Monday, October 3, 2016

जिम

जिम !

--------------  

पुन्या ममईच्या लोकाईला बोली बोलाईची म्हणटल तर जीमवानी वाटतय तर बोली बोलणाऱ्याहिंना परमान भाषा जीमवानी वाटतीया.

आमच्या वखताला जिमला हेल्थ क्लब म्हणून राहेयले व्हते लोग. तिठ हेल्थ कमी अन क्लब झाला की काय तेला आखाडा भी म्हणना . मंग म्हणून राहेय्ले जिमखाना. आता डेक्कन जिमखाना ह्यो कंच्या दक्षिणेला ते कळना झालं. अन तेनला तिठ काही खायाच काम दिसना तव्हा निस्त जिम म्ह्नाय्लेत. म्हण्त्येत की खण म्हणायचे त्याचच मंग खाना झालं म्हन. जस दिवाणखाना म्हणटल तर दिवाणजींचा खण.

पन सालं काय असल जिम म्हंजी अगुदार्च्याला. इंग्रजी शबुद तर हायच पन त्यांचंबि आपल्यावानी संस्कृतात समद असतंय तस कशात असल ? तर म्हणत्यात की हा शबुद ग्रीक भाषेतून आलाय म्हण. अन ग्रीक मध तरी जिम का म्हणत असतील तर म्हणत्यात की पहिले तिठ नागड्यान अभ्यास अन आन्घुळी अन व्यायाम करायचे म्हन. अहो म्हंजी कापडं काढुनशान !

आता तुमी जिम लावली अन कापड नाही कहाल्डी तर काय काय दुखणारच किवो !

-------------------------   
-------------------------

जिम / व्यायामशाळा

---------------------- 

जगात आजकाल जी नवी साधने येत आहेत, ( जसे समजा मोबाईल फोन ) ती अशी असतात की साधारण माणसाला सहजी, आपसूक समजावीत. म्हणूनच तर त्याबरोबर काही पुस्तक वगैरे आजकाल देत नाहीत. तुम्ही स्वतः शोधा, शिका आणि वापरा. माणसांचे सगळे व्यवहार असे सहजी समजण्यासारखे झाले की किती सुखकर ना ?

भाषेचे सुद्धा असेच होते. आपण लहानपणी मराठी बोलायचे शिकलो तेव्हा कोणता शब्दकोश आपल्याला माहीत होता ? लहान मुलांना तेव्हा तर लिहायला वाचायला सुद्धा येत नसते पण ते बिनधास्त बोलतात. शब्दांचे सुद्धा असेच नको का ? मग जिम म्हणजे काय ते आपल्याला आपसूक का कळू नये ? तर तो इंग्रजी म्हणून ! मग मराठीत आपल्या आधीचे लोक काय म्हणत ? कदाचित व्यायाम शाळा ?

व्यायाम हा संस्कृत मधून आलेला शब्द. व्य म्हणजे अवयव. व्यायम म्हणजे अवयवांची हालचाल, कसरत. व्यायाम म्हणजे अवयवांचा हालचालीचा सराव.

हे झाले थोडेफार संस्कृत मराठी येणाऱ्यांचे कळणे. पण आजकालची जी एबीसीडी ( अमेरिकन बॉर्न कन्फुज्ड देशी ) मुले आहेत त्यांना कसे कळते जिम म्हणजे ? तर कदाचित : जीव, जिवंत वगैरे मध्ये जी असते म्हणजे काही तरी जगण्याशी जन्मण्याशी संबंध असावा असे ते समजू शकतात. जे फार चूक नाही कारण ज म्हणजे जन्मणे ( जसे कुसुमाग्रज मध्ये कुसुमच्या अगोदर जन्मलेला हा अर्थ होतो तसा ).

तर आजकाल जिवंत राहायचे तर आवश्यक जिमच ना ! झाले ना कळणे आपसूक ?

--------------------      

Sunday, October 2, 2016

रानटी मन व झाडी

रानटी मन व झाडी
--------------------------
लेव्ही स्ट्राउस नावाचा एक प्रसिद्ध मानववंश-शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. त्याचा एक लेख ( Savage Mind ) "रानटी मन" सोबत टाचला आहे.
ह्यात त्याने अमेरिकेतल्या चिनुक भाषेचा ( जे तिथले रानटी लोक बोलत होते ) अभ्यास केलेला आहे. भाषाशास्त्रात असे म्हणतात की एखाद्या भाषेत जितके धूसर ( Abstract ) शब्द असतील तितकी ती भाषा समृद्ध . ह्या चिनुक भाषेत "झाड"  हा धूसर शब्द नसला तरी त्यांना जवळ जवळ ४५० झाडांची नावे माहीत होती, त्या झाडांचे उपयोग माहीत होते वगैरे.
धूसर शब्दांबाबत बोलताना त्याने एक गंमत ह्या चिनुक भाषेची अशी नोंदवली आहे : समजा ह्या चिनुक भाषेत असे म्हणायचेय की "एका गरीब मुलाला एका वाईट माणसाने ठार केले", तर चिनुक भाषेत ते म्हणतील, "एका मुलाच्या गरीबीला एका माणसाच्या वाईटपणाने ठार केले". धूसरता अजून काय रम्य असू शकेल ?
आपले मित्र संकेत मालती भारत हे कधी कधी "झाडी" बोलीबाबत सांगत असतात. तर ह्या झाडी बोलीत अशा किती झाडांची नावे असतील ? एकदा प्रयत्न करून बघायला हवे. झाडीत झाडे किती ?
-------------------------------

परत आकारात

-------------------------------------------------------
नेटके मराठी मथळे
------------------------------
"परत आकारात"     ( मटा दि.३ आक्टोबर २०१३ मधून )
-------------------------------------------
ही बातमी आहे ऐश्वर्या राय ही बाळंतपणात जो लठ्ठपणा येतो त्यातून व्यायाम करून परत आपल्या मूळ सौष्ठवाकडे येते त्यासंबंधी. पण शीर्षक आहे "परत आकारात". आकार लहान किंवा मोठा असतो. म्हणजे रोड किंवा लठ्ठ हे आकारच असतात. त्यामुळे नुसते "परत आकारात" म्हटल्याने ती रोड झालीय ही बातमी पोचत नाही. इंग्रजीत जसे "परत शेप-मध्ये" म्हटले की जो शेपचा सौष्ठव हा अर्थ येतो तो "परत आकारात"ने येत नाही. त्यामुळे शीर्षक हवे होते, "परत सौष्ठवात" किंवा "परत सौष्ठवाकडे". कित्येक वेळा नुसते रोड असणारी व्यक्ती सुंदर, सुडोल दिसेल असे नाही. त्यामुळे सौष्ठवात जसा योग्य ठिकाणी भरदार व योग्य ठिकाणी रोड असा अर्थ येतो तो "आकारात"ने येत नाही.
---------------------------------------------  

Thursday, September 29, 2016

षटशब्दी , षटकर्णी : ११

षटशब्दी, षटकर्णी : ११

अगदी मोजक्या शब्दात सांगता येणे हे मोठे कसब आहे. एकदा दारू-बैठकीत हेमिन्गवे ह्या लेखकाला आव्हान देण्यात आले की कमीत कमी शब्दात गोष्ट सांगायची. आजतागायत त्याने सहा शब्दात लिहिलेली ही गोष्ट सर्वोत्कृष्ट मानल्या जाते : “For sale: baby shoes, never worn.”

“विकणे आहे : बाळाचे बूट, न घातलेले”
----------------------------------------------------

षटशब्दी, षटकर्णी : ११

मराठा तितुका मेळवावा ; नाना मोर्च्यांत खेळवावा !

-------------------

Wednesday, September 28, 2016

षटशब्दी,षटकर्णी ! : ८

षटशब्दी, षटकर्णी ! : 8
------------------------------
भूक मिटली, तहान मिटली, पुढे काय ?

--------------

षटशब्दी,षटकर्णी

षटशब्दी, षटकर्णी

अगदी मोजक्या शब्दात सांगता येणे हे मोठे कसब आहे. एकदा दारू-बैठकीत हेमिन्गवे ह्या लेखकाला आव्हान देण्यात आले की कमीत कमी शब्दात गोष्ट सांगायची. आजतागायत त्याने सहा शब्दात लिहिलेली ही गोष्ट सर्वोत्कृष्ट मानल्या जाते : “For sale: baby shoes, never worn.”

“विकणे आहे : बाळाचे बूट, न घातलेले”
----------------------------------------------------

षटशब्दी, षटकर्णी : १

वारीत सापडलेल्या विजोड चपलांवर पांडुरंग उभा !

-------------------

Sunday, September 18, 2016

नो म्हणजे नो !

"नो म्हणजे नो !”

पिंक सिनेमा पाहिला आणि महत्व ठसले ते “नो म्हणजे नो” ह्या तत्वाचे. स्त्रियांना “नो”ची ताकद जाणवून देणारा हा सिनेमा अवश्य पाहण्यासारखा आहे.

तसेच ह्यावरून “नो” ह्या शब्दाविषयी भाषाशास्त्रीय कुतूहल जागे व्हायला हवे. शब्दांना अर्थाच्या अनेक छटा असतात. “हो” म्हणजे सकारात्मक अर्थ असला तरी तो जरा मोघमच असतो. हो म्हणजे किती प्रमाणात सहमत हे नक्की नसते. पण नाही/नको चे तसे नाही. त्याची नकारात्मक छटा नेहमीसाठीच नाही अशी परिपूर्ण असते.
    आजकाल सकारात्मक विचार करण्याचे खूपच प्रस्थ आहे. तशात कोणी "नाही", "नको", अशी नकार-घंटा लावली की आपल्याला वाटते की हे सगळे नकारार्थी आहे. हा नकारार्थ मराठीत "न" ह्या वर्णाने येतो. शब्दकोशात न-पासून सुरू होणारे शब्द पाहिले तर मोजून खात्री करून घ्यायची सुद्धा गरज भासत नाही इतके ह्या वर्णाचे नकार देणे डोळ्यात भरते. "न" पासून सुरू होणारे शब्द , शब्दकोशात आहेत एकूण:२६०३. पैकी नकारात्मक भाव दाखवणारे शब्द भरतात: ३९०. म्हणजे हे प्रमाण: १५ टक्के इतके प्रभावी आहे. त्यामुळे शब्दात न आला की तो त्याचा अर्थ नकारात्मक करतो, हे ज्यास्त संभवनीय होते. गंमत म्हणजे हे इतर भाषातही लागू पडते. जसे इंग्रजीत नो, नॉट, नेव्हर वगैरे किंवा हिंदीत नही, ना, वगैरे. आजकाल चांगल्या पालकत्वासाठी "हे करू नको, ते करू नको", असे नकारात्मक बोलू नये, असे म्हणतात. पण कोणाला रस्ता दाखवताना कसे जावे हे जसे महत्वाचे असते तसेच कुठे जाऊ नये हेही सांगणे महत्वाचे असते. म्हणूनच जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेत "न" असलेले शब्द ८० टक्के अभंगात दिसतात. कित्येक सकारात्मक अर्थ असणारे शब्दही नकार वापरूनच केलेले आढळतात ( जसे: नि:शेष, निष्कलंक, निर्द्वंद्व, निरभ्र, निर्दोषी, वगैरे.).
    "हे माझे एवढे वाचाना. तुम्हाला आवडले नाही तर मी परत लिहितोना". "बघाना"; असे आजकाल एक आर्जवासारखे आपण म्हणत असतो. हे इतके रूढ होते आहे की आपण इंग्रजीलाही असे प्रत्यय लावून आजकाल बोलायला लागलो आहोत. जसे: स्पीकना, सी टु इट ना, गो ना वगैरे.
    हे क्रियापदाला असे शेवटी ना लावणे ही आपल्या मराठीची सध्याची ढब आहे. क्रियापदावरून जर आज्ञा, हेतू, उद्देश, उपदेश वगैरे कळाले तर त्याला व्याकरणात क्रियापदाचे "अर्थ" म्हणतात. जसे: १)स्वार्थ ( उदा: तो घरी गेला ) २) आज्ञार्थ : ( उदा: रांगेत उभे राहा ) ३) विध्यर्थ : ( उदा: मुलांनी आईवडिलांचे ऐकावे ) ४) संकेतार्थ : ( उदा: पाऊस आला तरी सहल जाईलच. ). आता विचाराना, बोलाना, कराना, गा ना , या ना, खा ना, जा ना, खेळाना, उघडाना, ह्या सगळ्या शब्दात आपण जो "ना" लावतो तो प्रथमदर्शनी नकारात्मक दिसतो खरा पण ते एक प्रकारचे आर्जव, विनंती असून त्यात नकारात्मकता नसते. शिवाय आपण तो लावून एकप्रकारे आदरच दाखवतो. त्यामुळे केवळ विनंतीच नाही तर आदरार्थी "अर्थ" करणारा हा प्रत्यय आहे. हाच ना आपण जर शब्दाच्या सुरुवातीला लावला तर मात्र नकारी शब्द तयार होतात. जसे: नालायक, नामंजूर, नाराज, नाउमेद, वगैरे. असेच नि हा नकारी प्रत्यय सुरुवातीला लावून सकारात्मक शब्दही आपण बनवत असतो. जसे: निरोगी, निनावी, निकोप, निर्जंतुक वगैरे.
    वेदकालापासून आपण देवाचे वर्णन जिथे नेति नेति ( न इति, असा नाही, असा नाही ) अशा नकारी शब्दांनी करतो तिथे आता क्रियापदाला शेवटी ना लावून आपण आदर, विनंती करायला लागलो हे चांगल्याच अर्थाचे आहे !

नो म्हणजे नो हा अर्थ मात्र हा शब्द इमाने इतबारे पोचवतो !

---------------------------------------