Thursday, October 20, 2016

सडाफटिंग

------------------------
सडाफटिंग
---------------
ज्याला संसार नाही, काही आगापिच्छा नाही, जो एकटा आहे त्याला सडाफटिंग म्हणतात. सडाफटिंग ह्या शब्दात तसे दोन शब्द आहेत. सडा व फटिंग. दोन्हीचे अर्थ एकटा असेच आहेत. सड हे जनावरांच्या ( विशेषत: गाय, शेळी, म्हैस ह्या दूध देणार्‍या जनावरांच्या ) आंचळाला म्हणतात. ह्या आंचळांचा आकार पाहता त्याची रुंदी कमी व लांबी जास्त ह्या आकारावरूनच आपण सडसडीत ह्या शब्दाचा अर्थ काढतो. तसेच सडपातळ. कदाचित्‌ सडा/सडी माणसे ही अशीच सडपातळ असावीत व त्यावरून सडा/सडी झाले असावे. एकटा ह्याच अर्थाचे इतर समानार्थी शब्द आहेत : सोट, सोटभैरव, झोटिंग वगैरे.
फटिंग म्हणजेही एकटा, कुठलेही पाश नसलेला. तुकाराम महाराजांनी एका अभंगात असे म्हटले आहे : फटयाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2॥ तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3॥ इथे "फटया" म्हणजे संसार नसलेला, एकटा ह्या अर्थाने तिरस्कार केलेला हा माणूस विश्वास ठेवण्यास पात्र नाही असे म्हणताना कदाचित संसारी माणूस हा जास्त जबाबदार असतो असे सामाजिक निकषाने म्हटले असावे हे उघडच आहे. असेच "फटिंग" हा उल्लेख भा.रा.तांबे ह्यांच्या एका कवितेत असा येतो: ( म्हातार्‍या नवरदेवाची तक्रार ) : गहनविपिनीं करि गौरि घोर तप,---जरठास्तव नवयुवती करी जप,---नीरस हर तो भणंग जोगी,---रसे रसरसे ही सुखभोगी,---फटिंग तो, ही तपे वियोगी,---स्मरारि तो, ही स्मरसुखलोलुप,---उपवर मुलींनो कित्ता गिरवा,---त्यजुनि फाकडा धटिंग हिरवा,---फटिंग जोगी पिकला भगवा,---वरा ! पुजा हर सफल गतत्रप,----नशीब अमुचे जरठ वरांचे---सोंगाड्या मुलि, ढोंग जपाचे,----लचके रुचती या तरुणांचे---नातरि वरितो मुली सपासप,---आजोबा या म्हणती अम्हाला,---ठार करिती उरी खुपसुनि भाला,----गौरि असें का म्हणे हराला,---पाहुनि घेइल शंभु भवाधिप !
आजकाल मुलीही अशा एकट्या राहतात. त्यांच्यासाठी सडी हा शब्द आहेच. तेव्हा सडाफटिंग मुलींसाठी सडीफटिंग आपण म्हणू शकतो, किंवा सडीफटिंगा किंवा सडीफटिंगी !
---------------------------------

No comments:

Post a Comment