Wednesday, October 5, 2016

मराठी

मराठी
कुठल्याही साधनांशिवाय ( जसे : शब्दकोश, धातुकोश, व्युत्पत्तीकोश वगैरे ) जे आपल्याला कळते ते सदैव आपल्याबरोबर राहणारे व आपसूक असे असते. तसा प्रयत्न केला तर “मराठी” म्हणजे काय ?
गुजराथी, बंगाली, उडिया वगैरे भाषांच्या नावात त्यांचा प्रांत आहे, पण मराठीत “महाराष्ट्र” बसवायचा तर “हां हां” म्हणता “हा” अडचणीत आणतो. “मरहट्टा” म्हणजे “मराठा” हे ऐकलेले आहे पण त्याने आपण “हट्टी” आहोत हे लोकांना कळले तर ?
मर किंवा मरा हे काही फार चांगले शब्द नाहीत. आणि त्यासाठी मराठी असे ताणले तर ते काही गोड लागत नाही. मुळात “ठी” हा प्रत्ययच रांगडा आहे. काठी, साठी, गाठी, ताठी, नाठी, पाठी, माठी , राठी, लाठी, ह्या शब्दातून ठी असल्याने एक ताठपणा नक्कीच जाणवतो. त्याने मर किंवा मरा ला ताठी येईल खरी पण त्यात ह्या भाषेचे काही कळणे कसे येईल ? उलट मरण्यासाठी ( किंवा मारण्यासाठी ) ती मराठी असे होईल.
म म्हणजे मी, आणि राठ म्हणजे ओबडधोबड असा व माझी भाषा मराठी असे केले तर लोक फारच बिचकतील !
आपले राज्य किंवा राष्ट्र नुसते राष्ट्र नसून ते महा राष्ट्र आहे अशी आपली अस्मिता आहे. त्याला जागायचे तर हा महा-पणा मराठीत यायला हवा. त्या ऐवजी “रा” काय करते आहे इथे ? तर रा हे राजा ह्या अर्थाने घेऊ यात. म ह्या अक्षराचे दैवत तंत्रशास्त्रात “पुरुष” असे आहे. म्हणजे सगळ्या पुरुषात राजा असा जो त्याची भाषा ती “मराठी” !
आज मराठी भाषा दिवस आहे. तेव्हा मराठी सार्थ करायची असेल तर सगळ्या पुरुषात राजा होऊ यात कसे !
-------------------------------------

Tuesday, October 4, 2016

भाषेवर खापर---१५

----------------------------------------------
भाषेवर खापर--१५
बर्‍याच वेळा आपल्याला म्हणायचे असते एक व लोक त्याचा अर्थ काढतात भलताच. तेव्हा एकतर आपण तुम्ही संदर्भ सोडून अर्थ काढताय असे म्हणतो किंवा गैरसमजाचे खापर संस्कृतीवर, वेळेवर, प्रसंगावर किंवा चक्क भाषेवर काढतो. उत्क्रांतीत म्हणतात की माणसाला हाताची बोटे दिली होती ती झाडे वगैरे चढण्यासाठी, फांद्या घट्ट पकडण्यासाठी आणि आजकाल आपण बोटे वापरतोय, चित्रे काढण्यासाठी अक्षरे गिरवण्यासाठी किंवा उमटवण्यासाठी ( संगणकावर ). त्यामुळे एका कामासाठी दिलेली बोटे दुसर्‍या कामाला वापरली तसेच तर भाषेचे होत नसेल ना, असा काही भाषाशास्त्रज्ञांना संशय येतो. म्हणजे असे की समजा भाषा ही केवळ एकमेकाला संदेशवहन करण्यासाठी दिली होती व आपण ती आता विचार करायलाच वापरतोय, असे तर होत नसेल ? पण काही जण म्हणतात की आपण विचार भाषेत ( शब्दात, वाक्यात ) करीत नसून तो चिन्हात करतो. म्हणजे विचारासाठी भाषेचा काही उपयोग नाही. ( लहान मुले नाही का भाषा येत नसली तरी काही तरी विचार करीत असतातच ! ). आता राहता राहिला भाषेचा संदेशवहनासाठीचा उपयोग. त्यातही जर योग्य शब्द, वाक्य वापरूनही गैरसमजच होणार असतील तर खापर भाषेवरच फुटते. आता हे असे खरेच होते का हे काही सांप्रतची काही घडलेली उदाहरणे घेऊन बघू यात.
नॉनसेंस
राहूल गांधी नुकतेच कलंकित नेत्यांना वाचवणार्‍या एका अध्यादेशाबाबत म्हणाले की हा अध्यादेश कंम्लीट नॉनसेंस आहे आणि तो फाडून फेकून द्यायला हवा. त्यावर अनेकांनी हा अपमानास्पद शब्द आहे असे प्रतिपादले. नक्की काय अर्थ होतो "नॉनसेंस"चा ?
पूर्वी मॅट्रिक नापास झालेले स्वत:ला नॉन-मॅट्रिक म्हणवून घेत. त्याचा अर्थ होत असे की मॅट्रिक नापास किंवा मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेले. त्यात काही अपमानास्पद नसे. उलट ह्या कमी शिकलेल्यांना नॉन-मॅट्रिक ही पदवीच वाटे. गांधीजींनी जी अहिंसेची मोहीम काढली होती त्याला आपण म्हणतो नॉन-व्हॉयलेंस. त्यात खरे तर महात्मा गांधी उपासाला बसत त्याचाही समावेश असे. असे उपास करणे हे चांगलेच आक्रमक असे तरीही ते नॉन-व्हायलेंस मध्ये धरल्या जायचे. असेच आपण जे मांसाहारी खातो त्या म्हणतात नॉन-व्हेज. पण चिकन-पालक असा मांसाहारी पदार्थ असेल तर त्यात व्हेज नाही असे कसे ? असेच आहे नॉन-सेंस. पाहणे, ऐकणे, चाखणे, स्पर्शणे, हे झाले आपले सेंस. व तेच नाहीत असे नॉन-सेंस मध्ये होत नाही.
खरे तर अन्‌-नॅचरल व नॉन-नॅचरल ह्यात अन्‌-नॅचरलला जास्त नकारात्मकता आहे व त्या मानाने नॉन-मुळे नेमके नसण्याचे बोध होतात. जे आपण वर नॉन-मॅट्रिक, नॉन-व्हायलेंस, नॉन-व्हेज ह्या शब्दांत पाहिले. पण तरीही नॉन-सेंसला फारच नकारात्मकता आहे. इतकी की इंग्रजीतल्या ज्या पहिल्या वहिल्या दटावण्या ( वा शिव्या ) आपण शिकतो त्यात नॉन-सेंस येते. कारण ह्याचे समानार्थी शब्द आहेत : बंकम, क्लॅपट्रॅप, डबल-डच, आयवाश, फूलिशनेस, गिबरिश, मंबो-जंबो, रॉट, रबिश, सिलिनेस, स्टुपिडिटी, ट्रॅश, मिस्टेक, वगैरे. हे समानार्थी शब्द तसे बर्‍यापैकी अपमानास्पद आहेत. त्याच्या जोडीला जर कोणी कंम्लीट नॉन-सेंस, अटर-नॉनसेंस, शीअर नॉनसेंस असे म्हटले तर अपमानाची सीमाच होते.
त्यामुळे कोणा आईने सांगितले नाही तरी राहूल गांधींना ( व आपल्याला ) हे निश्चितच जाणवावे की नॉन-सेंस हा एक शिवीसारखाच अपमानास्पद शब्द आहे.
------------------------------------------

Monday, October 3, 2016

जिम

जिम !

--------------  

पुन्या ममईच्या लोकाईला बोली बोलाईची म्हणटल तर जीमवानी वाटतय तर बोली बोलणाऱ्याहिंना परमान भाषा जीमवानी वाटतीया.

आमच्या वखताला जिमला हेल्थ क्लब म्हणून राहेयले व्हते लोग. तिठ हेल्थ कमी अन क्लब झाला की काय तेला आखाडा भी म्हणना . मंग म्हणून राहेय्ले जिमखाना. आता डेक्कन जिमखाना ह्यो कंच्या दक्षिणेला ते कळना झालं. अन तेनला तिठ काही खायाच काम दिसना तव्हा निस्त जिम म्ह्नाय्लेत. म्हण्त्येत की खण म्हणायचे त्याचच मंग खाना झालं म्हन. जस दिवाणखाना म्हणटल तर दिवाणजींचा खण.

पन सालं काय असल जिम म्हंजी अगुदार्च्याला. इंग्रजी शबुद तर हायच पन त्यांचंबि आपल्यावानी संस्कृतात समद असतंय तस कशात असल ? तर म्हणत्यात की हा शबुद ग्रीक भाषेतून आलाय म्हण. अन ग्रीक मध तरी जिम का म्हणत असतील तर म्हणत्यात की पहिले तिठ नागड्यान अभ्यास अन आन्घुळी अन व्यायाम करायचे म्हन. अहो म्हंजी कापडं काढुनशान !

आता तुमी जिम लावली अन कापड नाही कहाल्डी तर काय काय दुखणारच किवो !

-------------------------   
-------------------------

जिम / व्यायामशाळा

---------------------- 

जगात आजकाल जी नवी साधने येत आहेत, ( जसे समजा मोबाईल फोन ) ती अशी असतात की साधारण माणसाला सहजी, आपसूक समजावीत. म्हणूनच तर त्याबरोबर काही पुस्तक वगैरे आजकाल देत नाहीत. तुम्ही स्वतः शोधा, शिका आणि वापरा. माणसांचे सगळे व्यवहार असे सहजी समजण्यासारखे झाले की किती सुखकर ना ?

भाषेचे सुद्धा असेच होते. आपण लहानपणी मराठी बोलायचे शिकलो तेव्हा कोणता शब्दकोश आपल्याला माहीत होता ? लहान मुलांना तेव्हा तर लिहायला वाचायला सुद्धा येत नसते पण ते बिनधास्त बोलतात. शब्दांचे सुद्धा असेच नको का ? मग जिम म्हणजे काय ते आपल्याला आपसूक का कळू नये ? तर तो इंग्रजी म्हणून ! मग मराठीत आपल्या आधीचे लोक काय म्हणत ? कदाचित व्यायाम शाळा ?

व्यायाम हा संस्कृत मधून आलेला शब्द. व्य म्हणजे अवयव. व्यायम म्हणजे अवयवांची हालचाल, कसरत. व्यायाम म्हणजे अवयवांचा हालचालीचा सराव.

हे झाले थोडेफार संस्कृत मराठी येणाऱ्यांचे कळणे. पण आजकालची जी एबीसीडी ( अमेरिकन बॉर्न कन्फुज्ड देशी ) मुले आहेत त्यांना कसे कळते जिम म्हणजे ? तर कदाचित : जीव, जिवंत वगैरे मध्ये जी असते म्हणजे काही तरी जगण्याशी जन्मण्याशी संबंध असावा असे ते समजू शकतात. जे फार चूक नाही कारण ज म्हणजे जन्मणे ( जसे कुसुमाग्रज मध्ये कुसुमच्या अगोदर जन्मलेला हा अर्थ होतो तसा ).

तर आजकाल जिवंत राहायचे तर आवश्यक जिमच ना ! झाले ना कळणे आपसूक ?

--------------------      

Sunday, October 2, 2016

रानटी मन व झाडी

रानटी मन व झाडी
--------------------------
लेव्ही स्ट्राउस नावाचा एक प्रसिद्ध मानववंश-शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. त्याचा एक लेख ( Savage Mind ) "रानटी मन" सोबत टाचला आहे.
ह्यात त्याने अमेरिकेतल्या चिनुक भाषेचा ( जे तिथले रानटी लोक बोलत होते ) अभ्यास केलेला आहे. भाषाशास्त्रात असे म्हणतात की एखाद्या भाषेत जितके धूसर ( Abstract ) शब्द असतील तितकी ती भाषा समृद्ध . ह्या चिनुक भाषेत "झाड"  हा धूसर शब्द नसला तरी त्यांना जवळ जवळ ४५० झाडांची नावे माहीत होती, त्या झाडांचे उपयोग माहीत होते वगैरे.
धूसर शब्दांबाबत बोलताना त्याने एक गंमत ह्या चिनुक भाषेची अशी नोंदवली आहे : समजा ह्या चिनुक भाषेत असे म्हणायचेय की "एका गरीब मुलाला एका वाईट माणसाने ठार केले", तर चिनुक भाषेत ते म्हणतील, "एका मुलाच्या गरीबीला एका माणसाच्या वाईटपणाने ठार केले". धूसरता अजून काय रम्य असू शकेल ?
आपले मित्र संकेत मालती भारत हे कधी कधी "झाडी" बोलीबाबत सांगत असतात. तर ह्या झाडी बोलीत अशा किती झाडांची नावे असतील ? एकदा प्रयत्न करून बघायला हवे. झाडीत झाडे किती ?
-------------------------------

परत आकारात

-------------------------------------------------------
नेटके मराठी मथळे
------------------------------
"परत आकारात"     ( मटा दि.३ आक्टोबर २०१३ मधून )
-------------------------------------------
ही बातमी आहे ऐश्वर्या राय ही बाळंतपणात जो लठ्ठपणा येतो त्यातून व्यायाम करून परत आपल्या मूळ सौष्ठवाकडे येते त्यासंबंधी. पण शीर्षक आहे "परत आकारात". आकार लहान किंवा मोठा असतो. म्हणजे रोड किंवा लठ्ठ हे आकारच असतात. त्यामुळे नुसते "परत आकारात" म्हटल्याने ती रोड झालीय ही बातमी पोचत नाही. इंग्रजीत जसे "परत शेप-मध्ये" म्हटले की जो शेपचा सौष्ठव हा अर्थ येतो तो "परत आकारात"ने येत नाही. त्यामुळे शीर्षक हवे होते, "परत सौष्ठवात" किंवा "परत सौष्ठवाकडे". कित्येक वेळा नुसते रोड असणारी व्यक्ती सुंदर, सुडोल दिसेल असे नाही. त्यामुळे सौष्ठवात जसा योग्य ठिकाणी भरदार व योग्य ठिकाणी रोड असा अर्थ येतो तो "आकारात"ने येत नाही.
---------------------------------------------  

Thursday, September 29, 2016

षटशब्दी , षटकर्णी : ११

षटशब्दी, षटकर्णी : ११

अगदी मोजक्या शब्दात सांगता येणे हे मोठे कसब आहे. एकदा दारू-बैठकीत हेमिन्गवे ह्या लेखकाला आव्हान देण्यात आले की कमीत कमी शब्दात गोष्ट सांगायची. आजतागायत त्याने सहा शब्दात लिहिलेली ही गोष्ट सर्वोत्कृष्ट मानल्या जाते : “For sale: baby shoes, never worn.”

“विकणे आहे : बाळाचे बूट, न घातलेले”
----------------------------------------------------

षटशब्दी, षटकर्णी : ११

मराठा तितुका मेळवावा ; नाना मोर्च्यांत खेळवावा !

-------------------

Wednesday, September 28, 2016

षटशब्दी,षटकर्णी ! : ८

षटशब्दी, षटकर्णी ! : 8
------------------------------
भूक मिटली, तहान मिटली, पुढे काय ?

--------------