधू जाता आपल्याला भेटतात प, पा पा, पप्पा, बाबा...वगैरे. तर पुटपुटणे जन्माला घालणे म्हणजे जप/जल्प ! काय फिट्ट शब्द आहे ना ? म्हणजे भाषेच्या जन्मापासूनच आपला जप/जल्प चालू आहे !
मॉडर्न लोक आजकाल क्लिक करणारे एक काउंटर/मोजक मिळते ते जपालाही वापरतात. पण धार्मिक लोकांना हे चालत नाही. कारण १०८ मण्यांच्या माळेत जसे अजून किती मणी बाकी आहेत, किती झाले आहेत त्याचा अंदाज लागतो तसे ह्या क्लिक करणार्‍यात कळत नाही. जपमाळ म्हणजे analogue आणि काउंटर म्हणजे Digital झाले.
जपमाळ फिरवण्यात एक टेकनीक आहे. जो १०८ वा शिरोमणी असतो तो जवळ आला ( त्याच्या लोकरीच्या दशांवरून ते स्पर्शाने कळते ) की बोट फिरवून त्याला आडवे करतात. काही धर्मात जपमाळच झाकण्यासाठी ती एका पिशवीत करण्याची प्रथा आहे.
नुसते नाव घ्यावे, मोजायची भानगड कशाला असे वाटत असेल तर विचार करा की आपले सगळे आयुष्य व कर्तब हे काही ना काही, मोजण्यातच जाते असे आढळेल. मग देवाचे नावही मोजावे न का ?
--------------------------------------------------

No comments:

Post a Comment