Monday, July 25, 2016

अलीकडे-पलीकडे

अलीकडे-पलीकडे

“अलीकडे” व “पलीकडे” हे इतके सोपे शब्द आहेत की ते सगळ्या मराठी बोलणाऱ्यांना आपसूक समजतात. ते शब्दकोशात कोण कशाला पाहील इतका त्याचा अर्थ सहज कळणारा आहे. असेच हा-तो, ह्या-त्या, इथ-तिथ, जवळ-दूर ह्यांचेही अर्थ असेच सहजी समजणारे आहेत. हे आपल्याला कोणी शिकवलेत असे काही आठवत नाही. मग ते आपल्याला कसे कळले असावेत ?

शब्द हे एक चिन्ह आहे व ह्या चिन्हांनी काही तरी दाखवल्या जाते असे म्हणतात. आपण अगदी लहानपणी जेव्हा भाषा शिकतो तेव्हा नीट पाहिले तर लक्षात येईल की मुले बोलण्या अगोदर बोलणाऱ्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत असतात. ते चेहऱ्यावरचे हावभाव बघतात. माझी आजी लहान बाळांशी एक खेळ खेळत असे. ती तान्ह्या बाळांना हातावर घेवून त्यांचे तोंड आपल्यासमोर धरी व तासन तास त्यांच्याशी बोले. असे बोलत बोलत ती बाळाला जरा दटावी, हं नुस्त बसून राहायला पाहिजे, कामं कोण करणार, अस बरच रागे भरे. पाहता पाहता हसणारं बाळ ओठ काढी ( ह्याला ती बाबर ओठ म्हणे ) आणि हमसून हमसून रडे. तान्ह्याला शब्द नसतील कळत पण भाव हमखास कळतात हे ह्यावरून कळेल. ( आयांच्या माघारी हा प्रयोग हमखास करून पाहण्यासारखा आहे ).

असेच आता शाळा कॉलेजातली लेक्चर्स आठवा. शिक्षकाकडे पाहिले नाही तर काही कळत नसे. त्यासाठी अगदी पुढची बाके अडवत असू. त्याचेही कारण अवघड विषय सुद्धा चेहऱ्याच्या भावावरून समजणे सोपे जाते, हेच आहे.

मग आपण ऐकलेले शब्द व चेहऱ्यावरच्या स्नायूंच्या हालचाली किंवा ठेवण ह्यांची अटकळ बांधतो व त्यांचा अर्थ ठरवतो. अलीकडे व पलीकडे ह्या शब्दात लीकडे ही शेवटची तीन अक्षरे सारखी आहेत. पण आरशात पहा अलीकडे म्हणताना ओठ आधी फाकतात व आत येतात, गाल बाजूला जातात. जसे काही कोणी बाहेरून आत येत आहे. ह्या उलट पलीकडे म्हणताना ओठ प म्हणताना चंबू होत गाल अजिबात बाजूला सरत नाही. जसे काही कोणी इथून दूर जात आहे. असेच हा-तो; ह्या-त्या; इथ-तिथ; जवळ-दूर म्हणताना होते व त्यानेच अर्थ कळतो. चेहऱ्यावरची हालचालच अर्थ दाखवते !

-------------------------   

No comments:

Post a Comment