Friday, December 30, 2016

धाकड २०१६

धाकड २०१६

काल “दंगल” पाहिला तेव्हा त्याच्यातल्या हरियाणवी बोलीची काही वैशिष्ट्ये चांगलीच लक्षात राहिली. त्यात धाकटी मुलगी पतियाळाच्या क्रीडा संकुलासंबंधी बोलतांना म्हणते की तिथे तर सगळ्या “धाकड”च मुली येत असतील ना ? धाक देणाऱ्या धाकड. किंवा मराठीत आपण ज्यांना धडधाकट म्हणतो तशा. ह्याच अर्थाच्या वळणाने गेले वर्ष २०१६ तसे धाकडच म्हणावे लागेल !

सबंध गेले वर्षभर भरवशाच्या म्हशिंनी टोणगे दिले, तेही जगभर ! हिलरी बाई येता येता हरल्या, तेही ट्रम्पसारख्या टोणग्या कडून. ब्रिटनसारख्या भरवशाच्या देशाने युरो सोडले. काश्मिरात दंगल माजली. अतिरेक्यांनी कहर केला. भारताने सीमेपार जावून चोप दिला. आणि सरतेशेवटी जगात कुठे झाली नसेल अशी नोटबंदी झाली !

वर्ष तसे धाकातच गेले !

--------------------------

 

Monday, December 26, 2016

श्रेष्ठ मौखिक

श्रेष्ठ मौखिक

साहित्यात श्रेष्ठता जर लोकप्रियतेवरून ठरवायची तर अनेक लोकांना जे मुखोद्गत ( पाठ ) आहे त्यावरून ठरवू गेले तर आजचे बहुतेक साहित्यिक बादच होतील. चांगले चांगले मान्यवर साहित्यिक हे त्यांच्या मृत्यू पश्चात केवळ आठ दहा वर्षेच लोकांच्या लक्षात राहतात. त्यांचे साहित्य ( कथा, कविता, लेख वगैरे ) तर फारच थोडे दिवस लोकांच्या ध्यानात राहते. ते पाठ तर नसतेच.

त्याउलट “शुभम् करोति कल्याणं” हे काव्य कोणाचे आहे, ते मूळ संस्कृत आहे का मराठी, हे आपल्या काही लक्षात नसते, पण काव्य पाठ असते. तशाच काही कविता व लोकगीते. आपण आपल्या साहित्य वाचनात अनेक प्रकार वाचतो, पण नेमके हेच कसे पाठ राहते ? अनेकांच्या अनेक वर्षे लक्षात राहणे, टिकणे हा निकष लावला तर हे काव्य प्रकार श्रेष्ठ नाहीत का ?

आजही वारकरी पंढरपूरला वारीला जातात हे दृश्य त्यातल्या भक्तीभावापेक्षा त्यांच्या पाठ असलेल्या तुकारामाच्या अभंग म्हणण्याने, एका वेगळ्याच, उच्च कोटीतले वाटतात. हे अभंग मग इतके वर्षे टिकून आहेत, ते असे म्हटल्या गेल्यानेच ना ?

ज्ञानपीठ वा अकादमी पुरस्कारापेक्षा आपली कविता वर्षानुवर्षे लोकांनी म्हणत राहावी असे कोणत्या कवीला वाटणार नाही बरे ? हीच मौखिकाची श्रेष्ठता !

----------------------

Thursday, November 3, 2016

अडानी भाषा : ३

अडानी भाषा : ३  

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

३ : गेल्तो = गेलो होतो  

आलो होतो, गेलो होतो, असे जरा अवघड वळणाचे बोलण्यापेक्षा आल्तो, गेल्तो हे कसे सुटसुटीत होते. जा किंवा जाणे हे मूळ क्रियापद व गेला हे त्याचे भूतकाळी रूप. काही जण “ तो जाएल हाये” असेही बोलतात. “मी जातो”चे “मी गेलो ” असे न करता आपण “मी गेलो होतो” असे व्याकरणात ओळखायला अवघड असे रूप का करीत असू ? कदाचित तमिळ मध्ये जसे “चेल” म्हणजे जाणे आहे त्यावरून “गेल्” असे तर हे करीत नसतील व मग गेल्तो ?

-----------------------

Tuesday, November 1, 2016

र चा रेटा

जय हो-मराठी-२०: र चा रेटा
------------------------------
"र"चा रेटा !
--------------------------------
    "र" ह्या वर्णाला मराठी वर्णमालेत अर्ध-स्वर ( सेमी व्हॉवेल ) असे मानतात. जीभ तयार न झाल्यामुळे लहान बालके बोबडे बोलतात हे आपण जाणतोच. तेव्हा सगळ्यात अवघड वर्ण "र" हाच असतो. हे ह्यामुळे होत असावे की "र" हे मूर्धन्य प्रकारात मोडते ( म्हणजे टाळूच्या वर जीभ लावून हा आवाज काढावा लागतो, ज्यासाठी जिभेचे वळणे तयार व्हावे लागते .). तसेच फोनोलॉजी शास्त्रातल्या, सोनोरिटी स्केल मध्ये जे वर्ण सगळ्यात मोठेपणे आपल्याला ऐकू येतात असे शोधून काढलेले आहे, त्यात स्वरानंतर सगळ्यात ज्यास्त मोठेपणी ऐकू येणारे वर्ण दिले आहेत : य, र, ल, व. त्यामुळे "र" ह्या वर्णाची योजना आपण सहजी स्पष्टपणे ऐकू येणार्‍या शब्दांसाठी करत असू, असे अनुमान निघते. त्यामुळे एखाद्या शब्दात "र"ची योजना असेल तर तो ठळक होतो असा परिणाम साधल्या जातो. ह्या पार्श्वभूमीवर शब्दकोशातल्या "र"पासून सुरू होणार्‍या एकूण २०६८ शब्दांची तपासणी केली तर हे सर्वच शब्द ठळकपणा आणणारे, महत्वाचा अर्थ असणारे दिसतात. ( एकूण २०६८ पैकी ५२५ शब्द महत्वाचे अर्थ असणारे, ठळकपणा आणणारे आढळतील. वानगीदाखल पहा: रक्त, रखडपटटी,रंजक, रंजलेगांजले, रटाळ, रडका, रंडी, रण, रत्न,रद्दी, रसाळ, रहाटगाडगे, राई, राकट, राग, रांजण,राजतिलक, राजबिंडा, रानदांडगा, रामराज्य, राष्ट्र,राक्षस, रुका, रुपया, रुग्ण, रुद्र, रुचिर, रुसणे, रूप,रौद्र, वगैरे.).  सामान्यापासून मोठेपण देणारा "राजा", कपाळावरच्या गंधात ठळकपणा आणणारा "राजतिलक", लहान पदार्थात स्पष्टपणे लहान असलेला पदार्थ "राई", नापसंतीच्या शब्दात प्रभावी असते:"अरेरे", छोट्यामोठ्या लढाया, युद्धे ह्यात स्पष्टपणे मोठे युद्ध म्हणजे "रण", मौल्यवान वस्तूत जादा मोल असलेले "रत्न", वगैरे. र-पासून सुरू होत असलेले बहुतेक शब्द असे हे त्यांच्या त्यांच्या प्रकारात मोठेपण, ठळकपण दाखवतात असेच दिसते. हाच "र"चा रेटा !
---------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------

Friday, October 28, 2016

अडानी भाषा : २

अडानी भाषा : २

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

२ श्यान = शेण

गाय, म्हैस, बैल ह्यांची विष्टा म्हणजे श्यान किंवा प्रमाण भाषेतले शेण. गावाकडे एक म्हण आहे की पडलेलं शेण माती घेऊन उठते, तसे हा शब्द कसा आला असेल त्याबद्दल अनेक मते शेणासंग उठतात. प्रमाण मत म्हणते की संस्कृत छगण वरून शगण-शअण-शाण-श्याण वरून शेण झाले. काही लोकांना वाटते की दाक्षिणात्य तमिळ मधल्या चाणम् वरून हे शेण झाले असेल.

शेण-बहाद्दर लोक म्हणतात की शेण फार औषधी असून ते अल्सर वर गुणकारी आहे. हार्वर्ड विद्यापीठात एक असे संशोधन आहे की शेणातून ज्या प्रकारचे मश्रुम्स होतात त्यापासून एक स्पिरिचुअल ड्रग तयार होते, जे घेतले असता फार पवित्र भावना येतात. ( कदाचित त्यानेच आजकाल अनेक लोक शेण खात आहेत असे दिसते ! ).

---------------------      

अडानी भाषा : १

अडानी भाषा : १

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

१.   अडाणी/ अडानी  

शब्दकोशात अडाणी ह्याचा अर्थ देतात : अकुशल, रानटी. सुरवातीचा आपला समाज हा असाच रानावनात राहणारा असणार. काही लोकांना वाटते की अडाणी हा शब्द “अज्ञानी” ह्या संस्कृत वरून आलेला असावा. पण जेव्हा सगळा समाजच हा रानावनात राहणारा होता, तेव्हा त्याला “अज्ञानी” असे कुठल्याही ज्ञानाची परीक्षा न घेता कसे म्हणत असतील. शिवाय “अडाणी” म्हणताना जी हिणवण्याची छटा आहे ती अज्ञानीत येत नाही. विश्वनाथ खैरे ह्यांचे एक असे प्रतिपादन आहे की मराठी भाषेचे मूळ तमिळ, मलयालम भाषेत सापडते. त्या भाषेत “अटा” म्हणजे कनिष्ठाला व मुलाला जवळिकेने आणि शत्रूला तिरस्काराने लावलेले संबोधन. तसेच “अटन्न” म्हणजे कनिष्ठ दर्जाच्या माणसांना बोलावण्याचा उद्गार. अटन्न-अडन्न-यावरून अडान होणे सहजी शक्य आहे व त्यावरून अडाणी !

---------------------------- 

Thursday, October 27, 2016

न कूपसूपयूपानाम् अन्वयोs

"न कूपसूपयूपानाम् अन्वयोऽ"
-----------------------------------
व्याकरणात काही प्रत्यय लावून आपण शब्द करतो असे सांगतात. जिथे असे प्रत्यय लावून शब्द केलेले असतात तिथे त्या प्रत्ययाचा सारखाच एक अर्थ असतो व तो त्या प्रत्यय लागलेल्या शब्दांना येतो. जसे "ऊन" हा प्रत्यय लावून आपण अव्यये करतो जसे : करून, देऊन, जेऊन, लिहून, वगैरे.  म्हणजे शब्द कसा बनलाय त्याची खूण प्रत्ययघटित शब्दांचे अर्थ सारखे असले तरच पटते असे होते. उदाहरणार्थ कूप, सूप, यूप मध्ये ऊप हा प्रत्यय नाही हे त्यांचे अर्थ सारखे नाहीत ह्यावरून ताडता येते. पण प प्रत्यय लावून आपण अनेक शब्द करतो असे मराठी व्याकरणात उदाहरणे देतात. जसे : कांडप, दळप, वाढप, वाटप, वगैरे. इथे असे दिसते की क्रियेला प प्रत्यय लावले की त्या क्रियेची मजूरी अशा अर्थाचे हे शब्द तयार होतात. आता कूप ही काही क्रिया नाही, पण उद्या समजा "कूप करणे" ही क्रिया रूढ झाली तर त्याच्या मजूरीला कूपप म्हणावे लागेल. तसेच एखादी गोष्ट "खूप करणे" ही क्रिया धरली तर त्याच्या मजूरीला खूपप म्हणतील. म्हणजे उच्चार सादृश्यापेक्षा अर्थ-सादृश्य असले पाहिजे हा निकष होतो.
पण असे किती अर्थ-सादृश्य असले पाहिजे ह्याचे काही प्रमाण नाही. म्हणजे कांडप, दळप, वाढप, वाटप हे शब्द प लागल्याने समान अर्थाचे झाले खरे, पण काप, बाप, साप, वगैरे अनेक तशा शब्दांना प लागले आहे पण त्याने अर्थ-सादृश्यता नाही. "न कूपसूपयूपानाम्‌ अन्वयोs" हे कूप सूप यूप ला लागू होतेय पण कांडप, दळप, वाढप, वाटप ह्या क्रियावाचक शब्दांना लागू होत नाही.
----------------------------------

चुका सुधाराव्यात का ?

चुका सुधाराव्यात का ?

-----------------------------------

माझ्या एका मावसभावाचे आडनाव आहे खरवडकर. आजकाल ख हे पहिल्या र ला व जोडून काढतात व त्यामुळे ते ख आहे हे कळते. पण पूर्वीच्या अक्षरांच्या खिळ्यात ख हे “रव” र आणि व मिळून काढीत असत. त्यामुळे त्यांच्या आडनावाचा उच्चार अनेक लोक रवरवडकर असा करीत.

वेस्ट इंडीजला माझ्या बॉसचे नाव होते बजाज. तिकडे j चा उच्चार ह किंवा य करीत व त्यामुळे त्यांचे नाव आले की लोकांची बोबडी वळे व ते म्हणत बयाय !

कधी कधी जेवताना एखादे शीत आपल्या ओठाला तोंडावर तसेच राहून जाते. ते आपल्या लक्षात येत नाही. अशावेळी ते त्या माणसाला सांगावे का ? काही लोकांच्या मते सांगू नये. कारण त्याने त्या माणसाला ओशाळल्यागत होते.

असेच भाषेचे होत असेल का ? एखादे वाक्य कोणी चुकीचे म्हणत असेल तर त्याला तिथल्या तिथे सुधारावे का ? भाषा ही प्रत्येकाची एक खेळण्याची मुभा असलेले सृजन आहे. जे वाक्य पद्यात चालते ते गद्यात व्याकरणदृष्ट्या चालत नाही असे होऊ शकते. मग ते एखाद्याने चूक म्हटले असेल व ते तुम्हाला कळले असेल तर कशाला सुधारावे ? कदाचित अशीच चूक करीत करीत लोक भाषेलाच सुधारून टाकतील व मग त्या लोकांना ती चूक वाटणारही नाही.

पूर्वी प्रत्येक बिलाखाली लिहिलेले असे : चूभूदेघे किंवा चूभूद्याघ्या. ( चूक भूल देणे घेणे किंवा चूक भूल द्यावी घ्यावी ). हे जरी आजकाल कोणत्याही टिपणाखाली लिहिलेले नसले तरी चूक भूल द्यावी घ्यावी, हेच बरे !

------------------ 

Saturday, October 22, 2016

सं, सम्

सं , सम्
---------
एखाद्या शब्दाच्या अलीकडे अक्षर ( उपसर्ग) लावून नवीन शब्द बनवण्याची पद्धत आहे. कधी हे अक्षर परभाषेतून घेतात. जसे : बेडर, बेकाबू, बेदम, बेचिराग, बेजार...इथे बे चा अर्थ वाचून , शिवाय, रहित असा करतात. असाच संस्कृत उपसर्ग आहे सं , सम्, ज्याचा अर्थ चांगले, बरोबर असा करून शब्द बनतात : संस्कार, सं़योग, संगम, संगीत, संतोष, संकल्प...संकट मात्र संक्रित,एकाच वेळी केलेले वरून आलेले आहे.

Thursday, October 20, 2016

साळकाया माळकाया

---------------------------------------
साळकाया माळकाया
-------------------------
कोणत्या शब्दाची काय व्युत्पत्ती आहे, तो कसा आला आहे, आधी तो कसा होता, या सगळ्यांपेक्षा सध्या तो लोक कसा वापरतात ह्याला जास्त महत्व असायला हवे. तोच त्याचा खरा अर्थ. म्हणूनच भाषाशास्त्रात असे एक वचन आहे की Meaning is usage. म्हणजे वापर हाच अर्थ !
तसा अर्थ लावायला गेलं तर साळ म्हणजे वरच्या टरफलासकटचे तांदुळाचे रोप असा अर्थ काढला तर मग त्याप्रमाणे काया असणार्‍या बायका असे केले तर ज्या साळकाया माळकाया असतात त्या काही अशा सडपातळ वगैरे अशा असत नाहीत. तर मग ह्या अशा विशेषणाचा काय अर्थ असावा ?
तिरस्कार दाखवण्याचा एक प्रकार असा आहे की तुम्ही कोणीही विशेष नाही आहात, अगदी सामान्य, चारचौघीसारख्या नगण्य आहात असे रॅंडमनेस दाखवण्याचा. ह्याचा अर्थ कोणीही, काहीही वैशिष्ट्य नसलेल्या, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. साळकाया-माळकाया ह्या वर्णनाने आपण ज्या बायकांचा उल्लेख करतो त्यांना खास असे काही वैशिष्ट्य नसते, त्या कोणीही असू शकतात. जसे गणितात रॅंडम नंबर म्हणजे कोणताही आकडा, ज्याला काही ताळतंत्र नाही असा, अशाच ह्या बायका. हे अपमान करण्याचे मोठे हमखास यशस्वी ठरणारे छद‌मी विशेषण आहे, काहीच वैशिष्ट्य नाही असे सांगणारे विशेषण !
सोम्या गोम्या, आंडू पांडू, टॉम-डिक-ऍंड-हॅरी, असेच म्हणून कोणाही सामान्य वकूबाच्या पुरुषालाही आपण अपमानकारक विशेषण करू शकतो !
-----------------------------------

सडाफटिंग

------------------------
सडाफटिंग
---------------
ज्याला संसार नाही, काही आगापिच्छा नाही, जो एकटा आहे त्याला सडाफटिंग म्हणतात. सडाफटिंग ह्या शब्दात तसे दोन शब्द आहेत. सडा व फटिंग. दोन्हीचे अर्थ एकटा असेच आहेत. सड हे जनावरांच्या ( विशेषत: गाय, शेळी, म्हैस ह्या दूध देणार्‍या जनावरांच्या ) आंचळाला म्हणतात. ह्या आंचळांचा आकार पाहता त्याची रुंदी कमी व लांबी जास्त ह्या आकारावरूनच आपण सडसडीत ह्या शब्दाचा अर्थ काढतो. तसेच सडपातळ. कदाचित्‌ सडा/सडी माणसे ही अशीच सडपातळ असावीत व त्यावरून सडा/सडी झाले असावे. एकटा ह्याच अर्थाचे इतर समानार्थी शब्द आहेत : सोट, सोटभैरव, झोटिंग वगैरे.
फटिंग म्हणजेही एकटा, कुठलेही पाश नसलेला. तुकाराम महाराजांनी एका अभंगात असे म्हटले आहे : फटयाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2॥ तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3॥ इथे "फटया" म्हणजे संसार नसलेला, एकटा ह्या अर्थाने तिरस्कार केलेला हा माणूस विश्वास ठेवण्यास पात्र नाही असे म्हणताना कदाचित संसारी माणूस हा जास्त जबाबदार असतो असे सामाजिक निकषाने म्हटले असावे हे उघडच आहे. असेच "फटिंग" हा उल्लेख भा.रा.तांबे ह्यांच्या एका कवितेत असा येतो: ( म्हातार्‍या नवरदेवाची तक्रार ) : गहनविपिनीं करि गौरि घोर तप,---जरठास्तव नवयुवती करी जप,---नीरस हर तो भणंग जोगी,---रसे रसरसे ही सुखभोगी,---फटिंग तो, ही तपे वियोगी,---स्मरारि तो, ही स्मरसुखलोलुप,---उपवर मुलींनो कित्ता गिरवा,---त्यजुनि फाकडा धटिंग हिरवा,---फटिंग जोगी पिकला भगवा,---वरा ! पुजा हर सफल गतत्रप,----नशीब अमुचे जरठ वरांचे---सोंगाड्या मुलि, ढोंग जपाचे,----लचके रुचती या तरुणांचे---नातरि वरितो मुली सपासप,---आजोबा या म्हणती अम्हाला,---ठार करिती उरी खुपसुनि भाला,----गौरि असें का म्हणे हराला,---पाहुनि घेइल शंभु भवाधिप !
आजकाल मुलीही अशा एकट्या राहतात. त्यांच्यासाठी सडी हा शब्द आहेच. तेव्हा सडाफटिंग मुलींसाठी सडीफटिंग आपण म्हणू शकतो, किंवा सडीफटिंगा किंवा सडीफटिंगी !
---------------------------------

ट ची टवाळी

ट ची टवाळी

कवळी

कवळी
----------
कवळी म्हणजे कृत्रीम दातांची जोडी हा अर्थ किंवा कोणत्याही शब्दाचा अर्थ आपल्याला कुठलाही शब्दकोश वा व्युत्पत्तीकोश न पाहता कळला तर किती बरे होईल नाही का ? लहानपणी नाही का, आपल्याला मम्मम्, भुभू, पापा, भुर्र, टाटा...असे अनेक शब्द असे आपसुक कळत होते ? अन् आत्ताच का शब्दकोश, व्युत्पत्तीकोश लागावेत ?
आपण म्हणे जास्त शब्द हे association ने, संदर्भाने शिकतो. जसे वर पाहून बाळाला विचारले की पंखा कुठेय, पंखा ? तर स्मार्ट बाळ वर पाहते व वर फिरणारा पंखाच असतो, त्याकडे बोट दाखवते. असे दोन चारदा गिरवून झाले की मग ते बाळ, कोणीही विचारले की बरोबर सहज पंखा दाखवते.
चला अशा संदर्भाने "कवळी" बघू. कव व त्याच्यापुढचे एकूण शब्द शब्दकोशात आहेत: ६५. कव चा अर्थ दिलाय : वेंध, मिठी, झडप, उडी. वेंध म्हणजे भोक,छिद्र, फट अशी लहान जागा. कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे ( मिठीत फट रहात नाही), कवळी शेंग म्हणजे इतकी बारीक की अगदी फटीत मावावी, कवळणे म्हणजे इतकी घट्ट मिठी की अजिबात फट राहू नये, कवटी ने मेंदूला इतके फिट्ट केलेले असते की अजिबात पोकळी नसते ( म्हातारपणी मेंदू आकुंचतो व फट पडते व त्यात स्त्राव /hemorrhage होतो, कवडसा हा छिद्रातून येणारा प्रकाश असतो, कवन/कविता/कवि हे मिठी मारणारेच आहेत,.....तर असे एकूण ४५ (६८%) शब्द असे आढळतात की जे फटीसंबंधी आहेत.
तोंड ( दात असणारे) ही तशी एक फटच असून त्यात दात ओळीने बसलेले आहेत. मग त्या फटीत (कव) मावेल अशी कृत्रीम दातांची ती कवळीच असणार !
------------

Thursday, October 13, 2016

इन्शा अल्लाह, तू अल्लाह हो...

-------------------------------------------------------------
इन्शा अल्लाह, जगाचा एकमेव देव "अल्लाह"च होईल !
--------------------------------------------------------
मलेशियात ६० टक्के लोक मुस्लिम ( एथनिक चायनीज ) आहेत व त्यांच्याकडे ख्रिश्चन लोक त्यांच्या God लाही अल्लाच म्हणतात. त्याविरुद्ध "द हेराल्ड" वृत्तपत्राविरुद्ध तिथल्या सरकारच्या गृहमंत्र्याने कोर्टात धाव घेतली व मुस्लिमांशिवाय इतरांना "अल्लाह" हा शब्द वापरायला मनाई केली. त्याविरुद्ध खालच्या कोर्टाने २००९ मध्ये पूर्वीचे ख्रिश्चनही हा "अल्लाह" त्यांच्या God साठी वापरत होते व ते तसे वापरू शकतात असा निर्णय दिला. त्याविरुद्ध त्यांच्या सरकारने अपील केले व नुकताच तीन मुस्लिम न्यायाधीशांच्या पीठाने हा शब्द फक्त मुस्लिमच वापरू शकतात असा निर्णय दिला. आता "द हेराल्ड" व ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे सर्वोच्च न्यायालयात ह्या निर्णयाविरुद्ध जाणार आहेत. ( खालची बातमी वाचा ).
इन्शा अल्लाह ( इफ गॉड विलस्‌, देवाच्या इच्छेने ) जगाचा एकमेव देव "अल्लाह"च होवो, हे मलेशियाच्या मुसलमानांना का बरे वाटत असावे ? इतर धर्मांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देवाला जर "अल्लाह" म्हणायला सुरुवात केली तर त्यात "अल्लाह"चा विजयच नाही का ? पण ह्यांना "अल्लाह"च्या विजयापेक्षा इस्लामचा विजय जास्त प्यारा असावा. म्हणजे तुम्ही मुस्लिम असाल तरच  मग तुमच्या देवाला "अल्लाह" म्हणा ! समजा, उद्या मुसलमानांची मते मिळावीत ह्या उद्देशापायी वा सर्वधर्मसमभाव ह्या उदात्त ध्येयापायी जर आपण गणपतीलाही "अल्लाह" म्हणायला सुरुवात केली व आरोळ्या दिल्या की "बाप्पा-अल्लाह मोर्या, पुढच्या वर्षी लौकर या !" तर हा सर्वधर्मसमभाव मुसलमानांना आवडू नये ? त्याला त्यांनी कोर्टामार्फत बंदी आणावी ?
इन्शा अल्लाह, हे जगाच्या देवा, तू "अल्लाह" हो !
-------------------------------------------------------------

डोळे हे जुल्मी गडे...

---------------------------------------------
डोळे हे जुल्मी गडे.....
-------------------------------
डोळे हे जुल्मी गडे,
रोखोनी मज पाहू नका...
हे जुने गाणे आठवण्याचे कारण एका विद्यापीठाने केलेले संशोधन असे सांगत आहे की जे लोक इतरांच्या डोळ्यात डोळे घालून, रोखून आपले मत पटविण्याचा प्रयत्न करतात त्यांना यश येत नाही. ज्याच्यावर तुम्ही डोळे रोखता तो तुमच्या मताशी सहमत होत नाही. त्याला तुम्ही सांगत असलेले मत पटत नाही.
आणि ह्याला उत्क्रांतीची साथ घेतलेली आहे. डोळे रोखण्याने आपली आक्रमकता दुसर्‍याला जास्त दिसते व तो डोळ्याला डोळा भिडवणे टाळतो असे आढळून आले आहे. ह्या ठिकाणी मारकुट्या मास्तरांचे डोळे वटारणे आठवून बघा. किंवा घरी जेव्हा वडीलधारे केव्हा रागाने अंगावर धावून येत डोळे रोखत जो उद्धार करीत असत ते आठवा. साहजिकच आता जर बॉसने डोळ्यात खाली पाहात आपल्याला काही सुनवावे हे कोणाला रास्त वाटेल.
तेव्हा हे संशोधन  रास्तच वाटणारे आहे. आणि गंमत म्हणजे ह्यावर जो तोडगा सुचवला आहे तोही मोठा मनोज्ञ आहे. संशोधक म्हणतात की जे ओठ-तोंड-गाल-हनुवटी ह्याकडे पाहतात ते जास्त सहमत होतात. इथे सुद्धा जर काही लोकांनी तोंड वेंगाडले असेल व ते आपल्याला दिसले असेल तर मात्र त्याच्या मताशी कोणीही सहमत होणार नाही हे ओघानेच येते.
तेव्हा तोंड सोज्वळ ठेवा व रोखून कोणाच्या डोळ्यात बघू नका.....
-------------------------------------

Monday, October 10, 2016

परोक्ष--अपरोक्ष

-------------------------------------
परोक्ष--अपरोक्ष
-----------------------
मूळ संस्कृतातल्या शब्दाचा मराठीतला रूढ अर्थ कसा नेमका विरोधी रूढ होतो, त्याचे उदाहरण परोक्ष-अपरोक्ष ह्या शब्दाने देतात. संस्कृतात परोक्ष म्हणजे डोळ्याआड ( अक्ष म्हणजे डोळा व परा म्हणजे पलीकडे ) असा अर्थ असताना तो मराठीत डोळ्यासमक्ष असा का रूढ व्हावा हे मोठे बघण्यासारखे आहे.
भाषाशास्त्रात एक मतप्रवाह असा आहे की शब्द हे अर्थात भेद करण्यासाठी केलेले असतात. म्हणजे "झाड" ह्या शब्दाला काही मूलभूत अर्थ असत नाही, तो फक्त भाड, माड, जाड,...वगैरे त्यासारख्याच शब्दांच्या अर्थापासून वेगळे करण्यासाठी केलेला शब्द असतो. काही शब्द हे जेव्हा एखाद्या जात-प्रकाराबद्दल असतात ( जसे: झाड) तेव्हा त्यात एक संपूर्ण उपप्रकारांची साखळीही त्यात येते. जसे: झाड मध्ये, झुडूप, वृक्ष, रोपटे, वगैरे प्रकारही येतात. मग त्यात नेमकेपणा येण्यासाठी आपण हे उपप्रकार निर्माण करतो. पण काही ठिकाणी दोन टोकांचे दोनच प्रकार असले की मग दोनच शब्द संभवतात. जसे: परोक्ष म्हणजे ( रूढार्थाने, डोळ्यादेखत ) व अपरोक्ष म्हणजे डोळ्याआड. मग हे भेद करणारे शब्द नेमके उलटतात कसे ?
"शहाणा" हा शब्द कित्येक वेळा छद्‌मीपणे आपण उलट अर्थाने वापरतो. जसे : तू फारच शहाणा आहेस, हं !, तसेच सध्या रूढ असलेला वाक्‌प्रचार पहा : "वाट लागली ". ह्याला मूळचा दिशादर्शक अर्थ सोडून त्याचा नकारात्मक अर्थ केला आहे.असेच आहे : "दिवे ओवाळणे"! ह्या प्रकारात कदाचित्‌ आपली मूळ बंडखोर वृत्तीही कामी येत असावी, ज्यामुळे दिलेल्या अर्थाचा शब्द फिरवून आपण त्याला विरुद्धी करतो.
शिवाय विरुद्ध अर्थांच्या शब्दांच्या जोड्या पाहिल्या तर असे दिसेल की त्या करताना आपण त्या "यमकी" करतो. जसे: अनुज-अग्रज; अतिवृष्टी-अनावृष्टी; अधोगती-प्रगती; अपेक्षित-अनपेक्षित; आशा-निराशा; इष्ट-अनिष्ट; उन्न्ती-अवनती; उचित-अनुचित; उच्च-नीच; कृपा-अवकृपा; चल-अचल; माहेर-सासर; सगुण-निर्गुण; स्वदेशी-विदेशी...वगैरे. ही आपली चाल इतकी उल्लेखनीय आहे की एकूण जोड्यांच्या ७० टक्के जोड्या अशा यमकी उच्चारांच्या असतात, ज्यामुळे एका शब्दाच्या विरोधी अर्थाचा शब्द तयार होतो. तर त्यात उच्चार-साम्यामुळे आपली गफलत होत असावी. नुकतीच बोलू लागलेली मुले ह्या चुका हमखास करतात असे आपण पाहतोच.

---------------------------