Friday, July 29, 2016

इगो अमरच असतो!

ईगो अमरच असतो !
-------------------------------
माणूस प्रत्यक्षात हयात नसला तरी त्याच्या साहित्यात ईगो वसूनच असतो. आजही आचार्य अत्रे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर टिप्पणी करायची असेल तर एक प्रकारचा अदृश्य धाक नाही का जाणवत ? त्यांच्या हयातीत जसे लोक वचकत तसेच अजून आजही वाचक वचकूनच असतात, त्यांच्या साहित्याला . त्याउलट ज्या नेमाडेंनी सगळ्या बहाद्दरांचे वस्त्रहरण केले त्यांनी केवळ साने गुरुजींना वंदनीय मानले, हे साने गुरुजींचा लडिवाळपणाच नाही का दाखवत ? प्रत्येक लेखक/कवी/कलावंताची एक स्वत:ची ढब वा शैली असते जीत, त्याचे सगळे स्वत्व व ईगो येतात व ते त्याच्या पश्चातही तग धरतात, हेच तर वाङ्मयाचे "अक्षर" असण्याचे लक्षण आहे. "आढ्यता" स्वभावात असण्याचे जसे फायदे असतात तसेच "नम्रता" वागवण्याचेही असल्याने वाचकांना मोह पडतो. स्वभावात काय असावे वा नसावे हे आपण ( इतर लोक ) ठरवू शकतही नाही , पण त्याचा आपल्यावर निश्चितच परिणाम होतो. एखाद्या कलाकाराला प्रयोगा दरम्यान मोबाईल वाजला तर आवडत नाही, तो प्रयोग सोडून जातो, हे एकदा कळले की मग नंतरचे रसिक त्याच्या स्वभावाशी जुळवूनच घेतात. ईगो अमरच असतो !

No comments:

Post a Comment