Saturday, November 14, 2015











निरागसाला बारा खून माफ ! अर्थात कट्यार काळजात घुसली !
गाण्याच्या स्पर्धेत जिंकणाऱ्याला “कट्यार” द्यावी हे मोठे काव्यमय आहे व तिने जिंकणाऱ्याने आपला गर्व भोसकावा ही अपेक्षा त्याहूनही काव्यमय. हे कागदावर जरा आदर्शवत वाटते खरे पण गाण्याचे क्षेत्र खरेच अति-स्पर्धेचे आहे. आमच्या हैद्राबादला माझ्या वर्गात एक आशालता म्हणून मुलगी होती. ती अप्रतीम गायची. तिकडे तिचे चाहते तिला आन्ध्र-लता म्हणत इतकी तिची तिकडे ख्याती होती. त्याचवेळेस कित्येक गुणी गायिका इतरत्र होत्या, पण अफवा अशी पसरलेली आपण ऐकलेली आहे की लता मंगेशकर इतक्या प्रभावशाली होत्या की त्या कोणा नव्या गायिकेला वर येउच द्यायच्या नाहीत. अनभिषिक्त सम्राज्ञीपद भोगताना त्यांना हे सर्व हातखंडे वापरावेच लागले असे काही म्हणतात. खरे नसेलही हे, पण अशी अफवा असणे हे गाण्याच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा होती हे निर्विवाद दाखवते. प्रत्यक्षात असे अनुभव असताना त्यावर नाटक व त्याचा सिनेमा करताना सुबोध भावे ह्यांनी मराठी सिनेमाला स्पर्धा नसताना एका प्रचंड उंचीवर नेउन बसविले आहे.
शंकर महादेवन व इतरांची गाणी तर अप्रतीम व अभिरुची-संपन्न आहेतच पण सचिन पिळगावकर ह्यांनी उच्च दर्जाचा अभिनय साकार केलेला आहे. जिंकणाऱ्याला स्पर्धा सोपी करणारा एक खून माफी देणारा वर व तो वापरताना खान-साहेबांची होणारी द्विधा अवस्था त्यांनी बहारदारपणे साकारली आहे. ह्या सिनेमात गाण्याच्या क्षेत्रात निरागसतेचे महत्व कसे अहम् आहे हे जसे कथेतून दाखविले आहे तसेच सुबोध भावे ह्यांनी आवर्जून राखले आहे. जिंकणाऱ्याला जसा कथेत एक खून माफ होता तसे ह्या निरागसतेचे महत्व पूर्ण सिनेभाभर मिरवणाऱ्या सुबोध भावे ह्यांना एकच काय बारा खून माफ व्हावेत इतक्या गुणाचा त्यांचा हा सिनेमा आहे.
खून नंतर माफ करूत, पण आधी हा सिनेमा लवकर पहा बर !

---------------------------------------------- 

Sunday, November 8, 2015

मराठीचे “खोटे मित्र ” !
-------------------------------------
आजकाल ज्याच्या त्याच्या फेसबुकाने छळ मांडलेला असून त्याच्या अति वापराने “तोंडी” “फेस” येत आहे. पण तेव्हा मी फेसबुक नुकतेच सुरू केलेले होते. ही तशी आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट. मी एक पोस्ट लिहिली होती, माझ्या वडिलांवर. “मराठवाडा”चे संपादक अनंत भालेराव ह्यांच्यावर. त्यात मी कुठे तरी भावूक होत, “अण्णा तुमची खूप सय येते”, अशा अर्थाचे काही तरी लिहिलेले होते. माझ्या अमेरिकन नातवंडांना कळावे म्हणून पोस्ट मी इंग्रजीतही भाषांतरीत केली होती. कदाचित की-वर्ड “अण्णा” ठेवला असावा. त्यांना घरी अण्णा म्हणत. तसेच त्यांचे अनेक अनुयायीही त्यांना अण्णा ह्या नावानेच संबोधत. मराठीत अण्णा म्हणजे मोठा भाऊ, असे सगळ्यांनाच माहीत आहे. ( अक्का आणि अण्णा हे नाते-संबंध-दर्शक शब्द कानडीतून आले आहेत असे समजतात. तर ते असो !).  पोस्ट लिहिली त्यावेळी त्यांची पुण्यतिथी जवळ आलेली होती. तसे ते सुधारक असल्याने आम्ही त्यांचे असे काही प्रसंग साजरे करीत नसूत. तर पोस्ट डकवून काही तास होतात न होतात, तोच मला मेल मध्ये निरोप आला : Anna wants to talk to you ! माझ्या अंगावर शहारेच आले. आता काय बोलतात काय जाणे ? दाभोलकरांची माफी मागत, ह्या निरोपावर विस्तृत काय लिहिले आहे ते बघण्यासाठी क्लिक केले आणि काय गंमत ! एक खालील फोटो आला व लिहिलेले होते : Hi dear !



  Anna : Hi dear !
------------------------------------------
    इंटरनेटवर Anna हे मुलींचे नाव आहे हे मग गुगल सर्चने मला दाखविले. त्याच बरोबर मराठीतला कर्ता पुरुष “अण्णा” हा, मराठी सोडले की कसा Anna नावाची मुलगी होतो ह्याचे मला नवलच वाटले . ( खरे तर गुगल सर्च वर अनेक गोऱ्या “अण्णा” होत्या पण ह्याच सावळीला माझ्याशी बोलावे वाटावे ?). खैर, ह्या “अण्णा”चे जाऊ द्या, पण मराठीत असे काही शब्द आहेत का की जे मराठी संदर्भ सोडले की मराठीला अडचणीतच नव्हे तर मराठीची अगदी वाट लावतात, असा विचार माझ्या मनात आला. आणि  हो, असे अनेक शब्द आहेत जे प्रत्यही मराठीला अनेक ठिकाणी अडचणीत आणतात असे लक्षात आले !
    माझी अमेरिकन नात आता युनिव्हर्सीटीत जाण्याची तयारी करीत आहे. त्या अगोदर सुट्टीवर जाण्याअगोदर काही दिवसासाठी ती मुंबईत आली होती. आता होस्टेलवर निदान भात तरी लावता आला पाहिजे ह्या पालकीय काव्याने/व्यूहाने , आम्ही तिला कुकर कसा लावायचा ते शिकवत होतो. मुख्य आदेश होता की तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर. तिला भातबीत आवडत नसे. पिझ्झा-बर्गर वाली पोरं ही ! तर ती बंडखोरी करीत विचारीत होती, “व्हाय तीन शिट्ट्या ?” त्यावरचे आमचे शास्त्रीय प्रवचन तिच्या काही पचनी पडले नाही. आम्ही असे का ? असे विचारल्यावर ती म्हणाली, Anyway your Bhaat is already Shitty !  शिट व शिट्टी हे इतके जवळ जवळचे शब्द आहेत हे आपल्या ध्यानातही येत नाही. मुळात बऱ्याच जणांना शिट हा इंग्रजी शब्द आहे असेच वाटत असते. पण “शिटणे” शब्दकोशात पाहिल्यावर आपला शब्दकोशच शिट्टी होऊन जातो ना !
    आम्ही असेच एकदा अमेरिकेहून आलेल्या आमच्या मुलीशी गप्पा मारीत होतो. गप्पांच्या ओघात तिने एक तरी मराठी नाटक पाहून जावे असा आग्रह आम्ही तिला करीत होतो. आग्रहाचे शेवटचे वाक्य होते, “अग, फक्त एक नाटक पहा !”. त्यावर आमची नातवंडं फिदी फिदी हसत मला म्हणाली, काय आजोबा हाउ कॅन यू टॉक सो ऑबसीन ? आम्हाला काही कळेना की, ह्यात अश्लील काय ? ते मग इंग्रजीतला प्रसिद्ध चार अक्षरी शब्द म्हणत म्हणू लागले How can you see Natak and _uck ? फक्त, हे सेन्सॉरवाल्यांना कळू नये म्हणजे झाले !
          आम्हाला सुट्टीत जयपूर उदेपूर अशा ठिकाणी जायचे होते. रीतीप्रमाणे आम्ही म्हटले की चला xxx कडे जाऊन बुक करू यात ही सफर ! त्यावर मुले म्हणू लागली की एजंट नको, आपण खाजगी प्रवास करू यात. आमचा अनुभव तर चांगला होता, मग का नको एजंट ? तर, म्हणे की मागच्या सफर मध्ये they suffered ! ही सफर कुठे व कुठे ते सफर होणे ? शब्दाने मराठी संदर्भ सोडला की सफर व्हावेच लागते !
आपल्याकडे रस्तोरस्ती गाई मध्येच बसलेल्या असतात हे पाहून अमेरिकन पोरांना मोठी गंमत वाटते. तर गेल्या खेपेस माझ्या नातवाला त्याच्या चायनीज मित्राने गाईबरोबर त्याचा एक सेल्फी काढून पाठवायला सांगितला होता. सकाळ पासूनच तो माझ्या मागे लागला होता, आजोबा आय वान्ट सेल्फी विथ अ गाय ! त्यावर त्याची आजी म्हणू लागली, बाहेर कशाला ? आजोबांबरोबरच काढ की. तेही गायच आहेत. त्यावर आमचा नातू समजवू लागला, आजी नॉट दॅट गाय, द गाय दॅट गीव्स मिल्क ! धडधाकट मराठी Guy वर दूध देण्याची नामुष्की ओढवली नाही हे नशीब !
    खूप वर्षापूर्वी मराठवाड्यातल्या एक आजी कॅनडाला गेल्या होत्या. त्यांना अजिबात इंग्रजी येत नव्हते. त्या परत आल्या तेव्हा तिकडच्या नवलाईच्या गोष्टी त्या आम्हाला सांगत. त्या एकदा सांगत होत्या की ते लोक काही तरी घाणेरडे “हाडूक” नावाचा पदार्थ खातात. आम्हाला बराच वेळ ह्या “हाडूक”चा छडा लागला नाही. मग कळले की “हॉटडॉग” चे हे रूप असून ते हाडका सारखेच दिसते म्हणून त्या हॉटडॉगला हाडूक म्हणत होत्या ! फ्रेंच भाषेत शेळीला चक्क “मटण” म्हणतात, तर ब्रेडला ब्रेडविनरला जे कष्ट पडतात ते लक्षात घेऊन, “पेन” म्हणतात. एकाच शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ करण्यात इंग्रजी खूप वाकबगार आहे. बिल हे कोणाचे नाव असू शकते ( जसे बिल क्लिंटन ), तर वस्तू बरोबर त्याच्या किमतीचे मिळते तेही बिलच असते तर अमेरिकेत डॉलरच्या नोटेला बिल म्हणतात. आपल्याकडे आपण शहरात राहतो त्या घराला ब्लॉक म्हणायचे तर अमेरिकेत रस्त्यालगत संपूर्ण इमारतीच्या लांबीला ब्लॉक म्हणतात. अमेरिकेत घरासमोर जिथे गाडी उभी करतात त्याला ड्राईव्ह-वे म्हणतात तर रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेला पार्क-वे म्हणतात . युरोपात लिहिण्याच्या टेबलाला ब्युरो म्हणावे तर अमेरिकेत ड्रॉवर्स असलेल्या टेबलाला ब्युरो म्हणतात .  काय एकेकाचे आडाखे असतात पहा !
    कानडी नवरीने मराठा भ्रतार केला तर काही काही कानडी शब्दांचा मराठीत भलताच अर्थ कसा निघतो हे अनेक वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात लिहून ठेवलेले आहे:
कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
 ( एका कानड्या देशातील स्त्रीने मराठा नवरा केला पण तिने कानडीत बोलले असता त्याने भलतेच समजावे व हा काही मराठीत बोलला असता तिने भलतेच समजावे. ( अहो देवा ) त्याप्रमाणे तुम्ही मला करू नका. या संतांची संगती द्या. एक वेळेला त्या कानडी बायकोने कानडी भाषेत “इल बा” म्हणजे इकडे या असे म्हटले आणि तिचा तो मराठी नवरा त्याचा अर्थ भलताच समजला. म्हणजे हिने आपणास बाबा असे म्हटले, ही तिने शपथच घेतली असे जाणून तो तिजपासून दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा विसंगत नवरा-बायकोच्या जोडप्यात सुखाऐवजी शीणच वाढेल.). असेच आजकालच्या कानडी भाषेत काही काही शब्दांचा भलताच अर्थ निघाल्याने आफत येते. उदाहरणार्थ : कुंडा/ कुंडी ह्या रोप लावण्याच्या पात्राला आजकालच्या कानडीत “कुल्ले” असा अर्थ येतो. त्यामुळे कर्नाटकात ज्यांना झाड लावायला कुंड्या हव्यात त्यांनी जरा जपूनच...
    असेच गुजराथी भाषेतल्या काही काही शब्दांचा मराठीत काही भलताच अर्थ होतो, अर्थ कसला अनर्थच ! ते लोक वेड्या माणसाला गांडा, व वेड्या बाईला गांडी म्हणतात, ज्याने आपल्याला राग येऊ शकतो. काम नसलेल्या रीकामटेकड्या माणसाला ते लोक नवरा म्हणतात, तर काम नसलेल्या बाईला नवरी ! एका दृष्टीने लग्नात नवरा-नवरीला काम नसतेच म्हणा व त्यामुळे हा अर्थ बरोबरही होतो.
    आजकाल बऱ्याच जणांकडे मोबाईल वरून फेसबुकात लिहायची सोय असते खरी, पण कित्येकांकडे मराठी अक्षरे उमटवण्याचे कर्तब नसते. मग ते मराठी कमेंट इंग्रजीतून ( रोमन लिपीतून ) लिहितात. आधीच ह्यांचे मराठी दिव्य ! ( ते दिव्य-मराठी वेगळे !) त्यात इंग्रजी त्यातूनही दिव्य. त्यात घोटाळे नाही झाले तरच नवल. शादी डॉट कॉम वर एकाने हिंदी निरोप इंग्रजीत असा लिहिला होता : Mujhe ugly ladki pasand hai ! अगली मुलगी कुरूप ( ugly) असूनही ह्याला कशी आवडली बरे ? सौदी हून एकाने एसएमएस असा पाठवला होता : Alikade paise saathvaat aahe ! आता हा पलीकडचा अली का सध्याचे त्याचे पैसे साठविणे हे अलीकडचे ? एका तरुणीने तिच्या रेसिपीत लिहिले होते : Doodh Bharpoor Ghala v mug ek And ! आता हिला अंड घालायचे होते का आणि काही दुसरे , हे तिचे तिलाच माहीत .  एकाने त्याच्या स्वित्झरलंडच्या प्रवासादरम्यान फेसबुक वर लिहिले होते : Kya Chees hai ! Switzerland madhye aalyawar pravasache cheese karayche asel tar ithle cheese khayla have. आता ह्यातले खरे चीज कोणते ते हुडकतच बसायला हवे.  आमच्या घाटकोपरला  गुज्जू लोकांचे काही विचारू नका. आमचा एक मित्र त्याचे गुज्जू नाव हार्दिक हे    इंग्रजीत Hard-dick  असे लिहितो. काय हा अश्लीलपणा आणि तोही एका लिपीच्या फरकाने !
मराठीत उच्चार सारखा पण इतर भाषात त्यांचा वेगळा अर्थ अशा शब्दांना भाषाशास्त्रात “खोटे मित्र” ( false friends ) असे म्हणतात. जसे : हिंदीतला “चुम्मा” म्हणजे चुंबन, तर तमिळ व मलयालम मध्ये चुम्मा म्हणजे “अगदी तसेच”. पट्टी ह्याचा हिंदीतला अर्थ होतो, बॅंडेज, तर मलयालम मध्ये ते होते “कुत्रा”. “चोर” मलयालम मधले म्हणजे होतो तांदूळ, तर, हिंदीत होते चोर. लहान मुलांचे सुसू म्हणजे शू करणे, तर, इंडोनेशिया व मलेशिया मध्ये त्याचा अर्थ होतो दूध. हंगेरी मध्ये पूस्सी म्हणजे चुंबन तर, पुस्सी म्हणजे मांजर व योनी. जपानी भाषेतली “काउ” म्हणजे मूर्ख. इंग्रजीत Embarassed म्हणजे ओशाळणे, तर स्पॅनिश मध्ये अर्थ होतो Pregnant. मराठीत “आले” म्हणजे केव्हाची आले, तर फ्रेंच मध्ये त्याचा अर्थ होतो जाणे. गन म्हणजे बंदूक असले तरी, बंगालीत त्याचा अर्थ होतो “गाणे”. बुक म्हणजे पुस्तक असले तरी बंगालीत त्याचा अर्थ होतो , कपाट. टॉक म्हणजे बोलणे असले तरी बंगालीत ते होते, कडू. मराठीत “हेल काढून बोलणे” म्हणजे अॅक्सेंट असले तरी कानडीत ते होते “घाण करणे ”. “मराठी बाणा” म्हणजे आपल्याला किती अभिमान. पण बंगालीत त्याचा ( बाणा) घाईने उच्चार केला तर अर्थ होतो “शिस्न”. हिंदीतले “अवसर” ही संधी असते तर, कानडीत त्याचा अर्थ होतो “घाई”. मुंडा म्हणजे पंजाबीत मुलगा होतो, तर तेलुगूत वेश्या. मराठी हिंदीतली टोपी ही कानडीत “फसवणे” ह्या अर्थाची होते. मराठी हिंदीतली पुंगी म्हणजे कानडीत “खोटे बोलणे” होते. हिंदीतले “नायी” म्हणजे हजाम होते तर तमिळ मध्ये त्याचा अर्थ कुत्रा होतो . मराठीतले आई म्हणजे तमिळ मधले “शी: घाण”.      अमेरिकेत निरनिराळे ज्यूस पिण्याचे फार प्रस्थ आहे. त्यात बऱ्याच जणांना अॅपल ज्यूस आवडतो तर तिथे अजून एक ज्यूस मिळतो, फ्रूट-पंच नावाचा. त्याचे इंग्रजीतले स्पेलिंग Fruit punch असे केलेले असल्याने हा मुष्टियुद्धातला पंच तर नसावा अशी शंका येते. मग वाटते की काही तरी स्टायलिश नाव ठेवण्याच्या पद्धतीतून हे पंच नाव आले असावे. पण काय आश्चर्य थोडा तपास केला तर आपलाच संस्कृत शब्द “पंच” म्हणजे पाच वरून हा फ्रुटपंच केलेला आहे हे कळते. मग काय आहे हे पंच प्रकरण ? तर, १६३२ मध्ये भारतातून ईस्ट इंडिया कंपनीच्या खलाशांनी म्हणे हे पेय तिकडे नेले होते. ते केले होते, साखर, अल्कोहल, लेमन, पाणी व चहा/मसाला ह्या पांच जिन्नसांनी. ह्या पंच जीन्नसांना उद्देशून मग ह्याचे नाव पंच पडले व मग त्यात बदल होत अनेक फळांचा रस मिसळून पेय करण्याचे सुरू झाले व नाव त्याच प्रकाराचे म्हणून फ्रुट-पंच पडले.
दवाखान्यात आपण एकवेळ “दवा” खात असू, पण पायखान्यात कोणी पाय थोडेच खाते ? दिवाणखाण्यात दिवाण काही खात नसतात, जनानखान्यात जनाना काय बरे खात असतील ? तोपखाना मध्ये तोफ बारूद्च खात असणार ! हत्तीखाना मध्ये हत्ती काय खात असतील ? तर असे “खाना” शेवटी लागलेले शब्द हे फारसीतून आले असावेत असाच आपला कयास होतो. पण  हे स्वदेशी शब्दापासून झालेले रूप आहे असे सावरकरांचे भाषा-शुद्धीहे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. सावरकर म्हणतात : खाना हे प्राकृत प्रत्ययरूपी शब्द मूळ संस्कृत शब्दापासून वा प्रत्ययापासून आलेले आहेत. ज्या खन धातूपासून खणणे, घराचा खण हे शब्द आलेले आहेत त्याचेच रूप खानाहे आहे ; म्हणून कारखाना ज्या खणात म्हणजे घरात कर्मकार काम करतात ते स्थल=कारखाना”. हत्तीखाना, तोपखाना, जनानखाना ह्या शब्दात हत्तीला, तोफेला, जनानाला कोण कशाला खाईल ? हे त्यांचे त्यांचे “खण” आहेत ! आता आपला मराठीच शब्द पहा बरे कसा खणखणीत वाटतो आहे ! स्वदेशी शब्दाचे नाणे ह्या व्युत्पत्तीमुळे आता कसे खणखणीत वाजते आहे.
जसे व्यवहारात आपल्याला आपले खरे मित्र व खोटे मित्र हे पारखून घ्यावे लागतात तसेच भाषेलाही, त्यातल्या शब्दांनाही त्यांचे मित्र पारखून घ्यावे लागतात. हे पारखताना मराठीला सोपे जावे म्हणून इथे मराठीचे खोटे मित्र कोण ते पाहिले आहे . तर ह्यांच्यापासून सावधान !
अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई :४०००७७  
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२





















  











Friday, April 3, 2015


भय इथले संपत नाही !
      माझ्या आयुष्यातली दहा बारा वर्षे ज्या भीतीने पोखरली होती, त्यासंबंधी आता हसू येईल, पण असे अनेकांना निरनिराळ्या भीतींपोटी वर्षे वाया घालवावी लागतात. ही भीती होती काळेपणाची, गोरे नसण्याची !
      मॅट्रिकच्या वर्षापासून मला हा एक नवीनच चाळा लागला होता. मी समोरची व्यक्ती, न्याहाळी व ती किती गोरी आहे, त्याचा अंदाज घेई व मग आपण त्याच्यापेक्षा काळे आहोत की गोरे असा अंदाज बांधी. आणि बहुतेक वेळा मला खिन्नच व्हायला होई. कारण मी होतोच काळा. आता त्याकाळात गरीबी असल्यामुळे ह्या वाटण्यामुळे मी काही क्रीम्स, लोशन्स वगैरे वापरू शकलो नाही पण उगाचच सारखे उदास वाटत राही. मग ह्यातून सुटका म्हणून मी अभ्यासात मन रमवे. त्यामुळे फायदा झाला तो अभ्यासाचा व करीयरचा. पण व्यक्तिमत्वात एक भित्रेपणा आलाच. ह्या भित्रेपणावर मात करण्यासाठी मग परत ज्यास्त वाचन, अभ्यास असे चक्रच पाठीमागे लागले. आता समजा समोरच्या मुलापेक्षा मी ज्यास्त काळा आहे असे मला वाटले तर त्यावर काही उपाय होता का ? पण तरीही माझा बराच मनातला वेळ ह्या तुलनेत जाई. त्यामुळे सुन्न व्हायला होई. अभ्यासात मन लागत नसे. सदा सर्व काळ आपण किती काळे आहोत, त्याचा अंदाज घेण्यातच जाई.
      खरे तर अशा वैगुण्यावर कुठल्याही घरात डॉक्टरी उपचार किंवा निदान समुपदेशनाचा तरी मार्ग शोधल्या गेला असता. पण त्या काळात ही सोय इतकी प्रचलित नव्हती. पण समुपदेशनाचा एक सामाजिक मार्ग होता. लता मंगेशकरांचे "एका तळ्यात होती" हे गीत इतके लोकप्रिय होते की ते सतत कानावर पडायचे व त्याने एक सामाजिक समुपदेशन परस्पर व्हायचे. गीतात एका राजहंसाची गोष्ट असे. राजहंस म्हणतात काळा असतो. तर अशी तीन बदकाची पिले आहेत. त्यापैकी एक काळे पिल्लु आहे. त्याला कोणी खेळायला घेत नाहीय. त्यामुळे ते पिल्लु उदास आहे आणि एके दिवशी त्याला तो राजहंस आहे असे कळते व तो सुखावतो. ह्या समुपदेशनामुळे आपण जरी काळे असलो तरी खास आहोत, हुशार आहोत ह्या स्वत:लाच देऊ केलेल्या धीराने मग मी खूप अभ्यास करायचो. त्याने शैक्षणिक यश मिळायचे. मान मिळायचा.
      तरीही आपण किती काळे आहोत ही पाहण्याची खोडी मधनं मधनं उचल खाई व पुन्हा उदासी येत असे. मग त्यावर पुन्हा काहीतरी वाचण्यात मन रमवावे लागे. एकदा मग काळ्या रंगावरच वाचणे झाले. एका जपानी माणसाचे संशोधन वाचले. काळा रंग मोजण्यासाठी स्पेक्ट्रोमेट्रिक कलरोमीटर वापरले होते. कपाळावरच्या एका जागेवरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्याच्या मोजमापावरुन आपल्या रंगाचे मोजमाप करतात. जगातल्या एकूण जमातींचे कॉकेशीयन, मोंगोल व निग्रॉइड असे वर्गीकरण केले तर त्यांच्या रंगांचे आकडे म्हणे असे निघतात : ( कॉकेशियन ) 3.1YR6.4/3.7 ; ( मोंगोलाइड) 4.9YR6.2/3.8 ; (निग्रॉइड ) 4.8YR4.1/3.4.
रक्तातल्या हेमोग्लोबिन व मेलॅनिन पिगमेंटमुळे हे वेगवेगळे रंग बनतात. ह्या आकड्यातले काळ्या रंगाचे फिकेपण मोजणारे आकडे होते : कॉकेशियन: 6.4; तर निग्रॉइडसाठी 4.1. हीच आहेत गोरेपणाची वैज्ञानिक मापं. केवळ दोनाच्या फरकाने एक गोरापान होतो तर दुसरा काळा. ह्यातले गोरेपण म्हणजे काळ्या रंगाचे फिकेपण, असे म्हणणे हे मोठे गंमतीदार आहे. आणि ह्याची उदाहरणे आपण हरघडी बघत असतो. वयात आलेल्या मुली व मुलेही त्या काळात काळी असली तरी जरा उजळ दिसू लागतात. कदाचित असेच फिकेपण म्हणजेच पर्यायाने गोरेपण, बाजारातल्या गोरेपणाच्या क्रीम्समुळे होत असावे. ( काळ्या रंगाच्या छटाही किती मजेदार असतात. ह्यात निग्रो लोकांचे ढिम्म काळेपण किंवा ठार-काळेपण आहे, तर भारतीयातले काळा-सावळा, उजळ, निमगोरे, गहू वर्णी, असे उतरत्या श्रेणीतले काळेपण आहे. ).
      सगळीच माणसे गोरी का नसतात ? काळसर माणसे मुळात काळी होतातच का ? जीवशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर माणसांचेसुद्धा अनेक वंश आहेत असे सांगतात व त्याप्रमाणे त्यांचे रंग होतात. अजूनही विज्ञान सांगते की भौगोलिक हवामानाप्रमाणे माणसे काळी-गोरी होतात. पण त्याच थंड हवेत काळी माणसेही असतात व त्यांचे वंशज हे काळेच होत राहतात. मी वेस्ट इंडीज मध्ये नोकरी निमित्त असताना तिथे मला ठार काळी असणारी निग्रो माणसे, व भारतीय वंशाची माणसे, समप्रमाणात राहताहेत असे पाहायला मिळाले. निग्रो लोकात असेही काही ( क्रिओल) लोक होते की जे रंगाने अगदी गोरे होते पण त्यांचे केस व शरीराचा इतर बांधा निग्रोंसारखाच होता. ही माणसे गोरी असली तरी ते स्वत:ला व इतर लोक त्यांना, काळेच समजत. जेव्हा केव्हा काळे-गोरे असे वाद होत तेव्हा हे गोरे-निग्रो, काळ्यांचीच बाजू घेत.
      १९५० च्या सुमारास जगातल्या लोकसंख्येत २६ टक्के माणसे गोरी होती व केवळ ८ टक्के माणसे काळी होती. आणि आता २०६० साली म्हणतात की जगातल्या लोकसंख्येत केवळ ९ टक्के माणसे गोरी असणार आहेत व काळी माणसे २६ टक्के होणार आहेत. म्हणजे काळ्यांचेच राज्य येणार आहे असे आपण म्हणू शकतो. तरी बरे ह्या २६ टक्क्यात भारतीय लोक धरलेले नाहीत. अमेरिकेतसुद्धा काळा अध्यक्ष व्हायला कैक शतकं त्यांना थांबाव लागलं.
      हे काळेपणाचे भूत आपल्या समाजात चांगलेच रुतलेले आहे. मुलींसाठी तर "गोरी गोरी पान" ही तर सर्वात महत्वाची प्रार्थना झाली आहे. कितीही चुकीचे मानले तरी गोरी मुलगी दिसायला चांगली दिसतेच. प्रत्येक आईला आपले मूल गोरे असावे असे वाटतेच, मग भले ती प्रत्यक्षात "कसेही असले तरी स्वस्थ असले म्हणजे झाले" असे म्हणत असो. माझ्या मुलासाठी मुलगी पाहताना एक मुलगी चांगली इंजिनिअर, हुशार होती. पण त्यामानाने दिसायला काळीच होती. बुद्धीने किती जरी सांगितले की दिसणे काही महत्वाचे नसते, तरी बरेच निर्णय आपण नेहमी दिसण्यावरूनच घेत असतो. आई जरी काळी असली तरी तिला आपला मुलगा गोरा असावा असेच वाटत असते. ह्या गोरेपणाच्या वैश्विक आकर्षणापायी अजूनही फॉरेनर माणसाच्या गोरेपणाने आपण दिपूनच जातो. एक गोरा माणूस वेस्ट इंडीजमध्ये मी नोकरीला असताना माझा चांगला मित्र झाला होता. एकदा मी धीर करून त्याला विचारले होते की तुम्हाला भारतीय माणसे ( ती परदेशी लोकांपेक्षा काळे असल्याने ) आवडतात का ? तर त्याने प्रांजळपणे सांगितले होते की आम्ही त्यांना सहन करतो जरूर, पण आम्हाला इतर गोरे लोक जसे आवडतात तसे ते आवडत नाहीत.
      कदाचित ह्याच गोरेपणामुळे आपल्याकडे ब्राह्मणांनी एकेकाळी पुढारलेपण मिळविले असेल. एक प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आहेत श्री.एस.एल.भैरप्पा नावाचे. त्यांची "दाटू" ही कादंबरी खूपच गाजली होती. त्याचे भाषांतर उमा कुलकर्णी ह्यांनी मराठीत "जा ओलांडुनी" ह्या नावाने केले आहे. ह्यात जाती जातीमधले तेढ कसे असतात ते रंगवलेले आहे. लिंगायत व तत्सम ब्राह्मणेतर लोक आपल्याला ब्राह्मणाइतकेच वा त्यांच्यापेक्षा ज्यास्त श्रेष्ठ समजतात असे दाखवले आहे. त्यात एक दलित पात्र आहे. ते म्हणते की तुम्हा ब्राह्मणांच्या बायका घरातच वावरल्याने उन्हाने रापल्या नाही व गोर्‍या राहिल्या तर आम्हा दलितांच्या बायका शेतात राबल्यामुळे रापल्या व काळवंडल्या. ह्यावरचे मतभेद कितीहि चर्चिले तरी रंगाच्या वैषम्याचे महत्व फारच उठून दिसते. हे रंगाचे दिसणे व त्याचे वैषम्य वाटणे, इतके सर्वव्यापी असते की त्याने कित्येक पिढ्या ह्या भावनेत पेटून निघतात. तरी बरे की कित्येक खालच्या म्हणवल्या जाणार्‍या जमातीतही गोर्‍या बायका आढळतात ( जसे: लमाणी, गवळी वगैरे ).
      माझ्या मेहुण्यांचा मुलगा काही काळा म्हणता येणार नाही पण गोर्‍यांतही मोडणार नाही असाच आहे. त्याला बायकोही तशीच मिळाली. यथावकाश तिला एक मुलगी झाली. ती मात्र अगदी पिट्ट गोरी म्हणता येईल इतकी गोरी झाली. आम्ही त्याला सहज चिडवत होतो की काही औषधे वगैरे घेतली होतीस की काय ? आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या गोरेपणाचे रहस्यच सांगितले. ते असे की मुलीच्या आईने गर्भारपणात बालाजी तांब्यांची काही औषधे घेतली होती. ती औषधे चांगलीच महागडी होती. त्यात सोन्याचे भस्मही असते म्हणतात. आणि औषधांचा गुण ह्या गोर्‍या पिटट मुलीमध्ये आमच्यासमोरच होता. असे अनेक मार्ग लोक काळेपणापासून सुटका व्हावी म्हणून आचरतात. त्यापैकी एक मार्ग परंपरेने चालत आला आहे तो असा की गर्व्हारशीने प्रसूत व्हायच्या आधी चांगले दूध प्यावे, नेमाने म्हणजे मूल गोरे होते. काळे-गोरे ह्या वादात आजकाल कसा बारीक फरक पडतो आहे ते आम्हाला आमच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस कळून आले. आमची मुलगी तशी काळी-सावळीच. तिची मोठी मुलगी सुद्धा झाली तेव्हा काळी सावळीच होती. मुलाच्यावेळेस तिला आम्ही सुचवले की दूध घेत जा किंवा काही औषधे घे. त्यावर ती जे म्हणाली त्यावरून काळे-गोरे वादाकडे नवी पिढी कशी पाहते ह्याचा आम्हाला अंदाज आला. ती म्हणाली होती, की औषधे वा दूध पिऊन होणारे दुसरे मूल होईलही गोरे, पण माझ्या मोठ्या मुलीला नाही का वाईट वाटणार ? मुलाचे गोरे असणे तिला आवडणारे होते, पण मुलीला आपण का नाही गोरे झालो, असे वैषम्य वाटणे तिला नको होते. आईने आदर्श असा विचार कसा करावा ह्याचेच हे उदाहरण झाले.
      गोरे व्हावे असे वाटणे ही केवळ मनाचे एक वाटणे आहे असे समजून सोडू देता येत नाही. कारण ह्या वाटण्यामागे जगातले मोठमोठे उद्योग कार्यरत आहेत. प्रचंड पैशांच्या उलाढाली होत आहेत. लॉरीयल, पॉंडस्‌, फेअर ऍंड लव्हली, अशा अनेक मातब्बर कंपनीच्या कोट्यावधी किंमतीची प्रसाधने ही काही केवळ मानण्याने आपण बाजूला सारू शकत नाहीत. ती दिवसेंदिवस अधिकच बाळसे धरत आहेत, त्यावरून गोरेपणाची क्रेझ कमी न होता वाढतेच आहे हे सहजी कोणाच्याही ध्यानात येईल.
      काळ्या माणसाला तो जेव्हा आपण काळे आहोत, असे समजणे सोडतो, तेव्हाच त्याचे काळे-पण सुटते. ह्याचे मी पाहिलेले साक्षात उदाहरण आहे, स्मिता पाटील ह्या नटीचे. ती जेव्हा दूरदर्शनवर वृत्त-निवेदिका होती तेव्हा हिला कसे काय घेतले असेल, असे वाटावे इतकी ती दिसायला साधारण होती. बर्‍याच नाटकांमध्येही जेव्हा तिला प्रत्यक्ष आजूबाजूला पाहिले तेव्हाही तिचे व्यक्तिमत्व काही खासे वा नजरेत भरण्यासारखे नव्हते. पण काय झाले कोण जाणे, ती सिनेमात आली आणि तिचे काळेपण व व्यक्तिमत्व एकदम उभारूनच आले. इतके की "भूमिका" ह्या सिनेमातल्या तिच्या भूमिका अगदी मातब्बर नटांनाही डोईजड व्हाव्यात. त्या काळातला जो सुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन त्याच्यासोबतही ती अनेक सिनेमात अगदी उठूनच दिसली. तिने प्रत्यक्षात लग्न केले तो नट राज बब्बरही त्याकाळचा एक देखणा नटच होता. ती स्वत: जेव्हा स्वत;चे दिसणे विसरली, तेव्हाच तिचे व्यक्तिमत्व निखरून आले व ती दिसायलाही चांगली दिसायला  लागली. गुण निखरले की रूपही निखरते असे म्हणतात ते तिच्याबाबतीत असे निदर्शनाला आले.
      काळा असूनही प्रचंड लोकप्रीय झालेला दुसरा एक नट म्हणजे रजनीकांत. अर्थात हा मराठी माणूस दक्षिणेत गेला व मग तिकडे लोकप्रिय झाला हे खरे असले तरी काळ्या रंगाला एक सार्थ अभिमान देवविणारे हे व्यक्तिमत्व आहे ह्यात शंका नाही.
            काळ्या रंगाचे न आवडणे किंवा त्यासंबंधीची भीती वाटणे ह्या भावनेवर इंग्रजीत सॅम्युअल जॉन्सन ह्यांचे एक प्रसिद्ध सुभाषित आहे व ते फार बोलके आहे. "भीतीची भावना ही आपल्यात ह्यासाठी रोवलेली असते की तिने वाईटापासून आपले रक्षण करावे. पण ह्या भावनेचे कर्तव्य हे आहे की तिने इतर भावनांबरोबर आपल्याला वाहून जाण्यासाठी मदत न करता आपल्या विवेकाला मदत करावी.". म्हणूनच काळ्या रंगाकडे मी भीतीने न पाहता चोखंदळपणे पाहण्याचे ठरवले व तशी मला बुद्धी वेळीच झाली हे अगदी दैवीच मानायला हवे.
      काळेपणाचे हे खूळ केवळ आपल्यालाच आहे, असे वाटले तर ते चुकीचे ठरावे इतके मुबलक आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानात काळेपणाची चर्चा झालेली आहे. जसे प्रसिद्ध तत्ववेत्ता सार्त्र ह्याने फ्रेंच नीग्रो चळवळीमागे असणार्‍या संकल्पनेला "नेग्रीट्यूड" असे नाव देऊन त्याची चर्चा केलेली आहे. तसेच फनां नावाच्या तत्ववेत्त्याने "ब्लॅक स्किन, व्हाइट मास्क" ह्या ग्रंथात काळेपणाची चर्चा "द फॅक्ट ऑफ ब्लॅकनेस" ह्या प्रकरणात केली आहे. अमेरिकेतल्या काळ्या निग्रोंचे लढे ज्या मार्टिन ल्यूथर किंगने लढवले त्याचे प्रसिद्ध गीत "हम होंगे कामयाब" तर आपण अजूनही गातोच की. ओबामांच्या निवडून येण्यात व आजही टिकण्यात त्यांच्या काळे असण्याचे भान जगाला ठेवावेच लागते, एवढा काळेपणाचा महिमा आहे.
      तमाम काळ्या लोकांचे दैवत शोभावे असे दैवत आहे पंढरपूरचे पांडुरंगाचे किंवा विठठलाचे. एकदम ठार काळ्या दगडात रेखलेली ही मूर्ती, त्याचे काळेपण सगळ्या दैवतात वेगळेपणाने मिरवीत असते. आपल्या देवादिकांमध्ये कृष्ण हा निळा आहे तर राम गोरा आहे. शंकर सुद्धा काळा निळाच आहे. ह्या सगळ्यात विठठलाचे काळेपण अगदी ठार काळे प्रकारातले आहे. कदाचित आपण सोयीसाठी विठठलाला साकार स्वरूपात पाहतो आहोत खरे, पण देवाला निर्गुण रूपातच पहावे ह्या विचारापोटीच विठठलाचा रंग काळा करण्यात आला असावा. आपल्या देहाला तुकाराम महाराज ह्याच विचाराने कलेवर म्हणतात, देहाची देहावर जी आवडी आहे ती अंतरंगात निर्गुण निराकाराचा अनुभव घेतल्यावर कमी होईल, तीही निर्गुणमय होईल असे ह्या अभंगात तुकाराम असे म्हणतात :
"आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥
आवडी आवडी कळिवरा कळिवरी । वरिली अंतरीं ताळा पडे ॥"
माझे काळ्या रंगाचे भय आता संपले, तसे ते तुम्हा आम्हा सर्वांचे संपो, हीच काळ्या विठठलचरणी विनंती !

----------------------------------------------------------------------------------------------

अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२

ई-मेल: arunbhalerao67@gmail.com



Saturday, May 10, 2014

“नीच” राजनीती !
एखाद्या शब्दाचा अर्थ काढताना त्यातल्या अक्षरांनाही काही अर्थ असतो का ? बघू या .
“न” हे अक्षर मराठीतले अनुनासिक आहे. मराठीत अ ते अ: हे बारा स्वर व क, ख ,...ते ज्ञ ही ३६ व्यंजने अशी एकूण ४८ अक्षरे आहेत. म्हणजे दर शंभर अक्षरात एखादेच अक्षर पुन्हा येण्याची शक्यता अवघी दोन टक्क्याची आहे. पण कोणतेही लिहिणे वा बोलणे तपासले तर त्यात सगळ्यात जास्त येणारी अक्षरे आहेत अनुनासिके. जसे आपण म्हटले की “संध्याकाळी येणारी डेक्कन क्वीन वेळेवर येणार आहे का ?” तर ह्या २२ अक्षरात अनुनासिके ( अनुस्वार, णा, न , न , णा ) येतात ५ , म्हणजे प्रमाण पडते २२%. असे अनेक उतारे तपासले तर १८ ते २०% टक्के हे अनुनासिकांचे वापरातील सातत्याचे प्रमाण दिसेल . ह्या शिवाय फोनोलॉजी ह्या विषयात सोनोरीटी स्केल मध्ये असे दाखवतात की सर्वात मोठ्याने ऐकू येतात ते स्वर व त्यानंतर य र ल हे द्रव व त्यानंतर अनुनासिके. म्हणजे श्रवणसुलभतेसाठी अनुनासिके फायद्याची ठरतात .
जेव्हा आपण कोणाला शिव्या घालण्याचे ठरवतो तेव्हा त्याचा भरपूर उपमर्द करण्याचा आपला मानस असतो . तेव्हा जास्त वापरातील व मोठ्याने ऐकू येणारी अनुनासिके वापरणे हे रास्त धोरण ठरते. शिवाय “न” ह्या अक्षरात नकारात्मकता ठासून भरलेली आहे हे कोणाच्याही लक्षात येतेच. त्यामुळे शिवी द्यायची तर ती  “नी” पासून असावी हे साहजिकच म्हणायला हवे.
आता राहता राहिले दुसरे अक्षर “च”. मराठीत ह्या अक्षराची एक वेगळीच खुमारी आहे. “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मागणीत “च” नसता तर आचार्य अत्रे म्हणायचे तसे चव्हाण मधले “च” काढले तर जे राहते ( “वहाण” ) तेच मारावे लागले असते. तंत्रशास्त्रात च ह्या अक्षराचे दैवत “इच्छाशक्ती” आहे व म्हणूनच “नीच” मध्ये प्रतवारी करणार्याची इच्छाशक्ती प्रकर्षाने दिसून येते.
त्यामुळेच “नीच” ही फार परिणामकारक शिवी होते व म्हणूनच ती फार झोंबते !

------------------------------------  

Friday, May 2, 2014

वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ( संकेत ) ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड ( संकेत ) असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.
हे झाले “वाट” ह्या शब्दाला आलेल्या नकारात्मक अर्थाचे अंदाज बांधणे. पण ह्याला  पुरावा शोधायचा तर लोकांचा ह्या शब्दाचा वापर कसा होतो ते पाहणे. आता वर्तमानपत्रातले हे शीर्षक पहा “खोदकामामुळे मुंबईकरांची “वाट” !” आता ह्यात वाट ही चक्क नकारात्मकच आहे .
एखाद्या शब्दाचे संचितच असे असते की ते नकारात्मक होतात. त्या शब्दाची ते वाटच लावतात !

-------------------------------------------------------