Friday, April 3, 2015


भय इथले संपत नाही !
      माझ्या आयुष्यातली दहा बारा वर्षे ज्या भीतीने पोखरली होती, त्यासंबंधी आता हसू येईल, पण असे अनेकांना निरनिराळ्या भीतींपोटी वर्षे वाया घालवावी लागतात. ही भीती होती काळेपणाची, गोरे नसण्याची !
      मॅट्रिकच्या वर्षापासून मला हा एक नवीनच चाळा लागला होता. मी समोरची व्यक्ती, न्याहाळी व ती किती गोरी आहे, त्याचा अंदाज घेई व मग आपण त्याच्यापेक्षा काळे आहोत की गोरे असा अंदाज बांधी. आणि बहुतेक वेळा मला खिन्नच व्हायला होई. कारण मी होतोच काळा. आता त्याकाळात गरीबी असल्यामुळे ह्या वाटण्यामुळे मी काही क्रीम्स, लोशन्स वगैरे वापरू शकलो नाही पण उगाचच सारखे उदास वाटत राही. मग ह्यातून सुटका म्हणून मी अभ्यासात मन रमवे. त्यामुळे फायदा झाला तो अभ्यासाचा व करीयरचा. पण व्यक्तिमत्वात एक भित्रेपणा आलाच. ह्या भित्रेपणावर मात करण्यासाठी मग परत ज्यास्त वाचन, अभ्यास असे चक्रच पाठीमागे लागले. आता समजा समोरच्या मुलापेक्षा मी ज्यास्त काळा आहे असे मला वाटले तर त्यावर काही उपाय होता का ? पण तरीही माझा बराच मनातला वेळ ह्या तुलनेत जाई. त्यामुळे सुन्न व्हायला होई. अभ्यासात मन लागत नसे. सदा सर्व काळ आपण किती काळे आहोत, त्याचा अंदाज घेण्यातच जाई.
      खरे तर अशा वैगुण्यावर कुठल्याही घरात डॉक्टरी उपचार किंवा निदान समुपदेशनाचा तरी मार्ग शोधल्या गेला असता. पण त्या काळात ही सोय इतकी प्रचलित नव्हती. पण समुपदेशनाचा एक सामाजिक मार्ग होता. लता मंगेशकरांचे "एका तळ्यात होती" हे गीत इतके लोकप्रिय होते की ते सतत कानावर पडायचे व त्याने एक सामाजिक समुपदेशन परस्पर व्हायचे. गीतात एका राजहंसाची गोष्ट असे. राजहंस म्हणतात काळा असतो. तर अशी तीन बदकाची पिले आहेत. त्यापैकी एक काळे पिल्लु आहे. त्याला कोणी खेळायला घेत नाहीय. त्यामुळे ते पिल्लु उदास आहे आणि एके दिवशी त्याला तो राजहंस आहे असे कळते व तो सुखावतो. ह्या समुपदेशनामुळे आपण जरी काळे असलो तरी खास आहोत, हुशार आहोत ह्या स्वत:लाच देऊ केलेल्या धीराने मग मी खूप अभ्यास करायचो. त्याने शैक्षणिक यश मिळायचे. मान मिळायचा.
      तरीही आपण किती काळे आहोत ही पाहण्याची खोडी मधनं मधनं उचल खाई व पुन्हा उदासी येत असे. मग त्यावर पुन्हा काहीतरी वाचण्यात मन रमवावे लागे. एकदा मग काळ्या रंगावरच वाचणे झाले. एका जपानी माणसाचे संशोधन वाचले. काळा रंग मोजण्यासाठी स्पेक्ट्रोमेट्रिक कलरोमीटर वापरले होते. कपाळावरच्या एका जागेवरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्याच्या मोजमापावरुन आपल्या रंगाचे मोजमाप करतात. जगातल्या एकूण जमातींचे कॉकेशीयन, मोंगोल व निग्रॉइड असे वर्गीकरण केले तर त्यांच्या रंगांचे आकडे म्हणे असे निघतात : ( कॉकेशियन ) 3.1YR6.4/3.7 ; ( मोंगोलाइड) 4.9YR6.2/3.8 ; (निग्रॉइड ) 4.8YR4.1/3.4.
रक्तातल्या हेमोग्लोबिन व मेलॅनिन पिगमेंटमुळे हे वेगवेगळे रंग बनतात. ह्या आकड्यातले काळ्या रंगाचे फिकेपण मोजणारे आकडे होते : कॉकेशियन: 6.4; तर निग्रॉइडसाठी 4.1. हीच आहेत गोरेपणाची वैज्ञानिक मापं. केवळ दोनाच्या फरकाने एक गोरापान होतो तर दुसरा काळा. ह्यातले गोरेपण म्हणजे काळ्या रंगाचे फिकेपण, असे म्हणणे हे मोठे गंमतीदार आहे. आणि ह्याची उदाहरणे आपण हरघडी बघत असतो. वयात आलेल्या मुली व मुलेही त्या काळात काळी असली तरी जरा उजळ दिसू लागतात. कदाचित असेच फिकेपण म्हणजेच पर्यायाने गोरेपण, बाजारातल्या गोरेपणाच्या क्रीम्समुळे होत असावे. ( काळ्या रंगाच्या छटाही किती मजेदार असतात. ह्यात निग्रो लोकांचे ढिम्म काळेपण किंवा ठार-काळेपण आहे, तर भारतीयातले काळा-सावळा, उजळ, निमगोरे, गहू वर्णी, असे उतरत्या श्रेणीतले काळेपण आहे. ).
      सगळीच माणसे गोरी का नसतात ? काळसर माणसे मुळात काळी होतातच का ? जीवशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर माणसांचेसुद्धा अनेक वंश आहेत असे सांगतात व त्याप्रमाणे त्यांचे रंग होतात. अजूनही विज्ञान सांगते की भौगोलिक हवामानाप्रमाणे माणसे काळी-गोरी होतात. पण त्याच थंड हवेत काळी माणसेही असतात व त्यांचे वंशज हे काळेच होत राहतात. मी वेस्ट इंडीज मध्ये नोकरी निमित्त असताना तिथे मला ठार काळी असणारी निग्रो माणसे, व भारतीय वंशाची माणसे, समप्रमाणात राहताहेत असे पाहायला मिळाले. निग्रो लोकात असेही काही ( क्रिओल) लोक होते की जे रंगाने अगदी गोरे होते पण त्यांचे केस व शरीराचा इतर बांधा निग्रोंसारखाच होता. ही माणसे गोरी असली तरी ते स्वत:ला व इतर लोक त्यांना, काळेच समजत. जेव्हा केव्हा काळे-गोरे असे वाद होत तेव्हा हे गोरे-निग्रो, काळ्यांचीच बाजू घेत.
      १९५० च्या सुमारास जगातल्या लोकसंख्येत २६ टक्के माणसे गोरी होती व केवळ ८ टक्के माणसे काळी होती. आणि आता २०६० साली म्हणतात की जगातल्या लोकसंख्येत केवळ ९ टक्के माणसे गोरी असणार आहेत व काळी माणसे २६ टक्के होणार आहेत. म्हणजे काळ्यांचेच राज्य येणार आहे असे आपण म्हणू शकतो. तरी बरे ह्या २६ टक्क्यात भारतीय लोक धरलेले नाहीत. अमेरिकेतसुद्धा काळा अध्यक्ष व्हायला कैक शतकं त्यांना थांबाव लागलं.
      हे काळेपणाचे भूत आपल्या समाजात चांगलेच रुतलेले आहे. मुलींसाठी तर "गोरी गोरी पान" ही तर सर्वात महत्वाची प्रार्थना झाली आहे. कितीही चुकीचे मानले तरी गोरी मुलगी दिसायला चांगली दिसतेच. प्रत्येक आईला आपले मूल गोरे असावे असे वाटतेच, मग भले ती प्रत्यक्षात "कसेही असले तरी स्वस्थ असले म्हणजे झाले" असे म्हणत असो. माझ्या मुलासाठी मुलगी पाहताना एक मुलगी चांगली इंजिनिअर, हुशार होती. पण त्यामानाने दिसायला काळीच होती. बुद्धीने किती जरी सांगितले की दिसणे काही महत्वाचे नसते, तरी बरेच निर्णय आपण नेहमी दिसण्यावरूनच घेत असतो. आई जरी काळी असली तरी तिला आपला मुलगा गोरा असावा असेच वाटत असते. ह्या गोरेपणाच्या वैश्विक आकर्षणापायी अजूनही फॉरेनर माणसाच्या गोरेपणाने आपण दिपूनच जातो. एक गोरा माणूस वेस्ट इंडीजमध्ये मी नोकरीला असताना माझा चांगला मित्र झाला होता. एकदा मी धीर करून त्याला विचारले होते की तुम्हाला भारतीय माणसे ( ती परदेशी लोकांपेक्षा काळे असल्याने ) आवडतात का ? तर त्याने प्रांजळपणे सांगितले होते की आम्ही त्यांना सहन करतो जरूर, पण आम्हाला इतर गोरे लोक जसे आवडतात तसे ते आवडत नाहीत.
      कदाचित ह्याच गोरेपणामुळे आपल्याकडे ब्राह्मणांनी एकेकाळी पुढारलेपण मिळविले असेल. एक प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आहेत श्री.एस.एल.भैरप्पा नावाचे. त्यांची "दाटू" ही कादंबरी खूपच गाजली होती. त्याचे भाषांतर उमा कुलकर्णी ह्यांनी मराठीत "जा ओलांडुनी" ह्या नावाने केले आहे. ह्यात जाती जातीमधले तेढ कसे असतात ते रंगवलेले आहे. लिंगायत व तत्सम ब्राह्मणेतर लोक आपल्याला ब्राह्मणाइतकेच वा त्यांच्यापेक्षा ज्यास्त श्रेष्ठ समजतात असे दाखवले आहे. त्यात एक दलित पात्र आहे. ते म्हणते की तुम्हा ब्राह्मणांच्या बायका घरातच वावरल्याने उन्हाने रापल्या नाही व गोर्‍या राहिल्या तर आम्हा दलितांच्या बायका शेतात राबल्यामुळे रापल्या व काळवंडल्या. ह्यावरचे मतभेद कितीहि चर्चिले तरी रंगाच्या वैषम्याचे महत्व फारच उठून दिसते. हे रंगाचे दिसणे व त्याचे वैषम्य वाटणे, इतके सर्वव्यापी असते की त्याने कित्येक पिढ्या ह्या भावनेत पेटून निघतात. तरी बरे की कित्येक खालच्या म्हणवल्या जाणार्‍या जमातीतही गोर्‍या बायका आढळतात ( जसे: लमाणी, गवळी वगैरे ).
      माझ्या मेहुण्यांचा मुलगा काही काळा म्हणता येणार नाही पण गोर्‍यांतही मोडणार नाही असाच आहे. त्याला बायकोही तशीच मिळाली. यथावकाश तिला एक मुलगी झाली. ती मात्र अगदी पिट्ट गोरी म्हणता येईल इतकी गोरी झाली. आम्ही त्याला सहज चिडवत होतो की काही औषधे वगैरे घेतली होतीस की काय ? आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या गोरेपणाचे रहस्यच सांगितले. ते असे की मुलीच्या आईने गर्भारपणात बालाजी तांब्यांची काही औषधे घेतली होती. ती औषधे चांगलीच महागडी होती. त्यात सोन्याचे भस्मही असते म्हणतात. आणि औषधांचा गुण ह्या गोर्‍या पिटट मुलीमध्ये आमच्यासमोरच होता. असे अनेक मार्ग लोक काळेपणापासून सुटका व्हावी म्हणून आचरतात. त्यापैकी एक मार्ग परंपरेने चालत आला आहे तो असा की गर्व्हारशीने प्रसूत व्हायच्या आधी चांगले दूध प्यावे, नेमाने म्हणजे मूल गोरे होते. काळे-गोरे ह्या वादात आजकाल कसा बारीक फरक पडतो आहे ते आम्हाला आमच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस कळून आले. आमची मुलगी तशी काळी-सावळीच. तिची मोठी मुलगी सुद्धा झाली तेव्हा काळी सावळीच होती. मुलाच्यावेळेस तिला आम्ही सुचवले की दूध घेत जा किंवा काही औषधे घे. त्यावर ती जे म्हणाली त्यावरून काळे-गोरे वादाकडे नवी पिढी कशी पाहते ह्याचा आम्हाला अंदाज आला. ती म्हणाली होती, की औषधे वा दूध पिऊन होणारे दुसरे मूल होईलही गोरे, पण माझ्या मोठ्या मुलीला नाही का वाईट वाटणार ? मुलाचे गोरे असणे तिला आवडणारे होते, पण मुलीला आपण का नाही गोरे झालो, असे वैषम्य वाटणे तिला नको होते. आईने आदर्श असा विचार कसा करावा ह्याचेच हे उदाहरण झाले.
      गोरे व्हावे असे वाटणे ही केवळ मनाचे एक वाटणे आहे असे समजून सोडू देता येत नाही. कारण ह्या वाटण्यामागे जगातले मोठमोठे उद्योग कार्यरत आहेत. प्रचंड पैशांच्या उलाढाली होत आहेत. लॉरीयल, पॉंडस्‌, फेअर ऍंड लव्हली, अशा अनेक मातब्बर कंपनीच्या कोट्यावधी किंमतीची प्रसाधने ही काही केवळ मानण्याने आपण बाजूला सारू शकत नाहीत. ती दिवसेंदिवस अधिकच बाळसे धरत आहेत, त्यावरून गोरेपणाची क्रेझ कमी न होता वाढतेच आहे हे सहजी कोणाच्याही ध्यानात येईल.
      काळ्या माणसाला तो जेव्हा आपण काळे आहोत, असे समजणे सोडतो, तेव्हाच त्याचे काळे-पण सुटते. ह्याचे मी पाहिलेले साक्षात उदाहरण आहे, स्मिता पाटील ह्या नटीचे. ती जेव्हा दूरदर्शनवर वृत्त-निवेदिका होती तेव्हा हिला कसे काय घेतले असेल, असे वाटावे इतकी ती दिसायला साधारण होती. बर्‍याच नाटकांमध्येही जेव्हा तिला प्रत्यक्ष आजूबाजूला पाहिले तेव्हाही तिचे व्यक्तिमत्व काही खासे वा नजरेत भरण्यासारखे नव्हते. पण काय झाले कोण जाणे, ती सिनेमात आली आणि तिचे काळेपण व व्यक्तिमत्व एकदम उभारूनच आले. इतके की "भूमिका" ह्या सिनेमातल्या तिच्या भूमिका अगदी मातब्बर नटांनाही डोईजड व्हाव्यात. त्या काळातला जो सुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन त्याच्यासोबतही ती अनेक सिनेमात अगदी उठूनच दिसली. तिने प्रत्यक्षात लग्न केले तो नट राज बब्बरही त्याकाळचा एक देखणा नटच होता. ती स्वत: जेव्हा स्वत;चे दिसणे विसरली, तेव्हाच तिचे व्यक्तिमत्व निखरून आले व ती दिसायलाही चांगली दिसायला  लागली. गुण निखरले की रूपही निखरते असे म्हणतात ते तिच्याबाबतीत असे निदर्शनाला आले.
      काळा असूनही प्रचंड लोकप्रीय झालेला दुसरा एक नट म्हणजे रजनीकांत. अर्थात हा मराठी माणूस दक्षिणेत गेला व मग तिकडे लोकप्रिय झाला हे खरे असले तरी काळ्या रंगाला एक सार्थ अभिमान देवविणारे हे व्यक्तिमत्व आहे ह्यात शंका नाही.
            काळ्या रंगाचे न आवडणे किंवा त्यासंबंधीची भीती वाटणे ह्या भावनेवर इंग्रजीत सॅम्युअल जॉन्सन ह्यांचे एक प्रसिद्ध सुभाषित आहे व ते फार बोलके आहे. "भीतीची भावना ही आपल्यात ह्यासाठी रोवलेली असते की तिने वाईटापासून आपले रक्षण करावे. पण ह्या भावनेचे कर्तव्य हे आहे की तिने इतर भावनांबरोबर आपल्याला वाहून जाण्यासाठी मदत न करता आपल्या विवेकाला मदत करावी.". म्हणूनच काळ्या रंगाकडे मी भीतीने न पाहता चोखंदळपणे पाहण्याचे ठरवले व तशी मला बुद्धी वेळीच झाली हे अगदी दैवीच मानायला हवे.
      काळेपणाचे हे खूळ केवळ आपल्यालाच आहे, असे वाटले तर ते चुकीचे ठरावे इतके मुबलक आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानात काळेपणाची चर्चा झालेली आहे. जसे प्रसिद्ध तत्ववेत्ता सार्त्र ह्याने फ्रेंच नीग्रो चळवळीमागे असणार्‍या संकल्पनेला "नेग्रीट्यूड" असे नाव देऊन त्याची चर्चा केलेली आहे. तसेच फनां नावाच्या तत्ववेत्त्याने "ब्लॅक स्किन, व्हाइट मास्क" ह्या ग्रंथात काळेपणाची चर्चा "द फॅक्ट ऑफ ब्लॅकनेस" ह्या प्रकरणात केली आहे. अमेरिकेतल्या काळ्या निग्रोंचे लढे ज्या मार्टिन ल्यूथर किंगने लढवले त्याचे प्रसिद्ध गीत "हम होंगे कामयाब" तर आपण अजूनही गातोच की. ओबामांच्या निवडून येण्यात व आजही टिकण्यात त्यांच्या काळे असण्याचे भान जगाला ठेवावेच लागते, एवढा काळेपणाचा महिमा आहे.
      तमाम काळ्या लोकांचे दैवत शोभावे असे दैवत आहे पंढरपूरचे पांडुरंगाचे किंवा विठठलाचे. एकदम ठार काळ्या दगडात रेखलेली ही मूर्ती, त्याचे काळेपण सगळ्या दैवतात वेगळेपणाने मिरवीत असते. आपल्या देवादिकांमध्ये कृष्ण हा निळा आहे तर राम गोरा आहे. शंकर सुद्धा काळा निळाच आहे. ह्या सगळ्यात विठठलाचे काळेपण अगदी ठार काळे प्रकारातले आहे. कदाचित आपण सोयीसाठी विठठलाला साकार स्वरूपात पाहतो आहोत खरे, पण देवाला निर्गुण रूपातच पहावे ह्या विचारापोटीच विठठलाचा रंग काळा करण्यात आला असावा. आपल्या देहाला तुकाराम महाराज ह्याच विचाराने कलेवर म्हणतात, देहाची देहावर जी आवडी आहे ती अंतरंगात निर्गुण निराकाराचा अनुभव घेतल्यावर कमी होईल, तीही निर्गुणमय होईल असे ह्या अभंगात तुकाराम असे म्हणतात :
"आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥
आवडी आवडी कळिवरा कळिवरी । वरिली अंतरीं ताळा पडे ॥"
माझे काळ्या रंगाचे भय आता संपले, तसे ते तुम्हा आम्हा सर्वांचे संपो, हीच काळ्या विठठलचरणी विनंती !

----------------------------------------------------------------------------------------------

अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२

ई-मेल: arunbhalerao67@gmail.com



Saturday, May 10, 2014

“नीच” राजनीती !
एखाद्या शब्दाचा अर्थ काढताना त्यातल्या अक्षरांनाही काही अर्थ असतो का ? बघू या .
“न” हे अक्षर मराठीतले अनुनासिक आहे. मराठीत अ ते अ: हे बारा स्वर व क, ख ,...ते ज्ञ ही ३६ व्यंजने अशी एकूण ४८ अक्षरे आहेत. म्हणजे दर शंभर अक्षरात एखादेच अक्षर पुन्हा येण्याची शक्यता अवघी दोन टक्क्याची आहे. पण कोणतेही लिहिणे वा बोलणे तपासले तर त्यात सगळ्यात जास्त येणारी अक्षरे आहेत अनुनासिके. जसे आपण म्हटले की “संध्याकाळी येणारी डेक्कन क्वीन वेळेवर येणार आहे का ?” तर ह्या २२ अक्षरात अनुनासिके ( अनुस्वार, णा, न , न , णा ) येतात ५ , म्हणजे प्रमाण पडते २२%. असे अनेक उतारे तपासले तर १८ ते २०% टक्के हे अनुनासिकांचे वापरातील सातत्याचे प्रमाण दिसेल . ह्या शिवाय फोनोलॉजी ह्या विषयात सोनोरीटी स्केल मध्ये असे दाखवतात की सर्वात मोठ्याने ऐकू येतात ते स्वर व त्यानंतर य र ल हे द्रव व त्यानंतर अनुनासिके. म्हणजे श्रवणसुलभतेसाठी अनुनासिके फायद्याची ठरतात .
जेव्हा आपण कोणाला शिव्या घालण्याचे ठरवतो तेव्हा त्याचा भरपूर उपमर्द करण्याचा आपला मानस असतो . तेव्हा जास्त वापरातील व मोठ्याने ऐकू येणारी अनुनासिके वापरणे हे रास्त धोरण ठरते. शिवाय “न” ह्या अक्षरात नकारात्मकता ठासून भरलेली आहे हे कोणाच्याही लक्षात येतेच. त्यामुळे शिवी द्यायची तर ती  “नी” पासून असावी हे साहजिकच म्हणायला हवे.
आता राहता राहिले दुसरे अक्षर “च”. मराठीत ह्या अक्षराची एक वेगळीच खुमारी आहे. “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मागणीत “च” नसता तर आचार्य अत्रे म्हणायचे तसे चव्हाण मधले “च” काढले तर जे राहते ( “वहाण” ) तेच मारावे लागले असते. तंत्रशास्त्रात च ह्या अक्षराचे दैवत “इच्छाशक्ती” आहे व म्हणूनच “नीच” मध्ये प्रतवारी करणार्याची इच्छाशक्ती प्रकर्षाने दिसून येते.
त्यामुळेच “नीच” ही फार परिणामकारक शिवी होते व म्हणूनच ती फार झोंबते !

------------------------------------  

Friday, May 2, 2014

वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ( संकेत ) ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड ( संकेत ) असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.
हे झाले “वाट” ह्या शब्दाला आलेल्या नकारात्मक अर्थाचे अंदाज बांधणे. पण ह्याला  पुरावा शोधायचा तर लोकांचा ह्या शब्दाचा वापर कसा होतो ते पाहणे. आता वर्तमानपत्रातले हे शीर्षक पहा “खोदकामामुळे मुंबईकरांची “वाट” !” आता ह्यात वाट ही चक्क नकारात्मकच आहे .
एखाद्या शब्दाचे संचितच असे असते की ते नकारात्मक होतात. त्या शब्दाची ते वाटच लावतात !

-------------------------------------------------------

Thursday, March 7, 2013

कासवीची दृष्टी

-------------------------------
कासवीची दृष्टी
--------------------
मला वाटते आळंदीच्या देवळात प्रवेशद्वारावरच एक कासवीची प्रतिमा आहे. लोक त्या प्रतिमेलाच देव समजून हात लावत आत जातात. ह्या प्रतिमेचे गूढ व संदर्भ मला एकदा वेस्ट इंडीज मध्ये असताना आम्ही एका पिकनिकला गेलो होतो तेव्हा कळाला. ही पिकनिक होती कासवांची बीचवर जाऊन अंडी घालणे, त्यातून कासवांची पिले जन्मणे व त्यांनी समुद्राकडे झेपावणे हे बघण्यासाठी. हे सगळे बघायला अगदी भर रात्रीच जावे लागते म्हणे. पहाट फुटायच्या आधी कासविणी येतात, अंडी घातलेली होती त्या जागी उकरतात, व अंड्यातून पिले कशी बाहेर येतात, त्यातली काही उपडी होतात ( मग ही काही कोणी सुलटी करीत नाही, ती मरूनच जातात ) व बाकीचे कसे समुद्राकडे झेपावतात, हे सगळे दृश्य मोठे रोमांचकारी असते. त्यात सगळ्यात अगम्य असते ते कासवीचे नुसते डोळ्यांनी पाहणे. ती दुसरे काही करीत नाही. उपड्या पडलेल्या पिलांना सुपडे करीत नाही की समुद्राकडे जोशाने कूच करणार्‍यांना प्रोत्साहन देत नाही. परमेश्वराने खरे तर असे असावे, नुसते नजरेने माया करावी, असे वाटूनच कदाचित ह्या कासविणीची प्रतिमा देवळाच्या प्रवेशद्वाराशी लावलेली असावी !
कवि काय किंवा शास्त्रज्ञ काय किंवा साधे साधक काय हे एका अनाम इच्छेने काहीतरी मोलाचे शोधत असतात. काहींना गवसते किंवा काहींना गवसले असे वाटते. विज्ञानात परंपरेने एकमेकांच्या शोधावर पुढे काम करणे, पडताळा घेणे असे काम होते व कालांतराने काही निश्चित काही हाती तरी लागते. पण कवींचे काय ? कोणाला खरेच सत्य गवसले असेल व ते इतरांनी वाचलेच नसेल किंवा वाचूनही समजले नसेल तर काय करायचे ?
इथे कवीला भवभूतीसारखे, (कासविणीसारखे) समानधर्मा रसिकाची नुसते वाट पाहात बसणे नशीबी येते. भवभूती म्हणाला होता : उत्पत्स्यते, अस्ति, मम को पि समानधर्मा । कालो हि अयं निरवधि:; विपुला च पृथ्वी ॥ ( माझ्यासारखा समानधर्मा असणारा कोणी रसिक उप्तन्न होईल, किंवा अन्यत्र कोठे असेलही. कारण काल अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.)

Tuesday, February 19, 2013

भूमिका

------------
भूमिका
------------------
    भूमिका ह्या मराठी शब्दात हा पंजाबी गायक "मिका" का बरे घुसलाय ?
    संबंध दर्शवणारे, संबंधार्थक, संस्कृत प्रत्यय लागून मराठीत काही शब्द होतात. जसे : कायिक ( काये संबंधी); वाचिक ( वाचेसंबंधी ) ; मानसिक ( मानसासंबंधी ) ; मासिक ( मास-संबंधी) ; लौकिक ( लोकांसंबंधी ) ; धार्मिक ( धर्मासंबंधी ) ; वगैरे. आता असे भूमि संबंधी शब्द करायचा असेल तर तो होईल भूमिक . पण इथे वापरात आहे : भूमिका. असे का ने शेवट होणारे अक प्रत्यय लागलेले शब्द मराठीत आहेत . जसे: लेखक, वाचक , रक्षक, पाचक, मारक, गायक वगैरे. ह्या शब्दांत जी क्रिया आहे तो करणारा किंवा कर्तृवाचक हे शब्द होतात. ह्यांच्यातल्या काहींची स्त्रीलिंगी रूपे करताना जरूर त्यांचे लेखिका, रक्षिका, गायिका अशी रूपे होतात पण भूमिका हे केवळ स्त्री-पात्रांसाठी वापरलेले नसून ते दोन्ही प्रकारच्या नटांच्या करण्यासाठी वापरतात. त्यामुळे भूमिका हा शब्द स्त्रीलिंगी असला तरी तो स्त्रीवाचक नसावा. शिवाय लेखक, वाचक ...मध्ये जे कर्तृवाचकपणा आहे तो भूमि करणारा असे ठरवले तर नट वा कलाकार ऐवजी भूमि कसणारा असा वेगळाच अर्थ होईल. त्यामुळे भूमिका मधला "अका" हा प्रत्यय संबंध दर्शवणाराच असावा ( कर्तृवाचक नसावा ).
    कलाकार जे सोंग वठवतात त्यात "भूमि"चा काय बरे संबंध ? तर मोल्सवर्थच्या अर्थाप्रमाणे, भूमिका म्हणजे : The earth; Theatrical dress; the costume of a character represented on stage; Place of action; stage; theatre, arena; ground; footing; place of standing. आणि वाक्यात उपयोग असा : "आपण ह्या कर्मभूमिकेत आहों तोंपर्यंत सर्व कर्म केले पाहिजे."
    ह्या अर्थाप्रमाणे Place of action ह्या अर्थाने भूमि हे यथार्थ ठरते. नाहीतरी इंग्रजीत कलाकारांच्या भूमिकेला Cast म्हणतातच व त्यात "भूमि" असाच संदर्भ मिळतो. भूमिका ही नाट्यशास्त्रात खरेच नाट्याची जागा अथवा भूमि च आहे ! त्यावरच तर हा डोलारा उभा असतो ! तर अशी ही भूमिका !
-----------------------------------------

Sunday, February 17, 2013

वाचकांचा धाक !

----------------------------------------------------
अरुणोदय झाला---२९
-------------------
वाचकांचा धाक !
----------------------------
    तुम्ही जेव्हा एखादे नवे मासिक सुरू करता तेव्हा अगदी व्यवस्थापन-शास्त्राप्रमाणे मार्केट-सर्वे करता . वाचकांना काय हवे ते विचारता व त्याप्रमाणे त्या मासिकाला बेतता. आता वाचकांची आवड जर नवीन मासिक सुरू करण्यात एवढी महत्वाची असेल तर चालत्या मासिकातही वाचकांची बदलती अभिरुची तेव्हढीच महत्वाची मानली पाहिजे.
    कवितारती मासिक ( खरे तर अनियतकालिक ) पाहिले तर ते बा.भ.बोरकरांच्या स्मृतीत सुरू झाले होते अशी ठळक नोंद अजूनही त्या मासिकावर आढळेल. त्या मासिकात कविता आठ दहा पाने व तीस-चाळीस पाने समीक्षा असे रूप सुद्धा वाचकांच्या प्रतिसादावरूनच झाले असावे.
    चित्रकार दलाल ( व मुळगावकर)  हे एकेकाळी तमाम महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर असत. कारण त्यांची चित्रे लोकांना भावत. मग ती वाचकांची अभिरुची म्हणून समजा तशी संपादकांनी आपापल्या मासिकांवर छापली तर तो वाचकांच्या अभिरुचीचा मरातबच मानला पाहिजे. एका चित्राने नवभारत किंवा भाषा आणि जीवन ह्यांचा खप वाढणार असेल तर काय हरकत आहे ? वैशालीतही आज जे पदार्थ आहेत तेही गिर्‍याइकांच्या पसंदीनेच केव्हातरी रुजवलेले होते ना ?
    एकेकाळी लघुकथा प्रचंड लोकप्रिय होत्या. त्याप्रमाणे कित्येक मासिके त्या छापीत. आज बदलत्या अभिरुचीमुळे बरीच मासिके लघुकथा छापत नाहीत. तसेच राशी-भविष्यांचे दाखवता येईल. गिरीश कुबेर एरव्ही वैज्ञानिक आविर्भाव आणतात पण लोकसत्तेत अजून राशी-भविष्य येतेच ना ?
    माझी आजी, आई ह्या नऊवारी साड्या नेसत असत. त्यांच्या डोळ्यादेखत पाचवारी आल्या, गेल्या, पंजाबी ड्रेस आले, जीन्स आल्या. समाज अभिरुचीचा एवढा मान ठेवतो तर एका मासिकाने एवढे टोकाच्या भूमीकेचे का असावे ?
---------------------------------------

Sunday, March 18, 2012



अरुणोदय झाला--२८

पानसिंग तोमार,
बोलीचा खुमार !

    हिंदी सिनेमाचे एक चांगले असते की तो कोणाला कशासाठी आवडतो तर कोणाला कशासाठी !
    मला हा सिनेमा बोली भाषेच्या खुमारी साठी आवडला.
    पानसिंग तोमार हा सैन्यात जातो. खायला मुबलक मिळते म्हणून सैन्यातल्या स्पोर्टस्‌ मध्ये रनिंग मध्ये प्राविण्य मिळवतो. इकडे त्याची शेती बळकावल्या जाते म्हणून तो बागी बनतो. चंबळचा डाकू बनतो. सिनेमाची गोष्ट एका पत्रकाराच्या मुलाखतीने उलगडत जाते. हाडाचा स्पोर्टमन जसा शर्यत पूर्ण केल्याविना रहात नाही त्या प्रमाणे हा शेवटी शरण न येता पोलिसांशी लढताना प्राण ठेवतो. सिनेमा जे खेळाडू हलाखीने मेले त्यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.
    आता बोली भाषेच्या खुमारी बद्दल. संवाद लेखकाने कमालीच्या प्रांजळपणाने संवाद थेट चंबळच्या बोलीतच ठेवले आहेत व इरफान ह्या नटाने त्याला त्याच्या नेहमीच्या तुसड्या फेकीने चांगलाच न्याय दिला आहे. एक साधे उदाहरण: मुलाखत घेणार्‍या पत्रकाराला तो मटण खाऊ देत नाही ( कारण पत्रकार मोटा असतो ) पण त्याला आइस-क्रीम विथ गुलाबजाम देतो. गरम गुलाबजाम आईसक्रीम बरोबर खाण्याच्या विदेशी लज्जतीचे बहारदार वर्णन करताना तोमार म्हणतो : एकै स्वाद है, लेकिन डबल मिजाज है !
    साध्या साध्या माणसांनाही विचारांचे गारूड कसे मोहवून अचाट कामे करून घेते तेही ह्या सिनेमात फार नजाकतीने दाखविले आहे. जसे सगळे जण पानसिंग तोमार ह्याला शेवटी शरणागती पत्कर असे सांगत असतात. पोलिटिकल करेक्टनेस प्रमाणे ते रास्तही ठरते. पण पानसिंग म्हणतो हम ठहरे पगबाधा रनर ( स्टीपल-चेस रेसचा रनर), हमार लक्ष्य फिनिश लाइन. भले जिते या हरे, रेस तो पूरी करनीही है ! एक साधे तत्व, पराकोटीच्या वेडेपणाला भाग पाडते !
    असेच सैन्याधिकारी त्याची चौकशी करीत असताना त्याला विचारतात की त्याच्यापैकी कोणाला पोलिसांनी कधी पकडलेले होते काय ? म्हणजे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? तर पानसिंग कौतुकाने म्हणतो, पोलिस पकडही नही पाये ! म्हणजे पकडल्या जातो तो चोर व पकडल्या जात नाही तो नेता असाच जनमानसाचा कौल दिसतो !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
----------------------------------------------------