----------------------------------------------
भाषेवर खापर--१५
बर्याच वेळा आपल्याला म्हणायचे असते एक व लोक त्याचा अर्थ काढतात भलताच. तेव्हा एकतर आपण तुम्ही संदर्भ सोडून अर्थ काढताय असे म्हणतो किंवा गैरसमजाचे खापर संस्कृतीवर, वेळेवर, प्रसंगावर किंवा चक्क भाषेवर काढतो. उत्क्रांतीत म्हणतात की माणसाला हाताची बोटे दिली होती ती झाडे वगैरे चढण्यासाठी, फांद्या घट्ट पकडण्यासाठी आणि आजकाल आपण बोटे वापरतोय, चित्रे काढण्यासाठी अक्षरे गिरवण्यासाठी किंवा उमटवण्यासाठी ( संगणकावर ). त्यामुळे एका कामासाठी दिलेली बोटे दुसर्या कामाला वापरली तसेच तर भाषेचे होत नसेल ना, असा काही भाषाशास्त्रज्ञांना संशय येतो. म्हणजे असे की समजा भाषा ही केवळ एकमेकाला संदेशवहन करण्यासाठी दिली होती व आपण ती आता विचार करायलाच वापरतोय, असे तर होत नसेल ? पण काही जण म्हणतात की आपण विचार भाषेत ( शब्दात, वाक्यात ) करीत नसून तो चिन्हात करतो. म्हणजे विचारासाठी भाषेचा काही उपयोग नाही. ( लहान मुले नाही का भाषा येत नसली तरी काही तरी विचार करीत असतातच ! ). आता राहता राहिला भाषेचा संदेशवहनासाठीचा उपयोग. त्यातही जर योग्य शब्द, वाक्य वापरूनही गैरसमजच होणार असतील तर खापर भाषेवरच फुटते. आता हे असे खरेच होते का हे काही सांप्रतची काही घडलेली उदाहरणे घेऊन बघू यात.
नॉनसेंस
राहूल गांधी नुकतेच कलंकित नेत्यांना वाचवणार्या एका अध्यादेशाबाबत म्हणाले की हा अध्यादेश कंम्लीट नॉनसेंस आहे आणि तो फाडून फेकून द्यायला हवा. त्यावर अनेकांनी हा अपमानास्पद शब्द आहे असे प्रतिपादले. नक्की काय अर्थ होतो "नॉनसेंस"चा ?
पूर्वी मॅट्रिक नापास झालेले स्वत:ला नॉन-मॅट्रिक म्हणवून घेत. त्याचा अर्थ होत असे की मॅट्रिक नापास किंवा मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालेले. त्यात काही अपमानास्पद नसे. उलट ह्या कमी शिकलेल्यांना नॉन-मॅट्रिक ही पदवीच वाटे. गांधीजींनी जी अहिंसेची मोहीम काढली होती त्याला आपण म्हणतो नॉन-व्हॉयलेंस. त्यात खरे तर महात्मा गांधी उपासाला बसत त्याचाही समावेश असे. असे उपास करणे हे चांगलेच आक्रमक असे तरीही ते नॉन-व्हायलेंस मध्ये धरल्या जायचे. असेच आपण जे मांसाहारी खातो त्या म्हणतात नॉन-व्हेज. पण चिकन-पालक असा मांसाहारी पदार्थ असेल तर त्यात व्हेज नाही असे कसे ? असेच आहे नॉन-सेंस. पाहणे, ऐकणे, चाखणे, स्पर्शणे, हे झाले आपले सेंस. व तेच नाहीत असे नॉन-सेंस मध्ये होत नाही.
खरे तर अन्-नॅचरल व नॉन-नॅचरल ह्यात अन्-नॅचरलला जास्त नकारात्मकता आहे व त्या मानाने नॉन-मुळे नेमके नसण्याचे बोध होतात. जे आपण वर नॉन-मॅट्रिक, नॉन-व्हायलेंस, नॉन-व्हेज ह्या शब्दांत पाहिले. पण तरीही नॉन-सेंसला फारच नकारात्मकता आहे. इतकी की इंग्रजीतल्या ज्या पहिल्या वहिल्या दटावण्या ( वा शिव्या ) आपण शिकतो त्यात नॉन-सेंस येते. कारण ह्याचे समानार्थी शब्द आहेत : बंकम, क्लॅपट्रॅप, डबल-डच, आयवाश, फूलिशनेस, गिबरिश, मंबो-जंबो, रॉट, रबिश, सिलिनेस, स्टुपिडिटी, ट्रॅश, मिस्टेक, वगैरे. हे समानार्थी शब्द तसे बर्यापैकी अपमानास्पद आहेत. त्याच्या जोडीला जर कोणी कंम्लीट नॉन-सेंस, अटर-नॉनसेंस, शीअर नॉनसेंस असे म्हटले तर अपमानाची सीमाच होते.
त्यामुळे कोणा आईने सांगितले नाही तरी राहूल गांधींना ( व आपल्याला ) हे निश्चितच जाणवावे की नॉन-सेंस हा एक शिवीसारखाच अपमानास्पद शब्द आहे.
------------------------------------------