Friday, December 18, 2015

जनांचा प्रवाहो !
मराठीच्या तिसरी चौथीत असेल जेव्हा कुसुमाग्रजांची कविता होती तेव्हा मास्तर आवर्जून सांगायचे की कुसुमच्या आधी ( अग्र ), ज म्हणजे जन्मलेला, म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ, ते वि.वा. शिरवाडकर. तेव्हा केवळ ज वरून जन्मणे ओळखायचे हे जरा स्मार्टपणाचे वाटे. जरी आजकालचे भाषाशास्त्र मानत असले की शब्दांचे अर्थ हे कोणत्याही व्यवस्थेने न येता केवळ यदृछेने ( आरबीट्ररी ) येतात तरी अभिनव गुप्तांचे तंत्रशास्त्र हे आवाजांना अर्थ असतात ह्या मताचे आहे व प्रत्येक अक्षराला त्याचा अर्थ असणारे एक दैवत असते असे म्हणते. त्या तंत्रशास्त्राप्रमाणे ज ह्या अक्षराचे दैवत आहे तन्मात्र, म्हणजे पंचमहाभूतांचे सूक्ष्म रूप. ह्याचा पडताळा म्हणून ज अक्षरापासून सुरू होणारे एकून १४३६ शब्द घेतले तर त्यातले २१५ म्हणजे १५% टक्के शब्द जन्मणे ह्या अर्थाचे दिसून येतात. ( हे चांगलेच परिणामकारी मानतात.).
जन्माला येणारे ते जन. खरे तर सगळी सृष्टीच जन्मते, जन्माला घालते. हे कधीच न संपणारे आहे. आपल्याला हवेतला ऑक्सिजन कमी होतोय असे जाणवते खरे पण त्याचा अर्थ सृष्टीचा कधी ना कधी नायनाट होईल असे नाही. कारण २.४ बिलियन वर्षापूर्वी म्हणतात की वातावरणात ऑक्सिजन नव्हता, केवळ बर्फ होता. त्यातल्या पाण्याचे हैड्रोजन व ऑक्सिजन असे विघटन व्हायला लागले व काही ऑक्सिजन वातावरणात साचू लागला. पुढे सृष्टीत असे काही जीव झाले ( जसे वनस्पती ) जे सूर्यप्रकाशापासून ऑक्सिजन निर्माण करू लागले व ऑक्सिजनचा साठा वाढू लागला. आज मितीस तो जेवढा आहे त्यावर आपले प्राण तगू लागले. पण उद्या जर हा साठा जरी कमी झाला तरी सृष्टी त्यावरही तगणारे प्राणी निर्माण करील.
हां, तेव्हा आपल्याला माणूस ऐवजी त्या प्राण्यांचा जन्म घ्यावा लागेल व ह्या सगळ्या प्रकाराला कैक बिलियन वर्षे लागतील. तेव्हढे थांबावे लागेल ! जनांचा प्रवाहो चालूच राहील !

------------------------  

No comments:

Post a Comment