Friday, September 2, 2016

चला, गाडी गाडी खेळू....

--------------------------------
चला, गाडी गाडी खेळू....
-----------------------
कशावरून कोणाला काय सुचेल ह्याचा काही नेम नसतो. व्यवस्थापनशास्त्रासारख्या रुक्ष विषयातले एक प्रसिद्ध व्यक्ति पीटर ड्रकर ह्यांनी व्यवस्थापनशास्त्रातले निर्णय हे कसे असावेत ह्याबाबत मोटार कार चालवण्यातले निर्णय घेणे, हे उदाहरण म्हणून दिले आहे . भाराभर आकडे व आलेख न मांडता निर्णय कसे चटकन्‌ घ्यावेत हे सांगताना ते म्हणतात, आपल्याला आपल्या गाडीची रुंदी माहीत नसते, रस्त्याची रुंदी माहीत नसते, समोरून येणार्‍या ट्रकची रुंदी माहीत नसते, तरीही आपण अंदाज वर्तवत रस्त्यातून गाडी अलगद काढीत जातो. तसेच भाराभर आकडे जमा न करता केवळ गट-फीलींगने आपल्याला निर्णय घेता यावेत. ( जसे गाडीला जास्त खरचटेल तसे आपले निर्णय जास्त बिनघोर होत जातील ! ).
अशाच प्रकारे चालत्या गाडीला खीळ का घालू नये ? तर प्रथम बैलगाडीला खीळ कशी घालीत ते पाहू. बैल गाडीच्या चाकांना १०/१२ पाती ( spokes ) असतात. जिथे चाक फिरते त्याच्या जवळ गाडीच्या खाली एक आडवे दांडके असे, जे बाहेर सरकवले की गाडीच्या चाकाला "खीळ" बसून चाक चक्क जाम होई. पण हे करताना ते दांडके क्षणात बाहेर काढणे जरूरीचे असते. नसता ते नुसतेच चाकाला घासत राहते व खीळ बसत नाही. असेच कुठल्याही चालत्या संस्थेचे असते. तिला पटकन्‌ दांडके घालून खीळ घालू म्हटले तर ते शक्य होत नाही. मग तिला हळू हळू ह्या ना त्या प्रकारे ब्रेक लावत आधी वेग मंदावावा लागतो. किंवा मग तिचा वेग कायम ठेवून तिची दिशा थोडी बदलणे हे जास्त सोपे होते व त्याने अपघातही टाळता येतात. जेव्हा गाडीचे ब्रेक निकामी (फेल) होतात तेव्हा असेच करावे लागते व तज्ज्ञ लोक तर सांगतात की दुसरी एखादी उभी गाडी पाहून चक्क तीवर ठोकर द्यावी. ह्याच न्यायाने जर चालत्या गाड्याला खीळ घालणे दुरापास्त असेल व अपघात करून का होईना गाडा थांबवायचा असेल तर मग "शीळ" वाजवत गाड्याला अजून वेगाने जायला प्रोत्साहन देत, अपघाताला उद्युक्त करणे, हाही एक मार्ग होऊ शकतो. पण जरा दुष्ट !
---------------------------------------

No comments:

Post a Comment