Friday, July 29, 2016

हेल्प द गुड "गाय" !

----------------------------------------
हेल्प द गुड "गाय" !
---------------------------
मालवणीतल्या एका गवळ्याकडे दहा गाई होत्या. तो रोज त्यांना चरायला सोडी व त्या नेमाने संध्याकाळी परतत. एकदा त्याच्या सहा गाई परतल्याच नाहीत. त्याला संशय आला व त्याने चोरांना पकडण्यासाठी उरलेल्या चारही गाईंना चरायला सोडले व त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले. अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी चोरटे आले व त्यांनी एका गाईला चार्‍याचे आमिष दाखवत कोपर्‍यात नेऊन बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. ते चोरटे तिला टेंपोत चढवीत असतानाच पोलीस आले व त्यांनी चोरट्यांना पकडले.
गाय परळच्या जनावरांच्या दवाखान्यात नेली असता आठ महिन्याची गाभण ( प्रेग्नंट ) असल्याचे कळले. गाभण गाईला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्याने केवळ तिलाच नाही तर, तिच्या पोटातल्या वासरालाही इजा पोचली की काय ते आता डॉक्टर तपासीत आहेत. चोरटे प्रत्येक गाय २५ हजाराला विकीत असत हे ही बाहेर आले आहे.
ब्राह्मणी संस्कारांची खिल्ली उडवण्यासाठी काही आयआयटीतले लोक दरवर्षी एक दिवस "बीफ-डे" साजरा करतात. त्यादिवशी सगळे मिळून गाईच्या मटणाला ( बीफ ) शिजवतात व झोडतात. ह्या वर्षी ह्या पार्टीला जाण्याचे मला निमंत्रणही आले होते पण मी गेलो नाही त्याचे आता मला बरे वाटते आहे. ब्राह्मण-हिंदू-मुसलमान हे भेद जाऊ द्या, पण केवळ बीफ गोड लागते म्हणून आपण ह्या चोरांच्या दुष्कृत्यात सामील झालो नाही ह्याचे मला आता बरे वाटते आहे. केवळ काही हजारासाठी एका गाभण ( प्रेग्नंट) गाईला असे लुबाडायचे हे एका जनावर बलात्कार केल्यासारखेच होते.
लोकांनो, प्लीज हेल्प द गुड "गाय" !
-----------------------------------------------------

इगो अमरच असतो!

ईगो अमरच असतो !
-------------------------------
माणूस प्रत्यक्षात हयात नसला तरी त्याच्या साहित्यात ईगो वसूनच असतो. आजही आचार्य अत्रे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर टिप्पणी करायची असेल तर एक प्रकारचा अदृश्य धाक नाही का जाणवत ? त्यांच्या हयातीत जसे लोक वचकत तसेच अजून आजही वाचक वचकूनच असतात, त्यांच्या साहित्याला . त्याउलट ज्या नेमाडेंनी सगळ्या बहाद्दरांचे वस्त्रहरण केले त्यांनी केवळ साने गुरुजींना वंदनीय मानले, हे साने गुरुजींचा लडिवाळपणाच नाही का दाखवत ? प्रत्येक लेखक/कवी/कलावंताची एक स्वत:ची ढब वा शैली असते जीत, त्याचे सगळे स्वत्व व ईगो येतात व ते त्याच्या पश्चातही तग धरतात, हेच तर वाङ्मयाचे "अक्षर" असण्याचे लक्षण आहे. "आढ्यता" स्वभावात असण्याचे जसे फायदे असतात तसेच "नम्रता" वागवण्याचेही असल्याने वाचकांना मोह पडतो. स्वभावात काय असावे वा नसावे हे आपण ( इतर लोक ) ठरवू शकतही नाही , पण त्याचा आपल्यावर निश्चितच परिणाम होतो. एखाद्या कलाकाराला प्रयोगा दरम्यान मोबाईल वाजला तर आवडत नाही, तो प्रयोग सोडून जातो, हे एकदा कळले की मग नंतरचे रसिक त्याच्या स्वभावाशी जुळवूनच घेतात. ईगो अमरच असतो !

इच्छांचं मरण

--------------------------------
इच्छांचं मरण
--------------------
महात्मा गांधी कसे आरामात १५/२० दिवसांचे उपवास करीत . कित्येक जैन मुनींनी १००/१२० दिवसांचे उपवास केलेले ऐकले आहे. माझी आजी आठवड्यातले तीन चार दिवस तरी उपवास करी. हे असे इच्छेला नाही म्हणणे ह्या लोकांना कसे जमले असेल ?
असेच वाटून मी एकदा चार दिवस प्रयोग केला होता. म्हणजे मला खूप दिवस करायचा होता पण हा प्रयोग मी चार दिवसच करू शकलो. तेव्हा मी किर्लोस्कर कमीन्स मध्ये इंजिनियर म्हणून महिना ३०० रुपयावर काम करीत होतो. पगार पुरेसा नसला तरी खाणेपिणे व्हायचे त्यात. पण महिना-अखेर अगदीच मोजके पैसे शिल्लक राहिलेले असायचे. जेमतेम आठ-दहा रुपये. त्यामुळे हा प्रयोग महिना-अखेरी करायचे ठरवले. प्रयोग असा होता की बिलकुल जेवायचे नाही. अगदीच मरायची वेळ आली तर केळी वगैरेसाठी चार-पाच रुपये होते शिल्लक. त्यामुळे प्रयोग करायला बिनधोक वाटले होते.
बरे बाकीचे व्यवहार सगळे नित्य-नेमाने करायचेच होते. फक्त जेवायचे नव्हते, काही खायचे नव्हते. त्यात कोणाकडे गेलेलो असलो व त्यांनी पोहे, उपमा असे काही केलेले असले की त्याला नाही म्हणताना जाम आतडे तुटत असे. बळे बळेच काही तरी कारण सांगून खाणे टाळायचे. त्यापेक्षा रात्रपाळीचे काम बरे पडायचे. जेवायचा प्रश्नच येत नव्हता तेव्हा. असे कसे तरी तीन दिवस तगलो. चौथ्या दिवशी इतका ढेपाळलो की जवळ असलेल्या तीनचार रुपायात बकाबका मिसळ-पाव का असेच खाल्ले, तेव्हा सुटका झाली व तात्काळ स्वीकारले की मनोनिग्रह वगैरे ह्या आपल्या आवाक्यातल्या गोष्टी नाहीत. आपण नाही मारू शकत आपल्या इच्छा. इच्छांचं मरणं आपल्यासाठी अवघडच आहे !
---------------------------------------------------

इच्छांचं मरण

--------------------------------
इच्छांचं मरण
--------------------
महात्मा गांधी कसे आरामात १५/२० दिवसांचे उपवास करीत . कित्येक जैन मुनींनी १००/१२० दिवसांचे उपवास केलेले ऐकले आहे. माझी आजी आठवड्यातले तीन चार दिवस तरी उपवास करी. हे असे इच्छेला नाही म्हणणे ह्या लोकांना कसे जमले असेल ?
असेच वाटून मी एकदा चार दिवस प्रयोग केला होता. म्हणजे मला खूप दिवस करायचा होता पण हा प्रयोग मी चार दिवसच करू शकलो. तेव्हा मी किर्लोस्कर कमीन्स मध्ये इंजिनियर म्हणून महिना ३०० रुपयावर काम करीत होतो. पगार पुरेसा नसला तरी खाणेपिणे व्हायचे त्यात. पण महिना-अखेर अगदीच मोजके पैसे शिल्लक राहिलेले असायचे. जेमतेम आठ-दहा रुपये. त्यामुळे हा प्रयोग महिना-अखेरी करायचे ठरवले. प्रयोग असा होता की बिलकुल जेवायचे नाही. अगदीच मरायची वेळ आली तर केळी वगैरेसाठी चार-पाच रुपये होते शिल्लक. त्यामुळे प्रयोग करायला बिनधोक वाटले होते.
बरे बाकीचे व्यवहार सगळे नित्य-नेमाने करायचेच होते. फक्त जेवायचे नव्हते, काही खायचे नव्हते. त्यात कोणाकडे गेलेलो असलो व त्यांनी पोहे, उपमा असे काही केलेले असले की त्याला नाही म्हणताना जाम आतडे तुटत असे. बळे बळेच काही तरी कारण सांगून खाणे टाळायचे. त्यापेक्षा रात्रपाळीचे काम बरे पडायचे. जेवायचा प्रश्नच येत नव्हता तेव्हा. असे कसे तरी तीन दिवस तगलो. चौथ्या दिवशी इतका ढेपाळलो की जवळ असलेल्या तीनचार रुपायात बकाबका मिसळ-पाव का असेच खाल्ले, तेव्हा सुटका झाली व तात्काळ स्वीकारले की मनोनिग्रह वगैरे ह्या आपल्या आवाक्यातल्या गोष्टी नाहीत. आपण नाही मारू शकत आपल्या इच्छा. इच्छांचं मरणं आपल्यासाठी अवघडच आहे !
---------------------------------------------------

Thursday, July 28, 2016

हाडाचा टण्णू

हाडाचा टण्णू !

-------------------

हैद्राबादला असताना रीतीप्रमाणे आम्ही लहान मुले गोट्या खेळत असू. बहुतेक गोट्या कांचेच्या असत व त्यात रंगीत फुले असत. पण सगळ्या गोटी बहाद्दरांचा अनभिक्षित राजा एक तेलुगु मुलगा होता. त्याच्याकडे एक पांढरी शुभ्र व जड अशी गोटी होती, जी तो इतक्या जोरात हाणी की कांचेच्या गोट्या चक्क फुटत असत. त्याला त्या काळी पोरं टण्णू किंवा बट्ट्या म्हणत. ही गोटी हाडाची केलेली असे व तो मुलगा एका हाडाच्या कारखान्यातून ती घेवून येई.

त्या टण्णूचा आम्हाला फार हेवा वाटे. कारण त्याच्या समोर बाकीच्या गोट्यांचा अजिबात टिकाव धरत नसे. हा हेवा कधी कधी आम्हाला स्वप्नात हाडाच्या कारखान्याला घेवून जाई व आम्ही कल्पनेने हाडाच्या तलवारी, जम्बिये, हाडाची पिस्तुले वगैरे बनवून अनेकांशी जिंकण्याची स्वप्ने पहात असू.

त्यानंतर आमचा काका जेव्हा मेडिकलला होता तेव्हा हातापायाची मोठी हाडे आम्ही जवळून पहात असू. काका त्यावर रंगीत पेन्सिलीने निळ्या लाल शिरा काढीत असे. त्याला म्हणे परीक्षेत हाडे ओळखून त्याची माहिती द्यावी लागे. तसा तो हाडाचा विद्यार्थी होताच !

पुढे होस्पेटला असताना एका सोन्याच्या खाणीत गेलो असताना तिथल्या एकाने आपल्या हाडात सुद्धा कसे सोने असते त्याची माहिती दिली होती. त्याने तर हाडाच्या टण्णूचा आमच्या मनातला मान अधिकच वाढला ! जीवनात काही व्हायचे असले तर व्हावे हाडाचा टण्णू !

------------------------

अगडबंब वाक्य

असे एक अगडबंब वाक्य...
-----------------------------
पहिल्या शब्दात एक अक्षर, दुसर्‍या शब्दात दोन अक्षरे, तिसर्‍या शब्दात तीन अक्षरे,....अशा वीस शब्दांचे हे एक वाक्य बघा आणि असेच एक वाक्य मराठीत होऊ शकते का त्याचा प्रयत्न करा:
"I do not know where family doctors acquired illegibly perplexing handwriting; nevertheless, extraordinary pharmaceutical intellectuality counterbalancing, indecipherability transcendentalizes intercommunication's incomprehensibleness".

Monday, July 25, 2016

अधीरापोटी फळे गोटी...

अधीरापोटी फळे गोमटी....
------------------------------
श्री.अमर्त्य सेन ह्यांची आई म्हणे रविंद्रनाथ टागोरांची सेक्रेटरी होती. त्यामुळे त्यांच्यावर टागोरांचा दाट प्रभाव असावा हे साहजिकच आहे. लोक धीर ठेवून वाट पाहतात व हे धीर धरणे एक प्रकारचे निराश होणेच असून त्याला गुण मानू नये असे गरीबांच्या कैवाराचे त्यांचे नुकतेच वक्तव्य आले आहे. ( खालची बातमी वाचा ) . ह्या अगोदर टागोरांच्या कवितेतली एक ओळ माझ्या चुकीची लक्षात राहिली होती. ती होती : We are too poor to wait. ह्याचा मी असा अर्थ काढीत असे की देवाच्या दरबारी कित्येकवेळा बराच काळ लागतो . ( उनके दरबार मे देर है लेकिन अंधेर नही है ह्या धर्तीवर ! ). त्यामुळे धीरोदात्तपणाला बगल देऊन अमर्त्य सेन उताविळीचे गुणगान का करीत आहेत ह्याचे मला नवलच वाटले. आपण म्हणतो ना का सबूरी का फल मीठा, किंवा धीरापोटी फ्ळे रसाळ गोमटी. मग हे असे उलटे का म्हणत आहेत. म्हणून मी अगदी "कसे पकडले" ह्या आविर्भावात "गीतांजली" ( रविंद्रनाथांचा कवितासंग्रह ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले होते ) काढली व ती कविता मला सापडलीही. ती अशी :
ENDLESS TIME
Time is endless in thy hands, my lord. There is none to count
thy minutes.
Days and nights pass and ages bloom and fade like flowers.
Thou knowest how to wait.
Thy centuries follow each other perfecting a small wild flower.
We have no time to lose, and having no time we must scramble
for a chances. We are too poor to be late.
And thus it is that time goes by while I give it to every
querulous man who claims it, and thine altar is empty of all
offerings to the last.
At the end of the day I hasten in fear lest thy gate to be shut;
but I find that yet there is time.
ह्यातली जी ओळ मला लक्षात होती ती मुळात होती : We are too poor to be late. आम्ही इतके गरीब आहोत की आम्ही उशीर खपवून घेऊ शकत नाही. किंवा आम्हाला सगळे ताबडतोब हवे आहे. कवितेतल्या देवाजवळ अनंत असा वेळ आहे व ह्या धीरासाठी देवाचे आभारच मानावेत. पण प्रत्यक्षात गरीब लोकांना जे काही मिळावयाचे आहे ते लवकरच मिळाले पाहिजे अशीच व्यवस्था करायला हवी. मला कसे नेमके उलटेच लक्षात राहिले होते व अमर्त्य सेन बरोबरच होते जेव्हा ते गरीबांसाठी अधीर राहण्याची भलामण करतात.
चला त्यानिमित्ताने "गीतांजली" उघडणे तर झाले !
--------------------------------

अलीकडे-पलीकडे

अलीकडे-पलीकडे

“अलीकडे” व “पलीकडे” हे इतके सोपे शब्द आहेत की ते सगळ्या मराठी बोलणाऱ्यांना आपसूक समजतात. ते शब्दकोशात कोण कशाला पाहील इतका त्याचा अर्थ सहज कळणारा आहे. असेच हा-तो, ह्या-त्या, इथ-तिथ, जवळ-दूर ह्यांचेही अर्थ असेच सहजी समजणारे आहेत. हे आपल्याला कोणी शिकवलेत असे काही आठवत नाही. मग ते आपल्याला कसे कळले असावेत ?

शब्द हे एक चिन्ह आहे व ह्या चिन्हांनी काही तरी दाखवल्या जाते असे म्हणतात. आपण अगदी लहानपणी जेव्हा भाषा शिकतो तेव्हा नीट पाहिले तर लक्षात येईल की मुले बोलण्या अगोदर बोलणाऱ्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत असतात. ते चेहऱ्यावरचे हावभाव बघतात. माझी आजी लहान बाळांशी एक खेळ खेळत असे. ती तान्ह्या बाळांना हातावर घेवून त्यांचे तोंड आपल्यासमोर धरी व तासन तास त्यांच्याशी बोले. असे बोलत बोलत ती बाळाला जरा दटावी, हं नुस्त बसून राहायला पाहिजे, कामं कोण करणार, अस बरच रागे भरे. पाहता पाहता हसणारं बाळ ओठ काढी ( ह्याला ती बाबर ओठ म्हणे ) आणि हमसून हमसून रडे. तान्ह्याला शब्द नसतील कळत पण भाव हमखास कळतात हे ह्यावरून कळेल. ( आयांच्या माघारी हा प्रयोग हमखास करून पाहण्यासारखा आहे ).

असेच आता शाळा कॉलेजातली लेक्चर्स आठवा. शिक्षकाकडे पाहिले नाही तर काही कळत नसे. त्यासाठी अगदी पुढची बाके अडवत असू. त्याचेही कारण अवघड विषय सुद्धा चेहऱ्याच्या भावावरून समजणे सोपे जाते, हेच आहे.

मग आपण ऐकलेले शब्द व चेहऱ्यावरच्या स्नायूंच्या हालचाली किंवा ठेवण ह्यांची अटकळ बांधतो व त्यांचा अर्थ ठरवतो. अलीकडे व पलीकडे ह्या शब्दात लीकडे ही शेवटची तीन अक्षरे सारखी आहेत. पण आरशात पहा अलीकडे म्हणताना ओठ आधी फाकतात व आत येतात, गाल बाजूला जातात. जसे काही कोणी बाहेरून आत येत आहे. ह्या उलट पलीकडे म्हणताना ओठ प म्हणताना चंबू होत गाल अजिबात बाजूला सरत नाही. जसे काही कोणी इथून दूर जात आहे. असेच हा-तो; ह्या-त्या; इथ-तिथ; जवळ-दूर म्हणताना होते व त्यानेच अर्थ कळतो. चेहऱ्यावरची हालचालच अर्थ दाखवते !

-------------------------   

Saturday, July 23, 2016

खरूजवर का खरजेवर

खरूज वर का खरजेवर ?

आजकाल खरूज हा रोग इतका प्रचलित नाही, पण आमच्या लहानपणी टरारून खरजेचे फोड येत, ते फुटत, त्यातून पू पाणी निघे व त्याला पाणी लागले की आग होई. त्यावर एकमेव उपाय म्हणजे लाईफबॉय हा लाल साबण असे.

खरूज झाली . ह्यावरून खरूज हे स्त्रीलिंगी आहे हे तर कळेलच. आता स्त्रीलिंगी का पुल्लिंगी वा नपुसक लिंगी का नाही हा भांडण्याचा प्रश्न नंतर पाहू. तूर्तास हा शब्द ( नाम ) स्त्रीलिंगी आहे हे मान्य करावे. प्रिया ही स्त्रीलिंगी असते व आपण तिच्यावर भाळतो, तेव्हा मी प्रीयेवर भाळलो अशी कबुली देतो, प्रीयावर भाळलो अशी नाही. तर स्त्रीलिन्गामुळे नामाचे रूप बदलले, हा नियम लक्षात आला असेल.

खरूज वर मलमपट्टी नको, खरजेवर लाईफ-बॉय साबण वापरावा ! असे म्हणावे लागते !

---------------------

Friday, July 22, 2016

वदनी कवळ घेता

------------------------------------
वदनी कवळ घेता...
----------------------
परंपरा ही आपल्याला बहुदा यांत्रिक करीत असावी. कारण वदनी कवळ घेता...ह्या जेवणाच्या वेळेस म्हणण्याच्या श्लोकाचा काय अर्थ असावा असा कधी आपल्याला प्रश्नच पडत नाही. काय असेल ह्या श्लोकाचा अर्थ ?
अर्थातच हा भक्तीमार्गाच्या ऐन सुवर्णकाळात रचलेला श्लोक असावा. कारण ह्यात देवाचे नाव श्रीहरी असे आहे. जेवताना घास घेताना श्रीहरीचे नाव घ्यावे असे म्हटले आहे. हे घेतल्याने सहज हवन होते, अगदी फुकटचे, असे जे म्हटले आहे ते पचण्याच्या दृष्टीने म्हटलेले नाही तर "हवन" जे यज्ञकार्यात करतात त्या रूपकाने म्हटलेले आहे. अन्न/घास आपल्याला शक्ती पुरवितो हे वैज्ञानिक कारण इथे दाखवलेले नाही कारण वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे बाबी खिजगणतीतच नव्हत्या तेव्हा. तसेच ह्यातले "होते" हे होणे ह्या क्रियापदाचे भूतकालवाचक रूप नसून अग्नीला जे "होता" असे म्हणत ते असावे. कारण इथे हवन आहे यज्ञातले.
"जिवन करी जिवित्वा" ह्या ओळी आधी पूर्णब्रह्म म्हणजे काय हे जाणू. शंकराचार्यांच्या केवलाद्वैतवादात हे ब्रह्म प्रकरण येते. सगळेच ब्रह्म असते. तुम्ही आम्ही सगळे. आणि माया मिथ्या असते असे ऐकलेले स्मरत असेलच. आता एकनाथांच्या भागवताकडे वळू. मायेचे वर्णन करताना एकनाथ ( अध्याय ३-६९,७०  ) म्हणतात, "आता कांही एक तुझ्या प्रश्नीं । माया सांगो उपलक्षणी । सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिविधगुणी विभागे ॥ जेवीं सूर्यासी संकल्पु नसे । तरी नसता त्याच्या ठायी दिसे । जेव्हा का निजकिरणवशें । अग्निप्रकाशे सूर्यकांती ॥ तेवीं शुद्धस्वरूपी पाही । संकल्पमात्र काही नाही । नसतचि दिसे ते ठायी । ते जाण विदेही "मूळमाया" ॥"
आता ही जर माया आहे तर केवलाद्वैतवादातले ब्रह्म कसे ? तर एकनाथ सांगतात,( अध्याय ३-८५-  ) "एशीं स्त्रजिलीं भूतें महाभूतें । जी जड मूढ अचेतें । त्यांसी वर्तावया व्यापारार्थे । विभागी आपणाते तत्प्रवेशीं ॥ पंचधा पंचमहाभूतें । ते कार्यक्षम व्यावया येथे । पंचधा विभागे श्रीअनंते । प्रवेशिये तेथे तें एक राया ॥ "गंध"रूपें पै पृथ्वीतें । प्रवेशोनि श्रीअनंते । पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥ पृथ्वी प्रवेशिला भगवंतु । यालागी आवरण-जळांतु । उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥ धरा धरी धराधर । यालागीं विरवूं न शके समुद्र । धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणे वाहे ॥ "स्वाद" रूपे उदकांते । प्रवेशोनि श्रीअनंते । द्रवत्वें राहोनिया तेथे । जीवनें भूतें जीववी सदा ॥ जीवनीं प्रवेशे जगज्जीवन । याकारणें आवरण तेंचि जाण । न शोषिता उरे जीवन । हे लाघव पूर्ण हरीचे ॥ " म्हणजे जे ब्रह्म ( चैतन्य ) आहे ते आधी गंध रूपाने पृथ्वीत आले आहे ( घासाचा वासच उद्युक्त करतो ) मग चैतन्य हे स्वाद रूपाने आपल्या शरीराच्या उदकात ( आपल्या टेस्ट-बडस्‌ ह्या द्रवच निर्माण करतात ) वसते आहे, व हे उदक आपल्या जीवनाला जीवनदान देते आहे. ( जीवाची उत्पत्ती जलातून झाली हे इथे आपल्याला आठवावे ). हेच ते जिवन करी जिवित्वा . आणि ह्या खाण्याला आपण ह्याच साठी उदरभरण नोहे समजून हे यज्ञकार्य समजून त्या पूर्ण ब्रह्माची/श्रीहरीची आठवण ठेवावी.
----------------------------------------

अजब तर्क

अजब तर्क
---------------
जे लोक काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडं का मारू नयेत?  राजकारणी म्हणतात, कारण मग तेही तुमच्या घरावर दगडं मारतील ना, म्हणून. आपण खून का करू नये, तर खून करणे वाईट आहे म्हणून नव्हे, तर दुसरेही  आपला खून करतील म्हणून. काही धूर्त म्हणतात, आपण दगडं मारायला गेलो तर घरं काचेची असल्याने आपण मारतोय ते लोकांना दिसेल, म्हणून. हे दोन्ही तर्क चुकीचे आहेत हे कोणालाही आता पटावे. असेच भ्रामक तर्क आहेत, की तुम्ही त्यांना वेश्या म्हणालात ना तर मग आम्ही तुमच्या माणसाच्या आई, मुलीला पेश करा असे म्हटले तर तुम्हाला त्यावर आक्षेप घ्यायचा अधिकार नाही. चांगल्या माणसांनी, व वाईट माणसांनी  वाईटाला वाईटच म्हटले पाहिजे,हीच नीती. वाईट माणसाला अधिकार आहे का नाही हे गैरलागू आहे. वाईट माणसाने साक्ष दिली, तर ती ग्राह्य धरून खुन्याला फाशी देतात, मग त्याने वाईटाला वाईट म्हटले तर ते तर्काला धरूनच होते!

Thursday, July 21, 2016

भाषा ही ओळख

भाषा ही ओळख ?

सध्या भीमसेन जोशींच्या मुलांचे वारसा-हक्काचे भांडण चर्चेत आहे. एका गटाने दुसऱ्या गटाचे म्हणणे खोडून काढताना त्यांच्या मृत्युपत्राच्या भाषेवरून हे त्यांचे मृत्युपत्र वाटतच नाही असे म्हटले आहे. अशाच एका खटल्यात मृत्युपत्राची भाषा ही ती करणाऱ्याची वाटत नाही असे ठरून ते रद्द झाल्याचे ऐकलेले आहे.

मृत्युपत्र हा खरे तर एका कायदेशीर भाषेचा नमुना असतो. “सदर मृत्युपत्र हे मी स्वेच्छेने करीत असून पूर्ण होशोहवाल मध्ये करीत आहे” असे लिहिलेले असले तरी ते कसे कलुषित आहे हे त्यातल्या भाषेवरून समजते ? आणि तसे असेल तर ही “भाषा” मोठी छान लपण्याची जागा होईल. 

आता म्हातारपणी मी एकटाच उरलो आहे, मला हलवत नाही, चालवत नाही, औषधपाणी करणारा हाच मुलगा आहे, सबब हे घर मी त्याच्या नावे करीत आहे असे लिहून सुद्धा आपल्याला त्यातली अगतिकता सहजी समजू शकते. म्हणजे जे लिहिले त्याच्या नेमके वेगळे कसे पोचले ? आणि इथे ही भाषा तुम्हाला माझी ओळख देते आहे की आजकालच्या काळाची ओळख देत आहे ? शब्दांच्या एकामागोमाग येण्यात हा कुठला भलताच “अर्थ” ह्यात डोकाऊन गेला ? ही माझी ओळख, तुमची का भवतालाची ?

--------------------------------------------------

ळ चे लळित

------------------------------------
"ळ" चे लळित !
-----------------------------------
    "ळ" हा मराठी वर्णमालेतला मोठा स्पेशल वर्ण आहे. इतर लोकांना ह्या "ळ" मुळेच मराठी बोलायला अवघड जाते. व्याकरणाच्या पुस्तकात ह्याला स्वतंत्र वर्ण म्हणून मानल्या जाते. तसेच ळ चा उच्चार करताना जिभेचा शेंडा कठोर तालू व कोमळ तालू यांच्या मधल्या भागाला म्हणजे "मूर्धा"ला लागल्यावर होतो व म्हणून त्याला "मूर्धन्य" म्हणतात. ळ ला पर्याय म्हणून ल हा वर्णही आपण वापरतो. हा ल अर्धस्वर असून मृदू असतो. जसे कमल किंवा कमळ, निर्मल किंवा निर्मळ, सरल किंवा सरळ, सकल किंवा सकळ, बाल किंवा बाळ, माला किंवा माळा, संध्याकाल किंवा संध्याकाळ,  वगैरे. पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर ळ मुळे एक प्रकारचा ठसठशीतपणा किंवा टोकाची भावना जाणवते. जसे सरल पेक्षा सरळ हे ज्यास्त सीधेपणाचे असते, निर्मल पेक्षा निर्मळ ज्यास्त निर्मळतेचे असते, फल पेक्षा फळ ज्यास्त फळणारे आहे, खल पेक्षा खळ हा ज्यास्त खलनायकी थाटाचा असतो. पूर्वी कमळ ज्यास्त वापरातले असल्याने मुलांचे नाव कमळाकर असायचे तर आताशी त्याचे कमलाकर करतो, हिंदी "चोली" पेक्षा मराठी "चोळी" ही ज्यास्त ठसठशीत वाटते, "बगळ्यांची माळ" कोमल भासावी म्हणून कवीच्या सोयीसाठी आपण "बलाकमाला" हा शब्द रास्त ठरवतो तर "बलाकमाळा" गैर मानतो, वगैरे.तर सारांशाने म्हणता येईल की ल वापरून आपण जे शब्द करतो त्यात वरचे, अधिकाचे परिमाण, वरची पातळी ( डिग्री ) दाखवायची असेल तर ती ळ वापरल्याने साधते. उच्चारशास्त्रात ल हा अर्धस्वर तर ळ हा स्वतंत्र वर्ण मानताना हीच वरची पातळी दाखविण्याचा प्रयत्न असावा. हाच "ळ"  चा वरच्या पायरीचा अर्थ म्हणता येईल. पूर्वी भजनांनंतर एक मनोरंजक नाटक असे ज्याला लळित म्हणत. "ळ" चे मराठीत असेच लळित आहे !
--------------------------
अरुण अनंत भालेराव
--------------------------------------

अपमान कसा करावा

अपमान कसा करावा ?

राजकारणात जेव्हा कोणी एकमेकाविरुद्ध बोलतात तेव्हा ते खरेच असते पण त्याने निष्कारण वैयक्तिक चारित्र्य हनन झाल्याचा त्यांना राग येतो. तर असा राग न येउ देता अपमान कसा करावा ?

सगळ्यात सोपे तत्व असे आहे की तुम्हाला कोणाचा बाप काढायचा असेल तर आपलाही बाप काढावा. म्हणजे समजा तुम्हाला असे म्हणायचेय की “तुझ्या बापाने असे कधी केले होते काय ?” तर इथे प्रश्न त्यालाच असून निष्कारण त्याचा बाप काढल्या गेलाय. आणि साहजिकच त्याला त्याचा राग येणार. आता त्याचा “बाप” काढायचाच असेल तर असे म्हणावे : “माझ्या बापाने तर असे कधी केले नव्हते, तुझ्या बापाने असे कधी केले होते काय ?” आता तो जर खवळला तर आपण चुचकारू शकतो की मी माझाही बाप काढलाय की !

तर आता मायावतींना ज्या गृहस्थाने “तुम्ही वेश्येपेक्षाही वाईट आहात. सकाळी एक कोटी घेवून तिकीट देता, दुपारी दोन कोटी तर संध्याकाळी तीन कोटी घेवून.” असे जे म्हटले, त्याच्याने त्यांचा अपमान झाला. आता हेच अपमान न होवू देता कसे म्हणावे ?

तर असे : “राजकारण आजकाल एक वेश्याव्यवसाय झाला आहे. निवडणुकीची तिकिटे पैसे घेवून देतात. पण मायावतीमुळे आमची अडचण होते. त्या सकाळी एक कोटी घेतात, व ते पाहून आम्ही सव्वा कोटी घेतले की त्या दुपारी दोन कोटी घेतात. आम्ही दोन घेतले की त्या तीन घेतात. हे वेश्याव्यवसायापेक्षा वाईट आहे.  ”

बघा झाला का अपमान ? कारण आम्ही पण त्याच व्यवसायात आहोत हे म्हटलेय की !

-----------------------