----------------------------------------------------
सृजन आधी संपावे की जीवन ?
---------------------------------------
कोणा एका कवीचे मागणे असे होते की पेन मधली शाई जशी लिहिता लिहिता संपावी, तसे जीवन जगताना सृजनाची शाई एका क्षणाला अलगद संपून जावी. म्हणजे शेवट तर येणारच. पण तो असा शेवटपर्यंत सृजन होत होत असणारा असावा. म्हणजेच सृजन शेवटपर्यंत टिकावे.
हे जरी कविकल्पनेप्रमाणे उदात्त, भव्य असले तरी प्रत्यक्षात असे होत नाही. शेवटची कित्येक वर्षे विंदा करंदीकर कविता करीत नव्हते. दुसरे काही लिहीत नव्हते. जणु काही सृजन आटलेच होते. थोडयाफार फरकाने बहुतेक कवींच्या लेखकांच्या वाटेला हे आटणे आधीच येते. थकणारे शरीर सृजनाचे झरेही बुझवीत राहते. सृजन आटल्यानंतरही कित्येक वर्षे शरीर ( वा लिहिलेली बाडे ) ढकलीत राहावे लागते. पाट्या टाकाव्या लागतात.
तसे पाहिले तर प्रत्येक लेखक-कवीची जशी एक स्वत:ची शैली असते, तसेच त्यांचे स्वत:चे ( हयातभराचे ) एक लाडके तत्व असते, जे ते आपल्या आविष्कारातून हयातभर व्यक्त करीत असतात. असे कलावंत फार विरळा की ज्यांची तत्वे इतकी अनेकांगी असतात की ती एका आयुष्यात सांगून होत नाहीत. कित्येक लेखकांचे तर असे होते की एकच ढब, एकच सांगणे, अनेक नंतरच्या कादंबर्यातून, कवितांतून ते परत परत सांगत राहतात. विशेषत: कवींचे असे फार होते. एखादा कवी ( जसे: ग्रेस) केवळ संध्याकाळ ह्या एकाच विषयाचे गाणे आयुष्यभर आळवत राहतो. त्यात चांगले वाईट असे जाऊ द्या, पण एका आयुष्यात जे सांगण्याचे असते ते केव्हाच त्याचे सृजनाच्या उर्मीसरशी सांगून झालेले असते. म्हणजे परिक्षेत जसे आपले एका परिच्छेदात उत्तर देऊन झालेले असते व आपण ते जरा भारदस्त करीत, त्याला पुरवण्या जोडत राहतो. मुद्दा केव्हाचाच संपलेला असतो.
ज्ञानेश्वरांचे तर हे सांगणे अवघ्या वयाच्या २० वर्षातच आटपून गेले होते व त्यावर त्यांनी सदेह समाधी घेतली होती. जे सांगायचे होते ते इतकेच, असे नेमकेपणे त्यांना वाटले असावे.
वाटते खरे की, सृजनाचा झरा कायम खळाळता राहावा. पण जीवनाचा स्त्रोत मंदावतांना तो तरी किती काळ खळाळेल ? पेन भरलेले असतानाच हात ढीले पडले तर त्या सृजनाच्या शाईचे काय होय ?
--------------------------------------------
Wednesday, August 31, 2016
---------------------------------------------------- सृजन आधी संपावे की जीवन ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment