Sunday, September 4, 2016

गुरू साक्षात !

---------------------------
गुरू साक्षात !
---------------------
आपण गुरू का करतो ? ह्याविषयी आजच्या टाइम्स ऑफ इंडियात एक चांगला लेख आला आहे. ( लेखक स्वामी अग्निवेष व थंपू ) . ह्या लेखात महात्मा गांधीजींच्या एका विचाराचे विस्तृतीकरण केलेले आहे. महात्मा गांधींचा विचार असा की, जर योग्य गुरू नसेल तर अर्धाकच्चा गुरू करून आपण आपल्या गळ्यात धोंडा बांधून घेऊ नये. तसा सकृदर्शनी विचार योग्यच आहे. पण आपल्याकडच्या सध्याच्या वातावरणात हा गोंधळ निर्माण करणारा आहे. कसा ?
वारकरी संप्रदायात माळ गुरूकडून घालून घेण्याची परंपरा आहे. कोण असतात हे गुरू ? हे काही मोठे ज्ञानी, तपस्वी असे लोक नसतात तर, आजूबाजूला असलेल्यांपैकी ज्यांनी नियमित पंढरपूरच्या वार्‍या केलेल्या आहेत, जे नेमाने भजन कीर्तन करतात असे रोजच्या व्यवहारात साधारण पदावर वावरणारे हे लोक असतात. ज्यांना भजन करावे वाटते त्यांना हे भजनाचे शास्त्र, परंपरा, जुजबी नियम हे समजावून सांगतात. ज्यांना तुकारामाची गाथा वाचायचीय त्यांना कोणती प्रत घ्यावी, अडले तर त्याचा अर्थ कोठे शोधावा वगैरे अगदी प्राथमिक बाबी हे गुरू सांगत असतात. आसाराम बापू किंवा रजनीश वगैरे बुवांच्या सारखे कोटी कोटी लोक शिष्य असलेले हे गुरू नसतात. तसेच ज्यांनी अशा गुरूंकडून माळ घालून घेतली आहे तेही काही आपले व्यवहार थांबवून ह्यांच्या पायी कायमचे शरण आलेले नसतात. मुख्य म्हणजे वारकर्‍यातल्या ह्या गुरूंचे मोठे आश्रम वा सत्संग होत नसतात. ते बिचारे साधकासारखेच व्यवहाराचा गाडा ओढणारे चारचौघांसारखे असतात. फक्त त्यांनी साधकाची अवस्था पूर्वीच स्वीकारलेली असते किंवा ते एकप्रकारचे ज्येष्ठ साधकच असतात. शिवाय वारकरी संप्रदायात गुरूला शरण जाऊन आपली साधक-अवस्था गुंडाळून ठेवावी अशी प्रथा नसून वारकरी एकमेकांच्या पायाच पडतात. म्हणजे साधनेत कोणी श्रेष्ठ, ज्येष्ठ, वा कनिष्ठ असा भेदभाव असत नाही. निदान प्रथा तरी तशा जोपासलेल्या असतात. त्यामुळे असंख्य भक्तांना आपल्या मर्जीप्रमाणे करायला लावून गडगंज आश्रम उभारणे, श्रीमंती ट्रस्ट निर्माण करणे असे प्रकार वारकरी गुरू करूच शकत नाहीत. मग हे वारकरी गुरू तरी का करतात ?
आम्ही जेव्हा पुण्याला इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये प्रथम राहायला गेलो होतो तेव्हा तिथे प्रत्येक मजल्यावर एक खोली एका सीनीयर स्टुडंट साठी दिलेली असायची. न समजणारे अवघड विषय, कुठले प्रश्न महत्वाचे, कुठले शिक्षक चांगले वगैरे अनेक भेडसावणारे प्रश्न ते नवख्या विद्यार्थ्याला समजावून सांगत असत. आणि हे सगळे त्यांच्यात असून ते साधत असत. वारकर्‍यांचे गुरू हे असेच सीनीयर स्टुडंट सारखेच असतात. वारकरी संप्रदायातले मर्म ते त्यांच्यात राहून, स्वत: साधकच राहून, नवख्यांना सांगत असतात. गुरू म्हणजे मार्गदर्शक व्हावा तो असा सहजी वारकर्‍यात होतो.
त्यामुळे गुरू करूच नये असा विचार करण्याची गरज नाही. किंवा कुठल्याही कायद्याखाली वारकर्‍यांच्या गुरूंना लागलीच अटक करण्याचीही गरज नाही. उलट आपण जे व्यवहारात ज्या ज्या लोकांकडून शिकत असतो ते आपले गुरूच असतात ते पटवणारी ही प्रथा असून आपण असेच एकमेकांना शिकवत एकमेकांचे गुरुत्व करायला हवे. हे खरे साक्षात गुरू !
-------------------------------------------

No comments:

Post a Comment