"नो म्हणजे नो !”
पिंक सिनेमा पाहिला आणि महत्व ठसले ते “नो म्हणजे नो” ह्या तत्वाचे. स्त्रियांना “नो”ची ताकद जाणवून देणारा हा सिनेमा अवश्य पाहण्यासारखा आहे.
तसेच ह्यावरून “नो” ह्या शब्दाविषयी भाषाशास्त्रीय कुतूहल जागे व्हायला हवे. शब्दांना अर्थाच्या अनेक छटा असतात. “हो” म्हणजे सकारात्मक अर्थ असला तरी तो जरा मोघमच असतो. हो म्हणजे किती प्रमाणात सहमत हे नक्की नसते. पण नाही/नको चे तसे नाही. त्याची नकारात्मक छटा नेहमीसाठीच नाही अशी परिपूर्ण असते.
आजकाल सकारात्मक विचार करण्याचे खूपच प्रस्थ आहे. तशात कोणी "नाही", "नको", अशी नकार-घंटा लावली की आपल्याला वाटते की हे सगळे नकारार्थी आहे. हा नकारार्थ मराठीत "न" ह्या वर्णाने येतो. शब्दकोशात न-पासून सुरू होणारे शब्द पाहिले तर मोजून खात्री करून घ्यायची सुद्धा गरज भासत नाही इतके ह्या वर्णाचे नकार देणे डोळ्यात भरते. "न" पासून सुरू होणारे शब्द , शब्दकोशात आहेत एकूण:२६०३. पैकी नकारात्मक भाव दाखवणारे शब्द भरतात: ३९०. म्हणजे हे प्रमाण: १५ टक्के इतके प्रभावी आहे. त्यामुळे शब्दात न आला की तो त्याचा अर्थ नकारात्मक करतो, हे ज्यास्त संभवनीय होते. गंमत म्हणजे हे इतर भाषातही लागू पडते. जसे इंग्रजीत नो, नॉट, नेव्हर वगैरे किंवा हिंदीत नही, ना, वगैरे. आजकाल चांगल्या पालकत्वासाठी "हे करू नको, ते करू नको", असे नकारात्मक बोलू नये, असे म्हणतात. पण कोणाला रस्ता दाखवताना कसे जावे हे जसे महत्वाचे असते तसेच कुठे जाऊ नये हेही सांगणे महत्वाचे असते. म्हणूनच जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेत "न" असलेले शब्द ८० टक्के अभंगात दिसतात. कित्येक सकारात्मक अर्थ असणारे शब्दही नकार वापरूनच केलेले आढळतात ( जसे: नि:शेष, निष्कलंक, निर्द्वंद्व, निरभ्र, निर्दोषी, वगैरे.).
"हे माझे एवढे वाचाना. तुम्हाला आवडले नाही तर मी परत लिहितोना". "बघाना"; असे आजकाल एक आर्जवासारखे आपण म्हणत असतो. हे इतके रूढ होते आहे की आपण इंग्रजीलाही असे प्रत्यय लावून आजकाल बोलायला लागलो आहोत. जसे: स्पीकना, सी टु इट ना, गो ना वगैरे.
हे क्रियापदाला असे शेवटी ना लावणे ही आपल्या मराठीची सध्याची ढब आहे. क्रियापदावरून जर आज्ञा, हेतू, उद्देश, उपदेश वगैरे कळाले तर त्याला व्याकरणात क्रियापदाचे "अर्थ" म्हणतात. जसे: १)स्वार्थ ( उदा: तो घरी गेला ) २) आज्ञार्थ : ( उदा: रांगेत उभे राहा ) ३) विध्यर्थ : ( उदा: मुलांनी आईवडिलांचे ऐकावे ) ४) संकेतार्थ : ( उदा: पाऊस आला तरी सहल जाईलच. ). आता विचाराना, बोलाना, कराना, गा ना , या ना, खा ना, जा ना, खेळाना, उघडाना, ह्या सगळ्या शब्दात आपण जो "ना" लावतो तो प्रथमदर्शनी नकारात्मक दिसतो खरा पण ते एक प्रकारचे आर्जव, विनंती असून त्यात नकारात्मकता नसते. शिवाय आपण तो लावून एकप्रकारे आदरच दाखवतो. त्यामुळे केवळ विनंतीच नाही तर आदरार्थी "अर्थ" करणारा हा प्रत्यय आहे. हाच ना आपण जर शब्दाच्या सुरुवातीला लावला तर मात्र नकारी शब्द तयार होतात. जसे: नालायक, नामंजूर, नाराज, नाउमेद, वगैरे. असेच नि हा नकारी प्रत्यय सुरुवातीला लावून सकारात्मक शब्दही आपण बनवत असतो. जसे: निरोगी, निनावी, निकोप, निर्जंतुक वगैरे.
वेदकालापासून आपण देवाचे वर्णन जिथे नेति नेति ( न इति, असा नाही, असा नाही ) अशा नकारी शब्दांनी करतो तिथे आता क्रियापदाला शेवटी ना लावून आपण आदर, विनंती करायला लागलो हे चांगल्याच अर्थाचे आहे !
नो म्हणजे नो हा अर्थ मात्र हा शब्द इमाने इतबारे पोचवतो !
---------------------------------------