Tuesday, July 20, 2010

अरुणोदय झाला-३
शब्द, भाषेचा "फंडा"
अमेरिकेत कशाचे ना कशाचे फॅड कायमच असते. सध्या इथे स्पॅनिश भाषा शिकायचे प्रस्थ दिसते आहे. कारण मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्मलेली माझी नात, जिला मराठी अजिबात येत नाही, सध्या माझ्याशी स्पॅनिश बोलते.
ही भाषाही मोठी अजब आहे. अमेरिकेतला जो कामकरी वर्ग आहे व जो बहुतांशी आडमार्गाने अमेरिकेत आला आहे, त्या वर्गाची हि बोली भाषा आहे.जगात सगळ्यात ज्यास्त लोक (१३० कोटी ) मंडारिन म्हणजे चिनी बोलतात व ती युनोची सहापैकी एक मान्य भाषा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्पॅनिश ( इस्पॅनिओल) भाषेचा जी बोलतात, ५० कोटी लोक, व तिसरा नंबर लागतो इंग्रजीचा ( ४९ कोटी). हिंदी व उर्दु एकत्र पकडले तर ( ६० कोटी) आपला नंबर तिसरा लागू शकतो पण सध्या तरी तो चौथा ठरतो.
तर आपल्या पुढे असलेली ही स्पॅनिश भाषा आहे तरी कशी ?
भाषेचा "फंडा" असलेले नुसते शब्द घेतले तर काय दिसते ? आपण मराठी, जे तू तू मै मै करण्यात वाकबगार असतो,त्यांचा "तू" स्पॅनिश मध्येही "तू" च आहे. आपला "सदरा" घालण्या अगोदर आपण बहुदा "खमीस" घालत असू . कारण स्पॅनिश मध्ये सदर्‍याला "खमीसा"च म्हणतात. पूर्वी आपण ज्या "मेज" वर बसत असू त्याच "मेजा" वर आजही स्पॅनिश लोक बसतात. आपल्याला व स्पॅनिश लोकांना सारखाच "पगार" मिळत असावा कारण दोन्हीकडे "पगार" म्हणजे पगारच आहे. स्पॅनिश लोकांच्या पायजम्याला नाडा नसावा कारण "नाडा" चा अर्थ "नाही" असा होतो. "अंक" म्हणजे जी मांडी होते ती स्पॅनिश लोकांना "बेडकाचे पाय" वाटते. जी गोष्ट आपल्याला "अप्रीय" वाटते ती स्पॅनिश लोकांना "अप्रीतो" वाटते. ज्या मराठी म्हातार्‍यांना "अस्मा" होतो त्यांना स्पॅनिश मध्येही "अस्मा" च होतो. जे मराठीत "बैलोबा" ठरतात त्यांना स्पॅनिश लोक "बुये" म्हणतात. कामशास्त्रात पलंगाचे महत्व स्पॅनिश लोकांना पटलेले असावे कारण ते पलंगालाच "काम" म्हणतात. दशमान पद्धतीतल्या "दश"ला ते लोक "देझ" म्हणतात, दोनला "दोस" म्हणतात.पूर्वी गॅबर्डीन नावाचे एक कापड मिळे त्याचा अर्थ ते रेनकोट असा करतात.जर्सी व मनीला हे त्यांचेच प्रकार असावेत कारण ते लोक त्याच नावाने ते ओळखतात. भांडणार्‍या माणसाला ते "लुचा" म्हणतात. धर्मशाळा, कार्यशाळा वगैरेतले "शाळा" म्हणजे स्पॅनिश लोकांची "खोली" ठरते.
आता कशी ही भाषा अगदी आपल्यातली वाटते की नाही ? अर्थात हे वाटायला अमेरिकेतले अगदी खुले राहणे आवश्यक आहे। कसे ? तर बघा आम्ही नातवंडांना रशियन मॅथ च्या क्लासला सोडून, चायनीज स्टोर मधून इंडियन ग्रोसरी घेऊन येतो व मग सांड्रा ही मेक्सिकन कामवाली आमच्या नातीशी स्पॅनिशचा सराव करते. सर्व भाषाशास्त्रज्ञांना अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.
अगदी आमच्या पुण्याच्या नाती आळंदीहून पुण्याला दिंडीतून चालत आल्या त्याच तोडीचे हे आहे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

2 comments:

  1. Después de mucho tiempo de haber publicado en "Arunodaya Zala" y todo lo que escribe siempre es bueno para leer y sentir.

    ReplyDelete
  2. ब्र्‍याच दिवसांनी लिहिलेस आणि ते मला पटले व भावले असे इंटरनेटवरच्या भाषांतरकाराने सांगितले असे वाटते आहे. अभिप्रायाबद्दल आभार.
    अरुण भालेराव

    ReplyDelete