Tuesday, September 8, 2020

 LOADED  !

——————  

DNA has released an unseen video of Sushant which is intended to show that Sushant is High on drugs. 

But look carefully. He is reading a book when Rhea is distracting him. 

Which druggie reads a book when high ? Most of them just doze off. But this intelligent guy is reading a book !

And what a brilliant choice of a book. Is it a fiction ? Love story ? About Films ?

No. The book is by a financial psychologist. Sarah Newcomb, Ph. D. 

And it is about , “ Money , Psychology and how to get ahead without leaving your values behind”. It highlights more on core values than money-making. 

And what a choice of a caption of the book : LOADED. 

General meaning of loaded is equipped with all gadgets. For example when I say my car is “Fully Loaded”, it means it is equipped with stereo, sun-roof and all other fancy gadgets.  

It does not mean, he is fully high on drugs !

——————-


Friday, January 19, 2018

स्त्री-पुरुष सिम्बायोसिस
--------------------------------
सिम्बायोसिस हा शब्द आपण क्वचितच वापरतो. अर्थात जे पुण्याचे आहेत त्यांना हे एका टेकडीवरचे कॉलेज आहे हे माहीत असते. पण ह्याचा अर्थ काय असावा ? तर हे जीवशास्त्रात सांगतात की “दोन जीवांचे एकमेकांना मदत करीत एकत्र राहणे”. उत्क्रांतीकार डार्विन भले 
म्हणू देत की बळी तो कान पिळी, पण जीवशास्त्र सांगते की सिम्बायोसिस हीच उत्क्रांतीची प्रेरणा आहे.
स्त्री-पुरुष संबंधात आदर्श वागणूक ही सिम्बायोसिस पद्धतीची आहे. सिम्बायोसिसचे उदाहरण म्हणून एका माशाचे उदाहरण देतात. ह्याचे नाव आहे क्लाउन फिश. वर विदुषकी थाटाचे पट्टे असलेला जो मासा आहे तोच क्लाउन फिश. हा एका काटेरी जिवाबरोबर राहतो. काटेरी जीव (anemone) त्याच्या काट्याने हल्लेखोरावर विष टाकतो व माशाला वाचवतो व एका स्निग्ध पदार्थाच्या स्त्रवण्याने माशाला त्याच्या विषापासून वाचवतो. क्लाउन फिश त्याच्या विष्ठेने अनिमोनला खाद्य पुरवतो व जे invertebrates अनिमोनवर हल्ला करतात त्यांच्यापासून संरक्षण देतो. ही जोडी जणू “अवघे धरू सुपंथ” असेच म्हणते आहे.

(अर्थात हे झाले साह्यकारी सिम्बायोसिस. कित्येकवेळा एका जीवावर स्वतः वाढणारे बांडगूळ जीवही असतात. हे  म्हणजे ऐजीच्या जीवावर बायजी उदार सारखे व अर्थातच नकोसे उदाहरण झाले.).

Wednesday, February 8, 2017


स्मरण मुक्ताचे !
आज मुंबई मिरर मध्ये युनिस डिसोझा ह्यांनी नझिम हिकमत ह्यांच्या तुरुंगाच्या भिंतीवरच्या कवितात एक कविता उद्धृत केली आहे. ती अशी :
“Today is Sunday. For the first time they took me out in the sun today.
And for the first time in my life I was aghast That the sky is so far away And so blue And so vast.
I stood there without a motion.
Then I sat on the ground with respectful devotion Leaning against the white wall.
Who cares about the waves with which I yearn to roll Or about strife or my wife right now The soil, the sun and me.
I feel joyful and how.“
तुरुंगातल्या एका कवीला सूर्याच्या मुक्ततेचे स्मरण व्हावे व ह्या ओळी वाचून तुरुंगाच्या भिंतीवर काव्य लिहिणाऱ्या सावरकरांची आठवण झाली व त्या शोधताना मला अंदमानच्या संकेतस्थळावर सावरकरांचे एक चित्र दिसले ज्यात भिंतीवरच्या काही ओळी दिसल्या. त्या शोधल्यावर अशा होत्या :
:
कमला काव्य
आणि हे सोनचाफ्या, तू शिकलासि तरी कुठे
ही दिव्य किमया ? आम्हा स्वयमन्य नरां जिथे
रुप्याचेही करायासी जड स्वर्ण न साधते
ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळुनी तिथे
मृदूचेतन सोन्याची, स्वर्णचंपक ! ही फुले
सुगंधी तुज पाहुनी निर्मितां मन हे भुले
प्रियाच सोनचाप्याची, चमेली किती ही खुले
तो तिच्यावरी, ती त्याच्यावरती उधळी फुले !
काय गंमत, हे कमला काव्य मला इंटरनेट वर मिळाले व ते ज्यांनी ( कवी वा.गो. मायदेव ) संपादित केले त्यांचीही मला आठवण झाली. मी पुण्याला इंजिनीअरिंग हॉस्टेलला असताना दर रविवारी मायदेवांच्या घरी जात असे. हे आपल्या सौ. सुधाताई काळदाते ह्यांचे वडील होत. ते रविकिरण मंडळातले कवी असून जुन्या काळातले लहान मुलांच्या कविता लिहिणारे कवी होते व त्यांचे बोलणे अतिशय मृदू व प्रांजळ असे. अशा कवीने हे कमला काव्य संपादित करावे हा मोठा काव्यमय न्याय आहे. ह्या ओळीत तुम्हाला दिसेल की तुरुंगातल्या कवीला सोनचाफ्याचे स्मरण व्हावे हे अपार काव्यमय आहे.
असेच माझे वडील ( कै. अनंत भालेराव ) हे एकदा तीन महिन्याचा तुरुंगवास भोगून घरी आले तेव्हा सांगत होते की आम्ही तुरुंगातून बाहेर पडलो व आम्हाला शेतात एक गाय चारा खात असलेली दिसली व आम्हाला इतका आनंद झाला की काय स्वातंत्र्याचे मूर्तिमंत चित्र आहे, की खुल्या आभाळाखाली एक गाय मुक्तपणे चारा खात आहे !
मुक्ततेचे एव्हढे बोलके चित्र व भावना मी पहिल्यांदाच पहात होतो. माझ्या अत्याचेच नाव मुक्ता असल्याने ह्या निमित्ताने आज तिचीही आठवण झाली.
हेच स्मरण मुक्तांचे !
------------------------

Saturday, January 21, 2017

खाणे,एक लांछन !

खाणे, एक लांछ्न !
वि.वा. शिरवाडकरांचे एक सायन्स फिक्शन वाले पुस्तक मी खूप वर्षामागे वाचले होते. त्यात अन्न खाणे ही क्रिया त्या गृहावर अतिशय अनैतिक मानल्या गेली होती. आज जसे संभोग हा अति खाजगी प्रकार आहे तसेच त्या गृहावर खाणे हे अति खाजगी मानल्या जायचे. प्रत्येक जण जेवण्यासाठी अति गुप्त अशा ठिकाणी जायचा व मग गुपचूप खायचा !
आज मांसाहार केला तरी प्राण्यांचा आपण जीव घेतो आहोत हे काही टाळता येत नाही. आणि शाकाहार केला तरी वनस्पतीला काय जीव नसतो का हे नाकारता येत नाही. त्यामुळे काहीही खाताना एक प्रकारची अपराधी जाणीव येतेच.
जे मोठ मोठे साधू संत होऊन गेले त्यांचे जीवन पाहिले तर खाणे हा प्रकार त्यांच्यासाठी अतिशय खालच्या दर्जाचा होता हेच दिसेल. खाण्याचा अर्धा तास त्यांना मिळाला तर ते साधनेत नक्कीच वळता करतील, इतके खाणे त्यांना गौण !
म्हातारपणी आहार आपसूकच कमी होतो खरा, पण एकूणातच खाणे हे एक लांछनच म्हणावे लागेल !
------------------------------

Tuesday, January 17, 2017

स्त्रिया, आया, बाया...

स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )
जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच   वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे !  असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे !  प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !

Monday, January 16, 2017

स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )

जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच   वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे !  असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे !  प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !

Friday, January 13, 2017

तिळ गुळाची भाषा ! 
आज संक्रांतीचे आपण मराठी लोक आवर्जून म्हणतो की “तिळगुळ घ्या, गोड बोला ”. आणि तरीही आपण मराठी जाणल्या जातो ते आपल्या रोखठोक-पणाने, आपल्या रांगड्या भाषेने ! हे काय गूढ आहे ?
गोड बोलण्याचे आज आपण काय प्रतीक देतो आहोत ? तर तिळ व गुळ. तिळ पाहताच आपल्याला जाणवतो तो तिळाचा लहानपणा. ( एवढा एक लहान तिळ म्हणे पांडवांनी सात जणात वाटून खाल्ला होता, हे एक गूढच, हिंदी गूढ/गुळ नव्हे मराठी गूढ !.).म्हणजे हे छोटे प्रतीक जणू आपल्याला खुणावते आहे, मित-भाषी व्हा !
गुळात आयर्न, लोह, चांगल्या प्रमाणात असते म्हणे. म्हणजे गोड बोलणे हे लोखंडासारखे कडक झाले की ! कदाचित त्यामुळेच गुळासारखे गोड असूनही मराठी माणसांचे बोलणे गुळातल्या लोहासारखे कडक, रोखठोक होते ! शिवाय त्यातला गोड अर्थ गुल होण्यामागे व्युत्पत्तीशास्त्र कारणीभूत असावे. कारण गुळ हा शब्द संस्कृत गुल वरून आला आहे म्हणतात. ( अर्थात संस्कृतात गुलचा अर्थ कच्ची साखर असाच आहे ). तेव्हा आपल्या गुळ ह्या प्रतीकातला गोडपणा गुल झाला तर तो दोष मराठी माणसांचा नसून व्युत्पत्तीचा आहे !
तेव्हा तिळगुळ घ्या व तरी गोड बोला ! 
---------------------------

Friday, December 30, 2016

धाकड २०१६

धाकड २०१६

काल “दंगल” पाहिला तेव्हा त्याच्यातल्या हरियाणवी बोलीची काही वैशिष्ट्ये चांगलीच लक्षात राहिली. त्यात धाकटी मुलगी पतियाळाच्या क्रीडा संकुलासंबंधी बोलतांना म्हणते की तिथे तर सगळ्या “धाकड”च मुली येत असतील ना ? धाक देणाऱ्या धाकड. किंवा मराठीत आपण ज्यांना धडधाकट म्हणतो तशा. ह्याच अर्थाच्या वळणाने गेले वर्ष २०१६ तसे धाकडच म्हणावे लागेल !

सबंध गेले वर्षभर भरवशाच्या म्हशिंनी टोणगे दिले, तेही जगभर ! हिलरी बाई येता येता हरल्या, तेही ट्रम्पसारख्या टोणग्या कडून. ब्रिटनसारख्या भरवशाच्या देशाने युरो सोडले. काश्मिरात दंगल माजली. अतिरेक्यांनी कहर केला. भारताने सीमेपार जावून चोप दिला. आणि सरतेशेवटी जगात कुठे झाली नसेल अशी नोटबंदी झाली !

वर्ष तसे धाकातच गेले !

--------------------------

 

Monday, December 26, 2016

श्रेष्ठ मौखिक

श्रेष्ठ मौखिक

साहित्यात श्रेष्ठता जर लोकप्रियतेवरून ठरवायची तर अनेक लोकांना जे मुखोद्गत ( पाठ ) आहे त्यावरून ठरवू गेले तर आजचे बहुतेक साहित्यिक बादच होतील. चांगले चांगले मान्यवर साहित्यिक हे त्यांच्या मृत्यू पश्चात केवळ आठ दहा वर्षेच लोकांच्या लक्षात राहतात. त्यांचे साहित्य ( कथा, कविता, लेख वगैरे ) तर फारच थोडे दिवस लोकांच्या ध्यानात राहते. ते पाठ तर नसतेच.

त्याउलट “शुभम् करोति कल्याणं” हे काव्य कोणाचे आहे, ते मूळ संस्कृत आहे का मराठी, हे आपल्या काही लक्षात नसते, पण काव्य पाठ असते. तशाच काही कविता व लोकगीते. आपण आपल्या साहित्य वाचनात अनेक प्रकार वाचतो, पण नेमके हेच कसे पाठ राहते ? अनेकांच्या अनेक वर्षे लक्षात राहणे, टिकणे हा निकष लावला तर हे काव्य प्रकार श्रेष्ठ नाहीत का ?

आजही वारकरी पंढरपूरला वारीला जातात हे दृश्य त्यातल्या भक्तीभावापेक्षा त्यांच्या पाठ असलेल्या तुकारामाच्या अभंग म्हणण्याने, एका वेगळ्याच, उच्च कोटीतले वाटतात. हे अभंग मग इतके वर्षे टिकून आहेत, ते असे म्हटल्या गेल्यानेच ना ?

ज्ञानपीठ वा अकादमी पुरस्कारापेक्षा आपली कविता वर्षानुवर्षे लोकांनी म्हणत राहावी असे कोणत्या कवीला वाटणार नाही बरे ? हीच मौखिकाची श्रेष्ठता !

----------------------

Thursday, November 3, 2016

अडानी भाषा : ३

अडानी भाषा : ३  

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

३ : गेल्तो = गेलो होतो  

आलो होतो, गेलो होतो, असे जरा अवघड वळणाचे बोलण्यापेक्षा आल्तो, गेल्तो हे कसे सुटसुटीत होते. जा किंवा जाणे हे मूळ क्रियापद व गेला हे त्याचे भूतकाळी रूप. काही जण “ तो जाएल हाये” असेही बोलतात. “मी जातो”चे “मी गेलो ” असे न करता आपण “मी गेलो होतो” असे व्याकरणात ओळखायला अवघड असे रूप का करीत असू ? कदाचित तमिळ मध्ये जसे “चेल” म्हणजे जाणे आहे त्यावरून “गेल्” असे तर हे करीत नसतील व मग गेल्तो ?

-----------------------

Tuesday, November 1, 2016

र चा रेटा

जय हो-मराठी-२०: र चा रेटा
------------------------------
"र"चा रेटा !
--------------------------------
    "र" ह्या वर्णाला मराठी वर्णमालेत अर्ध-स्वर ( सेमी व्हॉवेल ) असे मानतात. जीभ तयार न झाल्यामुळे लहान बालके बोबडे बोलतात हे आपण जाणतोच. तेव्हा सगळ्यात अवघड वर्ण "र" हाच असतो. हे ह्यामुळे होत असावे की "र" हे मूर्धन्य प्रकारात मोडते ( म्हणजे टाळूच्या वर जीभ लावून हा आवाज काढावा लागतो, ज्यासाठी जिभेचे वळणे तयार व्हावे लागते .). तसेच फोनोलॉजी शास्त्रातल्या, सोनोरिटी स्केल मध्ये जे वर्ण सगळ्यात मोठेपणे आपल्याला ऐकू येतात असे शोधून काढलेले आहे, त्यात स्वरानंतर सगळ्यात ज्यास्त मोठेपणी ऐकू येणारे वर्ण दिले आहेत : य, र, ल, व. त्यामुळे "र" ह्या वर्णाची योजना आपण सहजी स्पष्टपणे ऐकू येणार्‍या शब्दांसाठी करत असू, असे अनुमान निघते. त्यामुळे एखाद्या शब्दात "र"ची योजना असेल तर तो ठळक होतो असा परिणाम साधल्या जातो. ह्या पार्श्वभूमीवर शब्दकोशातल्या "र"पासून सुरू होणार्‍या एकूण २०६८ शब्दांची तपासणी केली तर हे सर्वच शब्द ठळकपणा आणणारे, महत्वाचा अर्थ असणारे दिसतात. ( एकूण २०६८ पैकी ५२५ शब्द महत्वाचे अर्थ असणारे, ठळकपणा आणणारे आढळतील. वानगीदाखल पहा: रक्त, रखडपटटी,रंजक, रंजलेगांजले, रटाळ, रडका, रंडी, रण, रत्न,रद्दी, रसाळ, रहाटगाडगे, राई, राकट, राग, रांजण,राजतिलक, राजबिंडा, रानदांडगा, रामराज्य, राष्ट्र,राक्षस, रुका, रुपया, रुग्ण, रुद्र, रुचिर, रुसणे, रूप,रौद्र, वगैरे.).  सामान्यापासून मोठेपण देणारा "राजा", कपाळावरच्या गंधात ठळकपणा आणणारा "राजतिलक", लहान पदार्थात स्पष्टपणे लहान असलेला पदार्थ "राई", नापसंतीच्या शब्दात प्रभावी असते:"अरेरे", छोट्यामोठ्या लढाया, युद्धे ह्यात स्पष्टपणे मोठे युद्ध म्हणजे "रण", मौल्यवान वस्तूत जादा मोल असलेले "रत्न", वगैरे. र-पासून सुरू होत असलेले बहुतेक शब्द असे हे त्यांच्या त्यांच्या प्रकारात मोठेपण, ठळकपण दाखवतात असेच दिसते. हाच "र"चा रेटा !
---------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------

Friday, October 28, 2016

अडानी भाषा : २

अडानी भाषा : २

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

२ श्यान = शेण

गाय, म्हैस, बैल ह्यांची विष्टा म्हणजे श्यान किंवा प्रमाण भाषेतले शेण. गावाकडे एक म्हण आहे की पडलेलं शेण माती घेऊन उठते, तसे हा शब्द कसा आला असेल त्याबद्दल अनेक मते शेणासंग उठतात. प्रमाण मत म्हणते की संस्कृत छगण वरून शगण-शअण-शाण-श्याण वरून शेण झाले. काही लोकांना वाटते की दाक्षिणात्य तमिळ मधल्या चाणम् वरून हे शेण झाले असेल.

शेण-बहाद्दर लोक म्हणतात की शेण फार औषधी असून ते अल्सर वर गुणकारी आहे. हार्वर्ड विद्यापीठात एक असे संशोधन आहे की शेणातून ज्या प्रकारचे मश्रुम्स होतात त्यापासून एक स्पिरिचुअल ड्रग तयार होते, जे घेतले असता फार पवित्र भावना येतात. ( कदाचित त्यानेच आजकाल अनेक लोक शेण खात आहेत असे दिसते ! ).

---------------------      

अडानी भाषा : १

अडानी भाषा : १

--------------------

प्रमाण भाषा ही बहुतांशी शिकलेल्यांची भाषा असते. त्या भाषेत अनेक संस्कार होऊन बदललेले शब्द असतात. पण हे काही मूळ शब्द नसतात. मूळ समाजच जेव्हा अडानी होता तेव्हा त्यांची मूळ भाषा अडाणीच असणार. आजची प्रमाण भाषा चांगली व मुळच्या अडाण्यांची भाषा हलक्या प्रतीची असे भाषेचा अभ्यास करणारे मानीत नाहीत. उलट अडाणी शब्द हेच मूळचे शब्द असल्याने अर्थाचा शोध घेताना अपार महत्वाचे असतात. तर चला अडाणी भाषा शिकू या.

१.   अडाणी/ अडानी  

शब्दकोशात अडाणी ह्याचा अर्थ देतात : अकुशल, रानटी. सुरवातीचा आपला समाज हा असाच रानावनात राहणारा असणार. काही लोकांना वाटते की अडाणी हा शब्द “अज्ञानी” ह्या संस्कृत वरून आलेला असावा. पण जेव्हा सगळा समाजच हा रानावनात राहणारा होता, तेव्हा त्याला “अज्ञानी” असे कुठल्याही ज्ञानाची परीक्षा न घेता कसे म्हणत असतील. शिवाय “अडाणी” म्हणताना जी हिणवण्याची छटा आहे ती अज्ञानीत येत नाही. विश्वनाथ खैरे ह्यांचे एक असे प्रतिपादन आहे की मराठी भाषेचे मूळ तमिळ, मलयालम भाषेत सापडते. त्या भाषेत “अटा” म्हणजे कनिष्ठाला व मुलाला जवळिकेने आणि शत्रूला तिरस्काराने लावलेले संबोधन. तसेच “अटन्न” म्हणजे कनिष्ठ दर्जाच्या माणसांना बोलावण्याचा उद्गार. अटन्न-अडन्न-यावरून अडान होणे सहजी शक्य आहे व त्यावरून अडाणी !

---------------------------- 

Thursday, October 27, 2016

न कूपसूपयूपानाम् अन्वयोs

"न कूपसूपयूपानाम् अन्वयोऽ"
-----------------------------------
व्याकरणात काही प्रत्यय लावून आपण शब्द करतो असे सांगतात. जिथे असे प्रत्यय लावून शब्द केलेले असतात तिथे त्या प्रत्ययाचा सारखाच एक अर्थ असतो व तो त्या प्रत्यय लागलेल्या शब्दांना येतो. जसे "ऊन" हा प्रत्यय लावून आपण अव्यये करतो जसे : करून, देऊन, जेऊन, लिहून, वगैरे.  म्हणजे शब्द कसा बनलाय त्याची खूण प्रत्ययघटित शब्दांचे अर्थ सारखे असले तरच पटते असे होते. उदाहरणार्थ कूप, सूप, यूप मध्ये ऊप हा प्रत्यय नाही हे त्यांचे अर्थ सारखे नाहीत ह्यावरून ताडता येते. पण प प्रत्यय लावून आपण अनेक शब्द करतो असे मराठी व्याकरणात उदाहरणे देतात. जसे : कांडप, दळप, वाढप, वाटप, वगैरे. इथे असे दिसते की क्रियेला प प्रत्यय लावले की त्या क्रियेची मजूरी अशा अर्थाचे हे शब्द तयार होतात. आता कूप ही काही क्रिया नाही, पण उद्या समजा "कूप करणे" ही क्रिया रूढ झाली तर त्याच्या मजूरीला कूपप म्हणावे लागेल. तसेच एखादी गोष्ट "खूप करणे" ही क्रिया धरली तर त्याच्या मजूरीला खूपप म्हणतील. म्हणजे उच्चार सादृश्यापेक्षा अर्थ-सादृश्य असले पाहिजे हा निकष होतो.
पण असे किती अर्थ-सादृश्य असले पाहिजे ह्याचे काही प्रमाण नाही. म्हणजे कांडप, दळप, वाढप, वाटप हे शब्द प लागल्याने समान अर्थाचे झाले खरे, पण काप, बाप, साप, वगैरे अनेक तशा शब्दांना प लागले आहे पण त्याने अर्थ-सादृश्यता नाही. "न कूपसूपयूपानाम्‌ अन्वयोs" हे कूप सूप यूप ला लागू होतेय पण कांडप, दळप, वाढप, वाटप ह्या क्रियावाचक शब्दांना लागू होत नाही.
----------------------------------

चुका सुधाराव्यात का ?

चुका सुधाराव्यात का ?

-----------------------------------

माझ्या एका मावसभावाचे आडनाव आहे खरवडकर. आजकाल ख हे पहिल्या र ला व जोडून काढतात व त्यामुळे ते ख आहे हे कळते. पण पूर्वीच्या अक्षरांच्या खिळ्यात ख हे “रव” र आणि व मिळून काढीत असत. त्यामुळे त्यांच्या आडनावाचा उच्चार अनेक लोक रवरवडकर असा करीत.

वेस्ट इंडीजला माझ्या बॉसचे नाव होते बजाज. तिकडे j चा उच्चार ह किंवा य करीत व त्यामुळे त्यांचे नाव आले की लोकांची बोबडी वळे व ते म्हणत बयाय !

कधी कधी जेवताना एखादे शीत आपल्या ओठाला तोंडावर तसेच राहून जाते. ते आपल्या लक्षात येत नाही. अशावेळी ते त्या माणसाला सांगावे का ? काही लोकांच्या मते सांगू नये. कारण त्याने त्या माणसाला ओशाळल्यागत होते.

असेच भाषेचे होत असेल का ? एखादे वाक्य कोणी चुकीचे म्हणत असेल तर त्याला तिथल्या तिथे सुधारावे का ? भाषा ही प्रत्येकाची एक खेळण्याची मुभा असलेले सृजन आहे. जे वाक्य पद्यात चालते ते गद्यात व्याकरणदृष्ट्या चालत नाही असे होऊ शकते. मग ते एखाद्याने चूक म्हटले असेल व ते तुम्हाला कळले असेल तर कशाला सुधारावे ? कदाचित अशीच चूक करीत करीत लोक भाषेलाच सुधारून टाकतील व मग त्या लोकांना ती चूक वाटणारही नाही.

पूर्वी प्रत्येक बिलाखाली लिहिलेले असे : चूभूदेघे किंवा चूभूद्याघ्या. ( चूक भूल देणे घेणे किंवा चूक भूल द्यावी घ्यावी ). हे जरी आजकाल कोणत्याही टिपणाखाली लिहिलेले नसले तरी चूक भूल द्यावी घ्यावी, हेच बरे !

------------------ 

Saturday, October 22, 2016

सं, सम्

सं , सम्
---------
एखाद्या शब्दाच्या अलीकडे अक्षर ( उपसर्ग) लावून नवीन शब्द बनवण्याची पद्धत आहे. कधी हे अक्षर परभाषेतून घेतात. जसे : बेडर, बेकाबू, बेदम, बेचिराग, बेजार...इथे बे चा अर्थ वाचून , शिवाय, रहित असा करतात. असाच संस्कृत उपसर्ग आहे सं , सम्, ज्याचा अर्थ चांगले, बरोबर असा करून शब्द बनतात : संस्कार, सं़योग, संगम, संगीत, संतोष, संकल्प...संकट मात्र संक्रित,एकाच वेळी केलेले वरून आलेले आहे.

Thursday, October 20, 2016

साळकाया माळकाया

---------------------------------------
साळकाया माळकाया
-------------------------
कोणत्या शब्दाची काय व्युत्पत्ती आहे, तो कसा आला आहे, आधी तो कसा होता, या सगळ्यांपेक्षा सध्या तो लोक कसा वापरतात ह्याला जास्त महत्व असायला हवे. तोच त्याचा खरा अर्थ. म्हणूनच भाषाशास्त्रात असे एक वचन आहे की Meaning is usage. म्हणजे वापर हाच अर्थ !
तसा अर्थ लावायला गेलं तर साळ म्हणजे वरच्या टरफलासकटचे तांदुळाचे रोप असा अर्थ काढला तर मग त्याप्रमाणे काया असणार्‍या बायका असे केले तर ज्या साळकाया माळकाया असतात त्या काही अशा सडपातळ वगैरे अशा असत नाहीत. तर मग ह्या अशा विशेषणाचा काय अर्थ असावा ?
तिरस्कार दाखवण्याचा एक प्रकार असा आहे की तुम्ही कोणीही विशेष नाही आहात, अगदी सामान्य, चारचौघीसारख्या नगण्य आहात असे रॅंडमनेस दाखवण्याचा. ह्याचा अर्थ कोणीही, काहीही वैशिष्ट्य नसलेल्या, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. साळकाया-माळकाया ह्या वर्णनाने आपण ज्या बायकांचा उल्लेख करतो त्यांना खास असे काही वैशिष्ट्य नसते, त्या कोणीही असू शकतात. जसे गणितात रॅंडम नंबर म्हणजे कोणताही आकडा, ज्याला काही ताळतंत्र नाही असा, अशाच ह्या बायका. हे अपमान करण्याचे मोठे हमखास यशस्वी ठरणारे छद‌मी विशेषण आहे, काहीच वैशिष्ट्य नाही असे सांगणारे विशेषण !
सोम्या गोम्या, आंडू पांडू, टॉम-डिक-ऍंड-हॅरी, असेच म्हणून कोणाही सामान्य वकूबाच्या पुरुषालाही आपण अपमानकारक विशेषण करू शकतो !
-----------------------------------

सडाफटिंग

------------------------
सडाफटिंग
---------------
ज्याला संसार नाही, काही आगापिच्छा नाही, जो एकटा आहे त्याला सडाफटिंग म्हणतात. सडाफटिंग ह्या शब्दात तसे दोन शब्द आहेत. सडा व फटिंग. दोन्हीचे अर्थ एकटा असेच आहेत. सड हे जनावरांच्या ( विशेषत: गाय, शेळी, म्हैस ह्या दूध देणार्‍या जनावरांच्या ) आंचळाला म्हणतात. ह्या आंचळांचा आकार पाहता त्याची रुंदी कमी व लांबी जास्त ह्या आकारावरूनच आपण सडसडीत ह्या शब्दाचा अर्थ काढतो. तसेच सडपातळ. कदाचित्‌ सडा/सडी माणसे ही अशीच सडपातळ असावीत व त्यावरून सडा/सडी झाले असावे. एकटा ह्याच अर्थाचे इतर समानार्थी शब्द आहेत : सोट, सोटभैरव, झोटिंग वगैरे.
फटिंग म्हणजेही एकटा, कुठलेही पाश नसलेला. तुकाराम महाराजांनी एका अभंगात असे म्हटले आहे : फटयाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2॥ तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3॥ इथे "फटया" म्हणजे संसार नसलेला, एकटा ह्या अर्थाने तिरस्कार केलेला हा माणूस विश्वास ठेवण्यास पात्र नाही असे म्हणताना कदाचित संसारी माणूस हा जास्त जबाबदार असतो असे सामाजिक निकषाने म्हटले असावे हे उघडच आहे. असेच "फटिंग" हा उल्लेख भा.रा.तांबे ह्यांच्या एका कवितेत असा येतो: ( म्हातार्‍या नवरदेवाची तक्रार ) : गहनविपिनीं करि गौरि घोर तप,---जरठास्तव नवयुवती करी जप,---नीरस हर तो भणंग जोगी,---रसे रसरसे ही सुखभोगी,---फटिंग तो, ही तपे वियोगी,---स्मरारि तो, ही स्मरसुखलोलुप,---उपवर मुलींनो कित्ता गिरवा,---त्यजुनि फाकडा धटिंग हिरवा,---फटिंग जोगी पिकला भगवा,---वरा ! पुजा हर सफल गतत्रप,----नशीब अमुचे जरठ वरांचे---सोंगाड्या मुलि, ढोंग जपाचे,----लचके रुचती या तरुणांचे---नातरि वरितो मुली सपासप,---आजोबा या म्हणती अम्हाला,---ठार करिती उरी खुपसुनि भाला,----गौरि असें का म्हणे हराला,---पाहुनि घेइल शंभु भवाधिप !
आजकाल मुलीही अशा एकट्या राहतात. त्यांच्यासाठी सडी हा शब्द आहेच. तेव्हा सडाफटिंग मुलींसाठी सडीफटिंग आपण म्हणू शकतो, किंवा सडीफटिंगा किंवा सडीफटिंगी !
---------------------------------