---------------------------------------
साळकाया माळकाया
-------------------------
कोणत्या शब्दाची काय व्युत्पत्ती आहे, तो कसा आला आहे, आधी तो कसा होता, या सगळ्यांपेक्षा सध्या तो लोक कसा वापरतात ह्याला जास्त महत्व असायला हवे. तोच त्याचा खरा अर्थ. म्हणूनच भाषाशास्त्रात असे एक वचन आहे की Meaning is usage. म्हणजे वापर हाच अर्थ !
तसा अर्थ लावायला गेलं तर साळ म्हणजे वरच्या टरफलासकटचे तांदुळाचे रोप असा अर्थ काढला तर मग त्याप्रमाणे काया असणार्या बायका असे केले तर ज्या साळकाया माळकाया असतात त्या काही अशा सडपातळ वगैरे अशा असत नाहीत. तर मग ह्या अशा विशेषणाचा काय अर्थ असावा ?
तिरस्कार दाखवण्याचा एक प्रकार असा आहे की तुम्ही कोणीही विशेष नाही आहात, अगदी सामान्य, चारचौघीसारख्या नगण्य आहात असे रॅंडमनेस दाखवण्याचा. ह्याचा अर्थ कोणीही, काहीही वैशिष्ट्य नसलेल्या, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. साळकाया-माळकाया ह्या वर्णनाने आपण ज्या बायकांचा उल्लेख करतो त्यांना खास असे काही वैशिष्ट्य नसते, त्या कोणीही असू शकतात. जसे गणितात रॅंडम नंबर म्हणजे कोणताही आकडा, ज्याला काही ताळतंत्र नाही असा, अशाच ह्या बायका. हे अपमान करण्याचे मोठे हमखास यशस्वी ठरणारे छदमी विशेषण आहे, काहीच वैशिष्ट्य नाही असे सांगणारे विशेषण !
सोम्या गोम्या, आंडू पांडू, टॉम-डिक-ऍंड-हॅरी, असेच म्हणून कोणाही सामान्य वकूबाच्या पुरुषालाही आपण अपमानकारक विशेषण करू शकतो !
-----------------------------------
Thursday, October 20, 2016
साळकाया माळकाया
सडाफटिंग
------------------------
सडाफटिंग
---------------
ज्याला संसार नाही, काही आगापिच्छा नाही, जो एकटा आहे त्याला सडाफटिंग म्हणतात. सडाफटिंग ह्या शब्दात तसे दोन शब्द आहेत. सडा व फटिंग. दोन्हीचे अर्थ एकटा असेच आहेत. सड हे जनावरांच्या ( विशेषत: गाय, शेळी, म्हैस ह्या दूध देणार्या जनावरांच्या ) आंचळाला म्हणतात. ह्या आंचळांचा आकार पाहता त्याची रुंदी कमी व लांबी जास्त ह्या आकारावरूनच आपण सडसडीत ह्या शब्दाचा अर्थ काढतो. तसेच सडपातळ. कदाचित् सडा/सडी माणसे ही अशीच सडपातळ असावीत व त्यावरून सडा/सडी झाले असावे. एकटा ह्याच अर्थाचे इतर समानार्थी शब्द आहेत : सोट, सोटभैरव, झोटिंग वगैरे.
फटिंग म्हणजेही एकटा, कुठलेही पाश नसलेला. तुकाराम महाराजांनी एका अभंगात असे म्हटले आहे : फटयाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2॥ तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3॥ इथे "फटया" म्हणजे संसार नसलेला, एकटा ह्या अर्थाने तिरस्कार केलेला हा माणूस विश्वास ठेवण्यास पात्र नाही असे म्हणताना कदाचित संसारी माणूस हा जास्त जबाबदार असतो असे सामाजिक निकषाने म्हटले असावे हे उघडच आहे. असेच "फटिंग" हा उल्लेख भा.रा.तांबे ह्यांच्या एका कवितेत असा येतो: ( म्हातार्या नवरदेवाची तक्रार ) : गहनविपिनीं करि गौरि घोर तप,---जरठास्तव नवयुवती करी जप,---नीरस हर तो भणंग जोगी,---रसे रसरसे ही सुखभोगी,---फटिंग तो, ही तपे वियोगी,---स्मरारि तो, ही स्मरसुखलोलुप,---उपवर मुलींनो कित्ता गिरवा,---त्यजुनि फाकडा धटिंग हिरवा,---फटिंग जोगी पिकला भगवा,---वरा ! पुजा हर सफल गतत्रप,----नशीब अमुचे जरठ वरांचे---सोंगाड्या मुलि, ढोंग जपाचे,----लचके रुचती या तरुणांचे---नातरि वरितो मुली सपासप,---आजोबा या म्हणती अम्हाला,---ठार करिती उरी खुपसुनि भाला,----गौरि असें का म्हणे हराला,---पाहुनि घेइल शंभु भवाधिप !
आजकाल मुलीही अशा एकट्या राहतात. त्यांच्यासाठी सडी हा शब्द आहेच. तेव्हा सडाफटिंग मुलींसाठी सडीफटिंग आपण म्हणू शकतो, किंवा सडीफटिंगा किंवा सडीफटिंगी !
---------------------------------
कवळी
कवळी
----------
कवळी म्हणजे कृत्रीम दातांची जोडी हा अर्थ किंवा कोणत्याही शब्दाचा अर्थ आपल्याला कुठलाही शब्दकोश वा व्युत्पत्तीकोश न पाहता कळला तर किती बरे होईल नाही का ? लहानपणी नाही का, आपल्याला मम्मम्, भुभू, पापा, भुर्र, टाटा...असे अनेक शब्द असे आपसुक कळत होते ? अन् आत्ताच का शब्दकोश, व्युत्पत्तीकोश लागावेत ?
आपण म्हणे जास्त शब्द हे association ने, संदर्भाने शिकतो. जसे वर पाहून बाळाला विचारले की पंखा कुठेय, पंखा ? तर स्मार्ट बाळ वर पाहते व वर फिरणारा पंखाच असतो, त्याकडे बोट दाखवते. असे दोन चारदा गिरवून झाले की मग ते बाळ, कोणीही विचारले की बरोबर सहज पंखा दाखवते.
चला अशा संदर्भाने "कवळी" बघू. कव व त्याच्यापुढचे एकूण शब्द शब्दकोशात आहेत: ६५. कव चा अर्थ दिलाय : वेंध, मिठी, झडप, उडी. वेंध म्हणजे भोक,छिद्र, फट अशी लहान जागा. कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे ( मिठीत फट रहात नाही), कवळी शेंग म्हणजे इतकी बारीक की अगदी फटीत मावावी, कवळणे म्हणजे इतकी घट्ट मिठी की अजिबात फट राहू नये, कवटी ने मेंदूला इतके फिट्ट केलेले असते की अजिबात पोकळी नसते ( म्हातारपणी मेंदू आकुंचतो व फट पडते व त्यात स्त्राव /hemorrhage होतो, कवडसा हा छिद्रातून येणारा प्रकाश असतो, कवन/कविता/कवि हे मिठी मारणारेच आहेत,.....तर असे एकूण ४५ (६८%) शब्द असे आढळतात की जे फटीसंबंधी आहेत.
तोंड ( दात असणारे) ही तशी एक फटच असून त्यात दात ओळीने बसलेले आहेत. मग त्या फटीत (कव) मावेल अशी कृत्रीम दातांची ती कवळीच असणार !
------------
Thursday, October 13, 2016
इन्शा अल्लाह, तू अल्लाह हो...
-------------------------------------------------------------
इन्शा अल्लाह, जगाचा एकमेव देव "अल्लाह"च होईल !
--------------------------------------------------------
मलेशियात ६० टक्के लोक मुस्लिम ( एथनिक चायनीज ) आहेत व त्यांच्याकडे ख्रिश्चन लोक त्यांच्या God लाही अल्लाच म्हणतात. त्याविरुद्ध "द हेराल्ड" वृत्तपत्राविरुद्ध तिथल्या सरकारच्या गृहमंत्र्याने कोर्टात धाव घेतली व मुस्लिमांशिवाय इतरांना "अल्लाह" हा शब्द वापरायला मनाई केली. त्याविरुद्ध खालच्या कोर्टाने २००९ मध्ये पूर्वीचे ख्रिश्चनही हा "अल्लाह" त्यांच्या God साठी वापरत होते व ते तसे वापरू शकतात असा निर्णय दिला. त्याविरुद्ध त्यांच्या सरकारने अपील केले व नुकताच तीन मुस्लिम न्यायाधीशांच्या पीठाने हा शब्द फक्त मुस्लिमच वापरू शकतात असा निर्णय दिला. आता "द हेराल्ड" व ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे सर्वोच्च न्यायालयात ह्या निर्णयाविरुद्ध जाणार आहेत. ( खालची बातमी वाचा ).
इन्शा अल्लाह ( इफ गॉड विलस्, देवाच्या इच्छेने ) जगाचा एकमेव देव "अल्लाह"च होवो, हे मलेशियाच्या मुसलमानांना का बरे वाटत असावे ? इतर धर्मांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देवाला जर "अल्लाह" म्हणायला सुरुवात केली तर त्यात "अल्लाह"चा विजयच नाही का ? पण ह्यांना "अल्लाह"च्या विजयापेक्षा इस्लामचा विजय जास्त प्यारा असावा. म्हणजे तुम्ही मुस्लिम असाल तरच मग तुमच्या देवाला "अल्लाह" म्हणा ! समजा, उद्या मुसलमानांची मते मिळावीत ह्या उद्देशापायी वा सर्वधर्मसमभाव ह्या उदात्त ध्येयापायी जर आपण गणपतीलाही "अल्लाह" म्हणायला सुरुवात केली व आरोळ्या दिल्या की "बाप्पा-अल्लाह मोर्या, पुढच्या वर्षी लौकर या !" तर हा सर्वधर्मसमभाव मुसलमानांना आवडू नये ? त्याला त्यांनी कोर्टामार्फत बंदी आणावी ?
इन्शा अल्लाह, हे जगाच्या देवा, तू "अल्लाह" हो !
-------------------------------------------------------------
डोळे हे जुल्मी गडे...
---------------------------------------------
डोळे हे जुल्मी गडे.....
-------------------------------
डोळे हे जुल्मी गडे,
रोखोनी मज पाहू नका...
हे जुने गाणे आठवण्याचे कारण एका विद्यापीठाने केलेले संशोधन असे सांगत आहे की जे लोक इतरांच्या डोळ्यात डोळे घालून, रोखून आपले मत पटविण्याचा प्रयत्न करतात त्यांना यश येत नाही. ज्याच्यावर तुम्ही डोळे रोखता तो तुमच्या मताशी सहमत होत नाही. त्याला तुम्ही सांगत असलेले मत पटत नाही.
आणि ह्याला उत्क्रांतीची साथ घेतलेली आहे. डोळे रोखण्याने आपली आक्रमकता दुसर्याला जास्त दिसते व तो डोळ्याला डोळा भिडवणे टाळतो असे आढळून आले आहे. ह्या ठिकाणी मारकुट्या मास्तरांचे डोळे वटारणे आठवून बघा. किंवा घरी जेव्हा वडीलधारे केव्हा रागाने अंगावर धावून येत डोळे रोखत जो उद्धार करीत असत ते आठवा. साहजिकच आता जर बॉसने डोळ्यात खाली पाहात आपल्याला काही सुनवावे हे कोणाला रास्त वाटेल.
तेव्हा हे संशोधन रास्तच वाटणारे आहे. आणि गंमत म्हणजे ह्यावर जो तोडगा सुचवला आहे तोही मोठा मनोज्ञ आहे. संशोधक म्हणतात की जे ओठ-तोंड-गाल-हनुवटी ह्याकडे पाहतात ते जास्त सहमत होतात. इथे सुद्धा जर काही लोकांनी तोंड वेंगाडले असेल व ते आपल्याला दिसले असेल तर मात्र त्याच्या मताशी कोणीही सहमत होणार नाही हे ओघानेच येते.
तेव्हा तोंड सोज्वळ ठेवा व रोखून कोणाच्या डोळ्यात बघू नका.....
-------------------------------------
Monday, October 10, 2016
परोक्ष--अपरोक्ष
-------------------------------------
परोक्ष--अपरोक्ष
-----------------------
मूळ संस्कृतातल्या शब्दाचा मराठीतला रूढ अर्थ कसा नेमका विरोधी रूढ होतो, त्याचे उदाहरण परोक्ष-अपरोक्ष ह्या शब्दाने देतात. संस्कृतात परोक्ष म्हणजे डोळ्याआड ( अक्ष म्हणजे डोळा व परा म्हणजे पलीकडे ) असा अर्थ असताना तो मराठीत डोळ्यासमक्ष असा का रूढ व्हावा हे मोठे बघण्यासारखे आहे.
भाषाशास्त्रात एक मतप्रवाह असा आहे की शब्द हे अर्थात भेद करण्यासाठी केलेले असतात. म्हणजे "झाड" ह्या शब्दाला काही मूलभूत अर्थ असत नाही, तो फक्त भाड, माड, जाड,...वगैरे त्यासारख्याच शब्दांच्या अर्थापासून वेगळे करण्यासाठी केलेला शब्द असतो. काही शब्द हे जेव्हा एखाद्या जात-प्रकाराबद्दल असतात ( जसे: झाड) तेव्हा त्यात एक संपूर्ण उपप्रकारांची साखळीही त्यात येते. जसे: झाड मध्ये, झुडूप, वृक्ष, रोपटे, वगैरे प्रकारही येतात. मग त्यात नेमकेपणा येण्यासाठी आपण हे उपप्रकार निर्माण करतो. पण काही ठिकाणी दोन टोकांचे दोनच प्रकार असले की मग दोनच शब्द संभवतात. जसे: परोक्ष म्हणजे ( रूढार्थाने, डोळ्यादेखत ) व अपरोक्ष म्हणजे डोळ्याआड. मग हे भेद करणारे शब्द नेमके उलटतात कसे ?
"शहाणा" हा शब्द कित्येक वेळा छद्मीपणे आपण उलट अर्थाने वापरतो. जसे : तू फारच शहाणा आहेस, हं !, तसेच सध्या रूढ असलेला वाक्प्रचार पहा : "वाट लागली ". ह्याला मूळचा दिशादर्शक अर्थ सोडून त्याचा नकारात्मक अर्थ केला आहे.असेच आहे : "दिवे ओवाळणे"! ह्या प्रकारात कदाचित् आपली मूळ बंडखोर वृत्तीही कामी येत असावी, ज्यामुळे दिलेल्या अर्थाचा शब्द फिरवून आपण त्याला विरुद्धी करतो.
शिवाय विरुद्ध अर्थांच्या शब्दांच्या जोड्या पाहिल्या तर असे दिसेल की त्या करताना आपण त्या "यमकी" करतो. जसे: अनुज-अग्रज; अतिवृष्टी-अनावृष्टी; अधोगती-प्रगती; अपेक्षित-अनपेक्षित; आशा-निराशा; इष्ट-अनिष्ट; उन्न्ती-अवनती; उचित-अनुचित; उच्च-नीच; कृपा-अवकृपा; चल-अचल; माहेर-सासर; सगुण-निर्गुण; स्वदेशी-विदेशी...वगैरे. ही आपली चाल इतकी उल्लेखनीय आहे की एकूण जोड्यांच्या ७० टक्के जोड्या अशा यमकी उच्चारांच्या असतात, ज्यामुळे एका शब्दाच्या विरोधी अर्थाचा शब्द तयार होतो. तर त्यात उच्चार-साम्यामुळे आपली गफलत होत असावी. नुकतीच बोलू लागलेली मुले ह्या चुका हमखास करतात असे आपण पाहतोच.
---------------------------