Monday, August 8, 2016

यशापयश

---------------------------
यशापयश
--------------
चार माणसे जमली की यशापयशाच्या कितीही व्याख्या करू म्हटले तरी पैसे हे अपरिहार्यपणे मध्ये येतेच. बरे आता आपली वये अशी अस्ताला झुकलेली असताना आता ह्या परामर्षाचा काही उपयोगही नसतो. मुंबई बर्‍याच जणांना ह्याच साठी आवडते की इथे यशाचे उंचीचे टोक इतके गगनाला भिडलेले असते की भल्याभल्यांना माना खाली घालाव्याच लागतात. एखाद्याला आपला फ्लॅट आता एक कोटीचा झाला ह्याचा जरा अभिमान यायला लागला की नेपियन सी रोडवरचा कोणी तरी असा भेटतो की ज्याच्या फ्लॅटचा भाव ३०/४० कोटींचा असतो. आता त्याच्यापुढे कोणीही "किस झाड की पत्ती".
त्यामुळे आपला साहजिकच कल होतो की नकोच कोणाला भेटणे किंवा असा यशापयशाचा परामर्ष घेणे. कारण आता कळले तरी आपण करणार काय ? असेच वाटणे असते एक चांगला पालक ( आई वा बाप ) होण्याचे. कधी सरदारी बेगम सिनेमा आठवून पहा. बेगमच्या आयुष्यात किती वळणे, किती खाली वरच्या जागा. आणि मरताना तिच्या मनाला लागून राहिलेला घोर कोणता ? तर, ती मुलीला विचारते की आता सांग, मी एक चांगली आई होते की नाही ? आता चांगल्या आईची काय लक्षणे, त्यातली तिने किती पुरी केली हे सगळे कसे ठरवायचे ? म्हणूनच कदाचित्‌ नोबेल पारितोषिक वाले "चांगली आई", वा "चांगला बाप" अशी पारितोषिके देत नसावेत !
साहित्याच्या दर्जाचेही असेच होते. कित्येकांचे नशीब बलवत्तर असते त्यांची पुस्तके खपतात, त्यांना योग्य स्थानावरचे लोक मानमरातब देतात, झालं.....मिळतो त्यांना दर्जा ! ज्यांना अजून नाही मिळाला त्यांनी मुकाट खालमानाने पाताळात आपापले वेगळे निकष हुडकावेत, किंवा असेच सहन करावे/दुर्लक्षावे. न पेक्षा आपण दर्जाहीनतेच्या वावरात तुरळक कोठे काही अंकुर दिसतात का ते पाहावे व दिसले तर डोळे सुखवावेत, व नाही दिसले तर कल्पावेत !
------------------------------------------

No comments:

Post a Comment