Friday, July 29, 2016

इच्छांचं मरण

--------------------------------
इच्छांचं मरण
--------------------
महात्मा गांधी कसे आरामात १५/२० दिवसांचे उपवास करीत . कित्येक जैन मुनींनी १००/१२० दिवसांचे उपवास केलेले ऐकले आहे. माझी आजी आठवड्यातले तीन चार दिवस तरी उपवास करी. हे असे इच्छेला नाही म्हणणे ह्या लोकांना कसे जमले असेल ?
असेच वाटून मी एकदा चार दिवस प्रयोग केला होता. म्हणजे मला खूप दिवस करायचा होता पण हा प्रयोग मी चार दिवसच करू शकलो. तेव्हा मी किर्लोस्कर कमीन्स मध्ये इंजिनियर म्हणून महिना ३०० रुपयावर काम करीत होतो. पगार पुरेसा नसला तरी खाणेपिणे व्हायचे त्यात. पण महिना-अखेर अगदीच मोजके पैसे शिल्लक राहिलेले असायचे. जेमतेम आठ-दहा रुपये. त्यामुळे हा प्रयोग महिना-अखेरी करायचे ठरवले. प्रयोग असा होता की बिलकुल जेवायचे नाही. अगदीच मरायची वेळ आली तर केळी वगैरेसाठी चार-पाच रुपये होते शिल्लक. त्यामुळे प्रयोग करायला बिनधोक वाटले होते.
बरे बाकीचे व्यवहार सगळे नित्य-नेमाने करायचेच होते. फक्त जेवायचे नव्हते, काही खायचे नव्हते. त्यात कोणाकडे गेलेलो असलो व त्यांनी पोहे, उपमा असे काही केलेले असले की त्याला नाही म्हणताना जाम आतडे तुटत असे. बळे बळेच काही तरी कारण सांगून खाणे टाळायचे. त्यापेक्षा रात्रपाळीचे काम बरे पडायचे. जेवायचा प्रश्नच येत नव्हता तेव्हा. असे कसे तरी तीन दिवस तगलो. चौथ्या दिवशी इतका ढेपाळलो की जवळ असलेल्या तीनचार रुपायात बकाबका मिसळ-पाव का असेच खाल्ले, तेव्हा सुटका झाली व तात्काळ स्वीकारले की मनोनिग्रह वगैरे ह्या आपल्या आवाक्यातल्या गोष्टी नाहीत. आपण नाही मारू शकत आपल्या इच्छा. इच्छांचं मरणं आपल्यासाठी अवघडच आहे !
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment