Sunday, March 18, 2012



अरुणोदय झाला--२८

पानसिंग तोमार,
बोलीचा खुमार !

    हिंदी सिनेमाचे एक चांगले असते की तो कोणाला कशासाठी आवडतो तर कोणाला कशासाठी !
    मला हा सिनेमा बोली भाषेच्या खुमारी साठी आवडला.
    पानसिंग तोमार हा सैन्यात जातो. खायला मुबलक मिळते म्हणून सैन्यातल्या स्पोर्टस्‌ मध्ये रनिंग मध्ये प्राविण्य मिळवतो. इकडे त्याची शेती बळकावल्या जाते म्हणून तो बागी बनतो. चंबळचा डाकू बनतो. सिनेमाची गोष्ट एका पत्रकाराच्या मुलाखतीने उलगडत जाते. हाडाचा स्पोर्टमन जसा शर्यत पूर्ण केल्याविना रहात नाही त्या प्रमाणे हा शेवटी शरण न येता पोलिसांशी लढताना प्राण ठेवतो. सिनेमा जे खेळाडू हलाखीने मेले त्यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.
    आता बोली भाषेच्या खुमारी बद्दल. संवाद लेखकाने कमालीच्या प्रांजळपणाने संवाद थेट चंबळच्या बोलीतच ठेवले आहेत व इरफान ह्या नटाने त्याला त्याच्या नेहमीच्या तुसड्या फेकीने चांगलाच न्याय दिला आहे. एक साधे उदाहरण: मुलाखत घेणार्‍या पत्रकाराला तो मटण खाऊ देत नाही ( कारण पत्रकार मोटा असतो ) पण त्याला आइस-क्रीम विथ गुलाबजाम देतो. गरम गुलाबजाम आईसक्रीम बरोबर खाण्याच्या विदेशी लज्जतीचे बहारदार वर्णन करताना तोमार म्हणतो : एकै स्वाद है, लेकिन डबल मिजाज है !
    साध्या साध्या माणसांनाही विचारांचे गारूड कसे मोहवून अचाट कामे करून घेते तेही ह्या सिनेमात फार नजाकतीने दाखविले आहे. जसे सगळे जण पानसिंग तोमार ह्याला शेवटी शरणागती पत्कर असे सांगत असतात. पोलिटिकल करेक्टनेस प्रमाणे ते रास्तही ठरते. पण पानसिंग म्हणतो हम ठहरे पगबाधा रनर ( स्टीपल-चेस रेसचा रनर), हमार लक्ष्य फिनिश लाइन. भले जिते या हरे, रेस तो पूरी करनीही है ! एक साधे तत्व, पराकोटीच्या वेडेपणाला भाग पाडते !
    असेच सैन्याधिकारी त्याची चौकशी करीत असताना त्याला विचारतात की त्याच्यापैकी कोणाला पोलिसांनी कधी पकडलेले होते काय ? म्हणजे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? तर पानसिंग कौतुकाने म्हणतो, पोलिस पकडही नही पाये ! म्हणजे पकडल्या जातो तो चोर व पकडल्या जात नाही तो नेता असाच जनमानसाचा कौल दिसतो !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------------------------

Friday, January 27, 2012

अरुणोदय झाला---२७
पुरस्कार केव्हा मिळावेत ?
    विंदा करंदीकरांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्या कितीतरी आधी त्यांनी कविता करायचे सोडले होते. जवळ जवळ जीवनाच्या शेवटालाच त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रात वसंत बापट, मंगेश पाडगावकर व विंदा करंदीकर ह्यांचे त्रिकूट एकेकाळी गावोगाव जाऊन काव्यगायनाचे कार्यक्रम करीत असत. खरे तर तेव्हढया एका कार्यासाठी, मराठी कविता व अभिरूचीच्या संगोपनासाठी, त्यांना दिले असते तितके पुरस्कार कमीच पडले असते, इतके ते मोलाचे काम होते. पण त्या वेळी हे तिन्ही कवी तरुण होते व त्यांची मस्ती, निर्मिती हाच त्यांना मोठा पुरस्कार वाटत असावा.
    कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कॉलेजमध्ये असताना जीवनानुभवाच्या महत्तेपोटी शिक्षण सोडून दक्षिणेकडे गेले होते व आतंकवादी समजून त्यांना तुरुंगवासही तेव्हा झाला होता. पण त्या तरुण कवीला "महाराष्ट्र काव्य-भूषण" हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने आत्ता चार-पाच वर्षापूर्वी दिला.
    कवी वसंत बापट कुठला पुरस्कार मिळण्याआधीच वारले.
    मागच्या वर्षी ठाण्याला एका कार्यक्रमात सगळे मान्यवर कवी रांकेत पहायला मिळाले. त्यात शंकर वैद्य दिसले. कोणी तरी त्यांची स्वाक्षरी मागत होते. वही, पेन, चष्मा, ह्या सगळ्या जामानिम्याला सांभाळत त्यांचा थरथरता हात कितीतरी वेळ स्वाक्षरी काढण्याचा प्रयत्न करीत होता. एके काळी दूरदर्शनवर काय अप्रतीम मुलाखती, काव्यगायन हा कवी करीत असे ते आठवून मन गहिवरून आले.
    ग.दि.माडगूळकर व शांताबाई शेळकेंना तर खास मानाचे असे पुरस्कार मिळायला खूपच उशीर झाला.
    कवी लोकांना जेव्हा आपण पुरस्कार देतो तेव्हा तो आपण त्यांच्या निर्मितीला केलेला एक सलाम असतो. तो आपण त्यांच्या निर्मितीच्या भरात असतानाच करायला हवा. निर्मितीची गात्रे गळित-गात्र झाल्यावर आपण त्यांना पुरस्कार देतो हा खरोखर त्यांच्यावरच्या आटलेल्या निर्मितीचा उपहासच नाही का ? प्रकृतीला न जुमानता जेव्हा कवी त्याला दिसणार्‍या वाटेने, आडवाटेने, चौखूर उधळत असतो तेव्हा आपण त्याच्या मार्गापासून दूरवर उभे राहतो व प्रकृती जेव्हा त्याचे सगळे निर्मिती-रस आटवते तेव्हा आपण त्याला मान देतो. हे आपले वागणे साहित्य-बाह्य लक्षणांना जोपासणारे आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------------

Tuesday, January 3, 2012



अरुणोदय झाला---२७

___" सह नौ टरक्‌तु !
सहवीर्यं डरवावहै ! "
  
    काल कानपूरला एक अफवा उठली आहे. अफवा अशी की तिथे भूकंप येऊ घातला आहे व तशात जे लोक बाहेर असतील, बाहेर झोपलेले असतील, त्यांची होईल, दगड आणि माती !
    क्षणभर हसू आले. पण जरा विचार केला तर आपली दगड आणि माती झाली आहे असेच दिसून आले. कशाचेच आता कौतुक नाहीय. कोणी अनाम पूर्वजांनी केव्हा तरी करुणा भाकली असेल की "माझ्या मना बन दगड !" आणि आपण आताशी दगडासारखे मख्ख झालेलो असू. हा कसला कंप आला आणि आपण बनलो दगड आणि माती ?
    समाजाचे राहू द्या, कुटुंबातली नाती सुद्धा व्हावी दगड आणि माती ? आणि पांगली किती माणसे ! आई-बाप इथे तर मुले तिथे परदेशी. देशात असली तरी परमुलुखात . प्रगती आणि सुधारणा म्हणजे, नेहमीचे बसकर सोडायचे व दुसरे शोधायचे, असेच का व्हावे ? आणि असे झाले म्हणून मनातले एकमेकांविषयी वाटणे, अनुकंपा, कमी का व्हावे ? ह्या अनुकंपेच्या न येण्यानेच होणार आहे का आपली दगड आणि माती ? का ह्या अनुकंपेपायी मोजावी लागणारी किंमत पाहूनच आपल्याला भीती वाटायला लागली आहे ? आताशी ह्या अंधाराची चीड येण्याऐवजी ह्याचा धाकच उदंड वाटतो आहे. हिंमतीने आणलेले पाणी बाळगणारी ओली जिवणीही अशी धाकाची रात्र कोरडी पडते आहे. मनाच्या ह्या खिंडारांवर आपण भीतीचा गाळ थापून काही डागडुजी करतो आहोत का ? ब्यूरोच्या बायका नेमल्या की झाले कर्तव्य, हीच का जनरीती होऊ लागलेली आहे ? हे भळभळणारे नात्यांचे रक्तस्त्राव लगेच थांबावेत म्हणून का आपण ह्या जनरीतींचा बर्फ त्यावर धरतो आहोत ? हे सगळे भयाण आहे . पण सगळीकडे असे भयाणतेचेच बुरुज दिसत आहेत. ह्या बुरुजांवरून शेवटची परवलीची शीळ येईल, जिच्या येण्याबरोबरच सगळे होईल दगड आणि माती ! ह्या शीळेलाच गिळू यात व मंत्र म्हणू यात __"सह नौ टरक्‌तु ! सहवीर्यं डरवावहै !"
    कानपूरला केव्हा बरे पोचले असतील मर्ढेकर ? कारण मर्ढेकरच म्हणाले होते :
            मनास पडली जर खिंडारें
            भकास, थापा गाळ भीतीचा,
            अन्‌ धमन्यांतिल धारांवरती
            बर्फ रचा मग जन-रीतीचा.
              
                अंधाराचा धाक उदंड,
                काळोखाची हाक अकल्पित,
                ओल्या जिवणीमधील पाणी
                पळविल ऐशी रात्र अशिल्पित;
              
                भयाणतेच्या बुरुजावरुनी
                येइल केव्हा शीळ अनामिक;
                गिळा तिला अन्‌ मंत्र आठवा
                मनातल्या पण मनांत, लौकिक:
          
            __"सह नौ टरक्‌तु !
            सहवीर्यं डरवावहै !"
( कवी : बा.सी. मर्ढेकर, १४, "काही कविता" मधून )
---------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
--------------------------------------------------------------------------------------

Friday, December 2, 2011

अरुणोदय झाला---२६

नाही हो नाही हो नाही......

    माणसाला ठामपणाचे खूप आकर्षण असते व आदर्श चांगला माणूस हा अगदी ठाम असाच असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस बर्‍याच बाबतीत हो नाही च्या अध्येमध्येच घोटाळत असतो. सोनियांचा आजार लोकांना सांगावा का नाही ?  राहूलने व्हेनेझुएलिन मुलीशी लग्न करावे का नाही ? राहूलने आत्ता लगेच पंतप्रधान व्हावे का पुढच्या निवडणुकी नंतर ? का प्रियांकालाच पंतप्रधानपद द्यावे ? हे खरे तर भारताचे मोठ्ठे प्रश्न असायला हवेत. पण लोकांना पडलेत एफडीआय-रिटेल, लोकपाल, महागाई, काळे धन, लाल दिवे वगैरे क्षुल्लक प्रश्न...
    लोकपाल बिलात अगोदरच लोकसभेने तीन मुद्यांवर होकाराचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणून मग आता कशाला नाही म्हणता येत नाही का ? कोण लागून गेली आहे स्टॅंडिंग कमीटी ? खुद्द सम्राज्ञीला अमेरिकेला ऑपरेशनसाठी जावे लागले, हे खरे, पण कोणता आजार होता हे आम्ही सांगू शकलो का ? सांगितले का ? अभिषेक मनु सिंघवी आहेत खूप हुशार पण त्यांना सुद्धा आम्ही कॉंग्रेसच्या प्रवक्तेगिरीवरून एकदा काढून टाकलेच होते ना ? प्रणबदा आहेत खूप अनुभवी पण राजीवजींच्या काळात त्यांनासुद्धा आम्ही चांगले बदडले होते ना ? मग नक्की नक्की असे काय असते ? नक्की कशाचे नक्की नसतेच.
    आमच्या नाही नाही म्हणण्याचे एवढे काय घेऊन बसलात. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ).  अहो देवाची व्याख्या करताना सुद्धा भारतीय तत्वज्ञान म्हणून गेले आहे की "नेति नेति". मग आम्ही थोडे हो नाही, हो नाही, केले तर त्यात काय एवढे ? न, ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त,  "न करणे" ही असते. पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).
    साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो.
    मग काय समजलात ? लोकपाल आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    एफडीआय-रिटेल मागे घेणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    काळे धन माघारी आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    महागाई कमी होणार का नाही ?  उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    २-जी चे राजे सुटणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    राहूलच लग्न होणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
    आमचेच राज्य परत येणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
( हे सगळे खरे समजायचे का ? नाही हो नाही हो नाही हो...........)
-------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------------

Tuesday, October 18, 2011

मु.पो.कुसुमाग्रज व भाषांतराचे पक्षी:
फारा वर्षानंतर एका अभिजात कार्यक्रमाला जायला मिळाले. दि.१५ आक्टोबरला ( २०११) यशवंतराव चव्हाण सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे कुसुमाग्रजांच्या कवितांवर कवी सौमित्र ( नट, किशोर कदम) व गुलजार ह्यांच्या कवितावाचनाचा हा कार्यक्रम होता. खालचे प्रेक्षागृह भरल्याने वरच्या बाल्कनीत बसावे लागले. अर्थात बाल्कनीही भरली हे या कार्यक्रमाचे दिसणारे यशच.म्हणतात की हा चौथाच कार्यक्रम होता आणि असे बरेच व्हावेत असे वाटावे इतका ह्रद्य !
स्टेजवर गुलजार व कुसुमाग्रजांचे भव्य चित्र, आणि दोन पोडियम्स इतकाच नेटका रंगमंच होता व तो फारच प्रभावी जाणवत होता. प्रेक्षकात डॉक्टर जब्बार पटेल, गुरू ठाकूर व मुंबईच्या धकाधकीतून निवांतपणा काढणारे रसिक होते. कवी सौमित्र कुसुमाग्रजांची कविता अतिशय भावोत्कटतेने वाचीत व नंतर गुलजार त्याचे हिंदी-उर्दूतले भाषांतर पेश करीत, काही स्पष्टिकरणेही देत. असे एका भाषेतले कवितेचे पक्षी मु.पो, कुसुमाग्रज ह्या कवीच्या गावाहून भरारी घेत गुलजार ह्यांच्या कवितेच्या गावी सुखेनैव पोंचत व दोन्हीही कवी किती प्रचंड ताकदीचे होते त्याचा प्रत्यय येई. मध्ये मध्ये सौमित्र त्यांना काही कविताविषयक, सृजनविषयक, तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारीत व त्यांची चपखल उत्तरे तितक्याच लीलया गुलजार देत. असा मन खिळवून टाकणारा हा कार्यक्रम फारच वेधक झाला. अखेर गुलजार म्हणाले तसे, अनेक कवींचे मुशायरे टाळून एकाच कवीची कवने व तिची भाषांतरे ह्यांचा मरातब करणारी ही मराठी अभिरुची त्यांना तसेच प्रेक्षकांना अपार भावली.
कवितांच्या निवडीबद्दल सौमित्रांचे, अमृता सुभाष ह्यांचे अवश्य अभिनंदन करायला हवे. कारण कुसुमाग्रजांची आपल्या मनात असलेली प्रतिमा गर्जा जयजयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, आगगाडी व जमीन, जालीयनवाला बाग, जा जरा पूर्वेकडे, वेडात मराठे वीर दौडले सात, टिळकांच्या पुतळ्याजवळ वगैरे शालेय जीवनात भेटलेल्या शिरवाडकरांना ( कुसुमाग्रज) दाट ओळखीची होती. त्यात समकालीन कवी जी जीवनावरची, नात्यांवरची, मृत्यूवरची तत्वज्ञानात्मक भाव-कवने रचतात तशाच कविता निवडून त्यांची भाषांतरे पेश करण्याने एका ज्ञानपीठ विजेत्या कवीची भारदस्त बाजू पहायला मिळाली. शिवाय मूळ कवितेचे लगेच भाषांतर पेश करण्याने ती कविता मनावर चांगली पक्की कोरल्या जायची हेही वाखाणण्यासारखे झाले. कविता वाचनाच्या निमित्ताने सृजनाचे व आयुष्याच्या तत्वज्ञानाचे जरा रंगतदार दर्शन झाले. मृत्यूबद्दल सौमित्रांनी विचारलेल्या प्रश्नावर गुलजारांनी एक काव्यमय कल्पना सांगितली. त्यांना मृत्यू आजाराने शय्येवर यायला नको आहे, क्षणात चिंध्या करणार्‍या अपघाताने यायला नको आहे, तर कविता लिहिता लिहिता पेनमधली शाई संपून जावी तसा यायला हवा आहे. कवी गुलजारांची भाषांतरे चपखल तर होतीच, शिवाय एका थोर कवीने दुसर्‍यासमोर किती प्रांजळपणे नतमस्तक व्हावे ह्याचा आदर्श दाखविणारी होती. त्यांच्या एका कवितेवर प्रेक्षकांची दाद आल्यावर ते म्हणाले की ही दाद मूळच्या कुसुमाग्रजांना आहे ! केव्हढी ही विनम्रता व किती देखणी !
आजकाल आपल्याच नात्यांबद्दल विमनस्क करणारी भावना दाखवणारी एक कविता मोठी बोलकी होती. कवीने मोठ्या मशागतीने रोप लावले आहे व त्याची निगराणी केली आहे. पण आता ते झाड उन्हपावसात बहरत असताना कवीला आता त्याच्याशी संबंध तुटल्यासारखा वाटतो आहे. आणि तरीही तो म्हणतो की हे बहरणे, निसर्गाचे कवतिक वगैरे त्या झाडाच्या मुळांतून जमीनीच्या कुशीत जाणारे आहे. आजकालच्या पोटच्या मुलांना अंतरणार्‍या पालकांना ह्या कवित्तेचे तत्वज्ञान क्षणभर हेलावून सोडते. तसेच म्हातारपणी एकटेपणाचे दु:ख सोसणार्‍या पुरुषांची व्यथा कवीने सात चमच्याच्या स्टॅंड ह्या हलक्या-फुलक्या वाटणार्‍या कवितेने छान रेखाटली आहे. घरची मालकीण असती तर तिच्या देखरेखीत सातवा चमचा हरवला नसता ह्या अगदी सोप्या, घरगुती निरिक्षणाला पुष्टी देत जेव्हा कवी म्हणतो की तर मग मीही हरवलो नसतो, तेव्हा एकटेपणाची हळहळ साक्षात समोर उभी राहते. ह्या कवितेच्या भाषांतरादरम्यान गुलजारांनी एक छान उत्तर दिले. सौमित्रांनी विचारले होते की तुम्हाला निसर्गाच्या रूपांचे सुचते कसे ? त्यावर गुलजार म्हणाले की निसर्गाचे सोडा, इथे कुसुमाग्रज तर निर्जीव अशा चमच्याच्या स्टॅंडला जिवंत करीत आहेत ! सृजनाला अजून वेगळी दाद ती काय असावी ? सृजनाबाबत एक कवी म्हणून सौमित्रांना कुतुहूल असणे स्वाभाविक. मग ते विचारतात की तुम्ही चालीवर गीते कशी लिहिता. ह्यावर ते सांगतात की दोनशे वर्षांपासून अशीच रीत चालत आली आहे. प्रक्रीया समजली नाही पण रीत अशीच हे उमगले.
कुसुमाग्रजांच्या ज्वलंत राजकीय उपरोधाची खूण पटविणारी एक कविता, महात्मा गांधींच्या सरकारी भिंतींवर टांगले असण्याची, नेहमीप्रमाणे भरघोस दाद मिळवती झाली. शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दु:खाची किंवा कंगालपणाची खिल्ली न उडवता त्याचा मानमरातब ( डिग्निटी ) कुसुमाग्रज "कलोजस" ह्या कवितेत कसा सांभाळतात ते गुलजारांनी कवितेच्या भाषांतरात अप्रतीमपणे बोलून दाखविले. कुर्ल्याच्या चाळीत एका बंदिस्त खोलीत त्या गरीबाला, कंदिलात, एका सूर्यनारायणाचे कसे दर्शन होते व तो कलोजस कसा घनगंभीर होतो हा अनोखा रसास्वाद गुलजार इथे आपल्याला शिकवून जातात. पुराने घर खचले तरीही उभारीने, ताठ कण्याने, लढणार्‍या शिष्यावरची कविता "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" ह्यात गुलजार कुसुमाग्रजांचे नेमक्या व मोजक्या शब्दात चित्र उभारण्याचे कसब आवर्जून दाखवतात. "बायको मात्र वाचली" एवढे म्हणण्याने बाकीची हलाखी आपल्यापुढे साक्षात उभी राहते असे जेव्हा गुलजार निदर्शनास आणून देतात तेव्हा एका कवीचे रसग्रहण कसे असते त्याचा नमूनाच पहायला मिळतो.
कवी सौमित्र म्हणजेच कसलेले नट किशोर कदम व गुलजार हेही थेटर सिनेमातले, व कुसुमाग्रजही थोर नाटककार, तेव्हा नाटकावरची कविता नसती तर चुकचुकल्यासारखे झाले असते. "नट" नावाची एका नटाच्या अखेराची अप्रतीम कविता अशीच रंगते. रिकाम्या प्रेक्षागृहात रिकाम्या खुर्च्यांकडे प्रयोगाअंती पहात हा नट आशा करतो की जे प्रेक्षक माझी स्मृती घेऊन गेले आहेत त्यांच्यात अंशा अंशाने तरी मी वाटला गेलो आहे ह्याचे मला समाधान आहे. अशा कार्यक्रमानिमित्त धावपळीतल्या रसिकांना थोर कवींचे अंश अशाच रितीने आपल्यात झिरपले असावेत अशी सुखद जाणीव होते, जी "मु.पो.कुसुमाग्रज, भाषांतराचे पक्षी" ह्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मिळणारी पोचपावतीच आहे जणु.

------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

Wednesday, July 27, 2011

---------------------------------------------------------------------------------------------

अरुणोदय झाला----२४
हीना रब्बानी खार !
भारतीय माणूस, मग तो मुस्लिम असो वा हिंदू, पाकीस्तानवर जरा खार खाऊनच असतो. पाकीस्तानशी बोलणी करताना त्याला नेहमीचे सर्व हातखंडे पाठ झालेले असतात. आम्ही मुंबई हल्ला काढला की त्यांनी समझौता एक्स्प्रेस काढायची, आम्ही घुसखोर काढले की त्यांनी बलुचिस्थान मध्ये होणारे हल्ले काढायचे. काश्मीर तर नेहमीचाच प्रश्न असतो. तशात पाकीस्तानने हीना रब्बानी खार ह्या ३० वर्षीय सुंदरीला परराष्ट्रमंत्री म्हणून भारतात पाठवावे हा खरेच एक मास्टरस्ट्रोक म्हणता येईल अशी चाल आहे. आणि त्यात एक प्रकारचे अप्रतीम काव्यही आहे. कसे ? अहो, ज्या पाकीस्तानावर आपण कायम खार खाऊन असतो त्यांनी त्यांचा परराष्ट्रमंत्रीच "खार" नावाचा पाठवावा ? म्हणजे हे अगदीच जशास तसे झाले !
शिवाय नेमेचि येतो मग पावसाळा सारख्या नेमाने होणार्‍या शांततेच्या बैठकी किती कंटाळवाण्या व्हायच्या. आणि आता पहा बरे ! बाईंवरून नजर हटत नाही इतके सौंदर्य ! किती माफक आणि भारी साजश्रृंगार ! १७ लाख रुपायांची म्हणे नुसती पर्स आहे. बिर्किन्स नावाच्या ब्रॅंडची आणि गॉगलही काय सुरेख, डोळ्यांना म्हटले तर लपवणारा, म्हटले तर खुलवणारा ! उंचनीच बाई, बोलतेही किती आर्जवी ! पाकीस्तानचे आता ऐकायला हरकत नाही !
आता भारतानेही ह्यापासून धडा घ्यायला हवा व आपला परराष्ट्रमंत्री असाच देखणा ठेवायला हवा. जर शशी थारूर ह्यांना परत आणू शकत नसतील तर त्यांची नववधू सुनंदा पुष्कर ही ह्या हीनाला तोडीस तोड होईल ! राहूलने स्वत: जरी अजून लग्न अथवा नारीवलय जवळ केलेले नसले तरी जरा देखणे लोक राजकारणात ठेवावेत म्हणजे आपल्या देशाचा टीआरपी जरा तरी वाढेल. हिलरी क्लिंटन बाईंचे नित्यनूतन बदलणारी केशभूषा पाहून सोनियांनीही जरा स्फूर्ती घ्यायला हरकत नाही.
माणसांचा तसाच देशांचा मूळ स्वभाव काही जाता जात नाही म्हणतात. पाकीस्तानाचा स्वभाव पहिल्यापासूनच उलटे बोलण्याचा, उलटे करण्याचा आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग ह्या "हीना रब्बानि खार" बाईला नेमताना त्यांच्या मनात नेमके उलटे नसेल ह्याचा काय भरवसा ? काय असेल ह्या बाईच्या उलटे ?--- हीना रब्बानि खार--ह्याच्या उलटे काय होते बरे ? अरेच्चा ! ते होते : रखा निब्बार नाही ! निब्बर नाही म्हणजे मऊ आहे, हेहि चांगलेच आहे म्हणायचे ! उलटे अथवा सुलटे बाईच जिंकते की !

-------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, July 13, 2011

कवितांच्या प्रतिमा--प्रतिमांच्या कविता
कै.पु.शि.रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या अंकात ( कविता-रती मार्च-जून २०११ ) प्रा.गंगाधर पाटील ह्यांचा एक "गाणारं झाड" नावाचा रेगे यांच्या आठवणींवरचा लेख आहे. त्या लेखात त्यांनी रेगे ह्यांना कशा काही कविता "दिसत" असत व ते लगेच त्या टिपून घेण्यासाठी रात्री उशाशी कागद-लेखणी ठेवीत असत असे सांगितले आहे. चक्क दिसलेली कविता व जोडून मोडून केलेली कविता ह्या संबंधी आपल्याला नेहमीच कुतुहूल असते. काही प्रमाण असो वा नसो, एक असे वाटत असते की जी कविता अशी "दिसते" ती दैवीच म्हणावी लागेल. ( मराठीतल्या विदुषी दुर्गा भागवत ह्या ग्रेस ह्यांच्या कवितांना असेच विशेषण लावीत. ). अशा दैवी कवितात कोलेरिज ह्यांच्या "कुबला-खान" ह्या शंभर ओळींच्या कवितेला सर्वात उच्च स्थान असावे, कारण ती म्हणे त्यांना शीर्षकासह दिसली होती. ह्यावर लगेच इस्लामवादी म्हणतील की मोहमंद पैगंबराला अपरिचित अशा भाषेत ज्या कविता दिसल्या ( म्हणजे आजचे कुराण ) त्यांनाच हे स्थान द्यावे, कारण त्या नुस्त्याच टिकल्या नाहीत तर त्यामागे आज एव्हडी प्रचंड संस्कृती उभारलेली आहे .
महाराष्ट्र काव्यभूषण श्री.मंगेश पाडगावकर सांगतात की त्यांना अकस्मात कवितेची एक ओळ सुचते व ती बरेच दिवस त्यांचा पिच्छा पुरवते व मग ते त्या ओळीतल्या भावनेनुसार त्याची चारोळी, वात्रटिका, गजल, सुनीत, भावगीत, गीत किंवा कविता अशी कलाकृती करतात. त्यांना प्रसंग, चित्र, देखावा दिसतो असे ते म्हणत नाहीत. कवी ग्रेस ह्यांना मात्र रात्री अपरात्री देखावे, दृश्ये दिसतात व त्यांच्या ते कविता करतात. असेच पु.शि.रेगे ह्यांना प्रसंग, देखावे दिसले व त्यावर त्यांनी कविता रेखल्या असे प्रा.गंगाधर पाटील ह्यांनी मांडले आहे. शास्त्रीय ( मेंदू बाबत ) दृष्टीने माग काढला तर असे आढळते की आपल्या मेंदूत विचार करण्याची काही कळच नाही.आपण एक तर साठवलेल्या आठवणी माघारी काढू शकतो किंवा येत असलेले अनुभव अगोदर असलेल्या अनुभवांशी पडताळून त्यांना योग्य कप्प्यात साठवू शकतो. पण आपल्याला स्वप्ने पडतात, चित्रे दिसतात हे तर नाकारता येतच नाही. स्वप्ने वा चित्रे दिसणे हे आपल्या मेंदूला खूपच सोयीचे आहे. कारण चित्रांऐवजी येणारे विचार जर शब्दात आले असते तर एखादे स्वप्न वाचायला आपल्याला कैक दिवस लागले असते. ( आपला लिहिण्याचा वेग असतो ४०/५० शब्द दर मिनिटाला, तर वाचण्याचा वेग असतो ८०/९० शब्द दर मिनिटाला. मनात वाचण्याचा वेग असतो १५०/१६० शब्द दर मिनिटाला. ) त्या मानाने अनेक शब्द लागणार्‍या वर्णनाचे एक चित्र ( फ्रेम ) धरले तर आपल्या पाहण्याचा वेगच असतो २४ फ्रेम्स दर सेकंदाला. म्हणजे क्षणात आपण कित्येक शब्दांचे चित्र ( फ्रेम ) वाचू शकतो, पण चित्राच्या भाषेत. आता ही चित्रेच म्हणजे प्रतिमा, असे धरले तर, ज्या कवींना कविता दिसतात असे मानले तर कवितेतल्या प्रतिमा ह्याच त्यांना दिसलेल्या प्रतिमा असे होईल. त्या प्रतिमा आपणही त्यांच्या कवितेतून पाहू शकतो.
नेमकेपणासाठी आपण पु.शि.रेगे ह्यांचीच अशी कविता-रतीने ह्या अंकात छापलेली ( मुखपृष्ठामागे ) एक कविता घेऊ :
पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो.

सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते बजावून सांगतो.

हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो.

मी कविता करीत नाही
माझ्या मनाची आणि तुझ्या धांव घेतो.

ह्या कवितेतल्या प्रतिमांची ( कवीला दिसलेल्या चित्रांची ) जंत्री केली तर तीत अशी चित्रे दिसतात : १) गाणारा पक्षी २) डरकाळ्या फोडणारा सिंह ३) झाडांना अंग घासणारा हत्ती ४) कविता करणारा कवी ( मी ) ५) पक्षी सीमा घोषित करतो आहे ६) सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय ७) हत्ती आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवतोय ८) कवी आपल्या मनाची व प्रेयसीची धांव घेतोय. ह्यातील १) ते ४) ही चित्रे अगदी सरळ-साधी चित्रणे आहेत तर ५) ते ८) चित्रे ही पहिल्या गटातील (१ ते ४) चित्रांचा अर्थ लावणारी चित्रे आहेत. सकृदर्शनी कवीने नुसती चित्रे सादर केली आहेत असे दिसते. पण जरा काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक चित्रावर त्याने आपला तर्क चालवलेला आहे व त्याचा अर्थ दिला आहे असे दिसेल. जसे: गाणारा पक्षी नुसते गात नाहीये तर तो आपल्या सीमा घोषित करतो आहे. डरकाळ्या फोडणारा सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय. झाडांना अंग घासणारा हत्ती आपल्या वावर-प्रदेशाच्या खुणा ठरवतोय. कवी कविता करीत नाहीय तर त्याच्या मनाची व प्रेयसीची धांव घेतो आहे.
कोणाही जाणकार प्राणी-मित्राला विचारले तर सिंहाचे, हत्तीचे ( एव्हढेच काय कुत्र्यांचेही ) हे आपली सत्ता-प्रदेश इतरांना दाखवून देण्याचे प्रघात आहेत, असे कळेल. म्हणजे हे नैसर्गिक आहे हे ठाम झाले. इथे कवी क्रमा क्रमाने आपल्याला ह्या तर्काला बांधून शेवटाला घेऊन जातो व म्हणतो की असेच माझी कविता ही कविता नसून तुझे व माझे प्रदेश दाखवणे आहे. शिवाय हे किती नैसर्गिकही आहे, सुंदर आहे. हे रेगे ह्यांचे प्रामाणिकपणे आपल्याला दिसलेल्या चित्रांचे दाखवणे आहे की नेटाने तर्क लढवून कविता ही त्यांच्या व प्रेयसीचे प्रदेश दाखवणे आहे हे पटवणे आहे ? आता ही काही लबाडी म्हणता येणार नाही. प्रख्यात विदुषी मार्जोरी बोल्टन ह्यांच्या "ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या पुस्तकातल्या "इंटेलेक्च्युयल फॉर्म:द टू मेन पॅटर्न्स ऑफ इमेजरी" ह्या प्रकरणातले हे वाक्य पहा (पृ.११२ ) : "तर्कसंगती हे जागृत मनाचे लक्षण आहे व भावनेच्या विरोधी आहे. श्रेष्ठ कवितेत भावनेचा भडिमार असून त्याचबरोबर सुसंबंद्ध आंतरिक तर्कही असेल. तर्काची सुसंगती ही चांगल्या कवितेच्या रचनेचा महत्वाचा भाग असतो, व तो प्रतिमांच्या अनाकलनीय परिणामांपेक्षा जोरदार असतो. " ह्या अंगाने, प्रत्येक प्राणीमात्र आपल्या वावर-सत्तेच्या प्रदेशाच्या खुणा दाखवीत असतो, हे ह्या कवितेतल्या तर्कामागचे मूलसूत्र होते.
प्रत्येक संबंधात (रिलेशन) त्यातल्या घटकांना आपला स्वतंत्र प्रदेश ( स्पेस ) लागतो हे आता जवळ जवळ मान्यच झाले आहे. ह्या स्वतंत्र वावराला वाव मिळाला नाही तर संबंध विकोपाला जातात हे कोणत्याही कौटुंबिक कोर्टात न जाताही आपण मान्य करू इतके ते पटण्याजोगे आहे. असे असताना कवीने असे जर म्हटले असते की माझ्या कवितेत तुझे प्रदेश व माझे प्रदेश असे मी दाखवतोय तर ते ह्या तर्क-संगतीची पुढची कडी झाले असते. रेगे ह्यांच्या वैयक्तिक चरित्रातही ते रास्त ठरते. जसे : बायको सरिताबाईंचा एक प्रदेश, जर्मन प्रेयसी केठ ह्यांचा एक प्रदेश, मुलाबाळांचा एक प्रदेश, मित्रांचा एक वगैरे. पण ते जेव्हा शेवटच्या ओळीत म्हणतात की माझ्या कवितेत मी माझ्या मनाची व तुझ्या ( मनाची ) धांव ( ओढ ) घेतोय तर ते ह्या प्रादेशिक रचना करण्याच्या तर्काविरुद्ध जाते. प्रियकर प्रेयसी ह्यांचे मनोमीलन हे रोमॅंटिक व आदर्श खासच असते पण मग त्यासाठी सिंह, हत्ती हे आपले वेगळे प्रदेश करतात ( इतरांपासून ) ही तर्काची दोरी रास्त ठरत नाही.
कवी भले म्हणो की मी माझ्या मनाची व तुझ्या मनाची धांव घेतोय पण वाचकरूपी तिसर्‍या अंपायरला विचारलेत तर तो धांव-चित ( रन-आऊट) झालाय असाच निर्णय द्यावा लागेल. कारण ह्या कवितेत केवळ प्रतिमांचा खेळ असता, नुसती पक्षी, सिंह, हत्ती ह्यांची चित्रे असती, तर कसल्याही निर्णयाचे कवीचे म्हणणे चालले असते. त्याला समीक्षकांप्रमाणे वाचकही अप्रतीम म्हणते झाले असते. पण ह्या कवितेत तर्क हीच मोठी प्रतिमा आहे व शेवटचे चित्र हे तर्क-विसंगत ठरते !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-----------------------------------------------------