चुका सुधाराव्यात का ?
-----------------------------------
माझ्या एका मावसभावाचे आडनाव आहे खरवडकर. आजकाल ख हे पहिल्या र ला व जोडून काढतात व त्यामुळे ते ख आहे हे कळते. पण पूर्वीच्या अक्षरांच्या खिळ्यात ख हे “रव” र आणि व मिळून काढीत असत. त्यामुळे त्यांच्या आडनावाचा उच्चार अनेक लोक रवरवडकर असा करीत.
वेस्ट इंडीजला माझ्या बॉसचे नाव होते बजाज. तिकडे j चा उच्चार ह किंवा य करीत व त्यामुळे त्यांचे नाव आले की लोकांची बोबडी वळे व ते म्हणत बयाय !
कधी कधी जेवताना एखादे शीत आपल्या ओठाला तोंडावर तसेच राहून जाते. ते आपल्या लक्षात येत नाही. अशावेळी ते त्या माणसाला सांगावे का ? काही लोकांच्या मते सांगू नये. कारण त्याने त्या माणसाला ओशाळल्यागत होते.
असेच भाषेचे होत असेल का ? एखादे वाक्य कोणी चुकीचे म्हणत असेल तर त्याला तिथल्या तिथे सुधारावे का ? भाषा ही प्रत्येकाची एक खेळण्याची मुभा असलेले सृजन आहे. जे वाक्य पद्यात चालते ते गद्यात व्याकरणदृष्ट्या चालत नाही असे होऊ शकते. मग ते एखाद्याने चूक म्हटले असेल व ते तुम्हाला कळले असेल तर कशाला सुधारावे ? कदाचित अशीच चूक करीत करीत लोक भाषेलाच सुधारून टाकतील व मग त्या लोकांना ती चूक वाटणारही नाही.
पूर्वी प्रत्येक बिलाखाली लिहिलेले असे : चूभूदेघे किंवा चूभूद्याघ्या. ( चूक भूल देणे घेणे किंवा चूक भूल द्यावी घ्यावी ). हे जरी आजकाल कोणत्याही टिपणाखाली लिहिलेले नसले तरी चूक भूल द्यावी घ्यावी, हेच बरे !
------------------
No comments:
Post a Comment