Tuesday, August 9, 2016

अपंगांची आपंगिता

अपंगांची  आपंगिता

शब्दांची मोठी गंमत असते.

पग म्हणजे पाय असतात. तर ते ज्याला नसतात त्याला पंगु म्हणतात. आता अ म्हणजे नसणे धरले व अपंग म्हणजे जो पंगु नाही असे झाले तर ? मग शब्दकोश वाले म्हणतात अहो अ आधी लागला की तो दाखवतो १) सादृश्य ( जसे अब्राह्मण म्हणजे ब्राह्मणासारखा) २) अभाव ३) भेद ४) लघुत्व ५) अप्रशस्तपणा ६) विरोध. म्हणजे इथे अपंग हा “पंगुसारखा” असे धरायचे. शिवाय “जयासी आपंगिता नाही” म्हणताना तेच प्रेमाने जवळ घेणे होते. पांग फेडल्यासारखे !

इंग्रजीत अपंग ला Handicappedम्हणत. त्यात पाया ऐवजी ( हॅंड ), हात काय करताहेत ? शिवाय टोपी ? तर म्हणतात की कोण्या एका खेळात ( बहुदा गोल्फ ) सगळे लोक जमा केलेले पैसे एका टोपीत गोळा करीत व लोक आपल्या खेळातल्या यशाप्रमाणे हात घालीत, भरभरून घेत किंवा रिकाम्या हाताने. “हॅंड इन कॅप” चे मग हॅंडीकॅप्ड झाले म्हणतात. सगळ्यांना समान न्याय मिळावा म्हणून ज्याचे त्याचे हॅंडीकॅप ( खेळातले अवघडलेपण ) ठरवीत. ज्या लोकांचे हातपाय धड आहेत तेच नेहमी जिंकू नयेत म्हणून, खरे तर, त्यांना हॅंडीकॅप द्यायचे, तर जे अधू आहेत त्यांनाच आपण हॅंडीकॅप्ड म्हणायला लागलो !

अपंग म्हणा किंवा सक्षम, आपंगिता बाळगा म्हणजे झाले !

---------------------------------       

No comments:

Post a Comment