Tuesday, May 3, 2016

पंक्चर फुस्स

--------------------
पंक्चर फुस्स !
-----------
जे शब्द कसेही लिहिले तरी नेमका अर्थ कळवतात त्यांच्या घडण्यामागे मोठी ठळक प्रक्रिया दडलेली असते. आणि ही बहुतांशी आवाजाची प्रक्रिया असते. आता पंचर, पंक्चर, पंपचर, अशा चुकीच्या शब्दांनीही नेमके काय झाले हे कळते ते इंग्रजी भाषेमुळे. ह्याऐवजी समजा "भोक पडणे" हा पर्यायी शब्द केला व त्यात चुका केल्या तर काहीच कळणार नाही. उदा: टायरला बोक पडले ; टायरला भुक पल्डे वगैरे. ह्या ऐवजी मराठीतला समजा "फुस्स झाले" हा पर्यायी शब्द घेतला व तो असा चुकीचा लिहिला ( गाडीचे टायर पुस्स झाले ; गाडीचे टायर फुस्सू झाले ; वगैरे ) तरी टायरवाल्याचे काही "नुसकान" होणार नाही.
हे असले शब्द त्यांच्या अर्थामध्ये आवाजाची नक्कल करतात व त्यांना ध्वन्यानुकारी ( onomatopoeia ) असे म्हणतात . ह्याची मराठीतली प्रसिद्ध उदाहरणे आहेत : कावळा, चिमणी, धबधबा, कोकिळा, ( cuckoo) , धडपड, वगैरे. आता पंक्चरच्या आजूबाजूचे शब्द पाहिले तर pun ; punch ; puncture; pungent; punish ; punitive; punk; punt, punter; puny वगैरे शब्द हे pun च्या उच्चाराने त्याचा आवाजच अधोरेखित करतात. असले शब्द मग हा आवाज/उच्चार काढतील असे असले की झाले. मग ते चुकीचे लिहिले तरी अर्थ कळवतात.
हे असे शब्द आहेत म्हणून माणसांचे व्यवहार सुकर तरी होतात. नाही तर पंक्चर हे पंपचर लिहिले व त्यामुळे त्याच्याकडे गिर्‍हाइकच आले नाही असे झाले तर ती अशुद्ध-लेखनाला फारच मोठी शिक्षा होईल व भाषेला हे परवडणारे नसते !
--------------------
-----

No comments:

Post a Comment