मराठीचे “खोटे
मित्र ” !
-------------------------------------
आजकाल ज्याच्या
त्याच्या फेसबुकाने छळ मांडलेला असून त्याच्या अति वापराने “तोंडी” “फेस” येत आहे.
पण तेव्हा मी फेसबुक नुकतेच सुरू केलेले होते. ही तशी आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट.
मी एक पोस्ट लिहिली होती, माझ्या वडिलांवर. “मराठवाडा”चे संपादक अनंत भालेराव
ह्यांच्यावर. त्यात मी कुठे तरी भावूक होत, “अण्णा तुमची खूप सय येते”, अशा
अर्थाचे काही तरी लिहिलेले होते. माझ्या अमेरिकन नातवंडांना कळावे म्हणून पोस्ट मी
इंग्रजीतही भाषांतरीत केली होती. कदाचित की-वर्ड “अण्णा” ठेवला असावा. त्यांना घरी
“अण्णा” म्हणत. तसेच
त्यांचे अनेक अनुयायीही त्यांना “अण्णा” ह्या नावानेच संबोधत. मराठीत अण्णा म्हणजे मोठा भाऊ, असे सगळ्यांनाच माहीत आहे. (
अक्का आणि अण्णा हे नाते-संबंध-दर्शक शब्द कानडीतून आले आहेत असे समजतात. तर ते
असो !). पोस्ट लिहिली त्यावेळी त्यांची
पुण्यतिथी जवळ आलेली होती. तसे ते सुधारक असल्याने आम्ही त्यांचे असे काही प्रसंग
साजरे करीत नसूत. तर पोस्ट डकवून काही तास होतात न होतात, तोच मला मेल मध्ये निरोप
आला : Anna
wants to talk to you ! माझ्या अंगावर शहारेच आले. आता काय
बोलतात काय जाणे ? दाभोलकरांची माफी मागत, ह्या निरोपावर विस्तृत काय लिहिले आहे
ते बघण्यासाठी क्लिक केले आणि काय गंमत ! एक खालील फोटो आला व लिहिलेले होते : Hi dear !
Anna : Hi
dear !
------------------------------------------
इंटरनेटवर Anna हे मुलींचे नाव आहे हे
मग गुगल सर्चने मला दाखविले. त्याच बरोबर मराठीतला कर्ता पुरुष “अण्णा” हा, मराठी
सोडले की कसा Anna नावाची मुलगी होतो ह्याचे मला नवलच वाटले . ( खरे तर गुगल सर्च वर अनेक गोऱ्या
“अण्णा” होत्या पण ह्याच सावळीला माझ्याशी बोलावे वाटावे ?). खैर, ह्या “अण्णा”चे
जाऊ द्या, पण मराठीत असे काही शब्द आहेत का की जे मराठी संदर्भ सोडले की मराठीला
अडचणीतच नव्हे तर मराठीची अगदी वाट लावतात, असा विचार माझ्या मनात आला. आणि हो, असे अनेक शब्द आहेत जे प्रत्यही मराठीला
अनेक ठिकाणी अडचणीत आणतात असे लक्षात आले !
माझी अमेरिकन नात आता
युनिव्हर्सीटीत जाण्याची तयारी करीत आहे. त्या अगोदर सुट्टीवर जाण्याअगोदर काही
दिवसासाठी ती मुंबईत आली होती. आता होस्टेलवर निदान भात तरी लावता आला पाहिजे ह्या
पालकीय काव्याने/व्यूहाने , आम्ही तिला कुकर कसा लावायचा ते शिकवत होतो. मुख्य
आदेश होता की तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर. तिला भातबीत आवडत नसे.
पिझ्झा-बर्गर वाली पोरं ही ! तर ती बंडखोरी करीत विचारीत होती, “व्हाय तीन
शिट्ट्या ?” त्यावरचे आमचे शास्त्रीय प्रवचन तिच्या काही पचनी पडले नाही. आम्ही
असे का ? असे विचारल्यावर ती म्हणाली, Anyway your Bhaat is already Shitty ! शिट व शिट्टी हे इतके जवळ जवळचे शब्द
आहेत हे आपल्या ध्यानातही येत नाही. मुळात बऱ्याच जणांना शिट हा इंग्रजी शब्द आहे
असेच वाटत असते. पण “शिटणे” शब्दकोशात पाहिल्यावर आपला शब्दकोशच शिट्टी होऊन जातो
ना !
आम्ही असेच एकदा अमेरिकेहून आलेल्या
आमच्या मुलीशी गप्पा मारीत होतो. गप्पांच्या ओघात तिने एक तरी मराठी नाटक पाहून
जावे असा आग्रह आम्ही तिला करीत होतो. आग्रहाचे शेवटचे वाक्य होते, “अग, फक्त एक
नाटक पहा !”. त्यावर आमची नातवंडं फिदी फिदी हसत मला म्हणाली, काय आजोबा हाउ कॅन
यू टॉक सो ऑबसीन ? आम्हाला काही कळेना की, ह्यात अश्लील काय ? ते मग इंग्रजीतला
प्रसिद्ध चार अक्षरी शब्द म्हणत म्हणू लागले How can you see Natak and _uck ? फक्त, हे सेन्सॉरवाल्यांना कळू नये म्हणजे झाले !
आम्हाला सुट्टीत जयपूर उदेपूर अशा ठिकाणी जायचे होते. रीतीप्रमाणे आम्ही
म्हटले की चला xxx कडे जाऊन बुक करू यात ही सफर ! त्यावर मुले म्हणू लागली की एजंट नको, आपण
खाजगी प्रवास करू यात. आमचा अनुभव तर चांगला होता, मग का नको एजंट ? तर, म्हणे की
मागच्या सफर मध्ये they suffered ! ही सफर कुठे व कुठे ते सफर होणे ?
शब्दाने मराठी संदर्भ सोडला की सफर व्हावेच लागते !
आपल्याकडे रस्तोरस्ती गाई मध्येच बसलेल्या असतात हे पाहून अमेरिकन पोरांना
मोठी गंमत वाटते. तर गेल्या खेपेस माझ्या नातवाला त्याच्या चायनीज मित्राने
गाईबरोबर त्याचा एक सेल्फी काढून पाठवायला सांगितला होता. सकाळ पासूनच तो माझ्या
मागे लागला होता, आजोबा आय वान्ट सेल्फी विथ अ गाय ! त्यावर त्याची आजी म्हणू
लागली, बाहेर कशाला ? आजोबांबरोबरच काढ की. तेही गायच आहेत. त्यावर आमचा नातू
समजवू लागला, आजी नॉट दॅट गाय, द गाय दॅट गीव्स मिल्क ! धडधाकट मराठी Guy वर दूध देण्याची नामुष्की ओढवली नाही हे नशीब !
खूप वर्षापूर्वी मराठवाड्यातल्या एक
आजी कॅनडाला गेल्या होत्या. त्यांना अजिबात इंग्रजी येत नव्हते. त्या परत आल्या
तेव्हा तिकडच्या नवलाईच्या गोष्टी त्या आम्हाला सांगत. त्या एकदा सांगत होत्या की
ते लोक काही तरी घाणेरडे “हाडूक” नावाचा पदार्थ खातात. आम्हाला बराच वेळ ह्या
“हाडूक”चा छडा लागला नाही. मग कळले की “हॉटडॉग” चे हे रूप असून ते हाडका सारखेच
दिसते म्हणून त्या हॉटडॉगला हाडूक म्हणत होत्या ! फ्रेंच भाषेत शेळीला चक्क “मटण” म्हणतात, तर ब्रेडला ब्रेडविनरला जे कष्ट
पडतात ते लक्षात घेऊन, “पेन” म्हणतात. एकाच शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ करण्यात
इंग्रजी खूप वाकबगार आहे. बिल हे कोणाचे नाव असू शकते ( जसे बिल क्लिंटन ), तर वस्तू
बरोबर त्याच्या किमतीचे मिळते तेही बिलच असते तर अमेरिकेत डॉलरच्या नोटेला बिल
म्हणतात. आपल्याकडे आपण शहरात राहतो त्या घराला ब्लॉक म्हणायचे तर अमेरिकेत
रस्त्यालगत संपूर्ण इमारतीच्या लांबीला ब्लॉक म्हणतात. अमेरिकेत घरासमोर जिथे गाडी
उभी करतात त्याला ड्राईव्ह-वे म्हणतात तर रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेला
पार्क-वे म्हणतात . युरोपात लिहिण्याच्या टेबलाला ब्युरो म्हणावे तर अमेरिकेत
ड्रॉवर्स असलेल्या टेबलाला ब्युरो म्हणतात .
काय एकेकाचे आडाखे असतात पहा !
कानडी नवरीने मराठा भ्रतार केला तर
काही काही कानडी शब्दांचा मराठीत भलताच अर्थ कसा निघतो हे अनेक वर्षांपूर्वी
तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात लिहून ठेवलेले आहे:
कानडीनें केला मर्हाटा
भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं
कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा
म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें
विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
( एका कानड्या देशातील स्त्रीने मराठा
नवरा केला पण तिने कानडीत बोलले असता त्याने भलतेच समजावे व हा काही मराठीत बोलला
असता तिने भलतेच समजावे. ( अहो देवा ) त्याप्रमाणे तुम्ही मला करू नका. या संतांची
संगती द्या. एक वेळेला त्या कानडी बायकोने कानडी भाषेत “इल बा” म्हणजे इकडे या असे
म्हटले आणि तिचा तो मराठी नवरा त्याचा अर्थ भलताच समजला. म्हणजे हिने आपणास बाबा
असे म्हटले, ही तिने शपथच घेतली असे जाणून तो तिजपासून दूर पळू लागला. तुकाराम
महाराज म्हणतात, अशा विसंगत नवरा-बायकोच्या जोडप्यात सुखाऐवजी शीणच वाढेल.). असेच
आजकालच्या कानडी भाषेत काही काही शब्दांचा भलताच अर्थ निघाल्याने आफत येते.
उदाहरणार्थ : कुंडा/ कुंडी ह्या रोप लावण्याच्या पात्राला आजकालच्या कानडीत “कुल्ले”
असा अर्थ येतो. त्यामुळे कर्नाटकात ज्यांना झाड लावायला कुंड्या हव्यात त्यांनी
जरा जपूनच...
असेच गुजराथी भाषेतल्या काही काही
शब्दांचा मराठीत काही भलताच अर्थ होतो, अर्थ कसला अनर्थच ! ते लोक वेड्या माणसाला
गांडा, व वेड्या बाईला गांडी म्हणतात, ज्याने आपल्याला राग येऊ शकतो. काम नसलेल्या
रीकामटेकड्या माणसाला ते लोक नवरा म्हणतात, तर काम नसलेल्या बाईला नवरी ! एका
दृष्टीने लग्नात नवरा-नवरीला काम नसतेच म्हणा व त्यामुळे हा अर्थ बरोबरही होतो.
आजकाल बऱ्याच जणांकडे मोबाईल वरून
फेसबुकात लिहायची सोय असते खरी, पण कित्येकांकडे मराठी अक्षरे उमटवण्याचे कर्तब
नसते. मग ते मराठी कमेंट इंग्रजीतून ( रोमन लिपीतून ) लिहितात. आधीच ह्यांचे मराठी
दिव्य ! ( ते दिव्य-मराठी वेगळे !) त्यात इंग्रजी त्यातूनही दिव्य. त्यात घोटाळे
नाही झाले तरच नवल. शादी डॉट कॉम वर एकाने हिंदी निरोप इंग्रजीत असा लिहिला होता :
Mujhe ugly ladki pasand
hai ! अगली मुलगी कुरूप ( ugly) असूनही ह्याला कशी आवडली बरे ? सौदी हून एकाने एसएमएस असा पाठवला होता : Alikade paise saathvaat aahe ! आता हा पलीकडचा अली का सध्याचे त्याचे पैसे साठविणे हे अलीकडचे ? एका तरुणीने
तिच्या रेसिपीत लिहिले होते : Doodh Bharpoor Ghala v mug ek And ! आता हिला अंड घालायचे होते का आणि काही दुसरे , हे तिचे तिलाच माहीत . एकाने त्याच्या स्वित्झरलंडच्या प्रवासादरम्यान
फेसबुक वर लिहिले होते : Kya Chees hai ! Switzerland madhye aalyawar pravasache
cheese karayche asel tar ithle cheese khayla have. आता ह्यातले खरे चीज कोणते ते हुडकतच बसायला हवे. आमच्या घाटकोपरला गुज्जू लोकांचे काही विचारू नका. आमचा एक मित्र
त्याचे गुज्जू नाव हार्दिक हे इंग्रजीत Hard-dick असे लिहितो. काय हा अश्लीलपणा आणि
तोही एका लिपीच्या फरकाने !
मराठीत उच्चार सारखा पण इतर भाषात त्यांचा वेगळा अर्थ अशा शब्दांना
भाषाशास्त्रात “खोटे मित्र” ( false friends ) असे म्हणतात. जसे : हिंदीतला “चुम्मा” म्हणजे चुंबन, तर तमिळ व मलयालम मध्ये
चुम्मा म्हणजे “अगदी तसेच”. पट्टी ह्याचा हिंदीतला अर्थ होतो, बॅंडेज, तर मलयालम
मध्ये ते होते “कुत्रा”. “चोर” मलयालम मधले म्हणजे होतो तांदूळ, तर, हिंदीत होते
चोर. लहान मुलांचे सुसू म्हणजे शू करणे, तर, इंडोनेशिया व मलेशिया मध्ये त्याचा
अर्थ होतो दूध. हंगेरी मध्ये पूस्सी म्हणजे चुंबन तर, पुस्सी म्हणजे मांजर व योनी.
जपानी भाषेतली “काउ” म्हणजे मूर्ख. इंग्रजीत Embarassed म्हणजे ओशाळणे, तर स्पॅनिश मध्ये अर्थ होतो Pregnant. मराठीत “आले” म्हणजे केव्हाची आले, तर फ्रेंच मध्ये त्याचा अर्थ होतो जाणे. गन
म्हणजे बंदूक असले तरी, बंगालीत त्याचा अर्थ होतो “गाणे”. बुक म्हणजे पुस्तक असले
तरी बंगालीत त्याचा अर्थ होतो , कपाट. टॉक म्हणजे बोलणे असले तरी बंगालीत ते होते,
कडू. मराठीत “हेल काढून बोलणे” म्हणजे अॅक्सेंट असले तरी कानडीत ते होते “घाण करणे
”. “मराठी बाणा” म्हणजे आपल्याला किती अभिमान. पण बंगालीत त्याचा ( बाणा) घाईने
उच्चार केला तर अर्थ होतो “शिस्न”. हिंदीतले “अवसर” ही संधी असते तर, कानडीत
त्याचा अर्थ होतो “घाई”. मुंडा म्हणजे पंजाबीत मुलगा होतो, तर तेलुगूत वेश्या.
मराठी हिंदीतली टोपी ही कानडीत “फसवणे” ह्या अर्थाची होते. मराठी हिंदीतली पुंगी
म्हणजे कानडीत “खोटे बोलणे” होते. हिंदीतले “नायी” म्हणजे हजाम होते तर तमिळ मध्ये
त्याचा अर्थ कुत्रा होतो . मराठीतले आई म्हणजे तमिळ मधले “शी: घाण”. अमेरिकेत
निरनिराळे ज्यूस पिण्याचे फार प्रस्थ आहे. त्यात बऱ्याच जणांना अॅपल ज्यूस आवडतो
तर तिथे अजून एक ज्यूस मिळतो, फ्रूट-पंच नावाचा. त्याचे इंग्रजीतले स्पेलिंग Fruit punch असे केलेले असल्याने हा मुष्टियुद्धातला पंच तर नसावा अशी शंका येते. मग वाटते
की काही तरी स्टायलिश नाव ठेवण्याच्या पद्धतीतून हे पंच नाव आले असावे. पण काय
आश्चर्य थोडा तपास केला तर आपलाच संस्कृत शब्द “पंच” म्हणजे पाच वरून हा फ्रुटपंच
केलेला आहे हे कळते. मग काय आहे हे पंच प्रकरण ? तर, १६३२ मध्ये भारतातून ईस्ट
इंडिया कंपनीच्या खलाशांनी म्हणे हे पेय तिकडे नेले होते. ते केले होते, साखर,
अल्कोहल, लेमन, पाणी व चहा/मसाला ह्या पांच जिन्नसांनी. ह्या पंच जीन्नसांना
उद्देशून मग ह्याचे नाव पंच पडले व मग त्यात बदल होत अनेक फळांचा रस मिसळून पेय
करण्याचे सुरू झाले व नाव त्याच प्रकाराचे म्हणून फ्रुट-पंच पडले.
दवाखान्यात आपण एकवेळ “दवा” खात असू, पण पायखान्यात कोणी पाय थोडेच खाते ?
दिवाणखाण्यात दिवाण काही खात नसतात, जनानखान्यात जनाना काय बरे खात असतील ?
तोपखाना मध्ये तोफ बारूद्च खात असणार ! हत्तीखाना मध्ये हत्ती काय खात असतील ? तर
असे “खाना” शेवटी लागलेले शब्द हे फारसीतून आले असावेत असाच आपला कयास होतो. पण हे स्वदेशी
शब्दापासून झालेले रूप आहे असे सावरकरांचे “भाषा-शुद्धी”
हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. सावरकर म्हणतात : “ खाना हे प्राकृत प्रत्ययरूपी शब्द मूळ संस्कृत शब्दापासून वा
प्रत्ययापासून आलेले आहेत. ज्या खन धातूपासून खणणे, घराचा खण
हे शब्द आलेले आहेत त्याचेच रूप “खाना” हे आहे ; म्हणून कारखाना ज्या खणात म्हणजे घरात
कर्मकार काम करतात ते स्थल=कारखाना”. हत्तीखाना, तोपखाना, जनानखाना ह्या शब्दात हत्तीला, तोफेला, जनानाला कोण कशाला खाईल ? हे त्यांचे त्यांचे “खण” आहेत ! आता आपला मराठीच शब्द पहा बरे कसा खणखणीत
वाटतो आहे ! स्वदेशी शब्दाचे नाणे ह्या व्युत्पत्तीमुळे आता कसे खणखणीत वाजते आहे.
जसे व्यवहारात आपल्याला आपले खरे मित्र व खोटे मित्र
हे पारखून घ्यावे लागतात तसेच भाषेलाही, त्यातल्या शब्दांनाही त्यांचे मित्र पारखून
घ्यावे लागतात. हे पारखताना मराठीला सोपे जावे म्हणून इथे मराठीचे खोटे मित्र कोण
ते पाहिले आहे . तर ह्यांच्यापासून सावधान !
अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व ),
मुंबई :४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२