---------------------------------------------
डोळे हे जुल्मी गडे.....
-------------------------------
डोळे हे जुल्मी गडे,
रोखोनी मज पाहू नका...
हे जुने गाणे आठवण्याचे कारण एका विद्यापीठाने केलेले संशोधन असे सांगत आहे की जे लोक इतरांच्या डोळ्यात डोळे घालून, रोखून आपले मत पटविण्याचा प्रयत्न करतात त्यांना यश येत नाही. ज्याच्यावर तुम्ही डोळे रोखता तो तुमच्या मताशी सहमत होत नाही. त्याला तुम्ही सांगत असलेले मत पटत नाही.
आणि ह्याला उत्क्रांतीची साथ घेतलेली आहे. डोळे रोखण्याने आपली आक्रमकता दुसर्याला जास्त दिसते व तो डोळ्याला डोळा भिडवणे टाळतो असे आढळून आले आहे. ह्या ठिकाणी मारकुट्या मास्तरांचे डोळे वटारणे आठवून बघा. किंवा घरी जेव्हा वडीलधारे केव्हा रागाने अंगावर धावून येत डोळे रोखत जो उद्धार करीत असत ते आठवा. साहजिकच आता जर बॉसने डोळ्यात खाली पाहात आपल्याला काही सुनवावे हे कोणाला रास्त वाटेल.
तेव्हा हे संशोधन रास्तच वाटणारे आहे. आणि गंमत म्हणजे ह्यावर जो तोडगा सुचवला आहे तोही मोठा मनोज्ञ आहे. संशोधक म्हणतात की जे ओठ-तोंड-गाल-हनुवटी ह्याकडे पाहतात ते जास्त सहमत होतात. इथे सुद्धा जर काही लोकांनी तोंड वेंगाडले असेल व ते आपल्याला दिसले असेल तर मात्र त्याच्या मताशी कोणीही सहमत होणार नाही हे ओघानेच येते.
तेव्हा तोंड सोज्वळ ठेवा व रोखून कोणाच्या डोळ्यात बघू नका.....
-------------------------------------
Thursday, October 13, 2016
डोळे हे जुल्मी गडे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment