-------------------------------------
परोक्ष--अपरोक्ष
-----------------------
मूळ संस्कृतातल्या शब्दाचा मराठीतला रूढ अर्थ कसा नेमका विरोधी रूढ होतो, त्याचे उदाहरण परोक्ष-अपरोक्ष ह्या शब्दाने देतात. संस्कृतात परोक्ष म्हणजे डोळ्याआड ( अक्ष म्हणजे डोळा व परा म्हणजे पलीकडे ) असा अर्थ असताना तो मराठीत डोळ्यासमक्ष असा का रूढ व्हावा हे मोठे बघण्यासारखे आहे.
भाषाशास्त्रात एक मतप्रवाह असा आहे की शब्द हे अर्थात भेद करण्यासाठी केलेले असतात. म्हणजे "झाड" ह्या शब्दाला काही मूलभूत अर्थ असत नाही, तो फक्त भाड, माड, जाड,...वगैरे त्यासारख्याच शब्दांच्या अर्थापासून वेगळे करण्यासाठी केलेला शब्द असतो. काही शब्द हे जेव्हा एखाद्या जात-प्रकाराबद्दल असतात ( जसे: झाड) तेव्हा त्यात एक संपूर्ण उपप्रकारांची साखळीही त्यात येते. जसे: झाड मध्ये, झुडूप, वृक्ष, रोपटे, वगैरे प्रकारही येतात. मग त्यात नेमकेपणा येण्यासाठी आपण हे उपप्रकार निर्माण करतो. पण काही ठिकाणी दोन टोकांचे दोनच प्रकार असले की मग दोनच शब्द संभवतात. जसे: परोक्ष म्हणजे ( रूढार्थाने, डोळ्यादेखत ) व अपरोक्ष म्हणजे डोळ्याआड. मग हे भेद करणारे शब्द नेमके उलटतात कसे ?
"शहाणा" हा शब्द कित्येक वेळा छद्मीपणे आपण उलट अर्थाने वापरतो. जसे : तू फारच शहाणा आहेस, हं !, तसेच सध्या रूढ असलेला वाक्प्रचार पहा : "वाट लागली ". ह्याला मूळचा दिशादर्शक अर्थ सोडून त्याचा नकारात्मक अर्थ केला आहे.असेच आहे : "दिवे ओवाळणे"! ह्या प्रकारात कदाचित् आपली मूळ बंडखोर वृत्तीही कामी येत असावी, ज्यामुळे दिलेल्या अर्थाचा शब्द फिरवून आपण त्याला विरुद्धी करतो.
शिवाय विरुद्ध अर्थांच्या शब्दांच्या जोड्या पाहिल्या तर असे दिसेल की त्या करताना आपण त्या "यमकी" करतो. जसे: अनुज-अग्रज; अतिवृष्टी-अनावृष्टी; अधोगती-प्रगती; अपेक्षित-अनपेक्षित; आशा-निराशा; इष्ट-अनिष्ट; उन्न्ती-अवनती; उचित-अनुचित; उच्च-नीच; कृपा-अवकृपा; चल-अचल; माहेर-सासर; सगुण-निर्गुण; स्वदेशी-विदेशी...वगैरे. ही आपली चाल इतकी उल्लेखनीय आहे की एकूण जोड्यांच्या ७० टक्के जोड्या अशा यमकी उच्चारांच्या असतात, ज्यामुळे एका शब्दाच्या विरोधी अर्थाचा शब्द तयार होतो. तर त्यात उच्चार-साम्यामुळे आपली गफलत होत असावी. नुकतीच बोलू लागलेली मुले ह्या चुका हमखास करतात असे आपण पाहतोच.
---------------------------
No comments:
Post a Comment